मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ७ जानेवारी, २०१७

शिखरापल्याड!



आंग्ल भाषेत काही समर्पक शब्दप्रयोग आहेत. "Over The Hill" हा त्यातला एक! एखाद्या व्यक्तीनं आपल्या क्षेत्रात आपल्या कारकिर्दीतील कामगिरीचं उत्तुंग शिखर गाठल्यानंतरच्या कालावधीत जेव्हा ती व्यक्ती त्या क्षेत्रात सक्रिय असते परंतु आपल्या सर्वोत्तम कामगिरीची बरोबरी करू शकत नाही त्यावेळी ती व्यक्ती  "Over The Hill" आहे असं म्हणण्याचा प्रघात आहे. 

पूर्वी मी माझ्या आवडत्या खेळाडुंच्या कामगिरीबाबत बराच भावुक असायचो. बोरिस बेकर, कपिल देव आणि हल्ली हल्ली रॉजर फेडरर ही काही उदाहरणं! ही मंडळी आपापल्या क्षेत्रात बराच काळ शिखरावर होती. ह्या कालावधीनंतरसुद्धा  ह्या मंडळींनी आपल्या क्षेत्रात सक्रिय राहण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांचा आपला निर्णय होता; आर्थिक बाबीसोबत अजून काही कारणं असतील. बोरिस आणि कपिल ह्यांच्या उदाहरणाच्या बाबतीत माझं तात्कालीन वय पाहता मी व्यावहारिकपेक्षा भावनिक जास्त होतो. आणि त्यामुळं ह्या मंडळींची शिखरापलीकडील कामगिरी पाहणं माझ्यादृष्टीनं फार क्लेशदायक ठरलं. ही लोक निवृत्तीचा निर्णय का घेत नाहीत ह्यावर मी बराच काळ मनात दुःखी होऊन विचार करीत असे. 

हल्लीचा फेडररसुद्धा सारख्या परिस्थितीत आहे. पण जीवनाच्या प्रवासात काही अधिक वास्तवांचा सामोरा केल्यामुळं  रॉजरचं हे रुप मी अधिक सामंजस्यानं समजुन घेतो. आर्थिक बाजुसोबत स्वानंदासाठी हा खेळत असावा अशी समजुत मी करुन घेतो. 

व्यक्तींप्रमाणं संस्थांनासुद्धा अशा कालावधीचा सामना करावा लागतो. पण संस्थांना एक पर्याय उपलब्ध असतो. यु ट्यूबवर The Rebirth of Eagle हा एक सुरेख व्हिडीओ उपलब्ध आहे. एकंदरीत ७० वर्षाचं आयुष्य जगू शकणाऱ्या रुबाबदार गरुडाला मानानं आयुष्य जगण्यासाठी ४० वर्षाच्या आसपास आयुष्याच्या मध्यंतरावर एक कठोर निर्णय घ्यावा लागतो.  त्याला एका अत्यंत कठीण स्थित्यंतराचा  सामना करत आपलं आधीचं रुप आमुलाग्र बदलावं लागतं. हा कठीण बदल स्वीकारण्याचं मनोबल दाखवलं तरच पुढील आयुष्य सुखकर होतं. 

एक प्रजाती म्हणुन मनुष्यजात उत्क्रांतीच्या प्रगत टप्प्यावर आहे. ह्या पुढील काळात मनुष्यजातीच्या व्यवहाराची मापकदंड झपाट्यानं बदलत जाणार आहेत. त्यामुळं आपली परिस्थिती over the Hill झाली की एक तर गरुडाची मानसिकता दर्शवावी लागणार किंवा आहे ती परिस्थिती आनंदानं स्वीकारुन जीवनगाणं उत्साहात गात राहावं लागणार! 

शेवटी जाता जाता Dwarf Star अर्थात खुजा तारा ही संज्ञा आठवली. आपल्या प्रखर तेजानं विश्वाचा एक कोपरा उजळून टाकणाऱ्या ताऱ्याला सुद्धा असलं खुजेपण अनुभवावं लागणं हे त्याचं प्राक्तनच होय! 

३ टिप्पण्या:

  1. Very apt comment from my friend Prakash Thakur
    आपा : " शिखरापलीकडील"
    आजचा ताजा टवटवीत ब्लाॅग वाचला. सोबत The Rebirth of an Eagle हा सुंदर vdo ही पाहिला.
    तुम्ही किती सुंदर पघ्दतीने आपले मनोगत व्यक्त केलय!
    अगदी खरं आहे, शिखरावरील खेळाडू, उत्तम नट, कलाकार जेव्हा आपल्या खेळाने, अभिनयातल्या अदाकारीने सर्वोच्च शिखरावर असतात नि नंतर खेळत वा अभिनय करीत रहातात परंतु ते पहिली उंची गाठू शकत नाहीत फक्त त्या क्षेत्रातल आपलं अस्तित्व टिकवतात ते पाहून खरंच मनाला क्लेश होतात. अत्यंत समप॔क शब्दात ही व्यथा तुम्ही मांडली आहात.

    उत्तर द्याहटवा
  2. प्रकाशजी, एका सुंदर प्रतिक्रियेबद्दल मनःपुर्वक धन्यवाद!
    तुमच्या प्रतिक्रियेने मी अजुन विचारात पडलो. तुम्ही उल्लेखिल्याप्रमाणं शिखरापल्याड लिहिताना माझ्या मनात सामाजिक जीवनात सक्रिय असणारे खेळाडू, नट आणि कलाकार हे होते. ह्या व्यक्तिमत्वाच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देण्याचा आपण आपला हक्कच समजतो. असं का? तर आपण त्यांच्यावर भाबडं प्रेम केलेलं असतं, श्रद्धा ठेवलेली असते आणि हो त्यांना आपल्या मनात काही अंशी दैवत्व बहाल केलेलं असतं. आणि हे बहाल केलेलं दैवत्वच आपल्या मनात त्यांनी केवळ शिखरस्थानी राहावं अशी आशा निर्माण करतं! पूर्वीचं दैवत्व आणि सद्यकालीन दैवत्व ह्यात एकच फरक - हल्ली दैवत्व बहालकेलेली बहुतांशी व्यक्तिमत्वं एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आर्थिक लाभाच्या मोहात अडकलेली दिसतात.

    उत्तर द्याहटवा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...