मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१७

बयेचा कारनामा !


आवश्यक कारणास्तव (दुसरा कोणता पर्याय नाही म्हणुन) आपला जीव धोक्यात घालण्याची वेळ ह्या भुतलावरील असंख्य लोकांवर दररोज येत असते. युद्धसंक्रमित भागात वास्तव्य करणारे लोक, दुष्काळी भागातील लोक, दुर्गम भागात राहणारे लोक ह्या सर्वांना येणारा प्रत्येक दिवस कोणता धोका घेऊन येणार आहे ह्याविषयी शाश्वती नसते. तरीसुद्धा जीवनाविषयीची अपार श्रद्धा ह्या लोकांना समोरील सर्व संकटांचा मुकाबला करण्याचं बळ देतं. 

जगात अजून एका प्रकारची लोकं वास्तव्य करुन असतात. लौकिकार्थानं सर्वसामान्य जीवन जगण्याची त्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती असते. परंतु त्यांच्या अंगात असणारी खुमखुमी त्यांना आपला जीव धोक्यात टाकणारी धाडसं करण्यास प्रवृत्त करते. आता ही खुमखुमी म्हणजे नक्की काय आणि ह्या सर्व प्रस्तावनेचा तात्कालीन संदर्भ कोणता ह्याविषयी थोडं!

गेल्या आठवड्यात विकी ओडींकोवा ह्या २३ वर्षीय रशियन मॉडेलनं एक साहस करण्याचं ठरवलं. ही बया आपल्या एका पुरुष सहकाऱ्यासोबत दुबईच्या ७४ मजली इमारतीच्या गच्चीवर गेली. थोडावेळ इथंतिथं सराव करुन ती  मग  केवळ आपल्या सहकाऱ्याच्या हाताचा आधार घेऊन ह्या ७४ मजली इमारतीवरून खाली लोंबकळली. आणि ह्या स्थितीत ती जवळपास १ मिनिट राहिली, तिथं हजर असलेल्या फोटोग्राफर मंडळींनी असंख्य फोटो, व्हिडीओ चित्रीत केला आणि अपेक्षेनुसार त्याला लाखो लोकांनी प्रतिसाद दिला. दुबईच्या महापौरांना हा प्रकार एकंदरीत आवडला नाही आणि त्यांनी विकीबाईंना बोलावुन कडक शब्दात समज दिली. ही समज जेव्हा दिली गेली तेव्हा मी प्रत्यक्ष हजर नव्हतो पण वाचलेल्या बातमीनुसार एकंदरीत "बाई तुला तुझा जीव धोक्यात घालायचा असेल तर त्याला माझी काही हरकत नाही पण माझ्या शहरात येऊन असले प्रकार करुन मला अडचणीत आणू नकोस!" असे त्या समजुतीचे स्वरूप दिसलं. 

आता विश्लेषण भागाकडे 
१) विकी आणि तिचा सहकारी ह्यांचा फिटनेस प्रशंसनीय! ७४ मजल्याच्या उंचीवर जोरदार वारे वाहत असताना केवळ एका हाताच्या आधारावर एक मिनिटभर लटकणे हा विकीच्या फिटनेसचा कौतुकाचा भाग तर विकीचे वजन एका हातानं इतका काळ पेलून धरणं हा तिच्या सहकाऱ्याच्या फिटनेसचा कौतुकाचा भाग! रशियन जिमनॅस्टची परंपरा ह्यास काहीशी कारणीभुत आहे अशी ह्यावर माझी काहीशी तज्ञ टिपणी!  

२) मानसिक कणखरता! ह्या मुद्यावर कदाचित मला धारेवर धरलं जाईल. मी ही पोस्ट लिहुन आपला जीव विनाकारण धोक्यात घालणाऱ्या विकीचं समर्थन करतो आहे असाही मतप्रवाह समोर येईल! प्रसिद्धीसाठी तिनं हा आततायी मार्ग स्वीकारला! पण क्षणभर हे सर्व बाजुला ठेवलं तर आपला जीव धोक्यात घालण्यासाठी जी मानसिक कणखरता दाखवावी लागते ती विकीने दाखवली. आणि आपण विकीला सुखरुप तोलुन धरू शकू ह्याचा आत्मविश्वास तिच्या सहकाऱ्याने दाखविला आणि निभावला देखील!
ह्या दोघांचा एकमेकांवरील आणि खासकरून विकीचा सहकाऱ्यावरील विश्वास हा ही उल्लेखनीय !

३) आता अजून एक विवादास्पद मुद्दा! जोशी, नेने, पाटील अथवा सावे आडनावाच्या मुलीने आपल्या सहकाऱ्याच्या साथीनं असं धाडस करण्याची हिंमत करण्याची शक्यता किती? ह्यात माझ्या सासरचं आडनाव सुद्धा वापरण्याइतपत माझ्या साहसाची सीमा मर्यादित आहे! सद्यकालीन घटना पाहता ही शक्यता मी शुन्य म्हणुन नक्कीच मांडणार नाही! पण ही शक्यता रशियन शक्यतेपेक्षा नक्कीच कमी असणार! कारण काय? सामान्यपणं कमीत कमी धोका पत्करत  दीर्घ कालीन जीवन जगण्याची मनोवृत्ती ह्या कमी शक्यतेचा गाभा असेल  असं एक विधान करुन  बाकीचा भाग मला  वाचकांच्या कल्पनाशक्तीवर सोपवुन द्यायला आवडेल!   

४) आयुष्यभर पुरणारी एका क्षणाच्या साहसाची खुमखुमी (त्यातील संभाव्य धोक्यासहित) विरुद्ध आयुष्याभरातील करोडो सामान्य क्षणांतून मिळणारं तसू तसूभर समाधान असा हा दोन मनोवृत्तीचा संघर्ष जाणवतो! बाकी असलं धाडस केलं म्हणून ह्या मुलीचं लग्न जमण्याची शक्यता कमी होणार नाही अशी माझी अटकळ आणि ही मराठी समाजाच्या आधुनिकतेची खूण! 

५) ह्या कमी शक्यतेमागे मराठी समाजाची फिटनेसची सद्यस्थिती हा ही एक वैचारिक चर्चेचा मुद्दा समोर येईल! 

६) ही शक्यता पुण्यात किती आणि महाराष्ट्रातील बाकीच्या किती? आणि त्यात किती तफावत असेल ; आणि ही तफावत धन असेल वा ऋण ह्यावर सुद्धा तज्ञांनी विचार करावा ही विनंती! पुण्यात ७४ मजली इमारत उभी रहावी का हा उपमुद्दा सुद्धा तज्ञांनी चर्चेत विचारात घ्यावा!

बाकी आजपासुन पुण्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना सुरु होणार आहे. दुपारी १ ते  ४ ह्या वेळात नक्की काय होणार ह्या शंकेनं मला जंगजंग पछाडलं आहे!

(Disclaimer - Author does not support such acts which would put individual's life at Risk 
मी  अशा जीव धोक्यात टाकणाऱ्या साहसांचं कोणत्याही प्रकारे समर्थन करीत नाही!) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...