मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, १८ डिसेंबर, २०१६

विचारमंथन !

वर्षाचे अखेरचे काही दिवस शिल्लक राहिले. गेल्या आठवड्यात कंपनीतील व्यवस्थापक मंडळींची विचारमंथन बैठक हैद्राबादेत पार पडली. ही बैठक आटोपली की वर्षातील जबाबदारीच्या बैठकी पार पडल्या असे मानायला हरकत नसते.  हे विचारमंथन ३ दिवस चाललं. त्यातील बहुतांशी तपशील गोपनीय. त्यामुळं इथं मांडण्यास वाव नाही. पण काही वाक्य लक्षात राहण्याजोगी!
यश म्हणजे ९९% टक्के अपयश होय! (Success is 99% Failure)!
ह्या वाक्यानं माझं लक्ष वेधलं. बहुदा एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे ह्या वाक्याचा मतितार्थ इथेही अभिप्रेत असावा! आयुष्य वलयांकित, प्रसिद्धीच्या झोतात राहुन जगण्याचा अट्टाहास करणं चुकीचं आहे हाच संदेश ह्यातुन मिळतो. पण एक मात्र खरं की आपल्या मेहनतीचं फळ आपल्यालाच मिळावं ह्यासाठी सुद्धा योग्य ते प्रयत्न करायलाच हवेत. 

डिसेंबरातील शेवटच्या दोन आठवड्यात मग बहुतेकांच्या सुट्टीचे दिवस सुरु होतात. सर्वांनी आपापल्या कुटुंबासोबत वेळ व्यतित करा, वर्षभराचा ताण घालवुन पुढील वर्षासाठी नवचैतन्याने भारून जानेवारीत परत या!! वगैरे वगैरे संदेश येतात. ह्यातील हेतू अत्यंत चांगला असतो.

जर तुम्ही तुमच्या कुटुंबियांशी वर्षभरात फारसे कनेक्ट नसाल तर शेवटच्या दोन आठवड्यात अचानक तुम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध होऊन त्यांच्याशी पूर्णपणे मिसळून जाऊ शकाल ह्याची अपेक्षा करणं चुकीचं! त्याचबरोबर कुटुंबियांसोबत वेळ व्यतित करणं म्हणजे पर्यटनस्थळी जाणं असाच अर्थ काढणं हे ही सदैव योग्य नाही. खरी अपेक्षा काय तर स्वतःला त्यांच्या जागी ठेवून पहा. त्यांच्या विश्वात नक्की काय चाललं असावा ह्याचा आराखडा बांधा आणि मग ज्या गोष्टींची त्यांना गरज वाटते त्याविषयी संवाद साधा! बऱ्याच वेळा त्यांच्या ह्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी फार दूरवर जायची गरज नाही हेच आपल्याला जाणवेल. 

मानसिकदृष्ट्या प्रगल्भ असणं हा आजच्या काळात मोठा गुण आहे. तुम्हांला दुःख झालंय का? तुम्ही उदास आहात का? हे पाहायला कोणाकडं वेळ नसतो. म्हणजे सर्वजण काही अचानक दुष्ट बनले असं काही नाही! पण बहुतेक सर्वांना त्यासाठी वेळ मिळत नाही. आता वेळ मिळत नाही ह्याचं काहीसं खोलवर जाऊन विश्लेषण! आपल्याकडं वेळ नसतो हे चुकीचं म्हणणं! खरंतर तर आपल्याला मोकळा वेळ मिळतो पण तो bits and pieces मध्ये असतो. अधुन मधून पाच दहा मिनिटाची फुरसत मिळते. पण आपण बऱ्याच वेळा हा वेळ सोशल मीडियावर काहीशा टाईमपास गोष्टीत घालवतो. ह्याच थोड्या वेळात तुम्ही एखाद्या जवळच्या मित्रास, नातेवाईकास फोन केलास तर त्यांना बरं वाटेल ह्यात शंका नाही. २०१७ सालात काही विशिष्ट कारण नसताना सुद्धा दररोज एका जवळच्या व्यक्तीस फोन करावा असं ध्येय ठेवण्यास काय हरकत आहे? 

एक गोष्ट आपण सर्व अनुभवतो; आपण भारतीय लोक अधिकाधिक बुद्धिमान आणि त्याचबरोबर आक्रमक बनत चाललो आहोत. आपल्या मुलांना आपण विविध गोष्टीत परिपुर्ण बनविण्यासाठी अगदी झटत असतो. माझं म्हणणं तर एकच - त्यांना मानसिकदृष्ट्या संतृप्त बनवा! त्यांच्यासाठी ही फार मोठी देणगी असू शकते! आर्थिकदृष्ट्या बहुतेक सर्वजण बऱ्यापैकी स्थिरस्थावर स्थितीत आहोत आणि पुढेही असणार! म्हणजे अगदी अतिश्रीमंत नसलो तरी आपल्या किमान गरजा भागविण्यापुरते तरी आपण सदैव सुस्थितीत राहणारच! जर आपण आपल्या पिढीला मानसिकदृष्ट्या संतृप्त बनवलं तर त्यांना आपल्यापेक्षा श्रीमंत, अधिक बुद्धिमान, अधिक भारदस्त व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीचा हेवा वाटणार नाही आणि जरी वाटला तरी ते त्यातून लवकर बाहेर पडतील. दुसऱ्यांची बौद्धिक आक्रमकता शांतपणे परतवुन लावण्याचे सुद्धा अनेक मार्ग असतात. त्यासाठी आपल्याला आक्रमक बनण्याची आवश्यकता नेहमीच नसते! 

वर्ष संपत आलं! ब्लॉगमध्ये ह्यावर्षी काही पोस्टची चांगली भट्टी जमली तर काहींची नाही! शेवटच्या आठवड्यात Trapped चा शेवट करावा असा विचार आहे. शेवटी ह्या विचारमंथन बैठकीच्या ठिकाणचा माझ्या सहकाऱ्याने काढलेला हा प्रेक्षणीय फोटो!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...