मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, २३ मार्च, २०१६

Substance Vs Style

ऑफिसात एका चर्चेत हा विषय निघाला. उच्चपदस्थ व्यक्तीकडे कोणती गोष्ट असणे महत्त्वाचे आहे Substance (अर्थात सखोल ज्ञान ) की Style (भुरळ घालणारे व्यक्तिमत्व). अर्थात बऱ्याच उत्तराचा ओघ दोन्ही गोष्टी असायला हव्यात असाच होता. 

हल्लीच व्यावसायिक जीवन म्हणा की वैयक्तिक जीवन! प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाला अनेक कंगोरे असणं आवश्यक बनलं आहे. कारण आपल्या जीवनात ज्या ज्या लोकांशी संपर्क येतो त्या सर्वांशी चांगल्या वागणुकीची एक विशिष्ट पातळी ठेवणं आवश्यक आहे. नाहीतर होतं काय की लोक तुम्हांला तोंडावर काही बोलत नाहीत पण हळुहळू तुम्हांला ते टाळत जातात आणि मग तुम्ही मागे पडत जातात. पुर्वी असं नव्हतं. एखादा विद्वान माणुस सर्वांशी किंवा अगदी आपल्या पत्नीशी सुद्धा तुसडेपणाने वागला तरी ते खपुन जायचं किंबहुना जितका माणुस जास्त विद्वान तितका तो जास्त तऱ्हेवाईकपणे वागणार अशीच लोकांची अप्रत्यक्ष समजुत होती. 

क्षणभर पुन्हा व्यावसायिक जीवनाकडे! एका उच्चपदस्थ व्यवस्थापकाकडे substance आणि style ह्या दोघांच्या किमान पातळ्या असणं आवश्यक असतं. उदाहरण म्हणायचं झालं तर समजा ज्ञानाची आणि व्यक्तिमत्त्वाची कमाल पातळी १०० टक्के असेल तर कोणताही माणुस एक उच्चपदस्थ बनण्यासाठी त्याच्याकडे ह्या दोन्ही गोष्टींच्या किमान ७० टक्के पातळ्या असाव्यात. म्हणजे एखादा माणुस substance वर ७२ आणि style वर ७५ टक्के असेल तर तो चालुन जाईल. पण १०० टक्के substance आणि ५० टक्के style वाला चालणार नाही किंवा १०० टक्के style आणि ६० टक्के substance वाला सुद्धा चालणार नाही.  इथे लक्षात घ्या की ७० टक्के हा आकडा मी उदाहरण म्हणुन घेतला. प्रत्यक्ष जीवनात विशिष्ट भुमिकेनुसर हे प्रमाण बदलत राहतं. एका वर्षभरात ज्या विविध प्रसंगाला एखाद्या भुमिकेतील उच्चपदस्थ व्यक्तिमत्त्वाला तोंड द्यावं लागतं त्यानुसारह्या दोन्ही गुणधर्मांच प्रमाण बदलत राहतं. आणि ह्या भुमिकेच्या वर असलेलं व्यवस्थापक मंडळ हे प्रमाण ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. 

व्यावसायिक जीवनात शिरणारा माणुस सुरुवातीला ह्या दोन्ही घटकांचं नैसर्गिक मिश्रण घेऊन येतो. ह्या जीवनात तग धरण्यासाठी मग तो आपल्या क्षमतेनुसार आपल्या व्यक्तिमत्त्वात बदल घडवून आणून ह्या दोन्ही गुणधर्मांचे हवं तितकं मिश्रण आणण्याचा कसोशीनं प्रयत्न करतो. पण एका विशिष्ट क्षणी ह्यातील एका गुणधर्माची तो त्याला शक्य असलेली कमाल मर्यादा गाठतो, मग त्याने Glass Ceiling गाठलं असं आपण म्हणु शकतो. 

शेवट वैयक्तिक किंवा सार्वजनिक जीवनाकडे! एक समाज म्हणून आपण Style ला अवास्तव महत्त्व देऊ लागलो आहोत असं वाटावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आधुनिक घरं, महागड्या गाड्या, आकर्षक व्यक्तिमत्त्व, रुबाबदार बोलणं ह्या सर्व गोष्टीच्या मोहापायी आपण मुळ पायाला म्हणजेच substance अर्थात ज्ञानाला एक समाज म्हणुन दुय्यम स्थान देऊ लागलो आहोत. त्यामुळेच एक समाज म्हणुन आपण कितवर पुढे जाऊ ह्याचं Glass Ceiling आपण लवकरच गाठु असं भय मला वाटू लागलं आहे.

६ टिप्पण्या:

  1. १००% सहमत आहे - सरते शेवटी balance महत्वाचा! आपण ठेवला नाहीत तर system हा balance तुमच्यावर थोपते. sytem ने तो तुमच्यावर थोपला तर तुमचा control सुटला :)

    उत्तर द्याहटवा
  2. १००% सहमत आहे - सरते शेवटी balance महत्वाचा! आपण ठेवला नाही तर system हा balance तुमच्यावर थोपते... Sytsem ने तो तुमच्यावर थोपला तर तुमचा control सुटला :) आणि आजच्या जगात - It's all about control!

    उत्तर द्याहटवा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...