मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, १८ सप्टेंबर, २०१६

Trapped - भाग २



अंतरिक्षयान पाहिल्यानंतर बरेच दिवस योगिनी आपल्याच विश्वात मग्न होती. स्वामीच्या वागण्यातील काही विशिष्ट खासियत सापडते का ह्याचा ती अभ्यास करत होती. आपल्याकडून संसारातील सर्व कर्तव्ये पार पाडण्याचा कसोशीनं प्रयत्न करत होती. स्वामी जर खुश झाला तर त्याच्या आपल्याबरोबरच्या वागण्यात काही फरक पडेल का ह्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्नसुद्धा करत होती. 

हे सर्व वाटतं तितकं सोपं नव्हतं. स्वामीच्या स्वभावातील विक्षिप्तपणा मधुनच उफाळून येई! अशावेळी आपला शांतपणा कायम ठेवण्यासाठी तिला कसोशीनं प्रयत्न करावा लागे. पण ह्या सर्व कठीण परिस्थितीतुन तिनं आपले प्रयत्न सुरुच ठेवले होते. स्वामीच्या आवडीचा स्वयंपाक करणं, त्याला आवडणारं संगीत लावणं अशा छोट्या छोट्या गोष्टीतून तिनं आपले प्रयत्न सुरु ठेवले होते. बाहेरच्या जगाशी संपर्क साधताना आपल्याला हे सारं काही आठवत नाही ह्याविषयी मनःस्ताप करणं सुद्धा तिनं हळूहळू सोडुन दिलं होतं. म्हणायला गेलं तर आपल्या विश्वातील इतका मोठा बदल तिनं जवळजवळ पुर्णपणे पचवुन टाकला होता. अचानक एके दिवशी तिच्या मनात विचार आला, "असंच आयुष्य जगायला काय हरकत आहे?" मग मात्र ती खडबडुन जागी झाली. सहजासहजी अशी हार मानणाऱ्यातील ती नव्हती. 

स्वामीच्या वागण्यात काहीसा फरक तिला जाणवु लागला होता. त्याचं वागणं पुर्वीइतकं निष्ठुर राहिलं नव्हतं. एकदा तर तिला अंगात किंचित ताप असताना त्यानं चक्क तिला चहा बनवुन दिला होता. हळुहळू तिचा धीर वाढू लागला होता. असंच एके दिवशी रविवारी सकाळी दोघं चहा शांत बसले होते. आपला खरा स्वामी अशावेळी आपल्या सोबत असता तर, ह्या विचाराला तिनं प्रयत्नपूर्व दूर लोटलं. सारं धैर्य एकवटून तिनं त्याला विचारलं, "स्वामी माझ्या मनावर तू कसं नियंत्रण करतोस?" मागील साऱ्या महिन्यातील आपली चांगली वागणुक तिनं ह्या प्रश्नाद्वारे पणाला लावली होती. जर स्वामी संतापला असता तर त्याच्या प्रतिक्रियेच्या संतप्तपणाने कोणतीही परिसीमा गाठली असती. आपल्याला हे सारं कळलं आहे हे स्वामीला आपल्या तोंडाने सांगण्यात फार मोठा धोका आहे असं ती समजत होती. 

स्वामीनं एक मोठा निश्वास घेतला. तो क्षणभराचा शांततेचा काळ योगिनीला एका युगासारखा वाटला. "मी तुझ्या मनावर कसं नियंत्रण करतो हे मी तुला सांगू शकत नाही! पण जे काही चाललं आहे ते तुला समजतं आहे हे मी जाणुन आहे!" आफ्रिकेवरुन परतल्यानंतर इतक्या महिन्यांच्या कालावधीनंतर स्वामी सलगपणे इतकं काही बोलला होता. हा संवाद सुरु करण्यासाठी आणि तो कसा होईल ह्याविषयी विचार करुन करुन योगिनीनं इतका तणाव घेतला होता की ह्यापुढं संवाद चालू ठेवणं तिला शक्य झालं नाही. 

दिवस पुढं चालले होते. मागचा तो संवाद म्हणजे ह्या दोघांच्या विश्वातील एका मोठं पाऊल होतं. स्वामीने त्या दोन वाक्यांत बऱ्याच गोष्टींची कबुली दिली होती. योगिनी पुढील काही दिवसात त्या संवादाच्या छायेतुन बाहेर निघाली होती. तिला हल्ली एका गोष्टीचं बरं वाटू लागलं होतं. घरी एकटं असताना विचार करण्याची तिची क्षमता आता पूर्वीइतकी प्रभावी झाल्याचं तिला जाणवु लागलं होतं. 

अशाच एका संध्याकाळी योगिनी आपल्या विचारशक्तीच्या स्पष्टतेबद्दल स्वतःशीच आनंद व्यक्त करत बसली होती. नेहमीप्रमाणं स्वामी घरी परतला. तो चहाचा कप घेऊन सोफ्यावर बसला होता. अचानक काय झालं ते योगिनीला समजलं नाही पण तिच्या तोंडुन उद्गार निघुन गेले, "स्वामी मला असं हे नियंत्रित विचारशक्तीचं जीवन जगुन वैताग आला आहे. मी माझं जीवन संपवायच्या निर्णयाप्रत येऊन पोहोचले आहे!"  स्वामीच्या चेहऱ्यावर तिला काही खास आश्चर्याचे भाव दिसले नाहीत. त्यानं आपला चहाचा कप संपवायला नेहमीइतकाच वेळ घेतला. 
" तू ह्या पृथ्वीवरील आपलं जीवन संपवुन माझ्या नियंत्रणातून मुक्तता मिळवु शकशील असा तुझा समज असेल तर तो पुर्ण चुकीचा आहे!" चहाचा कप टेबलावर ठेवत तो म्हणाला. आणि मग त्यानं काही क्षण योगिनीकडे रोखुन पाहिलं. 

योगिनीला अचानक ग्लानी येऊ लागली होती. तिचे डोळे मिटले गेले आणि अचानक तिच्या डोळ्यासमोर वेगळंच चित्र येऊ लागलं. तिचे सर्व नातेवाईक शोकाकुल होते. हे सर्व शोकाकुल का आहेत ह्याचा विचार करत असतानाच तिला पांढऱ्या कपड्यात आच्छादलेला आपला निष्प्राण देह खोलीच्या एका कोपऱ्यात दिसला. तिथं बाजुलाच स्वामीसुद्धा बसला होता. हे सर्व पाहत असताना ती खरोखर त्या चित्रात शिरली. तिथल्या योगिनीच्या देहातून ती बाहेर पडली होती आणि प्रचंड वेगानं ती एका प्रचंड अंधाऱ्या पोकळीत तिचा प्रवेश झाला होता. शरीरविरहित असं आपलं अस्तित्व तिला जाणवत होतं. आपल्या मनातील विचारांशिवाय तिला कोणाचीच सोबत नव्हती. अगदी स्वामीची सुद्धा! त्या विचारानं तिला अगदी हायसं वाटलं होतं आणि त्याच क्षणी तिला आपल्या बाजुला एक वायुमय अस्पष्टशी आकृती दिसली होती. आणि तिनं योगिनीशी संपर्क साधला होता. इतक्या प्रचंड आणि कोणत्याही मितीचं अस्तित्व असल्याचं खुण नसलेल्या ह्या विश्वात ही आकृती कोण असावी असा विचार करतानाच हा स्वामीच आहे हे तिला त्या संदेशावरुन समजलं होतं आणि तिला भयंकर धक्का बसला होता. 

"समजलं, ह्या विश्वापलीकडं सुद्धा मी तुझ्यावर कसं नियंत्रण ठेवू शकेल ते? सोफ्यावरुन उठत स्वामीनं तिच्या पाठीवर हलकंसं धोपटत तिला म्हटलं होतं. 

ह्या अनुभवातून बाहेर येण्यासाठी योगिनीला बरेच दिवस लागले होते. तिचा आत्मविश्वास काहीसा कोलमडला होता. आणि ज्या वेळी ती काहीशी सावरली होती त्यावेळी तिला जाणवलेली पहिली गोष्ट होती ती म्हणजे आपण विचारलेला हा प्रश्न 

"स्वामी मला असं हे नियंत्रित विचारशक्तीचं जीवन जगुन वैताग आला आहे. मी माझं जीवन संपवायच्या निर्णयाप्रत येऊन पोहोचले आहे!

खरंतर हा आपण विचारलेलाच नव्हता. स्वामीनेच तो आपल्या तोंडुन वदवून घेतला होता. त्याच्या क्षमतेची आपल्याला जाणीव करुन देण्यासाठी! प्रचंड उद्वीगतेनं तिनं टेबलावर आपली मूठ आपटली होती. 
ह्या जीवनातच नव्हे तर त्यापलीकडील विश्वात सुद्धा आपण अडकून गेलो आहोत ह्या प्रचंड वेदनादायक भावनेनं तिला व्यापुन टाकलं होतं. 
 
(क्रमशः)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...