मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, २३ मे, २०१६

इस्त्री



शाळा आणि महाविद्यालयातील गोष्ट! तो काळ एकतर वेगळा होता किंवा मी वेगळा होतो किंवा दोन्हीही! म्हणजे शाळेच्या वेळी खात्रीपुर्वक मी सांगु शकतो की आम्ही सर्वजण बिना इस्त्रीचे कपडे परिधान करायचो. महाविद्यालयात माझ्या बाबतीत परिस्थिती बदलली नव्हती आणि आजुबाजूच्या मुलांचे निरीक्षण करुन त्यांनी इस्त्री केलेले कपडे परिधान केले आहेत की नाही हे पाहण्याइतकी माझी कुतुहूलशक्ती विकसित झाली नव्हती. पण बहुदा रुपारेल आणि SPCE ह्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांचे आधिक्य असलेल्या कॉलेजात माझं शिक्षण झाल्याने बहुतांशी हीच परिस्थिती असावी असं मला वाटत! 

नंतर मग नोकरीला लागल्यापासुन मात्र परिस्थिती बदलली. इस्त्री केलेले कपडे ऑफिसात घालुन जाणे ही काळाची गरज बनली. विरार लोकलमधुन अंधेरीला उतरेपर्यंत हे कपडे इस्त्री केले आहेत ह्यावर कोणी विश्वास ठेऊ शकत नसे. पण "मी इस्त्री केलेले कपडे ऑफिसात घातले!" असं मानसिक समाधान का काय म्हणतात ना ते मात्र मिळायचं!

माझे वडील ऑफिसला जाईतोवर स्वतःचे कपडे स्वतः घरी इस्त्री करत. प्रत्येक कपडा अगदी मन लावुन व्यवस्थित! त्यावर पाण्याचे थेंब शिंपडायचे, प्रत्येक बाहीची घडी अगदी व्यवस्थित पडली आहे ह्याची खातरजमा करुन घेत! माझ्याकडे काही बाबतीत व्यवस्थितपणा आहे असे लोक म्हणतात आणि पत्नी सुद्धा म्हणते! म्हणजे नक्की असावा ! पण इस्त्री करण्याबाबतीत मात्र माझ्याकडे इतका काटेकोरपणा नाही. साधारणतः पाच मीटर अंतरावरुन पाहणाऱ्या माणसाला मी इस्त्री केलेले कपडे घातले आहेत असा भास / विश्वास व्हायला हवा इतक्या काटेकोरपणे इस्त्री करावी हे माझे धोरण! वडील निवृत्त झाले आणि मग आम्ही इस्त्रीवाला पकडला. हे लोक जशी मस्त इस्त्री करतात तशी आपल्याला सुद्धा एकदा का होईना करता यावी ही माझ्या मनात जबरदस्त इच्छा! "त्यांची इस्त्री वेगळी असते !" बायकोने मला समजावल्यावर मी काहीशा अविश्वासाने आणि काहीशा नाराजीने तिच्याकडे पाहिलं. 

पुढे अमेरिका गाठली. तिथं इस्त्रीवाला कुठून मिळणार आणि असला तरी आपल्याला दररोजच्या दररोज कोठे परवडणार? अमेरिकेतील लोकांचे एक वागणं आपल्या सर्वांना लगेच लक्षात येईल. जी काही धमाल करायची ती शुक्रवार दुपारपासून ते शनिवार रात्रीपर्यंत! रविवारी का कोणास ठावूक, मंडळी काहीशी दुःखात वाटायची. हाणून सर्वजण घरकामाला लागलेले दिसायचे. आमच्या वसाहतीत कपडे धुवायची यंत्रे सार्वजनिक ठिकाणी असल्याने बरीच पुरुषमंडळी तिथंच भेटायची. पुढे मग रविवारी जास्तच गर्दी व्हायला लागल्यापासुन मग मी माझ्या कपडे धुण्याच्या वेळा बदलल्या ही गोष्ट वेगळी! 

असो तर अमेरिकेत असताना रविवारी रात्रीचे जेवण आटोपलं की मग मी आठवड्याचे सर्व कपडे इस्त्री करायला घ्यायचो! एकदम ब्रह्मानंदी टाळी लागणे वगैरे प्रकार नसला तरी मस्तपैकी मी विचारमग्न व्हायचो. चिंतातुर जंतु असलेल्या माझ्या मनात पुढील आठवड्यात वाढुन ठेवलेल्या कामाव्यतिरिक्त दुसरे कोणते विचार येणं शक्य नव्हते. परंतु हा वेळ मला आवडायचा! माझ्या मनाला तो येणाऱ्या आठवड्यासाठी तयार करण्यासाठी खूपच मदत करीत असे! प्राजक्ता सुरुवातीला सूचना करी पण नंतर तिने माझा नाद सोडला होता. तुझी इस्त्री आणि तुझे ऑफिस - मला काय त्याचं ! अशा निष्कर्षापर्यंत काही काळाने ती येऊन पोहोचली होती. सोहम एक दोन वर्षाचा असेल. हा काहीतरी भयंकर प्रकार आहे हे इस्त्रीने तापलेल्या कपड्यांना स्पर्श करुन त्याने समजुन घेतलं होतं आणि त्यामुळे तो त्याच्याकडे ढुंकूनसुद्धा पाहत नसे. ह्या कारणांमुळे मी आणि माझी इस्त्री असा हा अर्धा तास अगदी एकांताचा काळ मला मननासाठी मिळे! 

आज अचानक हे सर्व इस्त्रीप्रकरण आठवायचं कारण म्हणजे मे महिना आणि इतर काही कारणांमुळे माझ्यावर इस्त्रीची वेळ आली. पुन्हा एकदा मन विचारात गुंतलं. स्वतःचे कपडे स्वतः इस्त्री करणे हे आपल्याला अगदी वास्तवात ठेवण्यासाठी खूप मदत करतं ह्याची जाणीव मला झाली. पैसा टाकुन सोयी मिळविता येतात ह्यात काही संशय नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. पण ह्या सोयी मिळाल्याने जो मोकळा वेळ मिळतो त्याचा व्यवस्थित वापर न करता आल्याने अनेक समस्या निर्माण होतात. जमिनीवर बसुन इस्त्री करणे हा एक उत्तम व्यायाम आहे असे मी म्हणतो. त्याचप्रमाणे त्या वेळात आपण आपल्या भ्रमणध्वनीपासून दुर राहतो आणि त्यामुळे घरातील लोकांशी संवाद साधण्याची शक्यता वाढीस लागते. आणि तुमच्याकडे कितीही पैसा असो स्वतः बाजारात जाऊन जीवनावश्यक गोष्टी विकत घेता येणं, प्राथमिक पातळीवरील स्वयंपाक करता येणे, इस्त्री करता येणे, घरातील सर्व उपकरणे आई / पत्नीच्या अनुपस्थितीत वापरता येणे हे प्रसंग तुमच्यावर कधी ना कधी तरी ओढवणारच! त्यावेळी तुम्हांला ते निभावता आले पाहिजेत हे नक्की! 

आधुनिक काळ आपल्यापुढे एका आभासी विश्वाचे चित्र रेखाटण्यात बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे आणि त्यामुळे मुलभूत तत्वांना आपण दुय्यम स्थान देऊ लागलो आहोत. पण अगदी निकटच्या भविष्यात ही मुलभूत तत्वे आपल्या खऱ्या महत्त्वासकट आपल्यासमोर उभी ठाकतील ह्याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नाही! 

हे सर्व काही आज सकाळी कराव्या लागलेल्या इस्त्रीच्या दोन कपड्यांपायी !! :)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...