मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, ३० जानेवारी, २०१७

सलाम राहुल !



आपल्या भोवतालच्या लोकांचं थोडं काळजीपुर्वक निरीक्षण केलं तर एक गोष्ट प्रकर्षांनं जाणवते. आपण लोकांचं वर्गीकरण विविध प्रकारात करु शकतो. 

पहिला प्रकार ज्यांना आपल्या स्वतःच्या वैशिष्ट्याविषयी, गुणांविषयी पुर्ण माहिती असते आणि त्याविषयी ते संतृप्त असतात.  त्यामुळं आपण जे काही नाही आहोत ते दाखविण्याचा आणि सोशल मीडियात त्यासाठी गवगवा करण्याचा त्यांचा प्रयत्न नसतो. आपल्या तत्वांशी एकनिष्ठ राहून ही लोक जीवन आपल्या मर्जीनं जगत असतात.  

आता हा पहिला प्रकार स्पष्ट केल्यावर बाकीच्या प्रकारांविषयी बोलणे सुज्ञास न लगे!

गेल्या आठवड्यात कोठंतरी आतल्या पानावर बातमी वाचनात आली. राहुल द्रविड ह्यानं बंगळुरू विद्यापीठानं देऊ केलेली सन्माननीय डॉक्टरेट पदवी नम्रतापुर्व नाकारली. ही पदवी नाकारताना त्यानं स्पष्टीकरण दिलं की सन्माननीय पदवी मिळविण्यापेक्षा संशोधन करुन खरीखुरी डॉक्टरेट मिळवणं मला आवडेल! राहुलला आपण सारे गेले कित्येक वर्षे ओळखतो. तो संशोधनात स्वतःला डुंबून घेईल ह्याविषयी जनांस संदेह नसावा. 

अजून एक गोष्ट! गेली एक दोन वर्षे भारतीय 'अ' संघ आणि युवा संघातून मुख्य क्रिकेट संघात येणाऱ्या गुणी क्रिकेटपटूंची संख्या नियमितपणे वाढीस लागली आहे आणि ती सुद्धा कोणता गवगवा न होता! थोडं डोकावून पाहिलं तर ह्या संघांच्या जडणघडणीत राहुल अगदी जवळून सहभागी झाल्याचं आढळून येतं. पण ह्याविषयी सोशल मीडियावर अजिबात कोठंही आत्मप्रौढी नाही! राहुलने कोठे क्लब विकत घेतला; ज्या खेळाशी त्याचा संबंध नाही त्याची जाहिरात केली असले प्रकार आपणास आढळणार नाहीत! 

एक समाज म्हणून आपण सोशल मीडियावर गवगवा करण्याची एक संस्कृती  गेल्या काही वर्षात उदयास आणली आहे (मी ही त्यात सहभागी आहे). ह्याचा परिणाम असा होतो की एखादं काम १०० टक्के परिपूर्णतेस नेण्याऐवजी ते ७० - ८० टक्के पुर्ण झालं की आपण तात्काळ प्रसिद्धीच्या मागे लागतो. अशी संस्कृती आपली पाळंमुळं रोवण्याच्या मार्गावर आहे अशावेळी शांतपणे आपलं कार्य पाडणाऱ्या राहुलकडं सुद्धा आपल्या सर्वांनी एक क्षणभर लक्ष देऊन योग्य ती शिकवण घेऊयात, हाच आजच्या पोस्टचा संदेश!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...