एखाद्या माणसाच्या स्वभावाचं वर्णन करताना आपली शब्दप्रतिभा बहरुन येते. तापट, प्रेमळ, साधासुधा, धूर्त, आक्रमक, उतावळा, वेंधळा अशी वेगवेगळी विशेषणं आपण वापरतो. त्या व्यक्तीचा विचार मनात आला की आपल्या नकळत हे विशेषण त्या व्यक्तीसोबत आपल्या मनात प्रवेश करतं.
एका विशिष्ट व्यक्तीचा जगाला जाणवणारा स्वभाव म्हणजे त्या व्यक्तीमध्ये वास्तव्य करुन असलेल्या विविध स्वभावपैलुंचे एकत्रित स्वरूपात बाह्यजगताला होणारं दर्शन! ह्या वाक्यात जगाला जाणवणारा स्वभाव आणि बाह्यजगताला हे महत्वाचे शब्द आहेत. बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या व्यक्तीचा खरा स्वभाव असतो वेगळाच पण काही कारणास्तव त्या व्यक्तीचं वेगळंच रूप प्रथमदर्शनी आपणासमोर येतं. मग त्या व्यक्तीसोबत जसजसा अधिकाधिक काळ आपण व्यतीत करतो तेव्हा मग त्या व्यक्तीचं खरं स्वभावदर्शन आपणास होतं. मग "तो आहे फणसासारखा - बाहेरून काटेरी (कठोर) पण आतून गोड (फणसाच्या गऱ्यासारखा)! वगैरे शब्दप्रयोग आपण करतो!
अरे बाबा वरचं सर्व ठीक पण वर दिलेल्या परीक्षानळ्या आणि ही पोस्ट ह्याचा संबंधच काय असा विचार तुमच्या मनात आला असणं स्वाभाविक आहे! ही संपुर्ण चौकट म्हणजे मनुष्याचा एकत्रित स्वभाव आणि ह्यातील प्रत्येक नळी म्हणजे एक स्वभावपैलू!
जेव्हा आपण एखाद्या माणसाच्या सानिध्यात केवळ काही काळ येतो त्यावेळी ह्यातील फक्त काही परीक्षानळ्यांवर प्रकाशझोत पडतो आणि फक्त त्याच स्वभावपैलुंची आपणास ओळख होते. त्यामुळं संपूर्ण चौकटीचं दर्शन झाल्याशिवाय आपण एखाद्या माणसाच्या स्वभावाविषयी अंतिम मत बनविण्याची घाई करु नये.
अजून एक मुद्दा! प्रत्येक पैलूच्या नळ्या मनुष्य जन्मतो त्यावेळी जितक्या भरल्या असतात त्या आयुष्यभर तितक्याच भरलेल्या राहतात का? उत्तर कदाचित नाही! जन्मतः मनुष्याला जो स्वभाव मिळालेला असतो तो बऱ्याच प्रमाणात आनुवंशिक असतो. कालांतराने मनुष्याला जशी शिकवण मिळते, जीवनानुभव मिळतात त्याप्रमाणे ह्यातील काही नळ्यांतील द्रव अधिक भरला जातो तर काही कमी होत जातो.
आयुष्य जसजसं पुढं सरकत जातं तसतसा आपल्या आयुष्याविषयी आपल्या मनात एक विशिष्ट् भावना निर्माण होत जाते. जसं की माझ्या आयुष्याचं सार्थक झालं, माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं वगैरे वगैरे! आणि ही अदृश्य भावना नकळतपणे आपल्या एकंदरीत स्वभावावर परिणाम करत राहते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा