मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शुक्रवार, १३ जुलै, २०१८

वसईचा पाऊस आणि व्यावसायिक वर्ग !






गेल्या आठवड्यातील वसई परिसरातील मुसळधार पावसामुळे तिथं पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे वसईतील दैनंदिन जीवनात आणि वसईहून मुंबईला नोकरी, शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या लोकांच्या जीवनात प्रचंड अडचणी निर्माण झाल्या.  वसईहुन मुंबईला शिक्षण, नोकरीसाठी जे लोक प्रवास करतात त्यांच्या आयुष्यातील दैनंदिन जीवनातील अडचणींविषयी मीमांसा करणारी पाच वर्षांपुर्वीची ब्लॉग पोस्ट मी कालच शेअर केली.


आज त्याच विषयावर काहिसं विस्तारानं लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे.  एकंदरीत वसईची सद्यस्थिती ही परिवर्तनाचा मधला टप्पा असं आपण म्हणू शकतो. ६० - ७० वर्षांपूर्वी वसईतील बहुतांशी लोक शेतीवर अवलंबुन होते. परंतु कालांतरानं केवळ शेतीवर उपजीविकेसाठी अवलंबुन राहणे शक्य होणार नाही याची जाणीव वसईतील लोकांना झाली असावी. त्यामुळे शिक्षण घेऊन नोकरी करण्याकडे लोकांचा कल दिसू लागला. त्यावेळी असणारी मुंबईतील लोकांची मर्यादित संख्या आणि परिणामी लोकल गाड्यांतील कमी गर्दी यामुळे वसईवरुन मुंबईला नोकरी करणार हे आवाक्यातील होते. परंतु पुढे मीरारोड, भाईंदर, वसई नालासोपारा आणि विरार या भागातील लोकसंख्या प्रचंड वाढली. त्यामुळे लोकल गाड्यांतून प्रवास विशेषतः गर्दीच्या वेळी जवळपास अशक्यप्राय होऊन बसला आहे. रस्त्याने जावं म्हटलं तर ट्रॅफिक जॅम होण्याची दोन तीन ठिकाणे आहेत जिथे ट्रॅफिक जाम केव्हांही होऊ शकतो. 

आतापर्यंतचा पोस्टचा भाग हा प्रस्तावना असे म्हणता येईल.  आता मुख्य मुद्द्याकडे वळतो. वसईतील जीवनाचा स्तर निर्विवादपणे चांगला म्हणता येईल. आता प्रत्येकाच्या चांगलं जीवन कशाला म्हणावं याविषयीच्या संकल्पना वेगवेगळ्या असतात. पण वसईतील जीवन चांगलं का म्हणावं तर शुद्ध हवा, ताजा भाजीपाला, चांगल्या दर्जाचे मासे /मटण, वाहतूक कोंडीची समस्या नाही या बऱ्याच चांगल्या गोष्टी उपलब्ध आहेत. माणसं बऱ्यापैकी समाधानी वाटतात मला वसईत! परंतु वसईत राहुन जर तुम्हाला उपजीविका करायची म्हटली तर मुंबईच्या तुलनेने कमी संधी उपलब्ध आहेत. वसईतील माणसं बहुधा एका द्विधा मन:स्थितीत सापडलेली असतात असं धाडशी विधान मी करु इच्छितो. वसईला सोडुन नोकरीसाठी मुंबई / दुसऱ्या शहरात वास्तव्य करावं की वसईतल्या वसईत राहून उपलब्ध व्यवसायिक संधींचा वापर करावा हा तो संभ्रम.  यातील कोणता निर्णय घ्यावा हे प्रत्येकाचं व्यक्तिस्वातंत्र्य आहे. 

आता ह्या सर्व प्रकाराकडं दुसऱ्या दृष्टीने पाहुयात ! एका शहराची एक विशिष्ट आयडेंटिटी किंवा ओळख असते. त्या शहरात बुद्धिजीवी वर्गाला राहण्यासाठी अनुकूल घटक आहेत की नाही हा त्या शहराची ओळख बनवण्यात महत्त्वाचा घटक आहे. आता वसईतील बुद्धिजीवी लोकांच्या दृष्टीतून पाहिले असता त्यांना दैनंदिन जीवनात कोणत्या प्रकारचा अनुभव मिळतो ते पाहूयात. दिवसाचे सरासरी तीन ते चार तास प्रतिकुल प्रवासात व्यतित करावे लागतात. वसईतील विद्युत पुरवठा पुर्णपणे नियमित केव्हाच नसतो. त्यावर उपाय म्हणून बऱ्याच जणांनी इन्वर्टर बसवले आहेत इंटरनेट कनेक्शनचा स्पीड असूनही सुधारण्यास वाव आहे.  तुमची कंपनी तुमच्याकडून उपलब्धतेची एका विशिष्ट पातळीवर अपेक्षा बाळगून असते. एखादा महत्त्वाचा कॉल तुम्हाला घरुन घ्यावा लागतो आणि दुनियाभरातील लोकांना २५ MB साईझचे प्रेसेंटेशन संगणकावरुन शेयर करावं लागतं त्यावेळी हे सर्व घटक व्यवस्थितपणे काम करत असणे आवश्यक असते. कंपनीच्या दृष्टीकोणातून पाहिलं असता तुमच्या घरी असलेली विजेची, इंटरनेटची उपलब्धता याबाबतीत घरून काम करण्यास अडचणी येत असतील तर ती कंपनीची समस्या नसून तो प्रश्न तुमचा असतो आणि तो तुमचा तुम्ही सोडवायचा असतो. आता प्रत्येक शहरातील बुद्धिजीवी व्यावसायिकाला या आधुनिक काळातील या मूलभूत सोयींची उपलब्धता करुन देण्यात शहरातील प्रशासनाची सुद्दा जबाबदारी नक्कीच असते. 

आता या बुद्धिजीवी वर्गाची एक खासियत आहे. यातील बहुतांशी लोक आपल्या आजूबाजूची परिस्थिती बदलण्याचा स्वतःहून प्रयत्न करीत नाहीत आणि ते का करीत नाहीत याची त्यांच्याकडे शेकडो कारणे असतात.  एक गोष्ट मात्र त्यांच्या बाबतीत काहीशी अप्रत्यक्षरीत्या घडत असते. जर एखाद्या शहरात किंवा विभागात त्यांच्या वास्तव्यासाठी आणि व्यावसायिक जीवनातील त्यांच्या कामगिरीला अनुकूल असे घटक उपलब्ध नसतील तर ते हळूहळू त्या भागातून काढता पाय घेण्याची मानसिकता दर्शवितात. आता त्या भागातील लोकप्रतिनिधींना किंवा प्रशासनाला हा बुद्धीजीवी वर्ग किती महत्त्वाचा वाटतो यावर त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कितपत प्राधान्य दिले जाते हे अवलंबून असतं . 

आता मी जो काही बुद्धिजीवी वर्ग असे मगापासून म्हणत आहे त्यात सुद्धा अनेक प्रकार असतात. यातील काहीजण एकदम स्ट्रॅटेजिक डिसिजन (महत्वाचे धोरणात्मक निर्णय) घेण्यात सहभागी असतात. त्यांच्या बुद्धीच्या पातळीमुळे त्यांना दररोज आठ तास काम करणार गरजेचं नसतं. त्यांच्या बुद्धीने एखादी विशिष्ट बुद्धिमान (brilliant) कल्पना पाच मिनिटात दिली तर त्याच्या जोरावर ते पुढील आठवडा महिना सुद्धा आरामात निभावून नेऊ शकतात.  असा वर्ग आरामात वसईत वास्तव्य करू शकतो आणि व्यावसायिकजीवन आणि त्यातील सर्व जबाबदाऱ्यासुद्धा निभावू शकतो.  परंतु दुसरा एक गट असा असतो की ज्यामध्ये तुमची दिवसातील किमान आठ ते दहा तास उपलब्धता हा एक महत्त्वाचा घटक तुमचे व्यावसायिक महत्त्व ठरवतो आणि हा एक असा वर्ग आहे ज्याला मुंबईला प्रवास करण्यात येणाऱ्या अडचणी आणि वसईत राहून तोंड द्याव्या लागणाऱ्या वीज आणि इंटरनेटची अनियमित उपलब्धता या घटकांचा मोठा फटका बसू शकतो. गेल्या काही दिवसांत वीज, इंटरनेट नसल्यानं आणि मुंबईला जाऊ न शकल्याने ह्यातील कितीजणांनी व्यावसायिक तोटा स्वीकारला ह्याची चाचपणी केली तर काही धक्कादायक आकडेवारी समोर येण्याची शक्यता जास्त आहे. 

ह्या आठ - दहा तास काम करुन आपलं व्यावसायिक आयुष्य जगणाऱ्या बुद्धिजीवी वर्गाच्या वास्तव्यासाठी वसईत अनुकूल वातावरण निर्माण करणं ह्यासाठी बऱ्याच घटकांना एकत्र येऊन पुढील काही वर्षे काम करावं लागणार आहे. प्रयत्नांची प्रामाणिकता आणि मनोबल हे दोन घटक ह्या प्रवासातील फार महत्वाचे घटक ठरणार आहेत. 

जाता जाता दिवसाला तीन-चार तास प्रचंड गर्दीत प्रवास करुनसुद्धा  लोक वसईला येणं का पसंत करतात हे जाणुन घ्यायचं असेल तर वसईतील नामांकित छायाचित्रकार प्रितम पाटील ह्यांनी काढलेलं हे छायाचित्र पहा!



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...