मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, ८ जुलै, २०१८

VNU


श्री गणेशाय नमः !!

एखाद्या विषयाला गवसणी घालण्याची आपली जर कुवत नसेल तर त्याच्या नादाला लागु नये हे माझं तत्त्व!  त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती आणि तिचं व्यक्तिमत्व इतकं बहुआयामी असेल की जे समजायला आपल्याला कठीण पडणार असेल तर त्यावर पोस्ट लिहायची धारिष्ट्य करु नये असा खरा तर माझा समज! परंतु एकदा मजेमजेत मी तुझ्यावर पोस्ट लिहितो म्हटल्यावर विनूने ते त्याच्या मनाच्या असंख्य कोपऱ्यांपैकी एका कोपऱ्यात घट्ट लिहुन घेतले . ह्या माणसाची निरीक्षणशक्ती अफाट ! मी साधारणतः शनिवारी मोठाले ब्लॉग लिहितो हे त्याच्या ध्यानात आलं असणार. त्यामुळे काल रात्री त्यानं विचारणा केली AP माझ्यावरचा ब्लॉग झाला की नाही लिहुन!  आता त्यानंच  विचारला म्हणजे ब्लॉग लिहिण्याचा प्रयत्न जरी पूर्ण तयारीनिशी नसला तरी तो खपवून घेतला जाईल यामुळे आजचं हे धारिष्ट्य !

विनायक सुभाष पंडित! अग्निपथमधील अमिताभ बच्चनच्या विजय दीनानाथ चौहान नावाइतकेच किंबहुना अंमळ जास्तच भारदस्त! विनुचे मुळचे गाव चिंचणी जवळचे वरोर! पंडित कुटुंबीय हे एकंदरीत संस्कृतीचे मोठे पुजारी असावेत असा विनूकडे पाहून अंदाज बांधता येतो. त्याचे आजोबा राजकारणी (११ वर्षे सरपंच) आणि समाजकारणी असल्यानं गावात त्यांचा खुप मान आणि दरारा होता. तेथील मंदिर उभारण्यात सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा होता.  विनुची आई मुळ वसईची आणि तिची नोकरीची शाळा दहिसरला आणि वडिलांची बदली पंचायत समिती ठाण्याला झाली. ह्या कारणास्तव विनुचे आई वडील वसईत स्थानिक झाले. विनू मात्र लहानपणापासून जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा गावी जाऊन जायचा रहायचा. त्याच्या म्हणण्यानुसार दीड-दोन वर्षाचा असल्यापासून तिथं जाऊन तो एकटा राहायचा. आता विनूला ज्याने कोणी जवळून पाहिलं आहे किंवा त्याचा फेसबुक अवतार अनुभवला आहे त्या सर्वांना विनूवर आणि त्याच्या बोलण्यावर कितपत विश्वास ठेवावा ही नेहमीच संभ्रमात  टाकणारी बाब आहे. पण दीड वर्षाचा बाळ विनु वरोर गावी एकटा जाऊन रहायचा ही विश्वास ठेवण्याजोगी बाब आहे. एक मात्र खरं की विनूला आपल्या गावाची प्रचंड ओढ आहे आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या रितीभाती अगदी त्यांचा पूर्ण अर्थ समजावून घेऊन परिपुर्णपणे पार पाडण्याकडे त्याचा कल असतो. सकाळी साडेतीन वाजता उठून पूर्ण चालीरीतिपुर्ण दिवाळीची पहिली आंघोळ पार पडणारा विनु  हा एकमेव माझ्या माहितीतील तरुण असावा. त्याच्या पहिल्या आंघोळीच्या उघड्याबंब फोटोंमुळे त्याची तुलना सलमान खानशी होऊ लागली असावी असा मला संशय आहे. विनूला गरिबांचा सलमान खान म्हणण्यात येतं त्यांना सलमान खानचा तेरे नाम हा चित्रपट ११३ वेळा पाहिला आहे असे त्याचे म्हणणे आहे. 

आत्ता इथे जरी मी विनू म्हणत असलो तरी खरं ते आहे VNU! यामध्ये पहिला V विनायकचा, N निहिरा आणि U उमिकाचा! हे सर्व जुळवून आणण्यासाठी ह्या पठ्ठ्यानं आपल्या मुलीचं नांव U वरुन ठेवण्याचा अट्टाहास धरला असावा.  ह्याने शालेय शिक्षण घेतलं ते वसईच्या RP  वाघ हायस्कूलमध्ये! बाकी सर्व आम्ही मित्रमंडळी न्यू इंग्लिश स्कूलची असल्याने अधुनमधुन हा आपल्यातला नाही अशी भावना आमच्यात निर्माण होते. परंतु या भावनेनिमित्त निर्माण झालेल्या आमच्या दुजाभावाला तो एकटा पुरून उरण्याची क्षमता तो बाळगुन आहे. त्याला RP  वाघची मंडळी एकत्र का आणता आली नाहीत असा मला मनात पडलेला प्रश्न कधीतरी त्याला विचारावासा वाटतो परंतु त्याविषयी तो काही फारसं वाईट वाटून घेणार नाही. ही न्यु इंग्लिश स्कुलची पोर इतकी हुशार कशी ही शंका लहानपणापासुन त्याच्या मनात खदखदत असली तरी ती प्रत्यक्षात बोलुन दाखवेल तो विनु कसला? 

विनूची विनोद बुद्धी जबरदस्त आहे आणि या विनोदबुद्धीला मराठी भाषेचे भाषेवरील त्याच्या प्रभुत्वाचे सहाय्य लाभले असल्याने तो जातिवंत विनोदाची हमखास पेरणी करू शकतो. त्याच्या तोडीस तोड विनोद करणारे हेमंत डोंगरे सर आणि राहुल ठोसर आणि बाकी काही त्यांची मित्रमंडळी एकत्र आली की मग एकमेकांना देण्यात येणाऱ्या कोपरखळ्यांची बहार उडवून दिली जाते. परंतु यातील काही संज्ञा ह्या केवळ त्या निवडक लोकांनाच माहीत असतात त्यामुळे आपल्याला मात्र केवळ त्या कळल्यासारखं करुन हसण्याचे नाटक करावं लागतं. 

स्पष्ट सांगायचं झालं तर काही महिन्यांपूर्वी विनु स्थूल होता. त्याला त्याआधी सुद्धा बऱ्याच जणांनी या वास्तवाची जाणीव करून दिली असणार. म्हणा तो ज्या ग्रुपमध्ये वावरतो तिथं एखादं सत्य सभ्यपणे सांगण्याची पद्धत नाही किंवा तिथं सत्य उतरण्याआधीच त्या ग्रुपकडून तुम्हाला ते भयानक परखडपणे सांगितलं जाण्याची पद्धत आहे. त्यामुळे तो स्थूल होण्याच्या बरेच आधी त्याला हे सांगण्यात आले असणार. त्यानं कित्येक वर्ष त्यावर काहीच केलं नव्हतं. परंतु सहा महिन्यांपूर्वी नक्की काय झालं कुणास ठाऊक! विनूने फिटनेसचे वेड डोक्यात घेतले. सकाळचा सूर्योदय ज्यांना गेले कित्येक वर्षे पाहिला नसेल असा हा विनू सहा वाजता उठून सायकलिंगला जायला लागला. वसईतील जागतिक दर्जाचे बॅडमिंटन खेळाडू हेमंत डोंगरे सर यांच्याकडून बॅडमिंटनची शटल्स मिळावीत म्हणून त्यांच्या मनधरण्या करू लागला. डोंगरे सरांनी शटल्स देणे जरी त्याच्या हाती नसले तरी सायकलिंग करणा मात्र त्याच्या हाती होतं त्यामुळे जिद्दीने सायकलिंगचा पाठपुरावा करून त्यांना गेल्या सहा महिन्यात तब्बल 20 किलो वजन घटवले. विनु हा पट्टीचा पोहणारा आहे. आफ्रिका खंडातील अमॅझॉन खोऱ्यातील विहिरीत दोन वर्षांपुर्वी वसईतील काही मंडळी अत्यंत धाडस करुन पोहण्यास गेली होती. त्यावेळी लाल शर्टात असणारा हा विनु! विहिरीच्या पाण्यात बोचकं वगैरे प्रकारांचं प्रदर्शन करण्यात विनूचा हातखंडा आहे हे मी ऐकुन आहे !


मित्रांच्या वाढदिवसांची फेसबुकवर अतिशोयक्ती अलंकारयुक्त आणि विनोदाचे कारंजे निर्माण करणारी पोस्टर्स बनवण्यात विनूचा हातखंडा आहे. जोपर्यंत विनुचे पोस्टर येत नाही तोपर्यंत लोकं बेचैन होऊन वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरू करीत नाहीत. त्याच्या या पोस्टर्समुळे वसईमध्ये तुम्हाला असंख्य जागतिक दर्जाचे लेखक, व्यवसायिक, खेळाडू वगैरे असण्याचा भास होईल. ते जे मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरेचे प्रकार म्हणतात ना! त्याचा वापर करून जर कोणी विनूच्या फेसबुक पोस्टचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला तर ह्या सर्व पोस्ट पृथ्वीवरील माणसाच्या नसून हा मनुष्य आणि त्याची मित्रमंडळी मागची काही शतकं आणि पुढची काही दशके यामध्ये वेगाने पुढे मागे करीत आहेत असा त्यांना भास होण्याची शक्यता आहे. 

विनू स्वतःचे लग्न हे जमवून म्हणजे घरच्यांनी जमवून दिलेले लग्न असे म्हणतो. परंतु याविषयीदेखील शंका घेण्यास प्रचंड वाव आहे. घरच्यांकडून स्थळ आले आणि मग मी ते पुढे नेले असे तो म्हणतो. आता त्याच्या या विधानाची खातरजमा जमा करुन घेण्यास अजिबात वाव नाही. काही काळापूर्वी म्हणजे अगदी गेल्यावर्षीपर्यंत विनू विनोदी गाणी बनवून की फेसबुक वर टाकायचा. त्याची गायन कला आणि विनोदबुद्धी यांचा उत्तम संगम या गाण्यांमधुन आढळून येत असे. परंतु पूर्ण धमाल करणारा तरुण  ते एक जबाबदारीने वागणारा मध्यमवर्गीय गृहस्थ हा जो विनूचा प्रवास गेल्या काही महिन्यांपासून चालू झालो आहे त्यामुळे त्याचे फेसबुक वरील हे गायन संपले असे मानण्यास वाव आहे सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय काय या गाण्याचे विनू वर्जन तुम्हाला कुठे सापडलं तर पहा!!!

विनूला राजकारणाविषयी भरपूर काही माहिती आहे. तो एका विशिष्ट पक्षाशी ओढ बाळगून आहे आणि त्यामुळे त्या पक्षाचा तो हिरीरीने वैयक्तिक पातळीवर पुरस्कार करतो किंवा त्यांच्यावरील टीकेला तो सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु या सर्व प्रकारात तो समोरचा माणूस दुखावला जाणार नाही याची काही विशिष्ट मर्यादेपर्यंत काळजीसुद्धा घेतो. राजकारणाविषयी त्याच्या मनात प्रचंड ओढ असली तरीसुद्धा राजकारणासाठी लागणारा धूर्तपणा माझ्यात नाही असे तो म्हणतो आणि त्यामुळे मी राजकारणापासून दूर राहतोय असे तो म्हणतो काही प्रमाणात ते सत्य असावे. विनूच्या अंगी छायाचित्रणाची सुद्धा कला आहे परंतु आपला स्वयंघोषित छायाचित्रकार मित्र राहुल ठोसर याच्या फेसबुक लाईक्स वर गदा येऊ नये म्हणून तो आपली छायाचित्रकारिता आणि त्याचे सोशल मीडियावरील प्रदर्शन मर्यादित ठेवतो. तरीदेखील त्याचे छायाचित्रकारितेतील कौशल्य अशा फोटोमधुन डोकावत राहते. 


वसईतील कला क्रीडा महोत्सवाच्या आयोजनात तो सक्रिय सहभाग घेतो. विनुची भारतीय रितीविषयीची ओढ त्याच्या विविध सामाजिक / सांस्कृतिक उपक्रमांतून परिवर्तित होते. अस्तंगत होत चाललेल्या ढोल संस्कृतीला पुनर्जीवन देण्याच्या उदात्त हेतूनं स्थापन झालेल्या वसईतील ढोल पथकाचा तो सक्रिय सभासद आहे. महाराष्ट्रदिन, दसरा अशा पवित्र सणांच्या दिवशी हे ढोल पथक वसईच्या मुख्य भागातुन मिरवणुक काढतात. त्या निमित्त विनुची फेसबुकावरील ही पोस्ट त्याच्या मराठीवरील प्रभुत्वाची जाणीव करुन देते. 

गर्व आहे #महाराष्ट्रीय असण्याचा
अभिमान आहे #ढोल_ताशा च्या कलेचा
जपतो आपली महाराष्ट्राची #संस्कृती
#निष्ठा आहे आपल्या #मराठी मातीशी
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा

ह्या माणसाचं आधीचं स्थूलपण त्याच्या खवय्येपणातुन आलं आहे. पारंपरिक पदार्थाचं त्याला भारी वेड असावं. यंदाच्या उन्हाळ्यात त्याच्याकडुन (म्हणजे अर्थात त्याच्या फेसबुकवरील पोस्टवरुन) मला ही रायत ह्या पदार्थाची रेसिपी कळली. 

हॉटेलमधले पंजाबी, गुजराथी, मारवाडी पदार्थ आवडीने खाणारा पण घरच्या #पारंपारिक खाद्यपदार्थांवर अक्षरशः हात,बोट चाटून/पुसून यथेच्छ #ताव मारतो तो खरा #मराठी. आपल्या पारंपारिक महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांची चव काही औरच..

छोटे गावठी आंबे पिकायला लागले की, आमच्या घरात आठवड्यातून किमान ५-७ वेळा बनणारा पदार्थ म्हणजे रायत.

आंब्याच्या रसात #नारळाचे दूध टाकून त्यात #मिरची_पूड, #मीठ, #गूळ आणि #मोहरीची पावडर टाकून एकत्र केले की झाले रायत. पोळी, भाता सोबत खायला योग्य. पण वाटीत याच्या रसात बुडवलेल्या #बाठ्यासोबत अगदी #बोट चाखून, चोखुन खाण्याची धन्यता काही वेगळीच..

एप्रिल - मे मोसमातील अजूनही बरेच पदार्थ बनायचे बाकी आहेत. आधी #आईने आणि आता #बायकोने असे वेगवेगळ्या मोसमातील पदार्थ बनवण्याची #परंपरा टिकवून ठेवली असल्याने त्याची चव आणि मजा घ्यायला मिळणार आहे. त्यामुळे दोघांचेही #आभार..

विनु यंदाच्या मोसमात खुप बिझी असणार आहे. नावातच गणपती असणारा विनु परम गणेशभक्त! वसईत त्यानं शाडू मातीच्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या सुबक गणेश मुर्ती उपलब्ध करुन दिल्या आहेत. 
 

ह्या उपक्रमासाठी आणि एकंदरीत भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी विनुला आणि त्याच्या कुटुंबियांना मनःपुर्वक शुभेच्छा !

२ टिप्पण्या:

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...