मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, ३ एप्रिल, २०१६

वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क - दिवस १

"केल्याने पर्यटन अंगी येते शहाणपण" असं म्हणायची पुर्वी पद्धत होती. तो काळ वेगळा होता. हल्ली लोक त्यांच्या लहानपणापासुनच अंगी शहाणपण बाळगुन असतात त्यामुळे केवळ ह्या कारणास्तव पर्यटन करण्याची प्रथा मागे पडत चालली आहे. स्वतंत्रपणे प्रवास करायचा की कोण्या पर्यटन कंपनीसोबत करायचा ह्या गोष्टीवर बराच उहापोह केल्यानंतर ह्या सहलीला वीणा वर्ल्ड तर्फे जायचं असा आमच्या घरी सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. आता घरच्या बाबतीत सर्वानुमते घेतले जाणारे निर्णय म्हणजे नक्की काय ह्याबाबत जास्त खोलात जायचं कारण नाही मंडळी!

ह्या पूर्वी वीणा वर्ल्डसोबत केलेल्या सिमला मनाली सहलीचे वर्णन http://nes1988.blogspot.in/2014/05/blog-post.html

इथे उपलब्ध आहे. कोणत्याही सहलीचे प्रवासवर्णन करताना आपण ते  विविध प्रकारे करु शकतो. पहिला प्रकार म्हणजे प्रत्येक स्थळ, घटना ह्यांचं योग्य शब्दाचा वापर करुन केलेलं वर्णन. आणि दुसरा प्रकार म्हणजे स्थळ, घटना ह्यासोबत मनात उमटलेल्या भावना, आपणास भेटलेल्या व्यक्तींच्या स्वभावाच्या जाणवलेल्या छटा वगैरे आपण आपल्या क्षमतेनुसार ह्यात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू शकतो. आता माझ्या ह्या ९ दिवसाच्या सहलीच्या वर्णनात मी कोणता प्रकार मनात बाळगुन हे प्रवासवर्णन लिहिण्यास प्रारंभ करणार हा एक मुद्दा आणि तुम्हांला त्याविषयी नक्की काय वाटणार हा वेगळा मुद्दा

वीणा वर्ल्ड ही एक अगदी सावधानतेची भुमिका बजावणारी प्रवासी कंपनी. एखाद्या विशिष्ट घटनेत जे सर्व काही चुकीचे होऊ शकतं ते सर्व समजा झालं तर ती घटना पुर्ण करण्यास किती वेळ द्यावा लागेल ह्याचा विचार करुन त्यासाठी वेळ राखुन ठेवण्याची दक्षता घेणारी ही कंपनी. आता ह्या प्रवासवर्णनात वीणा वर्ल्डचे जसं कौतुक होईल तसं काही सुधारणेस वाव असणाऱ्या टिपण्या सुद्धा असतील. वीणाताई आणि त्यांचे सर्व सहल व्यवस्थापक हे सर्व खेळीमेळीने घेऊन मला पुढच्या सहलीत प्रवेश देतील ही आशा! ह्या सहलीतील आमचे व्यवस्थापक सचिन मागावकर आणि त्यांचे सहकारी विक्रांत आणि आतिश ह्यांनी नऊ दिवसात आमचा कसा यथासांग पाहुणचार केला आणि आम्हांला कसे झेललं ह्याचं यथासांग वर्णन ह्या आणि पुढील भागात नक्कीच येईल! ह्या तिघांचा हा ह्या सहलीतील फोटो!



आमची सहल २५ मार्च ते २ एप्रिल अशी नऊ दिवसांची होती. २५ मार्चला सकाळी सहा वीसला इंडिगो ह्या कंपनीचे दिल्लीला जाणाऱ्या विमानाने आमच्या प्रवासाची सुरुवात होणार होती. ह्या विमानासाठी आम्ही सकाळी चार वीसला विमानतळावर हजर राहावे असे आम्हांला सांगण्यात आलं होतं. आपली चारशे वीसगिरी ह्यांना आधीच कशी कळली ह्याचं आम्हांला मोठं आश्चर्य वाटलं. ते बाजुला ठेऊन इतकं लवकर कशाला जायचं, चार वीसला जायचं तर किती वाजता उठायला लागेल, कोणती टॅक्सी पकडायची अशा प्रश्नांवर चर्चा करण्यात आम्ही गढून गेलो. शेवटी भल्या पहाटे पावणेचार वाजता टॅक्सी बोलविण्याचे ठरलं. पावणेचार वाजता निघायचं तर उठायचं किती वाजता अशी चर्चा करण्याच्या पलीकडे आम्ही गेलो आहोत. त्यामुळे अडीचचा अलार्म लावून मी सव्वादोनच्या आसपास उठलो आणि अलार्म वाजण्याआधीबंद केला. माझ्या सेलफोनला जर जीव असता तर हा सद्गृहस्थ अलार्म लावतो तरी कशाला असा विचार नक्कीच त्याच्या मनात आला असता

विमानतळावर वीणा वर्ल्डचे मंदार जोशी ठरल्याप्रमाणे हजर होते. त्यांनी आमची विमानतिकिटे आणि स्वादिष्ट खाऊचे पुडे आमच्या स्वाधीन केले. पुढे प्रवासात आम्ही ज्यांच्याशी अगदी गाढ मैत्री केली असे आमचे सर्व सहप्रवासी सुद्धा आमच्यासोबत त्यावेळी होते. पण बर्फ कोणी फोडायचा (Break the ice ह्या संज्ञेचे भयानक शब्दशः भाषांतर) म्हणून अजुन आम्ही कोणीच एकमेकांशी बोललो नाहीत. सुरक्षा पडताळणी वगैरे सोपस्कार व्यवस्थित पार पडले. मग बसने आम्हांला विमानापाशी नेण्याची वेळ आली. आमच्या बाजुला येऊन बसलेल्या ठाकुरबाईंनी आमच्या वीणावर्ल्डच्या बॅग्स पाहून आमच्याकडे स्मितहास्य केलं. मग हळुहळू गप्पा सुरु झाल्या

विमान बहुदा वेळेआधीच सुटलं. लोकेश जैन आणि रोहन राठोड हे वैमानिक होते. हवाई सुंदऱ्या इतर भाषांसोबत मराठी भाषा सुद्धा बोलू शकत होत्या हे ऐकून बरं वाटलं. विमानाच्या शेपटीच्या दिशेकडून येणारे वारे (TAIL WINDS) विमानाला दिल्लीच्या दिशेने पुढे ढकलत होते. विमान प्रतीतशी ९८० किमी वगैरे वेगाने दौडत होते. उकळत्या पाण्यात टाकून तयार झालेला उपमा आणि नुडल्स खाण्याचे दुःसाहस मी आणि सोहमने ४०० रुपये देऊन केलं

शेपटीवाऱ्यांनी वेगात पुढे ढकललेलं विमान ८ च्या सुमारास दिल्लीला उतरलं. विमानातुन उतरण्याआधी विमान स्वच्छ करण्यासाठी सहकार्य करण्याची प्रवाशांना विनंती करण्यात आली. पुढचं उड्डाण वेळेत होण्यासाठी ह्याची नक्कीच मदत होणार होती. आपला देश हळुहळू नक्कीच चांगल्या दिशेने पावलं टाकतोय हे मात्र खरं

धावत्या पट्ट्यावरून बॅगा अगदी पाच मिनिटात आल्या. ट्रॉलीसकट बाहेर पडतो तोच विक्रांत आणि सचिन स्वागतास हजर होते. तिथे टपरीवर चहा देऊन आमचं त्यांनी स्वागत केलं. त्यांच्या सहाय्यकांनी आमच्या जड बॅग्स बसच्या मागे टाकल्या. सचिन, विक्रांत आणि आतिश ह्यांनी आपापल्या ओळखी करून दिल्या. सचिनने आजच्या दिवसाचा आपला कार्यक्रम अगदी सविस्तरपणे सांगितला. हरिद्वार हे २१० किमी अंतरावर आहे; हा जवळजवळ ८ तासांचा प्रवास आहे, उत्तर प्रदेशात काही ठिकाणी एकाच मार्गीकेचे रस्ते लागतात. गंगा आरती सायंकाळी साडेपाचपासुन केव्हाही सुरु होऊ शकते. ती जर आपण चुकवलीत तर भल्या पहाटे उठुन सकाळच्या  साडेचारच्या आरतीला जावं लागेल, SO आपण सर्वांनी दिलेलं वेळापत्रक पाळणं कसं आवश्यक आहे हे त्याने आम्हांला जाणवुन दिलं. पुढे सचिनच्या प्रत्येक निवेदनात ह्या SO ने आमची साथ दिली.

"गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया!
"उंदीरमामा की जय! चुचुन्द्री मामी की जय!!"

ह्या घोषणेने प्रवासास सुरुवात झाली. सँविच, केक आणि फ्रुटी आम्हांला देण्यात आला. बऱ्याच दिवसांनी स्वतःची अशी हक्काची फ्रुटी मिळाली होती. दिल्लीच्या मुख्य भागातुन बसचा प्रवास सुरु होता. विविध देशांचे दुतावास बाजूने जाताना दिसत होते 



मुंबईच्या मानाने दिल्ली जागेच्या बाबतीत अगदी समृद्ध आहे हे प्रकर्षाने जाणवत होते. इंडिया गेट आणि इतरही काही खास आकर्षणे बाजूने जात होती आणि विक्रांत आम्हांला त्याची वेळोवेळी माहिती देत होता








हळुहळू मुख्य शहरातील भव्य भाग मागे पडला आणि काहीसा गर्दीचा विभाग सुरु झाला. काही वेळात मग मुरादनगर, मीरत विकास प्राधिकरण असे बोर्ड रस्त्यावरून बाजुला जाताना दिसत होते

उत्तर प्रदेशाततौली इथे प्रसिद्ध चीतल उपहारगृहात आम्ही साडेअकरा वाजता जेवण्यासाठी उतरलो. बऱ्याच जणांच्या घशावर असलेलं सँविच "अरे थांब बाबा!" असं कंठ ताणून सांगत होतं.

 

पण जेवायला वेळ लावलात तर सायंकाळची गंगा आरती चुकेल आणि मग सकाळी साडेचार वाजता उठायला लागेल हे सचिनचे शब्द सर्वांच्याच ध्यानात होते. त्यामुळे सर्वांनी चीतलमध्ये प्रवेश केला. इथलं जेवण अगदी सात्विक होतं. शेवटी आईसक्रीमसुद्धा मिळालं. ठाकूर बाईंचे नाव सुद्धा प्राजक्ता! दोन्ही प्राजक्तांनी ऑरेंज गोळ्यांची पुडकी विकत घेतली आणि हीच पुडकी मुंबईत कशी अगदी स्वस्तात मिळाली असती ह्यावर आपली मते मनमोकळेपणाने नोंदवली

आतापर्यंत चांगलंच अंतर कापल्याने आता थेट गंगाघाटावर जायचं की हॉटेलात सामान ठेवून मग जायचं ह्यावर चर्चा सुरु होती. निर्भया प्रकरणापासून दिल्लीतील बसना पडदे लावण्यास बंदी आहे. त्यामुळे सुर्याची किरणे अंग भाजून काढत होती. आजुबाजूला ज्याच्यापासून आगपेट्या बनविल्या जातात अशा वृक्षांची लांबवर पसरलेली शेती दिसत होती

काही वेळानं रुरकी आलं. IIT आणि Army Cantonment ही दोन खास आकर्षणं रस्त्याच्या बाजुने गेली. विक्रांतने त्यांची योग्य वेळी माहिती दिली. साडेअकराला जेवण झालं म्हणजे चहा सुद्धा दोन वाजता येणारच! पण आता मात्र बसमधल्या लोकांनी इतक्या लवकर चहा घेण्यास नकार दिला. विक्रांतने लोकांचं म्हणणं मानलं

आता हरद्वार जवळ येऊ लागलं होतं. गंगेचं विशाल पात्र नजरेस पडू लागलं होतं. २०१६ साली हरद्वार इथे अर्धकुंभ असणार आहे. त्यानिमित्त प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. साधुं, प्रवाशांच्या वास्तव्यासाठी तंबू आणि दैनंदिन गरजांसाठी सुविधांची सोय केली आहे. आतापर्यंत न ऐकलेल्या एका कॉम्प्लेक्सची पाटी सुद्धा नजरेस पडली आणि बसमध्ये विनोदाची लहर पसरली

 रस्त्याच्या एका बाजुला नील पर्वत आणि दुसऱ्या बाजूस बिल्व पर्वत आहे असे विक्रांत सांगत होता. नील पर्वतावर चंडी मातेचे आणि बिल्व पर्वतावर मनसा देवीचे मंदीर आहे. दोन्ही पर्वतांना जोडणारी केबल कार आहे / होती अशी काहीशी माहिती आम्हांला मिळाली. मध्येच थोडी रहदारी जास्त होती आणि त्यामुळे आमचा वेग मंदावला

आमची होती बस क्रमांक १! बस क्रमांक २ मध्ये बहुतेक पुण्याची मंडळी होती. ती बस दिल्लीहून उशिरा निघाली होती. त्यांनी थेट घाटावर यावं आणि आम्ही हॉटेलात जाऊन, सामान ठेऊन मग गंगा आरतीस यावं असं ठरविण्यात आलं. आजचं आमचं हॉटेल होतं Regenta Orko's. हॉटेल तसं व्यवस्थित होतं. इथं आम्हांला वेलकम ड्रिंक देऊन आमचं स्वागत करण्यात आलं. झटपट तयार होऊन आम्ही गंगादर्शनासाठी तयार झालो

प्रत्येक शहराची एक खासियत असते. हरिद्वार मध्ये प्रवेश केल्यापासुन तिथल्या वातावरणातील धार्मिकता अगदी बंद बसमधून सुद्धा मनाला जाणवत होती. शहरी वातावरणात वाढलेले आपण, माणसे सर्वसंगपरित्याग करुन साधू का बनतात ह्याचा आपणास बऱ्याच वेळा उलगडा होत नाही. पण का कोणास ठाऊक इथल्या वातावरणात असं काहीसं होतं की त्या परमात्म्याचा शोध घ्यावाच असंच काहीजणांना वाटणं शक्य आहे हे मला जाणवुन गेलं. ह्यामध्ये दोन शक्यता असु शकतात, आयुष्यात भौतिक सुखांची सर्व काही शिखरे गाठुन झाली की मग एखाद्या माणसास त्यातील निरर्थकता जाणवु शकते आणि आणि तो / ती ह्या मार्गास लागू शकते. दुसरी शक्यता म्हणजे एखाद्या सामान्य माणसास हे सारे काही नश्वर आहे आणि त्याचा मोह का धरावा असे वाटून तो ह्या मार्गास लागू शकतो

हे सारं काही आदर्शवादी नजरेतुन ! शहराची प्रत्यक्ष अवस्था मात्र मनाला खंत लावून गेली. इतकं मोठं धार्मिक महत्त्व असणारे शहर पण रस्त्यांची अवस्था मात्र दयनीय होती. रस्ता तसा अरुंद आणि त्यात रस्त्यावर विविध कामं सुरु होती. वाहतुकीने धुळीचा लोळ सर्वत्र उडत होता. ह्या बाह्य परिस्थितीचा मनावर परिणाम होऊन न देता खरोखर एकाग्रतेने पूजन करणे कितपत शक्य आहे अशी शंका माझ्या मनात निर्माण होत होती

रहदारीची परिस्थिती लक्षात घेता बसने आम्हांला एका ठिकाणी सोडून ती परत हॉटेलला गेली. आम्ही सर्व गंगाघाटाच्या दिशेने चालु लागलो. तिथे गंगा आरतीच्या वेळी होणारी गर्दी लक्षात घेता कमीत कमी मौल्यवान वस्तु सोबत बाळगाव्यात, लहान मुले, वयस्क मंडळींनी बाकीच्याची साथ सोडू नये असा सल्ला आम्हांस देण्यात आला होता. गंगा नदीच्या विशाल पात्राचे आम्हांस अगदी जवळुन दर्शन घडलं. ह्या जवळुन घडलेल्या दर्शनाने मन भारावून गेलं
 
गंगा पुजा आणि आरती ह्यांचं जवळून दर्शन व्हावं ह्यासाठी मोक्याची जागा पटकाविणे आवश्यक होते. त्यामुळे आम्ही वेगाने चालत होतो. शेवटी एकदाची आम्हांस तशी जागा मिळाली. धार्मिक मंडळीचे श्रद्धाभावे गंगास्नान सुरु होते. ज्या प्रकारे अगदी वयोवृद्ध स्त्री, पुरुष ह्या पात्रात स्नान करीत होते त्यावरुन त्यांच्या श्रद्धेविषयी शंका घेण्यास अजिबात शंका नव्हती. आपल्या शहरी माणसाच्या मनात हल्ली ही निरागस श्रद्धा बहुदा राहिली नसावी. सार्वजनिक ठिकाणी स्नान घेताना काही तारतम्य बाळगावी असा काहीसा अश्रद्धाळू विचारच माझ्या मनात सारखा डोकावत होता
 
घाटावर वैयक्तिक मंडळींची गंगा पूजा सुरु होती. मंत्रघोषाने वातावरण भारून गेलं होतं. सुर्यास्ताची वेळ होतं आली होती. सूर्य डोंगराआड चालला होता.
आमच्या मागे लोकांची गर्दी वाढू लागली होती. मोक्याच्या ठिकाणी उभे असलेले कमांडो आपली करडी नजर राखून होते. समोरील घाटावर ब्राह्मणांचे दर्शन झाले. त्यांनी सुस्वरात गंगेच्या पूजनास सुरुवात केली. वातावरण अगदी मंगलमय बनलं होतं. 







हे पूजन आटोपलं आणि मग सुस्वरात मंगलमय गंगा आरती सुरु झाली. 





ह्या मंगलमय वातावरणाने आणि मंत्रघोषाने माझ्या मनातील अश्रद्धेची सर्व पुट गळून पडली. मी पुर्णपणे त्या वातावरणाशी एकरूप झालो. आपण शहरी वातावरणात कसे भावनांच्या मर्यादित विश्वात जगत असतो ह्याची अगदी स्पष्ट जाणीव मला झाली. ह्या भारलेल्या वातावरणात आरती कधी संपली हे सुद्धा समजलं नाही.
गंगा स्नान करण्याची  मी किंवा आम्ही तयारी दाखविली नाही. गंगेच्या पाण्याची शुद्धता वगैरे व्यावहारिक विचार पुन्हा आड  आले. मग आम्ही गंगेच्या त्या पवित्र प्रवाहाला स्पर्श केला. त्या थंडगार पवित्र स्पर्शाने तन मन अगदी भारावून गेलं. मग पुन्हा सेल्फी प्रकार वगैरे जागृत झाले. परतीच्या वेळीचा नजराणा अगदी विहंगम होता. आपल्या शब्दाला जागून विक्रमने एक किटलीवाला आणला होता. त्या गरमागरम चहाने मन अजुनच प्रफुल्लित झालं. आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो. दुसरा पुण्याचा गट आम्हांला एव्हाना जॉईन झाला होता. सचिनचा चिंताग्रस्त चेहरा पाहुन आम्ही चिंताग्रस्त झालो. आम्हांला परत घ्यायला येणारी बस ट्रॅफिकमध्ये अडकली होती. त्याने आणि विक्रम , आतिश ह्यांनी आम्हां सर्वांना काही अंतर चालुन एका ठिकाणी थांबविले. आम्हांला काही काळ थांबायला लागलं खरं पण आमच्या कुशल ड्रायव्हरने एव्हाना बस आमच्या जवळपास आणली होती. घाईने आम्ही बसमध्ये शिरलो आणि हुश्श केलं. हॉटेलमध्ये शिरताच आम्हांला मग धन्य वाटलं. पहिल्या मजल्यावर रात्रीच्या भोजनाची सोय होती. बहुदा आम्ही जास्तच घाई केली होती. केवळ भिसे कुटुंबीय काही वेळाने आम्हांला जॉईन झाले. जेवणं आटपून आम्ही रुमवर परतलो आणि पहाटे अडीच वाजता उठलेले, थकले भागले तीन जीव रात्री नऊ वाजताच निद्राधीन झाले. 
(क्रमशः)
नोंद - उद्यापासून ऑफिस सुरु. त्यामुळे पुढील भाग प्रसिद्ध करण्यास विलंब लागू शकतो. 

२ टिप्पण्या:

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...