मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०१६

Trapped - भाग १


स्वामी आला. योगिनीनं जेवणाचं ताट टेबलावर ठेवलं होतं आणि सर्व पदार्थ नुकतेच गरम करुन शेजारीच मांडून ठेवले होते. अंगात कणकण होती म्हणून बिछान्यावर पडली आणि नेमका डोळा लागला. 

"आई गं !" डोक्यात एक सणकून कळ गेली तशी योगिनी कळवळली. तापाने लालसर झालेले डोळे तिनं उघडले तर स्वामीने तिच्या डोक्यावर रोखून धरलेली टॉर्च तिच्या नजरेस पडले. त्यातील किरणांनी तिच्या मस्तकात ही कळ निर्माण केली होती. अंगातला ताप वगैरे विसरुन योगिनी झटकन उठली. भात, भाजी, वरण सर्व काही स्वामीला हवं तसं गरम आहे ना ह्याची तिनं खातरजमा करुन घेतली आणि मगच ताट वाढलं. 

एखाद्या वाघासमोर बांधलेल्या शेळीनुसार स्वामी जेवेस्तोवर योगिनी त्याच्या बाजुलाच बसुन होती. "कोणी मेल्यागत असला रडका चेहरा का घेऊन बसलीस माझ्यासमोर! " स्वामी कडाडला. एका क्षणात योगिनीच्या चेहऱ्यावर ओढुनताणून आणलेलं हसु होतं. "ऑफिसात सर्व काही व्यवस्थित होतं ना आज?" तिनं प्रश्न विचारला. "ह्या वर्षात ८२ वेळा हा प्रश्न विचारुन झाला आहे. आजची ही ८३ वी वेळ!" स्वामीने निर्विकार चेहऱ्यानं तिला जाणीव करुन दिली. भाजी त्याच्या अगदी मनासारखी झाली असावी म्हणून त्यानं असा निर्विकार प्रश्न विचारला असावा, योगिनीने मनाची अटकळ बांधली. 

थोड्या वेळातच जेवण वगैरे आटपून स्वामी गाढ झोपी गेला सुद्धा! पण योगिनी मात्र तळमळत जागीच होती. 

त्यांच्या लग्नाला आता तीन वर्षे होत आली होती. सुरुवातीला राजाराणीचा संसार अगदी दृष्ट लागण्यासारखा चालला होता. अगदी मनासारखा पती लाभला म्हणुन योगिनी अगदी "सातवे आसमान" वर होती. पण एकदा ऑफिसच्या कामानिमित्त म्हणुन स्वामी आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला. सुरुवातीला आठवडाभराचा म्हणुन असणारा दौरा चांगला तीन महिने लांबला. 

तीन महिन्यांच्या विरहानंतर स्वामी परतणार म्हणून योगिनी अगदी आनंदात होती. स्वामी परतला तो मध्यरात्री दोन वाजता! काहीतरी बदलल्याची जाणीव नक्कीच योगिनीला झाली होती, पण तीन महिन्यांच्या प्रवासाचा शीण आल्यानं स्वामी मूडमध्ये नसेल आणि आपण सुद्धा झोपेत असू म्हणून आपल्याला असं वाटून गेलं असणार अशी तिनं मनाची समजूत काढली होती. 

पण तिची ही समजुत क्षणिक होती. दुसऱ्या दिवशी सकाळपासुन योगिनीचा हा बंदिवास सुरु झाला होता. जे काही चाललं होतं ते विश्वास ठेवण्याच्या पलीकडचं होतं. शरीर स्वामीचच असलं तरी तो नक्कीच स्वामी नव्हता. तीनच महिन्याचा कालावधी झाला असला तरी योगिनी आपल्या स्वामीला चांगली ओळखुन होती. आणि आफ्रिकेच्या प्रवासानंतर परतलेला स्वामी म्हणजे त्याच्या देहात वास्तव्य करणारी दुसरीच कोणी व्यक्ती आहे ह्याची योगिनीला पूर्ण खात्री होत होती. 

पहिले काही दिवस आपला हा संशय जवळच्या कोणाला तरी बोलुन दाखवावा असं तिला वाटत होतं. पण असा संशय बोलून दाखवावा तर आपल्यालाच लोक वेड्यात काढतील अशी तिला भिती वाटू लागली होती. हा भूतांखेतांचा प्रकार असावा असा विश्वास ठेवण्यास तिचं आधुनिक मन तयार होत नव्हतं. शेवटी एक दिवशी स्वामी ऑफिसात गेला असताना तिनं मनाचा हिय्या करुन आपली धाकटी बहीण नमिता हिला भ्रमणध्वनीवरुन आपला संशय मेसेज करुन सांगायचं ठरवलं. तिनं जसा मेसेज टाईप केला आणि तो पाठविण्यासाठी send बटन दाबायचा प्रयत्न केला तसं अचानक सर्व अक्षरे एका मागोमाग एक नाहीशी होताना दिसू लागली. जसं कोणी backspace बटणं दाबावीत तसं! 

योगिनी अगदी हादरुन गेली होती. त्या दिवशी सायंकाळी परतलेला स्वामी आपल्याकडे काहीसा खुनशी नजरेनंच पाहतो आहे हे तिला जाणवलं होतं. तीन दिवसानंतर तिनं आईला फोन करुन हे सांगायचं ठरविलं तर अचानक तिच्या मोबाईलच कव्हरेजच बंद झालं होतं. योगिनीचा हा बाह्य जगताशी संपर्क साधण्याचा प्रयत्न अजुन काही दिवस चालला होता. पण प्रत्येक प्रयत्नाच्या वेळी कोणतीतरी अज्ञात शक्ती तिचा हा प्रयत्न हाणुन पाडत होती. 

अजून एक भयाण वास्तव तिच्यासमोर आलं होतं. स्वामीने सुरुवातीचे काही दिवस काहीतरी बहाणा करुन तिचा सार्वजनिक प्रसंगातील वावर अगदी किमान ठेवला होता. आणि जेव्हा त्यानं तिला अगदी मनसोक्तपणे समारंभात वावर करण्याची मुभा दिली होती तेव्हा मात्र तिच्या स्मरणशक्तीचा काही ठराविक भाग तिला अज्ञात बनत होता. आपलं भय, संशय तिला अशा प्रसंगी अजिबात आठवत नसे. आणि मग सर्व काही आटपून घरी परतल्यावर मात्र तिला आपण अशी नामी संधी वाया घालवली ह्याची हळहळ लागुन राही. आणि स्वामीच्या चेहऱ्यावरील ते छद्मी हास्य तिची अगतिकता अजुनच वाढवी. 

एकटी बसली असताना मग ती ह्या सर्व घटनांची तर्कसंगती लावण्याचा प्रयत्न करीत असे. आपण एका जाळ्यात अडकलो आहोत आणि आपला हा लढा केवळ आपल्यालाच लढायचा आहे हे ती समजुन चुकली होती. सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर आपल्या मेंदूवर ताबा मिळवु शकणारा स्वामी आपल्याला एकटी असताना मात्र मुक्तपणे कसा विचार करुन देतो ह्याचंच तिला राहूनराहून आश्चर्य वाटत होतं. हे स्वातंत्र्य जितका वेळ आहे तोवर त्याचा पुरेपूर वापर करुन घेतला पाहिजे ह्याची देखील तिला जाणीव होती. 

स्वामीच्या देहात वावरणारा नक्की आहे तरी कोण ह्याचा छडा लावणं हे योगिनीच्या जीवनाचं एकमात्र ध्येय बनून राहिलं होतं.  

योगिनीचं असं विचारचक्र सुरु असतानाच तिला त्यांच्या बंगल्याच्या बागेमध्ये काहीशी चकाकणारी गोष्ट दिसली. रात्रीच्या वेळी बागेत असं चकाकणारी कोणती गोष्ट आली म्हणून योगिनी बाहेर उठून पाहावयास गेली तर एका क्षणार्धात वस्तु तिच्या नजरेआड झाली होती. पण त्या काही मिलीसेकंदात त्या वस्तूचा आकार तिच्या मनः पटलावर कायमचा नोंदला गेला होता. शालेय जीवनात वाचलेल्या परग्रहवासियांच्या गोष्टी तिच्या चांगल्याच लक्षात होत्या. आणि त्यातील अंतरिक्षयान आज काही वर्षांनी तिच्या मनःपटलावर पुन्हा एकदा नोंदलं गेलं होतं. तिचा मेंदू जागरुक होता म्हणुन ती एका क्षणार्धात बिछान्यावर झोपून गेली. 

तिचा संशय खरा ठरला होता. स्वामी अगदी खडबडत उठला होता. धावत जाऊन त्यानं बागेत जाऊन नजर टाकली होती. तिथल्या मोकळ्या जागेकडं पाहून तो अगदी वैतागला होता. मग पुढील पाच मिनिटं तो संशयानं अगदी रोखुन झोपलेल्या योगिनीकडं पाहत राहिला होता. एकदाचा तो जाऊन पुन्हा झोपला तेव्हा कुठं तिनं सुटकेचा निश्वास टाकला होता. 

आपला स्वामी म्हणजे परग्रहवासी आहे की काय ? कृष्णपक्षातील उशिरानं उगवलेल्या चंद्राकडं पाहत योगिनी आपल्या मनातील संशयाच्या वादळाला आवर घालायचा आटोकाट प्रयत्न करत होती 

(क्रमशः) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...