मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, १९ जून, २०१६

सैराट - एक विश्लेषण






बहुतांशी सर्वसामान्य माणसं दोन विचारसरणीने जीवन जगत असतात. 

पहिली विचारसरणी (धोपटमार्गाने वाटचाल) - त्यांच्या जीवनाचा बराचसा भाग हा आपल्या चरितार्थाची सोय लावण्यात व्यापून गेलेला असतो. लहानपणापासुन आईवडील त्यांना लवकरात लवकर आपल्या पायावर उभा राहायला शिक असं सांगुन त्यांच्या मतीनुसार शिस्तीतल्या जीवनाचा स्वीकार करण्याचा उपदेश करीत असतात. ह्या विचारसरणीनुसार वागताना विशिष्ट वयात शाळा पास होणे, नोकरीधंद्याला लागणे, आई वडिलांनी निवडलेल्या साथीदाराशी लग्न करणे, पुढे पालक म्हणुन मुलांचे संगोपन करणे, मग आदर्श आजी आजोबा बनणे, भजनाला जाऊन बसणे असा मार्ग साधारणतः सांगितला जातो. 

दुसरी विचारसरणी (धोपटमार्गापासून फारकत) - वरील विचारसरणी बहुतेक सर्वांना स्वीकारावी लागत असली तरी किती प्रमाणात ती स्वीकारावी ह्याविषयी प्रत्येक व्यक्ती जसजशी मोठी होत जाते तसतसं स्वातंत्र्य मिळत जाते. ह्यातील काही गोष्टीतील धोपटमार्गापासूनची फारकत फारशी गंभीर नसते. शाळा कॉलेज पास होणे एखादं वर्ष मागे पुढे झालं तरी आयुष्यावर मोठा परिणाम पडत नाही. म्हणजे पुन्हा एकदा जीवनगाडी रुळावर आणायला तुम्हांला दुसरी संधी मिळते. पण काही गोष्टीतील धोपटमार्गापासुनची फारकत तुमच्या आयुष्यावर फार मोठा परिणाम करते. लहान वयातील घरच्यांचा विरोध पत्करून केलेलं लग्न ही त्यापैकी  एक गोष्ट ! ह्यातील प्रत्येक वेळा ही गोष्ट तुमच्या आयुष्यावर वाईट परिणाम करते असं नव्हे पण … 

सैराट 

आता वळूयात सैराटकडे. त्यातील काही गोष्टींचे हे विश्लेषण!

१) आर्चीचे परशाच्या प्रेमात पडणे - परशा आपल्याकडे सतत पाहत आहे हे लक्षात आलेली आर्ची मग लवकरच त्याच्या प्रेमात पडते. ह्यामध्ये त्यांचा बौद्धिक संवाद वगैरे प्रकार नाही! नाही म्हणायला त्याला बारावीत चांगले गुण असतात. नागराजने मुद्दामच हे प्रथमदर्शनी प्रेम म्हणुन खुलविले असावे असा माझा अंदाज! ह्यात बहुतांशी जनतेला आपल्या बाबतीत हे असं काही घडू शकते अशी आशा नागराज निर्माण करतो. 

२) आर्चीचा बिनधास्तपणा - आर्ची चित्रपटाच्या पूर्वाधात जबरदस्त बिनधास्तपणा दाखविते. खोखो खेळताना आपल्याकडे बघणाऱ्या परशाची हजेरी घेताना असो कि त्याच्याशी कॉलेजात हाणामारी करणाऱ्या मंग्याचा सर्वांसमोर समाचार घेणे असो की परशाच्या आईची आत्याबाई म्हणुन ट्रॅक्टरवरुन येऊन खबरबात घेणे ह्या सगळ्या प्रकारात तिचा बिनधास्तपणा अगदी मस्तपणे समोर येतो. अशी बिनधास्त प्रेमिका आपल्याला मिळावी अशी जी मनोकामना बहुतांशी सर्वसामान्य तरुणांच्या मनात असते तिला आर्चीच्या रूपाने हुबेहूब मूर्तस्वरुप देण्याची कामगिरी नागराजने उत्कृष्टपणे बजावली आहे. 

आर्ची ही अगदी श्रीमंताघरची लेक! त्यामुळे हा बिनधास्तपणा अगदी वास्तववादी वाटतो!

३) चित्रपटाचा वेग आणि नेत्रदीपक फ्रेम्स  - पुर्वार्धात चित्रपट अगदी वेगाने पुढे सरकतो आणि प्रेक्षकाला खुर्चीला खिळवुन ठेवतो. चित्रपटात घेतल्या गेलेल्या काही फ्रेम्स अगदी नेत्रदीपक! हिरवगार शेत, घोड्यावरील रपेट हे सीन्स उत्तमरित्या चित्रित करण्यात आले आहेत.

४) Honour killing - हा प्रकार महाराष्ट्रात अस्तित्वात आहे का आणि असल्यास किती प्रमाणात? ह्या विषयी हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण करतो. चित्रपटाच्या शेवटी प्रेमिकांना कायमचं दुरावताना दाखवुन प्रेक्षकांची सहानभुती मिळविण्याची ही ट्रिक एक दुजे के लिये, कयामत से कयामत तक वगैरे चित्रपटापासुन प्रचलित आहे. जर ह्या चित्रपटाचा सुखांत दाखवला असता तर चित्रपट इतकाच यशस्वी झाला असता का हा विचार करण्यासारखा प्रश्न! 

५) ट्रेनच्या तालावर नाचणं  - कॉलेजात असेपर्यंत मुलं जो काही मनसोक्त धतिंगपणा करतात त्याची रूपं वेगवेगळी ! गावात ह्यासाठी मोजके पर्याय उपलब्ध! परंतु त्यामुळे आपल्या सृजनशीलतेला बंधन येऊ देतील ते कॉलेजकुमार कसले! केवळ ट्रेनचा आवाज हे पार्श्वसंगीत घेऊन त्याच्या तालावर मनसोक्त नाचण्याचा आनंद लुटणे ही तर तरुणाईची खासियतच!

६) लसूण सोलणं  -   पळुन जाणं सोपं पण त्यानंतर मात्र जीवनाची दाहक वास्तवता समोर उभी ठाकते! बाहेर भेटून मग आपआपल्या घरी जाण्याचा काळ वेगळा आणि २४ तास एकत्र राहण्याचा प्रसंग वेगळा! मुलांना लहानपणापासुन आईच्या हातच्या जेवणाची सवय असते आणि हे जेवण आयतं मिळण्याची सुद्धा बहुतांशी उदाहरणात सवय असते. त्यामुळे लग्नानंतर ही जबाबदारी आपसुकपणे बायकोने स्वीकारावी ही मानसिकता बरेच तरुण बाळगुन असावेत. त्यामुळे लसूण सुद्धा न सोलता येणारी बायको मिळाली तर कठीणच!

७) लग्नानंतरचे वाद विवाद व्यवस्थापन  - लग्नानंतर वाद विवाद होतातच. सामाजिकदृष्ट्या दोन अगदी वेगळ्या स्तरावर असणाऱ्या जोडप्यात वाद झाला आणि त्यातील कनिष्ठ स्तरावरील साथीदाराने आपल्या घरातील / ज्ञातीतील काही आक्षेपार्ह भाषा वापरली किंवा वर्तवणूक केली तर दुसरा साथीदार त्याला माफ करु शकतो काय? चित्रपटात हे शक्य होऊ  शकत असलं  तरी वास्तवात मात्र कठीण आहे. 

मुख्य म्हणजे आपण व्यक्ती म्हणुन नक्की कसे आहोत आणि व्यक्ती म्हणुन नक्कीआपणास काय हवं आहे ह्याची पुर्ण जाणीव बहुदा कोणालाच नसते. त्यामुळे मतभेदाचे प्रसंग उद्भवल्यास त्यावेळी त्यावर तोडगा म्हणुन नक्की काय हवं आहे त्याविषयीची संदिग्धता बऱ्याच जोडप्यांना महागात पडते. 

८) आर्चीचा आईला फोन - आर्ची अचानक दोन वर्षांनंतर आईला फोन का करते हे मला आधी न उलगडलेलं कोडं! म्हणजे चित्रपटाच्या कथेची ती नक्कीच गरज आहे कारण त्या कॉलमुळे तिच्या घरच्यांना तिचा ठावठिकाणा कळतो! आर्ची स्वतः आई बनल्यावर तिला आपल्या आईची मानसिकता अधिक चांगल्या प्रकारे कळते, ती तिच्याशी अधिक चांगल्या प्रकारे कनेक्ट होते आणि म्हणुन तिला फोन करते ! आज आमच्या कौटुंबिक ग्रुपवरील मला प्राची, निऊ  आणि प्राजक्ताने  जे काही ज्ञान दिलं त्यातील हा एक मुद्दा! आणि दोन वर्षानंतर का फोन तर त्यांच्या मुलाची बाहेर पडणारी कोवळी पावलं ही कथानकाची गरज म्हणुन दोन वर्षानंतर हा कॉल! हे सर्व उमजल्यावर अचानक कोणत्या तरी प्रसंगाने आर्चीला आईची अगदी जोरदार सय येते असा काही प्रकार दाखवता आला असता असं मला राहुन राहून वाटून गेलं!

९) आर्ची परशाची निरागसता - ह्या दोघांची निरागसता हा ह्या चित्रपटाचा USP! ह्या चर्चेपायी आपली मध्यरात्र ओलांडुन गेली तरी chat करणारी निऊ म्हणाली. मी लगेचच मान्य केलं!

तर लोकहो सैराट पाहताना लक्षात ठेवायची मुख्य गोष्ट म्हणजे पोस्टच्या सुरुवातीला उल्लेखलेली विचारसरणी १ आणि २! मी पक्का विचारसरणी १ चा! अधुनमधून विचारसरणी २ कडे झुकतो तो असली पोस्ट लिहिण्यापुरता! विचारसरणी २ साठी असलेली आपआपली appetite किती आहे हे प्रत्येकाने ओळखुन असणं सर्वांच्या दृष्टीने किती बरं असतं नाही का!  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...