मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, १५ ऑक्टोबर, २०१७

थोरत्व - कालपरत्वे



वेताळ  - " हल्ली  या पृथ्वीतलावर थोर लोकांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होतंय असं तुलाही वाटतंय का?" 

वेताळाच्या ह्या अचानक आलेल्या ह्या प्रश्नानं विक्रम आश्चर्यचकित झाला. 

विक्रम  - "थोर ह्या शब्दाची नक्की व्याख्या काय?" विक्रमाने आपल्याला विचार करायला वेळ मिळावा म्हणुन तात्पुरता प्रश्न विचारला. 

विक्रमाची ही वेळकाढुपणाची चाल वेताळच्या ध्यानात आली होती. तरीही तो उत्तरला. 

वेताळ  - "थोरत्व हे दोन प्रकारचं असतं . एक जनांनी मनापासुन स्वीकारलेलं आणि दुसरं एखाद्या व्यक्तीनं स्वतःविषयी सोयिस्कररित्या मानलेलं ! पूर्वीच्या आणि सद्ययुगातील थोरत्वाची व्याख्या बदलत चालली आहे."

विक्रम - "तुम्ही  मला  तुम्हांला  हव्या असलेल्या  उत्तराच्या  दिशेनं  घेऊन  जायचा प्रयत्न  करीत  आहात !  तरीही मी  माझं  खरंखुरं मत  मांडु इच्छितो. थोर लोकांच्या विविध श्रेणी आहेत. भारतदेशी ज्याप्रमाणं विविध स्तरावर क्रिकेट खेळलं जातं तसंच  थोरत्वाचे सुद्धा आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय , राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय आणि अगदीच राहवलं नाही तर गल्लीस्तरीय असे अनेक प्रकार आढळुन येतात. 

वेताळ  - "असं  होय ?" (विक्रमला स्फुरण मिळुन त्यानं  अधिक  जोशात आपलं  म्हणणं पुढे चालु ठेवावं ह्यासाठी हा प्रयत्न होता.)

विक्रम  -  "थोरत्व मिळण्याचा निकष  पुर्वी फार कडक असायचा . आणि थोरत्व बहाल करण्याचा अधिकार त्या त्या क्षेत्रातील मोजक्या अधिकारी मंडळींकडे राखीव असे आणि  एखाद्या  व्यक्तीनं  विशिष्ट  क्षेत्रात अनेक दशके  सातत्यानं अभिजात कामगिरी केल्याशिवाय ही तज्ञ मंडळी त्या व्यक्तीला थोरत्वाच्या पहिल्या पायरीवर सुद्धा उभं करीत नसत. पण हल्ली मात्र असं होतं नसावं!"

वेताळ - "तुला असं का वाटतंय विक्रम?"

विक्रम - " हल्लीसुद्धा ही तज्ञ मंडळी अस्तित्वात आहेत. पण त्यांचा आवाज / त्यांचं मत सोशलमीडियावरील कोलाहलात अगदी क्षीण झालेलं आहे. त्यामुळं जरी अभिजात थोरत्व बहाल करण्याचा अधिकार ह्याच मंडळींकडे असला तरीसुद्धा बाकीच्या पातळीवरील थोरत्व बहाल करण्यासाठी सोशल मीडियावरील थोरत्व अभिलाषी गुडघ्याला बाशिंग लावुन बसलेली मंडळी आणि त्यांचे समर्थक अगदी उतावीळच आहेत. आणि एकच गोष्ट सातत्यानं सांगितली की लोकांचा त्यावर विश्वास बसतो ह्या उक्तीनुसार अशा नवथोर लोकांच्या संख्येत भर पडत चालली आहे."

वेताळ  - "हं  - तु आतापर्यंत अगदी एखाद्या विद्वानासारखं बोलतोयस , पण मला समजण्यासाठी काही प्रत्यक्ष उदाहरणं देशील  का ?"

विक्रम - " खरंतर कोणाची नावं घेणं  योग्य नव्हे! पण णुनु कपुर, महागुरू ह्यांच्याविषयी योग्य आदर बाळगुन सुद्धा त्यांना थोर  मानायला मनापासुन मी तयार नाही . ९० च्या कालावधीत ह्या दोघांची जी रुपं पाहिली होती ती लक्षात ठेवता आणि त्यामुळं त्यांनी हल्ली कितीही आव आणला तरी मन मात्र संपुर्णपणे त्यांना  थोर म्हणुन स्वीकारायला तयार होतं नाही ! सुहाना सफरमध्ये णुनु  ज्याप्रकारे आव आणुन आधीच्या काळच्या आठवणी आणतो ते पाहुन किंवा नवशिक्या कलाकरांना महागुरुंनी दिलेल्या टिप्स पाहुन कधी कधी त्यांच्या  self - proclaimed अर्थात स्वयंघोषित थोरत्वाविषयी शंका घ्यावीशी वाटते  "

वेताळ - " हं , म्हणजे  हा एकंदरीत  चुकीचा  प्रकार आहे  तर ! "

विक्रम - " अगदी पुर्णपणे  चुकीचा  म्हणता येणार नाही. कारण पुर्वी एखाद्या क्षेत्रात एका व्यक्तीनं आपलं थोरत्व सिद्ध केलं की मग त्या वटवृक्षाच्या छायेखाली कित्येकजणांचे कौशल्य संधीच्या अभावी पुर्णपणे भरारत नसे ! लोकांना एका क्षेत्रात केवळ एकाच थोर व्यक्तीची इतकी सवय होऊन जाई की बाकीचं कोणी ह्या क्षेत्रात काही चांगलं करु शकतो ह्यावर त्यांचा विश्वासच बसत नसे ! जसे की पद्माकर शिवलकर अर्थात पॅडी  ह्यांची झाकली गेलेली कला !"

वेताळ- " असे हो! पण ह्या पोस्टच्या सुरुवातीला लेखणीचे चित्र कसे बरे ?"

विक्रम  - "आपली  ही गोष्ट  महाराष्ट्रदेशी  लिहिण्याचा प्रयत्न एक नवलेखक  करीत आहे. त्याच्या मनात ही भावना किमान गल्लीस्तरीय पातळीवर निर्माण झाली असावी . आणि त्यासाठी हे चित्र !"

वेताळ - "धन्यवाद विक्रम , पण तु आपलं मौन मोडलंस . मी हा निघालो !"

विक्रम  विक्रम वेताळ वेताळ ....  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...