मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शुक्रवार, १ सप्टेंबर, २०१७

मुंबईचा पाऊस !



लहानपणी किर्लोस्कर मासिक घरी यायचं. त्यात अनेक चांगली सदरं आणि कथा असायच्या. बहुदा त्याच मासिकात वाचलेली 'मुंबईचा पाऊस' ही कथा अजून चांगलीच लक्षात आहे. एक धडाडीचा उद्योजक, परंतु काही घटनांमुळे व्यावसायिक प्रवासात गटांगळ्या खात असलेला. अचानक त्याला एक चांगलं प्रकाशनाचे काम मिळतं. अट अशी असते की त्या छपाईच्या कामाच्या हजार प्रती एका आठवड्यात प्रिंट करायच्या असतात. प्रिटिंग प्रेसचा तो जमाना! ह्या उद्योजकाचा पूर्वीचा ओळखीचा प्रिटिंग प्रेसवाला काही कारणास्तव हात वरती करतो. हातची आलेली संधी गमवावी लागणार म्हणुन पुन्हा एकदा हताश झालेला हा माणुस इराण्याच्या हॉटेलात चहा पीत असताना त्याला त्याचा जुना मित्र भेटतो. खरंतर हा दारूच्या आहारी गेलेला असतो. ह्याची सुद्धा प्रिटिंग प्रेस असते पण त्याच्या दारु पिण्याच्या सवयीमुळे त्याला हे काम द्यायला उद्योजक तयार नसतो, पण आता परिस्थिती अशी आलेली असते की उद्योजकाचा नाईलाज असतो. तो त्याला ऍडव्हान्स आणि छपाईची कच्ची प्रत त्याच्या प्रेसमध्ये नेऊन देतो. परिषद रविवारी असते आणि शनिवारी उद्योजकाला ह्या प्रती आयोजकांना नेऊन द्यायच्या असतात, आणि काही अनपेक्षित घडामोडीमुळं ह्या उद्योजकाला पुढील तीन - चार दिवस ह्या दारुड्या मित्राशी संपर्क ठेवता येत नाही. शुक्रवारी संध्याकाळी मात्र तो धावतपळत ह्याच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये पोहोचतो. तिथली परिस्थिती पाहुन त्याला मोठा धक्का बसतो. हजार प्रतींसाठी फक्त कागदं आणुन ठेवलेली असतात आणि हे महाशय दिलेल्या ऍडव्हान्सच्या आधारे दारुच्या नशेत चुर्रर्र असतात. ह्या उद्योजकाला पाहुन त्याची नशा धाडकन उतरते. पश्चातापाने दग्ध होऊन तो ह्या उद्योजकाला अजुन एक संधी देण्याची विनंती करतो. राखेतुन बाहेर यायची समोर आलेली संधी अशी जाताना पाहुन उद्योजकाला मोठा धक्का बसतो. तो तसाच घरी परततो. निराश मनात येणाऱ्या सर्व विचारांना मोठ्या प्रयत्नपूर्व मागं सारुन तो सकाळ येईपर्यंत धीर धरतो. मध्यरात्रीच्या आसपास केव्हातरी संततधार सुरु होते. आणि सुरुच राहते. सकाळी गुडघाभर पाण्यातुन वाट काढत हा उद्योजक कसाबसा आयोजकांच्या ऑफिसात पोहोचतो ते सर्व कबुली देऊन माफी मागायला! पावसानं नखशिखांत भिजलेल्या त्याला पाहुन आयोजक अगदी भारावुन जातात. त्याला बसायला देतात. विषयाला कशी सुरुवात करायची असा संभ्रम मनात बाळगुन असलेल्या उद्योजकाची अडचण आयोजक दूर करतात. "ह्या जोरदार पावसानं मुंबई सगळी कोलमडून पडली आहे! आमच्या बाहेरगावच्या बऱ्याच पाहुण्यांनी आम्ही उद्या येऊ शकत नाही असं कळवलंय आणि त्यामुळं ही कॉन्फरन्स आम्हांला पुढील रविवारी ढकलावी लागत आहे! आणि हो त्यामुळं आम्हांला प्रुफात काही बदल करावे लागत आहेत." आयोजकांचं हे बोलणं ऐकुन उद्योजकाचे विश्व बदलुन जातं. पुढं मग तो दारुडा प्रिंटर अगदी दृष्ट लागण्याजोगं काम करुन देतो आणि मग उद्योजक / प्रकाशकाची डुबती हुई नाव तरून जाते. 

हे सर्व आठवण्याचं कारण म्हणजे ह्या आठवड्यातील मुंबईचा पाऊस ! मंगळवार सकाळी ऑफिसात पोहोचलो तेव्हा मनाचा ९९.९९ % भाग हा ऑफिसच्या विविध कामांच्या विचारांनी व्यापुन गेला होता. ह्यातील प्रत्येक काम महत्त्वाचं आहे असंच वाटत होतो आणि त्यांना प्राधान्यक्रम देताना नेहमीप्रमाणं गोंधळ होत होता. ह्यातील एक जरी काम झालं नाही तर जणु काही दुनिया होत्याची नव्हती होणार होती. अचानक दोननंतर पावसानं जोर पकडला आणि मग मात्र सर्व चित्रच पालटुन गेलं. सर्वांच्या प्राधान्यक्रमावर एकच गोष्ट होती आणि ती म्हणजे सर्व कर्मचारी (IT
मधल्या लोकांना कर्मचारी हा शब्द वापरताना कससंच होतंय) सुरक्षितरित्या घरी पोहोचतील की नाही!

यथावकाश आमच्या ऑफिसातील सर्वजण सुखरुप घरी पोहचले. पण मुंबईतील सगळेच काही इतके सुदैवी नव्हते. डॉक्टर अमरापुरकर ह्यांचं ह्या पावसामुळं दुर्दैवी निधन झालं. एक तिशीतला तरुण कारमध्ये अडकुन मरण पावला. नेहमीप्रमाणं मुंबईच्या स्पिरिटला लोकांनी दाद दिली. आणि पालिकेवर हवं तितकं तोंडसुख घेतलं. टीव्हीच्या उथळ खासगी वाहिन्यांच्या माथेफिरु अँकरनी आक्रस्ताळेपणाने तारस्वरात उगाच गडबड केली. ह्या अँकर लोकांनी माझं डोकं फिरवलं आहे. पुढील काही दिवसांत त्यांच्यावर एक पोस्ट !

आता मुळ मुद्दा ! एक शहर म्हणुन आपल्या मुंबईनं सामान्यतेच्या मर्यादा केव्हाच ओलांडल्या आहेत. शांतपणे सर्व नागरिकांना आपले दैनंदिन व्यवहार पार पाडता येतील अशी स्थिती राहिली नाही. दररोज सकाळी ऑफिसात आणि रात्री घरी पोहोचलो की दोन मिनिटं बसुन स्वतःचीच पाठ थोपटुन घ्यावीशी वाटते. ज्याप्रमाणात शहर अनियंत्रितपणे विस्तारलं आहे ते पाहता शहराचं दैनंदिन चक्र बिघडण्यासाठी अगदी छोटीशी गोष्ट देखील पुरेशी होते. मेट्रोने अर्ध्याहुन अधिक शहराच्या वाहतुकव्यवस्थेचा बोऱ्या वाजवला आहे. उरल्यासुरल्या रस्त्यात एक छोटी गाडीदेखील जर बंद पडली तरी मागे दोन तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागतात. सामान्य माणसांना आपल्या भवितव्याची इतकी चिंता लागली आहे की त्यांना समाजकारणात भाग घ्यायला वेळ मिळत नाही आणि त्यामुळं राजकारणी लोकांचा दर्जा पुर्ण घसरला आहे. आणि सामान्य लोक केवळ त्यांना दोष देऊन पुन्हा आपल्या कामाला लागत आहेत. 

सारांश - मुंबई सहजासहजी ब्रेकडाऊन होईल अशी पाच - सहा कारणं आहेत. सरासरीच्या नियमानुसार ती अधूनमधून घडत राहणार. किंबहुना दररोजच्या दिवशी सकाळी आपल्या मनाच्या कोपऱ्यात आपण ही शक्यता घेऊनच उठत असतो आणि रात्री झोपताना ह्यातील एकही शक्यता वास्तवात उतरली नाही तर सर्वशक्तिमानाचे आभार मानुन आपण झोपी जातो. त्यामुळं ज्यादिवशी ह्यातील एखादी घटना घडेल तर शांत डोक्यानं त्यातुन मार्ग काढावा. उगाचच प्रशासनाला दोष देऊ नये. ह्या शहराच्या सिस्टिमचा भाग असण्याचा निर्णय आपणच घेतला आहे आणि सद्यस्थितीला  काही अंशी आपणही जबाबदार आहोत त्यामुळं धुतल्या तांदळासारखं स्वच्छ असल्याचा आव आणुन उगाचच गडबड करु नये. हा प्रकार अगदी सहन होत नसेल तर एखाद्या गावात जाऊन शांतपणे जीवन व्यतित करायला तुम्हांला कोणी थांबवलं नाही! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...