मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, २६ जून, २०१६

शिखरमार्ग !

"जया अंगी मोठेपण तया यातना कठीण" अशी मराठीत उक्ती आहे. व्यावसायिक जगात वावरताना अशा काही उच्चपदस्थ व्यक्तींना पाहताना किंवा त्यांच्याविषयीची पुस्तकं वाचताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही पैलु जाणवले त्याविषयीची आजची ही पोस्ट! 


१) दीर्घ दिनचर्या - 
हल्ली सर्वच क्षेत्रात दीर्घ वेळ काम करावं लागतं. इतकंच नव्हे तर काही जणांना विविध शहरांत, देशांत सतत प्रवास करावा लागतो. बहुतेक वेळा दीर्घ प्रवासानंतर इच्छित स्थळी पोहोचल्यावर तात्काळ आपल्या कामास किंवा अगदी महत्वाच्या मिटिंगला सुरुवात करावी लागते.  तिथं वेगळ्या प्रकारचा आहार मिळतो त्यास सुद्धा जमवुन घ्यावं लागतं. ह्या सर्व बदलत्या परिस्थितीचा मुकाबला करताना ज्यावेळी प्रत्यक्ष कामास सुरुवात होते त्यावेळी तुम्ही आपली सर्वोत्तम कामगिरी सादर करावीत अशी अपेक्षा असते.

२) उत्तम स्मरणशक्ती -  
ही सर्व उच्चपदस्थ मंडळी अनेक लोकांशी आपल्या कामानिमित्त संवाद साधत असतात. एका दिवसात ह्या लोकांना संवाद साधाव्या लागणाऱ्या लोकांची संख्या शंभर किंवा त्याहुनही सुद्धा जास्त सहज जाऊ शकते. अशावेळी आपण संवाद साधत असलेल्या मंडळींसाठी नक्की महत्वाच्या गोष्टी कोणत्या, त्यांच्याशी आपण शेवटी ज्यावेळी बोललो त्यावेळी आपली चर्चा नक्की कोणत्या विषयावर झाली होती, त्यांना आपण काही आश्वासन दिलं होतं काय हे सर्व'लक्षात राहायला हवं! ह्यातील काही लोक त्यांच्या संघटनेतील पाचशे, हजार वगैरे लोकांची नावे लक्षात ठेवू शकतात. ह्यावरची गोष्ट म्हणजे ह्यातील बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची नावे सुद्धा लक्षात ठेऊ शकतात.


३) उच्च भावनांक -
ही मंडळी ज्या बैठकीत भाग घेत असतात त्यात अगदी महत्वपूर्ण आणि दुरपांगी परिणाम करणारे असे निर्णय घेतले जातात. ह्या निर्णयांमुळे कोट्यवधी रकमेचा नफा / तोटा होऊ शकत असतो आणि हजारो लोकांची आयुष्ये प्रभावित होऊ शकत असतात. हे सर्व असताना देखील आपण एक व्यक्ती म्हणुन ह्या निर्णयांशी भावनिक बंध जोडणं चुकीचं असतं. आपण एक कर्तव्य म्हणुन हा निर्णय घेत आहोत ह्याची जाणीव असणं आवश्यक असतं. एखादा इतका महत्वाचा निर्णय घेऊन बैठकीबाहेर पडल्यावर लगेचच एखाद्या खेळीमेळीच्या बैठकीत हसऱ्या चेहऱ्याने सहभागी होता आलं पाहिजे. 

त्याचप्रमाणे तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काहीही घडामोडी घडत असोत पण त्याचा यकिंचितही परिणाम तुमच्या व्यावसायिक जीवनावर होता कामा नये.

४)  उत्तम संवादकला - 
ह्या लोकांनी बोललेला प्रत्येक शब्द, लिहिलेलं प्रत्येक वाक्य असंख्य लोक वाचत / ऐकत असतात आणि आपापल्या बुद्धीनुसार त्याचा अर्थ लावत असतात. त्यामुळे ह्या संवादामध्ये चूक करण्यासाठी अजिबात वाव नसतो. 

ज्यावेळी ह्या व्यक्ती १:१ पातळीवर संवाद साधत असतात त्यावेळी साधत असतात त्यावेळी त्या समोरच्या व्यक्तीला मार्गदर्शन करणे, त्याला उत्तम कामगिरी करण्यासाठी उत्साहित करणं आणि त्या व्यक्तीला खास वाटून देणे ह्या सर्व कामगिऱ्या एकाच वेळी पार पाडता यायला हव्यात.

५) कौटुंबिक समतोल - 
 निःसंशयपणे ह्या व्यक्तींना बऱ्याच दीर्घ कालावधीपर्यंत आपल्या कुटुंबापासून दूर राहण्याची वेळ येते किंवा कमीत कमी वेळ कुटुंबासोबत व्यतित करण्याची संधी मिळते. अशा परिस्थितीत जो वेळ ह्या व्यक्ती कुटुंबासोबत घालवतात त्यावेळी त्यांना इतकं खुष ठेवता यायला हवं कि बाकीच्या वेळची आपली कमतरता सहन करण्याची शक्ती त्यांना मिळावी. हे वाक्य लिहायला कितीही सोपं असलं तरी प्रत्यक्षात आणण्यास अत्यंत कठीण असतं. 

६) विनोदबुद्धी - 
 कार्यालयातील गंभीरातील गंभीर परिस्थिती सांभाळण्यासाठी कधीतरी विनोदबुद्धीचा वापर करता येऊ शकतो. हा योग्य प्रसंग कोणता आणि ह्या प्रसंगी योग्य विनोद कोणता ह्याची उत्तम जाणीव काही उच्चपदस्थ व्यक्तींना असल्याचं जाणवुन येतं. 

७) शिस्तबद्ध दिनचर्या - 
ठरलेल्या वेळी बैठकीला उपस्थित न राहणे, आजारी पडल्यामुळे अनुपस्थित राहिल्याने महत्त्वाच्या बैठकी चुकणे ह्या गोष्टी ह्या उच्चपदस्थ व्यक्तींना अजिबात परवडण्यासारख्या नसतात.  त्यामुळे शिस्तबद्ध दिनचर्या हा एक महत्त्वाचा घटक ह्या लोकांना स्वीकारावा लागतो. हल्ली नियमित व्यायाम करुन अगदी फिट राहणे हा ही एक गुणधर्म बनत चालला आहे. रात्रीचे जेवण कमी करणे किंवा खूप आधी घेणे हा सुद्धा हल्ली आढळून येणारा गुणधर्म! हृदयविकाराच्या आजारापासून आपणास कसं दूर ठेवावं ह्यासाठीचे प्रतिबंधक उपाय म्हणून हे स्वीकारले जातात.


८) बदलांस सामोरी जाण्याची क्षमता - 
शिखरावरील वास्तव्य बऱ्याच वेळा दीर्घकाळ नसतं. आपला काळ संपत आला की त्याची चिन्ह ओळखता येणं आणि नवीन शिखराची वास्तव्यासाठी योग्य वेळी निवड करणे ही सुद्धा कला ह्या लोकांना जमायला हवी. ह्यासाठी आपल्या आणि संबंधित क्षेत्रातील घडामोडी आणि Business Knowledge सहजगत्या अवगत करण्याची कला अंगी असावी.


आता काही वेगळे मुद्दे! काही नव्याने शोध लावलेल्या अँपच्या बाबतीत एक नवीन कल्पना यशस्वीपणे अमलात आणली असता अशा व्यक्तींना आरंभीच्या काळात कमी स्पर्धेचा मुकाबला करावा लागतो. अशावेळी त्यांना वरील सर्वच गोष्टींचा स्वीकार करण्याच्या बंधनांपासून त्यांना बरीच मुक्तता मिळू शकते. 

शिखरावर एकच व्यक्ती असली तरी शिखरमार्गावर सुद्धा काही जागा उपलब्ध असतात. वरील उल्लेखलेल्या गुणधर्मातील केवळ काहीच  गुणधर्म ज्यांच्याकडे आहेत त्यांच्यासाठी ह्या जागा योग्य असतात. आपल्या गुणधर्मानुसार आपली योग्य जागा ओळखता येणं ही सुद्धा एक महत्त्वाची कला आहे!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...