मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, १० सप्टेंबर, २०१७

Bariwali



दूरदर्शनची लोकसभा वाहिनी दर शनिवारी रात्री ९ वाजता एक पारितोषिक विजेता प्रादेशिक चित्रपट दाखवते. हाच चित्रपट रविवारी दुपारी २ वाजता पुनर्प्रक्षेपित केला जातो. शनिवारी रात्री मध्ये एकही जाहिरातीचा अडथळा नसलेले हे चित्रपट पाहणं हा माझ्यासाठी एक आनंदअनुभव असतो. 

काल रात्री पाहिलेला चित्रपट "बारीवाली"- म्हणजे घरमालकीण. हा मी समजत असलेला उच्चार चुकला असल्याची शक्यता आहे. किरण खेर ही आपल्या नोकरांसोबत आपल्या भल्या मोठ्या वाड्यात एकाकी आयुष्य जगणारी मध्यमवर्गीय स्त्री. अचानक तिच्या वाड्यात आपल्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी परवानगी मागण्यासाठी एक चित्रपट दिग्दर्शक येतो. पुढं चित्रीकरणादरम्यान ही घरमालकीण मानसिकदृष्ट्या ह्या दिग्दर्शकामध्ये गुंतत जाते, तो विवाहित आहे हे माहित असुनही ! मग पुढं चित्रपट सरकतो आणि शेवटी किरण खेरच्या आयुष्यात पुन्हा एकदा एकाकीपण ठेवून निघुन जातो. 

मला असे एकाच वास्तुत मोजक्या व्यक्तिरेखांभोवती फिरत असणारे चित्रपट पाहायला आवडतं. बाकीचे लक्ष वेधुन घेणारे घटक नसल्यानं चित्रपटाचा दिग्दर्शक आपलं सर्व सामर्थ्य ह्या चित्रपटातील मोजक्या व्यक्तिरेखांचे पैलु उलगडुन दाखविण्यासाठी पणाला लावतो. ह्या चित्रपटाचा कल एका स्त्रीचं मनोविश्व उलगडुन दाखविण्याकडं झुकला होता. "माया मेमसाब" ने सुद्धा असाच प्रयत्न केला होता. कथा आणि हृदयनाथ ह्यांचं काहीसं गूढ संगीत ह्या दोन गोष्टी चित्रपटाला संस्मरणीय बनविण्यासाठी पुरेशा होत्या. 

स्त्रीचं मनोविश्व ही फार गूढ गोष्ट आहे. पुर्वीच्या कथेतील राजकुमारींना एखादा देखणा शूर राजपुत्र, ज्याचं मोठं राज्य आहे आपला वर म्हणुन अपेक्षित असायचा. आणि गोष्टीत तो त्यांना मिळायचा देखील! प्रत्यक्षात मात्र अपेक्षेनुसार वर मिळणं हे बऱ्याच वेळी कठीण असायचं, आहे आणि असेल. जसं स्त्रीच्या बाबतीत तसं पुरुषांच्या बाबतीत सुद्धा होतं. पण ह्या विषयावर बरेचसे पुरुष एकतर भावुक नसल्यानं अथवा बाह्यदर्शी आपला भावुकपणा दर्शवित नसल्यानं फारसं काही लिहिलं, बोललं गेलं नसावं. 

आपलं विवाहानंतरचे आयुष्य कसं असेल ह्याविषयी मुली जे काही चित्र रेखाटतात त्यात वास्तवपणे महत्वाच्या किती गोष्टींबाबत विचार केला गेलेला असतो हे जाणुन घेणं तसं कठीणच! पण उपलब्ध साहित्यानं किंवा जुन्या कृष्णधवल चित्रपटांनी जी प्रतिमा रंगवली त्यानुसार एकत्र कुटुंबात सर्व मोठ्यांच्या नजरा चुकवून आपल्या पत्नीसाठी गजरा / वेणी आणणारा, क्वचितच गाणं म्हणु शकणारा, ऑफिसात नोकरी करणारा वगैरे गुण आपल्या अंगी बाळगणारा नवरा मिळणं हे मुलींनी स्वप्नवत मानलं. प्रत्यक्ष संसारात पडून मुलं वगैरे झाल्यावर मात्र हे सर्व प्रकार मागे पडावेत अशी एकत्र कुटुंबपद्धतीची अपेक्षा असायची. आयुष्याच्या कोणत्यातरी एखाद्या टप्प्यावर मग मन बंड करुन उठायचं पण अशा बंडखोर मनाची मजल वहीत काव्य लिहिण्यापुरता किंवा मैत्रिणीशी सुचक शब्दात गप्पा मारण्यापुरता सीमित असायची हे चित्र रेखाटलं गेलं आहे. 

लहानपणी काही काळ आपल्यापेक्षा मोठ्यांना जास्त समजतंय अशी भावना मनात बाळगायची, तरुण वयात नोकरी, लग्न ह्या बाबींमुळं मन गर्क असतं. पण एक क्षण असा येतो की ज्यावेळी अगदी पर्वताइतक्या नसलं तरी किमान एका टेकडीसारख्या उंचीवर बसल्याची जाणीव मनात धरुन आपल्या आयुष्याविषयी, भोवतालच्या समाजाविषयी अनेक विचार मनात येतात. जर आतापर्यंत आपल्या आयुष्यानं आपल्याला जे काही दिलं त्याविषयी आपण काहीसे निराश असु आणि ह्या क्षणी आपल्या आयुष्यात ह्यापुढं फारसा काही मोठा बदल घडुन येण्याची आशा बाळगत नसु तर मग मनातील ही खिन्नता आपल्या संवादांतून, वागण्यातुन कुठंतरी बाहेर पडते. 

पण सर्वत्र असं चित्र नसतं. काही व्यक्ती जी काही परिस्थिती आहे त्यातुन सर्वात आशादायी असं चित्र रेखाटतात आणि ते प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करतात. हा एक महत्वाचा मुद्दा ! प्रत्येक व्यक्तीनं मनात रेखाटलेलं आयुष्याचं एक स्वप्नमय चित्र असतं. आणि ह्या स्वप्नमय चित्राचा प्रत्यक्ष जीवनातील एक equivalent असतो. स्वप्नमय चित्र बऱ्याच जणांचं सारखं असु शकतं पण त्याचं  equivalent मात्र प्रत्येकाचं आपापलं वेगवेगळं असतं. आणि ह्या equivalent च्या प्रवासाचा मार्ग आपल्यालाच आखायचा असतो आणि जमेल तसं त्याला upgrade करत राहायचं असतं. आपल्या स्वप्नमय चित्राचा equivalent न सापडल्यानं किंवा त्यासाठीची तडजोड करता न आल्यानं दुःखी राहिलेली मंडळी पाहणं दुसऱ्यांना सुद्धा क्लेशदायक असते. 

कसं असतं पहा ना ! ज्यांना स्वप्नमय चित्रं खूप चांगली रंगवता येतात ती बऱ्याच वेळा खूपच भावुक असतात आणि ज्यांना  equivalent लवकर समजतो ती नको तितकी वास्तववादी मंडळी असतात. बारीवाली ही स्वप्नमय चित्र रंगविण्याच्या पहिल्या पायरीवर होती तर माया मेमसाब ही पुर्णपणे आपल्या स्वप्नमय जगात वावरत होती. अशा स्वप्नमय माणसांच्या जीवनात एखादी वास्तववादी व्यक्ती येणं आवश्यक असतं. नाहीतरी आपला कोश विणुन ही मंडळी त्यात राहतात आणि कदाचित रुढ जगापासुन दुर निघुन जातात.  

राहता राहिली ती आपला equivalent नको तितक्या लवकर समजलेली मंडळी! बाह्यजगाच्या नजरेतुन पाहिलं तर ही मंडळी कदाचित निरस आयुष्य जगत आहेत असा भास होण्याची शक्यता असते पण ह्या मंडळींनी आपलं स्वप्न कोठंतरी जतन करुन ठेवलेलं असतं आणि जमेल तसं त्या ध्येयाकडं त्यांची वाटचाल सुरु असते.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...