मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, ४ डिसेंबर, २०१६

तमसो मा ज्योतिर्गमय!


माझे काका नरेंद्र पाटील ह्यांनी गॅलरीतून काढलेला हा एक सुरेख फोटो! हा फोटो त्यांनी आमच्या कुटुंबाच्या व्हाट्सअँप ग्रुपवर टाकला आणि मग छायाचित्रणातील त्यांच्या कौशल्याच्या कौतुकाबरोबर आमच्या ग्रुपवरील संबंधित चर्चेला उधाण आलं. हे चित्र पाहुन नक्की काय वाटतं ह्यावर ह्या चर्चेचा रोख वळला. 
हल्ली आपले विचार मांडण्यात मी अग्रेसर असतो आणि का कोणास ठाऊक बऱ्याच वेळा लोक मला अडवत नाहीत. मी खुप ज्ञानी झाल्याने असं होत असावं ह्याची शक्यता कमी असल्यानं माझ्या लिहिण्या-बोलण्यानं सर्वांचं चांगलं मनोरंजन होत असावं असं मी वाटून घेतो आणि आपलं काम चालूच ठेवतो. 
हा फोटो पाहून मला ज्ञानप्राप्तीच्या क्षणाची सर्वप्रथम आठवण झाली. सर्वत्र अंधकारमय असताना अचानक सर्व काही स्पष्ट करणारा प्रकाश आपल्यासमोर यावा आणि मग मनातील सर्व शंका, भिती दूर व्हावी ह्या घटनेची मला आठवण झाली. 
ज्ञानप्राप्तीचे क्षण अनेक असु शकतात. जीवनमरणाच्या रहाटातून सुटकेचा क्षण यावा आणि मोक्षप्राप्ती होताना सर्वत्र उजेडानं व्यापुन टाकावं हा एक ज्ञानप्राप्तीचा क्षण! 
एखादा शास्त्रज्ञ मोठ्या संशोधनात गढुन गेला असावा; बरीच वर्षे उपलब्ध माहितीच्या भंडाराच्या काहीसा गोंधळला असावा आणि अचानक मग सर्व काही स्पष्ट करणारा, सर्व माहिती भंडाराला सुसूत्रतेनं एकत्र एका सूत्राने जोडणारा धागा त्याला मिळावा असा हा युरेका क्षण! 
पंधरा-वीस वर्षे संसारात बांधून ठेवलेला नवरा बायकोच्या कधी अनपेक्षित बाहेर जाण्यानं अचानक गवसलेल्या स्वातंत्र्यानं गोंधळून जावा आणि त्याला सर्वत्र अंधारमय परिस्थितीचा भास व्हावा आणि अचानक बायको येण्याच्या चाहुलीनं त्याच्या मनातील ह्या गोंधळाचा संपूर्ण निचरा व्हावा हाच तो ज्ञानप्राप्तीचा क्षण! 
हल्लीच्या परिस्थितीमध्ये चांगला तासभर उभं राहिल्यावर मिळालेल्या त्या नोटांच्या स्पर्शानं होणारा हा प्रकाशमय क्षण!
संध्याकाळी दाजींबरोबर ह्या विषयावर मोठी चर्चा झाली. चर्चा म्हणण्यापेक्षा त्यांनी अध्यात्माच्या बऱ्याच पैलुंना बोलताबोलता अगदी लीलया आमच्यासमोर उलगडून ठेवलं. त्यांचा अध्यात्म ह्या विषयावर गाढा अभ्यास! आयुष्याच्या कोणत्यातरी एका क्षणी प्रत्येकास मी कोण? मी आलो कोठून आणि जाणार कोठे ह्याचा संभ्रम निर्माण होतो आणि आपापल्या परीनं त्याचा उलगडा करण्याचा जो तो प्रयत्न करतो. ही तर एका मोठ्या साधनेची तयारी! ह्यासाठी हवी मोठी एकाग्रता आणि आपल्या मनाशी संवाद साधण्याची क्षमता! पण हा संवाद साधायचा कसा? देह नश्वर आहे; देहाच्या जिवंतपणाचे लक्षण म्हणजे श्वास! ध्यान लावून ह्या श्वासावर लक्ष केंद्रित करावं आणि हा श्वास नक्की जातो कोठे ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा! दाजी आम्हां सर्वांना ज्ञानकण वाटून देत होते. त्यांनी ओम शब्दाचं, vibrations चं महत्त्व अशा अनेक गोष्टींना स्पर्श केला. खरंतर चर्चा अशीच बराच वेळ चालली असती पण घरातील स्त्रियांनी ह्या चर्चेमुळं लांबणीवर पडत चाललेल्या जेवणाकडं आपापल्या परीनं लक्ष वेधलं आणि मग आम्हां सर्वांचा ज्ञानप्राप्तीचा क्षण आला!  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...