मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २ जुलै, २०१६

"मेसी" क्षण !





ह्या आठवड्याची सुरुवात काहीशी निराशाजनकच झाली. सकाळी साडेपाचला अर्जेंटिना आणि चिली ह्यांचा सामना पाहण्यासाठी उठू पाहणाऱ्या सोहमला साडेसहा वाजता उठण्यास तयार करण्यास मी यश मिळविलं. मध्यंतरानंतरचा सामना पूर्ण पाहता येईल ह्या गोष्टीवर तो तयार झाला. पण सामना मात्र पुर्ण वेळेत आणि त्यानंतरच्या अतिरिक्त वेळेत सुद्धा गोलशुन्य बरोबरीत राहिला. सोहम स्कुल बसला गेला आणि पेनल्टी शूटआऊटमध्ये मेसीची पहिलीच किक गोलपोस्टच्या बाहेर गेली. पुढे अर्जेंटिना हा कोपा अमेरिका स्पर्धेचा अंतिम सामना हरली. 

बार्सिलोनातर्फे क्लब पातळीवर खेळताना अगदी अविस्मरणीय यश मिळविणाऱ्या मेसीचा अर्जेंटिनातर्फे खेळताना महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील चौथ्या महत्वाच्या अंतिम सामन्यातील हा पराभव! आपल्या देशाला सर्वोत्तम बहुमान मिळवून देण्यात अपयश आल्याचं शल्य मेसीच्या हृदयात आधीपासुन होतंच; त्यात रविवारी आपली पेनल्टी किक चुकल्याचं दुःख त्याला अगदी हताश करुन गेलं आणि त्यानं तडकाफडकी आंतरराष्ट्रीय पातळीवरुन निवृत्ती पत्करली. हा तो "मेसी" क्षण ! 

मेसीच्या बाबतीतील हा "मेसी" क्षण तो मेसी होता म्हणुन जगभर गाजला. पण आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्यात सुद्धा असे आपल्याला मेसी क्षणाच्या टोकाला पोहचवणारे क्षण येतंच राहतात. प्रत्येकजण आपापल्या परीने शांत राहत, मनाची समजुत घालत पुन्हा जीवनरगाड्यात स्वतःला गुंतवून घेत असतो. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात येणाऱ्या अशा काही टोकाच्या तणावदायी प्रसंगांविषयी थोडे शब्द!

१> सध्या पावसाळा सुरू आहे; दिवसभराच्या कामानंतर आपण जेव्हा घरी जायला निघतो तेव्हा रस्त्यांच्या दयनीय परिस्थितीमुळे नेहमीच्या अर्ध्या तासाच्या प्रवासाला ज्यावेळी सव्वा - दीड तास लागतो त्यावेळी आपल्या सहनशक्तीची परिसीमा गाठली जाते. कार घेऊन ऑफिसात जावं तर पार्किंग मिळण्यासाठी अगदी धावतपळत निघावं लागतं आणि उन्मत्त रिक्षावाले आणि आपल्या हाती स्वतःची सुरक्षा सोडून दिलेले बाईकस्वार ह्यांच्यापासुन आपल्या वाहनांचा बचाव करत सारथ्य करावं लागतं. एखादा दिवस आरामात रिक्षाने जावं म्हटलं तर त्यांची आपल्यावर कृपादृष्टी होण्याची अगदी वाट पाहावी लागते. पावसाळ्यात लोकलने प्रवास करणाऱ्या लोकांचे हाल तर अजुन वाईट होतात. त्याविषयी अधिक न बोललेलं बरं!

एक सर्वसाधारण नागरिक म्हणुन आयुष्य जगताना सुखरूप प्रवास करण्याचा जो आपला हक्क आहे त्याची जबाबदारी शासनसंस्था पार पाडत नसल्याचं शल्य आपल्या मनात सदैव बोचत राहतं. पण आयुष्यातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्याची जी मध्यमवर्गीय शिकवण आपल्याला लहानपणापासून मिळालेली असते तीच आपल्याला ह्या नैराश्याच्या क्षणी सुद्धा "मेसी" क्षणापर्यंत जाऊन देण्यास परावृत्त करते. 

२> कार्यालयात अनेकवेळा अनेक प्रसंग आपल्या मनाविरुद्ध घडत असतात. कधी कधी आपल्या ह्या मनःस्थितीचा लंबक नैराश्याच्या दिशेने अगदी कमाल पातळीवर झुकतो पण राजीनामा देण्याची "मेसी" प्रतिक्रिया आपण बहुतांशी पातळीवर टाळत असतो. पुन्हा एकदा आयुष्यातील आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आवश्यक असणारी पैश्याची गरज हे ह्यामागचं मुख्य कारण असू शकतं. 

३> नाती - काही लोकांच्या बाबतीत नात्यांमध्ये तणावाचे क्षण सतत येत राहतात. आपल्यापरीने खूप मेहनत घेऊनसुद्धा नात्यातील सुर जुळून येत नाही. मग असं बेसूर नातं घेऊन पूर्ण आयुष्य ओढायचं की एकदाच "मेसी" निर्णय घेऊन टाकायचा हा मोठा यक्षप्रश्न अशा लोकांसमोर उभा ठाकतो! 

ही झाली काही मुख्य उदाहरणं! बहुतेक वेळा आपल्याला "मेसी" निर्णय घेण्यास भाग पाडणारा "मेसी" क्षण अचानक आपल्यासमोर उभा ठाकत नाही. असल्या क्षणाची पुर्वसुचना देणाऱ्या signs आपल्याला मिळत असतात. पण त्या signs आपल्या लक्षात यायला हव्यात आणि त्यांचं योग्य विश्लेषण आपणास करता यायला हवं! आपल्याला भडसावणाऱ्या काही सर्वात क्लिष्ट समस्यांविषयी आधारगटांशी चर्चा करण्याची आपली तयारी हवी. आधारगट म्हणजे प्रत्येकवेळा एखादी ऑफिशिअल संस्था असलीच पाहिजे असंही नव्हे! तुमची पत्नी. पती, जवळचे मित्र, नातेवाईक हे बऱ्याच वेळा तुमचे आधारगट (support system) असू शकतात. केवळ भावनांच्या आहारी जाऊन असा टोकाचा निर्णय घेण्यापासुन एखाद्या व्यक्तीस परावृत्त करण्यास हे आधारगट खूप मदत करु शकतात. 

शेवटी पुन्हा खऱ्या मेसीकडे वळूयात! मला पडलेले काही प्रश्न - 
अ) समजा मेसीची पेनल्टी चुकली नसती आणि तरीही अर्जेंटिना हरली असती तरीसुद्धा  मेसीने निवृत्ती जाहीर केली असती का? त्याला झालेल्या दुःखात मोठा वाटा कसला होता - सलग चौथा अंतिम सामना हरल्याचा की इतक्या महत्वाच्या सामन्यात आपल्या संघाला चुकीची सुरुवात करून देण्यास जबाबदार असल्याचा! 

ब) समजा आपण हा सामना हरलो तर आंतरराष्ट्रीयसामन्यातून निवृत्ती घ्यायचीच असा निर्णय त्याने आधीपासुनच घेऊन ठेवला होता का? केवळ क्लब पातळीवर यश मिळवून दिल्याबद्दल त्याच्यावर होणारी टीका त्याच्या इतकी जिव्हारी लागली होती काय?

ही तडकाफडकी घेतलेली निवृत्ती मागे घ्यावी म्हणुन मेसीला विनंतीसुद्धा करण्यात येईल किंबहुना अशा चर्चेस आता आरंभ सुद्धा झाला आहे! 

काही "मेसी" क्षणांच्या वेळी घेतलेले 'मेसी" निर्णय परत फिरवण्याची चैन / मुभा आपल्यातील काही मेसींना आयुष्य देतं; पण प्रत्येकवेळी ही चैन / मुभा मिळते असं मात्र नाही!

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...