मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०१७

HeatMap


गेले कित्येक वर्षे HeatMap ह्या संज्ञेचा आणि माझा निकटचा संबंध आहे. एखाद्या टीमची विविध विषयातील तज्ञपातळी आलेख रुपात मांडण्यासाठी ह्या संकल्पनेचा बऱ्याच वेळा वापर केला जायचा आणि मग आलेखरुपात मांडल्यामुळं एक संघ म्हणुन ज्या काही कमकुवत बाबी आहेत त्या अगदी प्रकर्षानं डोळ्यासमोर उभ्या ठाकतात. 

आज मात्र काही वेगळ्या संदर्भात ही पोस्ट ! मंगळवारी रात्री म्हणजे धनत्रयोदशीच्या रात्री ऑफिसातुन वसईला येण्यासाठी ऑफिसच्या कॅबचा आधार घेतला. सहसा मी ही कॅब वापरत नाही, जवळपास दीड वर्षाने वापरली. मुंबई माणसांनी / वाहनांनी किती दाट भरुन गेली आहे ह्याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर रात्री साडेआठ नंतर इनऑर्बिट मालाडच्या परिसरातुन बाहेर पडून दहिसर टोलनाक्याच्या दिशेने कुच करण्याचा प्रयत्न करावा. आपलं ड्रायव्हिंग आणि अशा कुशल लोकांचं ड्रायव्हिंग ह्यातील फरक लगेचच जाणवतो. त्यानं आतल्या रस्त्यानं वगैरे गाडी शिताफीनं पश्चिम द्रुतगती महामार्गावर आणली. इथं आल्यावर मात्र त्याचा नाईलाज झाला. प्रचंड संख्येतील वाहनं वेगानं उत्तर दिशेला जात होती. जिथं कुठं थोडी मोकळी जागा मिळेल तिथं आपलं वाहन पुढे दामटायचा प्रयत्न करीत होती. हल्लीच्या पद्धतीनुसार माझे सहप्रवासी आपल्या भ्रमणध्वनीच्या स्क्रिनशी वार्तालाप करण्यात मग्न होते. मी जिथं बसलो होतो तिथुन मला ड्रायव्हरचे डोळे बरोबर दिसत होते. त्याच्या बुबुळांची अगदी वेगानं हालचाल होत होती. दोन्ही बाजूनं, मागुन येणाऱ्या वाहनांकडे तो नजर ठेवत होता. तीच परिस्थिती आजुबाजूच्या वाहनाच्या ड्रायव्हरची ! 

मनातल्या मनात मी दोन हीटमॅप काढले. त्या परिसरातील लोकसंख्येच्या घनतेचा आणि दुसरा त्या परिसरातील माणसांच्या तणावपातळीचा ! दोन्ही आलेख अगदी गडद लाल आले. बहुदा गुगल मॅपशी हे समप्रमाणात होते. दहिसरचेकनाका पार केला आणि मग वाहनं वेगानं पुढे सरकायला लागली. आतापर्यंत निमुटपणे सारथ्य करत असलेल्या ड्रायव्हरच्या नजरेत सुद्धा काहीसा मोकळेपणाचा भाव आला. थोड्या वेळानं मग कॅबने महामार्ग सोडला आणि वसईफाट्याचे वळण घेतलं. मग हवेतला थोडा थंडावा जाणवला म्हणजे तापमानाचा हीटमॅपसुद्धा सुद्धा हिरवागार होत चालला होता. 

गेले दोन दिवस मी मस्त दिवाळीची सुट्टी अनुभवत आहे. हिटमॅपच्या हिरव्यागार क्षेत्रात वावरत आहे. बघताबघता सुट्टी संपेल आणि मग पुन्हा गर्दीच्या मुंबईत जाणं भाग पडेल. एक गोष्ट लक्षात येते हिटमॅपच्या हिरव्यागार क्षेत्रात सतत राहण्याची क्षमता सुद्धा कमी झाली आहे. चार - पाच दिवस झाले की मुंबई पुन्हा खुणावते. 

पोस्टचा सारांश एकच - आपल्या सभोवतालच्या वातावरणातील घटकांचा अभ्यास करुन ज्यामुळं (ह्यात व्यक्ती, ठिकाणं वगैरे घटकांचा समावेश होतो) आपल्याला तणावसदृश्य भावना निर्माण होते त्याचा एक अदृश्य हीटमॅप मनातल्या मनात आखलेला असणं उत्तम असतं. एकदा का हे घटक माहित झाले की त्यांना कसं टाळायचं किंवा अगदी नाईलाजानं त्यांच्याशी मुकाबला करावा लागला तरी त्या लाल क्षेत्रातुन झटपट कसं बाहेर पडायचं किंवा त्यात राहूनसुद्धा कमीतकमी कसा त्रास करुन घ्यायचा ह्या विषयी शांतपणे विचार करणे आपल्याला सहजसाध्य होतं. 

(तळटीप - वसईत दिवाळीत फटाके वाजवले जाण्याच्या घटनेचा माझ्या हीटमॅपमधील माझं अस्तित्व हिरव्या क्षेत्रात असण्यावर काडीचाही फरक पडला नाही ) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...