मुंबई शहर आणि उपनगरांत कबुतरांनी बराच उच्छाद मांडला आहे. त्यांचं मानवी वस्तीच्या अगदी नजिकचं वास्तव्य मनुष्याला आरोग्यदृष्टीनं अगदी घातक आहे. परंतु अनेकजण ह्या वास्तवाला विसरुन कबुतरांच्या घनदाट वस्तीतील वास्तव्याला प्रोत्साहन देत असतात. ह्या विषयावर पोस्ट नंतर कधीतरी!
पोस्टची सुरुवात कबुतरांच्या संदर्भानं करण्याचं कारण म्हणजे ह्या कबुतरांचं एक स्वभाववैशिष्ट्य! समजा तुम्ही काही दिवस तुमची मुंबईतील सदनिका बंद ठेऊन शहराबाहेर गेलात आणि कबुतरांच्या जोडप्यानं तुमच्या सदनिकेच्या उघड्या राहिलेल्या फटीतून अथवा बाल्कनीत ठेवलेल्या कुंड्यामध्ये वा अवतीभोवती आपल्या वास्तव्यासाठी एका जागेची निवड केली तर मग मोठा बाका प्रसंग उद्भवतो! तुम्ही परत येता आणि ह्या कबुतरांना हुसकावुन लावण्याचा प्रयत्न करता, परंतु ह्या ठिकाणी आपल्याला घर बांधता येणार नाही ही समजुत ह्या कबुतरांच्या गळी उतरवताना आपल्या सर्वांना नाकी नऊ येतात.
आपल्या सर्वांचं सुद्धा असंच असतं नाही का? आपण सुद्धा आपल्या समजुतीनुसार आपल्या स्वतःच्या, आपल्या परिवाराच्या सुखाचं एक चित्र आपल्या मनात रंगवुन ठेवतो. आणि ह्या चित्राशी भावनिकदृष्ट्या आपण स्वतःला प्रचंड प्रमाणात गुंतवून घेतो. भोवतालचं जग अगदी क्लिष्ट बनत चाललं आहे. आपण हे चित्र रेखाटताना विचारात घेतलेल्या भोवतालच्या घटकांच्या स्थित्या, त्यांचे संदर्भ झपाट्यानं बदलत राहतात. भोवतालच्या व्यक्ती बदलतात (ह्यात दुसऱ्या व्यक्ती आपल्या जीवनात येतात आणि असणाऱ्या व्यक्तींचे स्वभाव बदलतात हे दोन अर्थ अभिप्रेत आहेत). पण आपलं मन मात्र त्या कबुतराच्या जोडीप्रमाणं काहीसं वेडं बनतं. आपल्या मनातील सुखाची मूळ व्याख्या, ते मूळ चित्र आपण अगदी उराशी बाळगुन ठेवतो. आणि मग काहीसं कालबाह्य झालेलं सुखाचं हे चित्र आपल्याला प्राप्त झालं नाही म्हणून दुःखी बनुन राहतो. मी दुःखी आहे, मला सहानभूती हवी ह्या भावनेत आयुष्य व्यतीत करणारी अनेक मंडळी आपल्याला अवतीभोवती वावरताना दिसतात!
आजच्या ह्या पोस्टचा मतितार्थ एकच! योग्य वेळी सुखाचं योग्य पुनर्रव्याख्यीकरण करा! अगदी आजचं उदाहरण घ्यायचं झालं तर रविवारच्या सुखाची व्याख्या त्या दिवशीच्या जेवणाच्या विशिष्ट चित्राशी निगडित असते. आज आलेली संकष्टी विचारात घेता ह्या दिवशीच्या आनंदाची व्याख्या लवकरात लवकर पुनर्रचित करा! सुखी व्हाल !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा