सोप्या गोष्टींच्या बाबतीत आपण एकदा का त्यांचा अनुभव घेतला की त्या अनुभवांच्या आधारे भविष्यात आपण ती गोष्ट घडत असताना त्याच्या परिणामाची (Outcome / Result) सहज अटकळ बांधु शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर एखादी गोष्ट उंचावरुन खाली सोडली की ती जमिनीवर पडायलाच हवी, काचेवर दगड मारला आणि ती सर्वसामान्य काच असेल तर ती फ़ुटायलाच हवी वगैरे वगैरे. गणित आणि विज्ञान ह्यांच्या बाबतीतसुद्धा काही बाबतीत आपण समीकरण, सुत्र (Formula) सहजासहजी मांडु शकतो.
पण जीवन नेहमीच सोपं नसतं. आपल्या अवतीभोवती काही क्लिष्ट गोष्टी सुद्धा असतात. भारतासारख्या खंडप्राय देशात वार्षिक पावसाचा अंदाज बांधणं, एखाद्या ठिकाणी भुकंपाची शक्यता वर्तविणे ह्या गोष्टी बऱ्याच क्लिष्ट आहेत. क्लिष्टता येते ती दोन बाबतीत
१. पाऊस, भुकंप ह्यासारख्या घटनांवर परिणाम करु शकणाऱ्या सर्व घटकांना ओळखुन काढणं.
२. ह्या सर्व घटकांना ओळखुन काढल्यावर मग त्यांच्यातील अन्योनसंबंध प्रस्थापित करुन त्याच एखादं सुत्र किंवा समीकरण बनविणं.
आतापर्यंत माणसाची बुद्धिमत्ता अशा क्लिष्ट गोष्टींच्या बाबतीत अचुक सूत्र, समीकरण प्रस्थापित करण्याइतकी प्रगत झाली नाही. त्यामुळं मग माणसाचा कल आपणच निर्माण केलेल्या संगणकांचा वापर करुन ह्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याकडे वळतो. इथं अचुक सुत्र, समीकरण नसल्यानं ह्याऐवजी मॉडेल ह्या प्रकाराचा वापर केला जातो. ह्या मॉडेल्सना आतापर्यंतची सर्व माहिती / डेटा आणि त्यावेळी आलेले रिझल्ट्स (निकाल) पुरवले जातात. संगणकाने विकसित केलेली ही निर्णय घेण्याची बुद्धिमत्ता ढोबळमानाने Artificial Intelligence ह्या नावानं ओळखली जाते. आणि ह्या क्षमतेचा वापर करुन प्रचंड प्रमाणातील माहितीचे पृथ्थकरण करुन त्या घटनेच्या भविष्यातील शक्यतेचे निदान करण्याच्या तंत्रास ढोबळमानाने Machine Learning असं म्हटलं जातं. ह्यातसुद्धा दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारची मॉडेल्स (Unsupervised Models) फक्त input डेटाचा वापर करुन निकालाची शक्यता वर्तवितात तर दुसऱ्या प्रकारची मॉडेल्स (Supervised Models) input आणि output ह्या दोन्ही माहितीचा वापर करुन निकालाची शक्यता वर्तवितात.
सुज्ञ वाचकांनी आतापर्यंत ओळखलंच असेल की ह्या सर्व प्रकारात वर्तविलेली निकाल १००% अचुक असण्याची शक्यता विरळच. जे मॉडेल अधिकाधिक अचुक निकाल वर्तवु शकेल ते उत्तम मॉडेल!
आता आदित्य स्पेशल ! केवळ वरील तांत्रिक माहिती द्यायची असती तर मी ही पोस्ट लिहिली नसती. ह्याविषयावर शेकडो तज्ञ लोक बसली आहेत आणि मी वर दिलेल्या वरवरच्या माहितीत ते चुका काढतीलही. माझा मुद्दा आहे वेगळाच ! बऱ्याच वर्षांपासुन माझ्या मनात ही शंका होतीच. आता हे AI / ML प्रकरण जास्त तापायला लागल्यापासुन माझ्या मनातील ह्या शंकेनं जोरदार बळ पकडलं आहे.
आपलं मनुष्यजातीचं ह्या भुतलावरील अस्तित्व हा आपल्याहुन बुद्धिमान शक्तीचा खेळ आहे. आपण सर्व मॉडेल्स आहोत. मॉडेल्स म्हणजे तसली मॉडेल्स नव्हेत तर आपण प्रयोगशाळेतील पात्र आहोत. चांगल्या प्रकारची एक शक्ती आणि वाईट प्रकारची एक शक्ती - ह्या दोघांनी आपापले हस्तक आपल्या रुपानं ह्या पृथ्वीवर पाठवले आहेत. आणि हे Supervised Model आहे. आपण आयुष्यभर सर्व अनुभव गोळा करतो, शिकतो. ह्या आपल्या खऱ्या शक्तींना आपले आयुष्याभरातील अनुभव हवे असतात. त्यामुळं आपल्याला मरणं क्रमप्राप्त आहे. जेणेकरुन आपले हे मालक आपल्या अनुभवांचा वापर करुन अधिक बुद्धिमान चांगली / वाईट मॉडेल्स भविष्यात पृथ्वीवर पाठवेल.
आता संगणकाच्या बाबतीत आपल्याला कसं भय आहे की ते एके दिवशी आपल्यापेक्षा बुद्धिमान होतील आणि आपल्यावर नियंत्रण करतील. त्याचप्रमाणं भविष्यातील आपल्यातील एखादा बुद्धिमान माणुससुद्धा ह्या आपल्या मॉडेलचं रहस्य उलगडुन काढेल आणि त्या मालकाशी लढा देईल.
सारांश - इथं तिघेजण आहेत. शक्तिमान, माणुस आणि संगणक. पहिली शक्यता अशी की शक्तिमानानेच आपल्याला संगणकाची निर्मिती करण्याची बुद्धी दिली. जेणेकरुन ज्यावेळी आपण शक्तिमानाशी लढा द्यायला तयार होऊ त्याचवेळी शक्तिमान आपल्याविरुद्ध संगणकांना बंड करायला लावेल.
दुसरी शक्यता. भविष्यातील बुद्धिमान माणुस संगणकांना आपल्यासोबत घेऊन मग त्या शक्तिमानाच्या अस्तित्वाचं कोडं उलगडुन काढेल आणि त्यांच्याशी लढा सुरु करेल. त्यावेळी हा बुद्धिमान माणुस मरण्यास सुद्धा नकार देईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा