मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २८ जानेवारी, २०१७

Trapped - भाग ७



आधीच्या भागाच्या लिंक्स 
भाग पहिला 

भाग दुसरा 

भाग तिसरा 

भाग चौथा 

भाग पाचवा 

भाग सहावा 
 http://patil2011.blogspot.in/2016/11/trapped.html


खऱ्या तर जुन्या पण आताच्या नव्या स्वामींशी जुळवून घेण्याचा योगिनीचा आटोकाट प्रयत्न सुरु होता. ह्या स्वामीला (नवस्वामी) त्याच्या अनुपस्थितीमधील काळातील नक्की किती आणि काय आठवेल हा प्रश्न तिने आधीच्या (परस्वामी) ला विचारुन पाहिला होता. पण त्यानंदेखील काही खात्रीलायक उत्तर दिलं नव्हतं कारण ते त्याला पूर्णपणे माहित नव्हतं. योगिनीला सतत नवस्वामीवर लक्ष ठेवावं लागत होतं. 

नवस्वामीला ऑफिसात जाऊन दोन तीन दिवस झाले असतील पण त्याची चिडचिड काहीशी वाढीला लागली होती. बहुदा त्याला ऑफिसातील सर्वच गोष्टी समजत नव्हत्या. आणि आपल्याला अचानक हे सारं काही समजत नाही हे त्याला कळत नसल्यानं त्याचा संताप होत होता. घरी देखील आर्यन त्याच्या जवळ जात नव्हता. त्या छोट्या जीवानं हा फरक नक्की जाणला असा कयास योगिनीनं बांधला होता. 

नवस्वामी रात्री परतला तो अगदी तणावपूर्वक चेहरा घेऊनच! "काय झालं स्वामी!" योगिनीनं अगदी काळजीपुर्वक स्वरात विचारलं. तिच्या मनात एक दोन दिवसांपासून प्रचंड गोंधळ माजला होता. सुरुवातीची  नवस्वामीविषयीची तटस्थ भावना हळुहळू नाहीशी होत चालली होती. "ह्या साऱ्या प्रकरणात ह्याचा काही दोष नाही, मग आपण ह्याला शिक्षा का द्यायची" असा एकंदरीत तिचा विचार होऊ लागला होता. 
"मला नक्की काय झालंय ते समजत नाही योगिनी!" आर्यन झोपी गेला आहे ह्याची खात्री करुन आलेला नवस्वामी बोलला. "ऑफिसात काही जमत नाहीय, इथं आर्यन माझ्याकडं येत नाही, आणि तू सुद्धा अशी तुटकतुटकपणे वागतेस! माझ्याच्यानं हे सारं सहन नाही होतं!" इतकं बोलुन तो हमसाहमशी रडू लागला. योगिनीनं मनावर घातलेली सारी बंधनं तुटून पडली होती. 

सकाळी नवस्वामी बराच सावरला होता. आर्यन जरी त्याच्या जवळ यायला तयार नव्हता तरी त्यानं मोठ्या प्रेमानं त्याला खेळवला. जाताना योगिनीकडे एक प्रेमळ नजर टाकुन तो ऑफिसला गेला. हातात चहाचा कप घेऊन योगिनी खिडकीत बसली होती. मनातील विचारांचं वादळ थांबण्याचं नाव नव्हतं. रस्त्यावरची वाहतुक सुरळीत चालली होती. अचानक पलीकडं तिला तो वेडा दिसला. अगदी परस्वामीच्या आगमनाच्या पहिल्या आठवड्यात दिसला होता त्यानंतर आज पहिल्यांदा दिसला होता. योगिनीच्या हातातील चहाचा कप निसटता निसटता वाचला. "हे सर्व माझ्याच बाबतीत का घडत आहे!" असं ती स्वतःशीच पुटपुटली आणि भयानं तिनं खिडकी लावून घेतली. 

खिडकी लावून ती मागं वळली आणि तिला अजुन एक धक्का बसला. आर्यन खिदळत छताकडं पाहत होता. त्याला असा खिदळताना तिनं पहिल्यांदाच पाहिला होता. ती धावतच आर्यनच्या पाळण्याकडं गेली. आर्यनला हात लावणार इतक्यात तिला हवेत एक अदृश्य थराची भावना स्पर्शुन गेली. तिला ही भावना ओळखीची होती. मृत्यूनंतर कसा अनुभव येतो आणि तिथंही मी तुला सोडणार नाही ह्याची जाणीव करुन देण्यासाठी परस्वामीने जो तिला अनुभव दिला होता, नेमकी तीच भावना होती. 

"स्वामी, तू इथं आहेस?" योगिनी मोठ्यानं ओरडली. तिचा संयम सुटला होता. "हो!" रागीट स्वरात स्वामीच उत्तर आलं. आर्यन जिथं पाहून खिदळत होता नेमका तिथुनच आवाज आला होता. "मी आलेलं तुला आता कसं आवडणार?" परस्वामीच्या शब्दाशब्दातून क्रुध्दता प्रकट होत होती. "तू असं का म्हणतोयस स्वामी?" योगिनी रडवेल्या स्वरात म्हणाली. "मग काय एका पृथ्वीवासियासोबत तुझा संसार अगदी सुखानं सुरु झाला ना आता!" स्वामी म्हणाला. योगिनीच्या डोक्यात प्रकाश पडला होता. पण मग तिच्या डोक्यात अजून एक विचार आला. हा परस्वामी अगदी केव्हाही आपल्या अवतीभवती अदृश्य स्वरूपात असाच वावरत राहणार काय?  

आर्यनच खिदळणं असंच सुरु होतं. "चूप बस!" रागानं योगिनी आर्यनवर खेकसली. आर्यनचा चेहरा अगदी रडवेला झाला. त्याला पहिल्यांदा योगिनीनं ओरडलं होतं. आर्यन जसा रडवेला झाला तसं परस्वामीचा स्वर अगदी पालटला. "योगिनी, खबरदार त्याला ओरडलीस तर!" तो तारस्वरात ओरडला. योगिनीचं मन झपाट्यानं विचार करु लागलं होतं. सततच्या विपरीत परिस्थितीत राहिल्यानं स्वतःचा बचाव करण्याची वृत्ती तिच्या मनात प्रबळ झाली होती. ह्या परस्वामीपासून बचाव करण्यासाठी आर्यन हे एक साधन होऊ शकतो हा विचार तिच्या मनात आला होता. आपल्या पोटच्या बाळाविषयी असा विचार आपल्या मनात यावा ह्याची तात्काळ पश्चातापपूर्ण भावना तिच्या मनात आली. "मी त्याला घेऊन जाईन!" परस्वामीनं  आपलं अस्त्र बाहेर काढलं. "आला मोठा घेऊन जाणारा! तुझ्या लोकांपासून आपला जीव कसा वाचवायचा ते पहिलं पाहा तू ! " योगिनी एखाद्या वाघिणीपणे लढा देत होती. 
तिचं शेवटचं वाक्य बहुदा परस्वामीला मर्मी वार करुन केलं असावं. "योगिनी!" परस्वामी अगदी तारस्वरात ओरडायला आणि घराच्या दाराची बेल वाजायला एकच गाठ पडली. 
(क्रमशः )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...