मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, २९ जुलै, २०१८

Starters ते Meddlers!!


माननीय आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य, भारत सरकार
महोदय,

बरेच दिवसापासून ह्या मुद्द्यावर आपल्याशी संपर्क साधावा हा विचार मनात घोळत होता. गेल्या आठवड्यातील तेलंगणा राज्यातील माझ्या व्यावसायिक भेटीनंतर हा विचार पक्का झाला. हा विचार आहे तो स्थानिक समाजातील स्टार्टरचे अधिक प्रमाणात ग्रहण आणि त्या अनुषंगाने उदभवू शकणाऱ्या आरोग्यविषयक समस्या!

सद्यकालीन भारतीय समाजाची आर्थिक स्थिती उंचावत चालली आहे. यामागे कोणत्याही पक्षाचा वगैरे हात नसुन ही कालानुरूप घडलेली घटना आहे. अर्थशास्त्राच्या मुलभूत नियमांनुसार ज्या क्षणी माणसांकडे अन्न, वस्त्र, निवारा या गरजांना मुलभूत स्वरुपात पुर्ण करुनसुद्धा त्यांच्याकडे क्रयशक्ती बाकी राहते. त्यावेळी मनुष्याचं लक्ष चैनीच्या गोष्टींकडे वळते. साधारणतः हाच प्रकार आपल्याला भारतीय मध्यमवर्गीयांच्या बाबतीत घडताना आढळून येत आहे. हाती पैसा खुळखुळत असलेला हा तरुण मध्यमवर्ग एक नव्याने स्थिरावत चाललेल्या जीवनसरणीचा पाठलाग करताना दिसत आहे. यामध्ये फॅन्सी कार, फॅशनेबल कपडे या गोष्टींचा समावेश होतो. ह्यात समाविष्ट करण्याजोगी अजुन एक गोष्ट म्हणजे बाहेर जाऊन चमचमीत पदार्थ खाण्याचं वाढलेलं प्रमाण! 

आता इथं थोडं खोलवर जाऊन पाहुयात. बाहेर जाऊन हॉटेलात चमचमीत पदार्थ खाण्याची पद्धती ही काही अगदी आताची नाही. गेले कित्येक वर्ष आपण भारतीय ते करत आलो आहोत. परंतु गेल्या पाच-दहा वर्षांत एक महत्त्वाचा फरक यात दिसून येतो. बुफे पद्धतीच्या आहाराचे आणि त्यासोबत स्टार्टर्सचे वाढते प्रमाण!! हे बुफे नक्की कधी भारतात सुरू झाले हे मी छातीठोकपणे सांगू शकत नाही. परंतु २००० साली इंग्लंडात असताना तेथे सहा पौंडाला मनमुराद अन्नपदार्थांचा आस्वाद घेण्याची आठवण मी बाळगुन आहे. परंतु यामध्ये सर्व काही मेनकोर्स संबंधित खाद्यपदार्थ असावेत असं मला पुसटसं आठवतं. पण नंतर काळ बदलला.  मध्यंतरीच्या काळात स्टार्टर या प्रकारातील खाद्यपदार्थांनी जनमानसाचा (आणि जनपोटाचा) कब्जा घेतला. 

तुम्ही जिथे बसला आहात तिथं आणुन ठेवलेली कोळशाची शेगडी आणि त्या शेगडीवर लोखंडी सळयांना लावुन आणलेले मसालेदार पदार्थ म्हणजेच स्टार्टर्स! काही स्टार्टर्स तुमच्यासमोर थेट प्लेटमध्ये आणुन वाढले जातात. आता होतं काय की या पदार्थांचं खुप वैविध्य असतं.  बहुतांशी तरुणवर्ग असतो आणि सर्वजण त्या एका पार्टीच्या वातावरणात प्रसन्न मनाने धमाल करत असतात. चर्चेलासुद्धा अत्यंत मजेदार विषय असतात. ह्या सर्व घटकांमुळं आपण नक्की किती स्टार्टर्सचा आस्वाद घेतला आहे याची गणती करणे अशक्य होऊन राहतं. त्यात नॉनव्हेज starters खाणाऱ्यांसमोर अजून एक आव्हान असतं. संपुर्ण नॉनव्हेज स्टार्टर्स जरी त्यांनी चाखुन पाहिले (चाखुन पाहणे हा झाला सौम्य शब्दप्रयोग !!) तरी त्यानंतर काही चमचमीत व्हेज स्टार्टर्स सुद्धा तुम्हाला खुणावत असतात! या सर्व प्रकारामध्ये तुमचं पोट हे गच्च ते अतिगच्च या स्थितीच्या मध्ये पोहोचलेलं असतं. 

पोटात कशीबशी जागा करुन तुम्ही ज्यावेळी सर्व (व्हेज आणि नॉन-व्हेज) स्टार्टसना न्याय देऊन एक सुटकेचा निःश्वास टाकता. त्यावेळी तुमचा एखादा मित्र विचारतो,  "चला आता मेन कोर्सला जाऊयात का?" ह्या क्षणी तुमच्या चेहर्‍यावरील भाव पाहण्यासारखे होत असावेत. तरीसुद्धा एका सामाजिक बांधिलकीच्या दायित्वाला न्याय देण्यासाठी म्हणुन अडखळत पायाने तुम्ही मेन कोर्सपर्यंत जाऊन पोहोचता! (आता या अडखळण्यामागे भरगच्च पोटाचा वाटा किती आणि मनातील अपराधी भावनेचा वाटा किती याविषयी मी काही टिप्पणी करू इच्छित नाही). परंतु एकदा का तुम्ही मेन कोर्सपर्यंत पोहोचलात की तेथील पदार्थांचे वैविध्य पाहून तुमचा मनोनिर्धार ढासळून पडण्याची शक्यता बळावते. तिथं चिकन मटण यांचे बरेच प्रकार त्यांच्यासोबत शाकाहारी पदार्थांचे वैविध्य हे तुम्हाला खुणावत असते. 

जोशी, गाडगीळ मंडळी स्टार्टर्सचा आस्वाद घेतल्यानंतर मेनकोर्सकडे ढुंकूनही पहात नाही! हा त्यांच्या निर्धाराचा विजय!!
सर म्हणतात की तंदूर स्टार्टर्स म्हणून चांगले चायनीज स्टार्ट नको!! आता हे झालं त्यांच्या देशप्रेमाचा प्रतीक!!
संतसुर्य तर बाहेर जास्त अन्नग्रहण करीतच नाही. त्यामुळे स्टार्टर / मेनकोर्स यामध्ये गल्लत होण्याचा संभवच नाही. विनुची सध्याची देहयष्टी पाहता तो बाहेर काही खात असेल असे वाटत नाही. राहता राहिला तो बालक! प्रत्येक खाद्यपदार्थ बनवणाऱ्या खानसाम्याने अगदी मन लावुन  तो पदार्थ बनवला असला पाहिजे. आणि जर आपण त्याला न्याय दिला नाही तर त्या खानसाम्याला कसे वाटेल हा उदात्त विचार करून तो नक्कीच सर्व पदार्थांना न्याय देत असावा!!

अशाप्रकारे मेनकोर्सचा आस्वाद घेऊन झाल्यानंतर आपण आता कोणीतरी मला इथून उचलून घेऊन घरी किंवा हॉटेलात पोहोचवा अशा विचारात असतो. अशा वेळी अजुन एखादा मित्र म्हणतो, "अरे इथले डेझर्ट चांगले आहेत असं म्हणतात! या क्षणी आपली सदसद्विवेकबुद्धी संपुष्टात आलेली असते किंवा आपण अगदी सुस्पष्ट विचार करु लागलो असतो! आता इतका पोटावर अन्याय केलेलाच आहे आणि पुढील काही दिवस आपल्याला नाहीतरी लंघन करावंच लागणार आहे तर मग बिचाऱ्या डेझर्टवर अन्याय कशाला असा विचार करुन आपण डेझर्टच्या दिशेने चालू लागतो. याक्षणी आपण अपराधी भावनेवर पूर्ण विजय मिळवला असल्यामुळे आपण मनसोक्तपणे डेझर्टचा आस्वाद घेतो. इथं गुलाब जामुन, फेरणी, जलेबी, केक,  विविध प्रकारची आईस्क्रीम वगैरे प्रकारांना आपण उचित न्याय देतो. 

माननीय आरोग्यमंत्री, 
आता वळुयात मुख्य मुद्द्याकडे! तरुण पिढीतील आरोग्यविषयक समस्या या भयंकर स्वरुपात वाढीस लागल्या आहेत.  आपण भारतीयांनी गेल्या काही वर्षांत आपल्या आहारपद्धतीत खूप बदल केल्याचं आढळून येतं.  १९७० सालातील अजित वाडेकरसोबत गेलेल्या  इंग्लंड दौऱ्यातील भारतीय खेळाडू पहा किंवा त्या काळातील कोणत्याही बातम्यांची चित्रफीत पहा. त्यावेळी आपण भारतीय सडसडीत होतो. कारण आपण कमी खायचो आणि चीझ वगैरे प्रकारांचं कमी सेवन व्हायचं! पण नंतर आपला संपर्क पाश्चिमात्य लोकांशी अधिकाधिक प्रमाणात येऊ लागला. तेथील थंड हवामानामुळे हे लोक अधिक प्रमाणात मांसाहाराचं  आणि एकंदरीत आहाराचं सेवन करतात. परंतु थंड हवामान आणि त्यांची सक्रिय जीवनसरणी यामुळे ते आपला फिटनेस राखून असतात. आपण त्यांचा त्यांची ही जीवनपद्धती किंवा आहारपद्धती उचलताना हवामानाचा विचार केला नाही. त्याचबरोबर आपल्यातील फक्त मोजक्या लोकांनी सक्रिय जीवनसरणीचा म्हणजेच व्यायामाचा अंगीकार केला आणि त्यामुळे ज्या लोकांनी केवळ आपला आहार वाढविला त्या लोकांमधील आरोग्यविषयक समस्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. 

आता तुम्ही म्हणाल की तू केवळ प्रश्न मांडतोय यावर उपाय काय?  उपाय म्हणायला गेला तर तसा सोपा नाहीये! बफे पद्धतीचं आणि त्यासोबत स्टार्टर्सचे भारतीय मध्यमवर्गीयात पसरलेलं लोण आता थोपवून धरणे शक्य होईल असे मला वाटत नाही. "मी खूप मेहनत करुन (डोकं चालवुन) पैसा कमावतो. त्यामुळे तो मी कशा पद्धतीने खर्च करावा हे मी माझे ठरवणार! त्याबाबतीत तुम्ही कोणी ढवळाढवळ करण्याची गरज नाही!" असेच उत्तर बहुतांशी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर एक वेगळा क्रांतिकारक उपाय मी सुचवू इच्छितो आहे. 

कोणताही माणूस  हॉटेलात गेला असता त्याला पहिला अर्धा तास फक्त मेनकोर्स वाढण्याचं कायदेशीर बंधन प्रत्येक हॉटेलवर घालावं अशी मी मागणी करत आहे. प्रत्येक माणसाने मेनकोर्सच्या किमान दोन प्लेट ग्रहण केल्याशिवाय त्याला स्टार्टर्सचा आस्वाद घेऊन देता कामा नये. स्टार्टर्सचा क्रम बदलल्यामुळं त्यांचं  नावसुद्धा बदलून मेडलर्स (Meddlers) किंवा लुडबुड्या असं करावं.  त्यामुळे स्टार्टर्स सुरुवातीलाच का सर्व केले जात नाहीत असले प्रश्न निरर्थक प्रश्न कोणी विचारणार नाही. 

हा एकंदरीत लेखाचा खटाटोप हा भारतीय जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या उद्देशानं मी केलेला आहे. ही सुचना जर अंमलात आणली गेली तर लोकांच्या तब्येती सुधारुन कन्सल्टिंग डॉक्टरच्या आणि विमा कंपन्यांच्या उद्योगावर गदा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्ही माझ्या सूचनेचा स्वीकार करणार असाल तर त्यासोबत मी माझ्या संरक्षणाची सुद्धा मागणी करत आहे!!

एक जबाबदार नागरिक!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...