मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ९ एप्रिल, २०१६

वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क - दिवस २


सहा वाजताचा वेक अप कॉल म्हणजे दारावर ठकठक! तोवर मी सवयीनुसार उठून जागा होतो. आज हे हॉटेल सोडायचं असल्याने सकाळी सातला बॅग्स बाहेर  काढणे आवश्यक होते. आमच्याकडे Roles and Responsibility अगदी चांगल्या प्रकारे ठरविल्या गेल्या आहेत. त्यामुळे बॅगा भरल्या जात असताना मी मदतनिसाची भुमिका अगदी चांगल्या प्रकारे बजावीत होतो. सात वाजुन पाच मिनिटांनी सर्व बॅग्स भरुन खोलीबाहेर काढल्या आणि मी धन्य झालो. काल रात्री गंगाघाटावर स्नान केलं नव्हतं. पण आज सकाळी हॉटेलात आलेल्या गंगेच्या पाण्याने स्नान करून गंगास्नानाचे पुण्य आम्ही पदरात पाडून घेतलं.
आम्ही सात वीसच्या सुमारास नाश्त्याला हजर झालो. जवळपास सर्व मंडळी आधीच हजर होतीसर्वांनी सोहमची आपुलकीने चौकशी केली. बसमध्ये सोहम हा एकमेव लहान मुलगा असल्याने त्याचं बऱ्यापैकी कौतुक होत होतं. नाष्टा जोरदार होता. छोले भटुरे, पोहे, केलोग्स, इडली, फ्रुट ज्यूस, ब्रेड बटर वगैरे वगैरे! प्रत्येक पदार्थाच्या समोर उभं राहिल्यावर नाही कशी म्हणु तुला ह्या गाण्याची आठवण होत आपोआप तो पदार्थ डिशमध्ये येऊन अलगद विसावत होता. सर्वांनी नाष्टा आटोपला आणि आम्ही बाहेर पडलो. हॉटेलच्या बाहेर सर्वांचे एक छोटे फोटो सेशन  झाले आणि आमचं रिषीकेशला प्रस्थान झालं

आज वातावरण थोडं गाळ होतं. माझी खिडकीची सीट होती. असल्या प्रवासात वाटेत दिसणारी झाडं मला खुणावतात. माझ्याशी संवाद साधतात. असंच रिषीकेशच्या प्रवासात एका थांब्याच्या ठिकाणी दिसलेलं एक एकटं झाड! बहुदा येणाऱ्या जाणाऱ्या हजारो लाखो प्रवाशांकडे ते अगदी निर्विकारपणे पाहत असावं




काही वेळातच रिषीकेश आलं. बसने आम्हांला आता सोडलं होतं. अरुंद रस्त्यामुळे आता बस आम्हांला दुपारच्या जेवणानंतरच भेटणार होती.इथे आम्हांला आमचे गाईड भेटले. पहिला थांबा होता तो 'प्रति केदारनाथ प्रती बद्रीनाथ' मंदिर  इथे!  


 
गाईड महाशयांनी आम्हांला ह्या मंदिराची आणि चारधामची सविस्तर कथा सांगितली. वातावरणात पवित्रता अगदी जाणवत होती. पूर्वीच्या काळच्या काही प्रसिद्ध ओळीसुद्धा त्यांनी ऐकविल्या
जो गया बद्री उसकी रह सुधरी 

जो गया बद्री वो रहा उधरही 







थोडं विषयांतर!  वर्ल्ड कप T२० मधल्या वेस्ट इंडीजच्या बद्रीला पाहुन सोहमला त्या गाईडची आठवण झाली . अंतिम सामन्यात बद्रीचा खांदा दुखावला त्यावेळी तो फलंदाजीस येणार नाही असंच आम्हांला वाटलं पण मध्ये अनेक गडी बाद झाल्यावर तो खांद्यावर उपचार घेऊन फलंदाजीस तयार झाला त्यावेळी आम्हांला शीघ्रकाव्य सुचलं!
वो रहा बद्री 
क्या उसकी हालत सुधरी?

ह्या मंदिराच्या परिसरात बेलाचं फळ खाणारं माकड होतं. अगदी उंचावर बसुन ते फळ खात असल्याने गाईडने आम्हांला थोडी काळजी घ्यायला सांगितली. आणि झालंही तसंच ! ते वजनदार फळ काही वेळातच खाली पडलं



ह्या मंदिरानंतर आम्ही गंगा  मंदिराकडे आलो!

गंगा मंदिर भगीरथ कहाणी 
गंगा मैया सत्ययुगात पृथ्वीवर आली. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलयुग. कलयुगाचा कालखंड ७ लाख १४ हजार ३८ दिवस. सध्या फक्त कलियुगातील ५ हजार वर्षे झाली आहेत. ब्रह्मा एकदा पापणी मिटतात तेव्हा एक युग संपुन जातं. चार युगांचा कालावधी संपला की प्रलय येतो आणि मग पुन्हा सृष्टीची निर्मिती होते. आतापर्यंत हे बऱ्याच वेळा झालं आहे. 
सत्यलोकात राजा सगर नावाचा अधिपती होता. त्याच्या दोन पत्नी होत्या. 
त्याला पुत्रप्राप्ती झाली नव्हती. त्याच्या कुलगुरूने त्यास ब्रम्हाची उपासना करण्यास सांगितली. राजा सगरने ब्रम्हाची उपासना केली. ब्रह्माने प्रसन्न होऊन त्यास दोन फळे दिली. त्याचबरोबर त्याला शंभर अश्वमेध यज्ञ करण्यास सांगितलं. राजा सगर ह्याचे आपल्या धाकट्या राणीवर अधिक प्रेम असल्याने त्याने तिला प्रथम हे फळ दिलं जेणेकरून तिचा पुत्र राज्याचा अधिपती होईल. थोरल्या राणीच्या दासीकडून ही बातमी तिला कळल्याने तिचा संतापाने तिळपापड झाला. तिने धाकल्या राणीसाठी खीर बनवुन त्यात विषप्रयोग केला आणि त्यामुळे धाकल्या राणीला साठ हजार पुत्र झाले. गाईडने सांगितलेल्या ह्या कथेत आणि इंटरनेटवरील कथेत थोडाफार फरक आढळतो. असो!

शंभरव्या अश्वमेध यज्ञातील राजा सगर ह्याने सोडलेला अश्व मृत्युलोक पार करुन स्वर्गलोकाकडे निघाला. ह्यामुळे देव भयभीत झाले. त्यांनी कपटाने हा घोडा कपिलमुनीच्या आश्रमात लपविला. राजाचे शिपाई अश्व नाहीसा झालेला पाहून भयभीत झाले आणि त्यांनी राजास ही बातमी कळविली. राजाचे साठ हजार पुत्र तात्काळ अश्वाच्या शोधार्थ निघाले. शोध चालु असताना ते कपिल मुनीच्या आश्रमाच्या जवळ आले असताना त्यांना हा अश्व दिसला. ह्या पुत्रांनी कपिल मुनींवर आक्रमण केलं. कपिल मुनी आपल्या तपश्चर्येत मग्न होते. परंतु ते जागृत होईस्तोवर ह्या पुत्रांनी त्यांच्यावर आक्रमण केलं. तपश्चर्या भंग झालेल्या मुनींची क्रोधीतनजर ह्या पुत्रांवर पडून ते सर्व भस्मसात झाले. राजाला संदेश मिळाला की तुझे साठ हजार पुत्र भस्मसात झाले आहेत. शोकमग्न राजा कपिल ऋषींच्या आश्रमापाशी जाऊन त्यांना विचारता झाला की माझ्या पुत्रांकडून असा कोणता गुन्हा घडला ज्याची तुम्ही अशी मोठी शिक्षा माझ्या पुत्रांना दिलीत. ऋषी म्हणाले की मी तर तपात मग्न होतो नक्की काय झालं ते मला माहित नाही. माझ्या डोळ्यातून जी क्रोधाची ज्वाला बाहेर पडली तिने हे पुत्र जळत आहेत जोवर तो स्वर्गातुन गंगामातेला पृथ्वीवर आणत नाहीस तोवर त्यांची ही अशीच स्थिती राहील. राजा आपल्या राज्यात परत आला आणि आपल्या नातु अंशुमन ह्यास राज्य सोपवुन हिमालयात तपास निघुन गेला. त्याच्या हजारो वर्षाच्या तपश्चर्येने सुद्धा गंगामाता प्रसन्न होऊ शकली नाही. अशा तीन पिढींनी गंगामातेला प्रसन्न करण्याचे विफल प्रयत्न केले. चौथ्या पिढीतील भगीरथ बारा वर्षाचा असताना त्याला ही सर्व कहाणी समजली. त्यानेसुद्धा त्या वयात तपास आरंभ केला आणि ११ हजार वर्षे एका पायावर गंगेची तपश्चर्या केली. तेव्हा कुठे गंगामाता प्रसन्न झाली आणि तिने भागीरथास प्रत्यक्ष दर्शन दिलं. परंतु गंगामाता जर थेट पृथ्वीवर आली तर तिच्या प्रवाहाचा वेग ही भूमाता सहन करू शकली नसती आणि म्हणुन भगीरथाने शंकराची आराधना करुन त्यांना प्रसन्न केलं. त्यानंतर गंगामाता प्रथम शंकराच्या जटांमध्ये सामावली. ती ह्या जटांमध्येआधी हजारो वर्षे सामावुन मगच पृथ्वीवर आली. मग कालांतराने शिवाने आपल्या एका केसातुन तिला मुक्त करून पृथ्वीवर सोडलं. सुरुवातीच्या गंगेच्या प्रवाहास भागिरथी असे म्हटलं जातं. हरिद्वार इथं सप्तर्षीनी पुन्हा गंगेस अडवलं. त्यामुळे तिथं आपणास सप्तर्षी आश्रम आढळतो. भगीरथाने त्यांना विनंती करून पुन्हा मुक्त केलं. अखेर शेवटी कपिल मुनीच्या आश्रमाजवळ गंगेस आणुन भगीरथाने आपल्या पूर्वजांस मुक्त केलं. 

गंगा  मंदिराच्या परिसरातील ही काही छायाचित्रे!







गंगेच्या मंदिरात गंगाजलाचे छोटे कमंडलू होते. परंतु आमच्या मार्गदर्शकाने पुढील ठिकाणी गंगाजल घेण्यास सांगितलं.  
 
गंगामंदिराच्या परिसरात मार्कंडेयाचे मंदिर आहे. अगदी लहान वयात ह्याच्या कपाळी मृत्यु लिहिला होता. पण ह्याने शिवाची प्रार्थना करुन मृत्युपासून आपली सुटका करुन घेतली आणि त्यास अमरत्व प्राप्त झालं.

पुढील थांबा होता उत्तरांचल पर्यटन विभागाचे अधिकृत विक्री केंद्र. ह्या वातानुकुलीत विक्री केंद्रात आकर्षक व्यक्तिमत्वाच्या पी एचडी केलेल्या संचालकाने आम्हांस विविध खड्यांचे महत्त्व समजावून सांगितलं. एकमुखी रुद्राक्ष. तीन रुद्राक्ष. भारतात केवळ तीन एकमुखी रुद्राक्ष आहेत. एक इंदिरा गांधींकडे होता जो त्यांनी हत्येच्या दिवशी घातला नव्हता. एक ठाकरे घराण्याकडे बाळासाहेबांकडे होता. आणि एक ह्या विक्री केंद्रात इस्कॉनकडे
एकमुखी रुद्राक्ष तीन ठिकाणी आढळतात! उत्तरांचलातील रुद्राक्ष सर्वश्रेष्ठ , त्यानंतर नेपाळ आणि त्यानंतर इंडोनेशिया येथील! संचालक आम्हांला समजावून सांगत होता.स्फटिक, नवग्रह माला वगैरे प्रकार अगदी प्रभावी होते. तिथे योग्य ती खरेदी करून आमची पावलं बाहेर पडली. 
 रिषीकेश येथील रिव्हर राफ्टींग प्रसिद्ध आहे. पण आमच्याकडे त्यासाठी वेळ नव्हता. म्हणुन आजुबाजूने जाणाऱ्या मंडळींच्या तयारीकडे पाहत आम्ही समाधान मानुन घेतलं.


बाहेर वीणा वर्ल्डतर्फे आम्हांस खास छास देण्यात आलं. त्यानंतर लक्ष्मण झुला हे आकर्षण होते. लक्ष्मण झुला हा suspension bridge आहे. माझ्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या आठवणी जागृत झाल्या. प्रोफेसर मुरडी आणि का कोणास ठाऊक influence line सुद्धा आठवली. राम झुला हा सुद्धा असाच एक अजून जुना पूल आहे.

लक्ष्मण झुला
 
झुनझुनवाला कुटुंबीयांनी पर्यटकांचे होणारे हाल पाहुन हा पुल बांधण्यासाठी धन दिलं होतं. दोन वेळा हा पुल मोठ्या पुरात वाहुन गेला. सध्या उभा असलेला लक्ष्मणझुला १९२७ साली बांधण्यात आला आहे. 




लक्ष्मणझुल्यावर आम्ही काही काळ छायाचित्रण केलं. अशा ठिकाणी सोहमचा हमखास वन्यप्राण्यांशी मुकाबला होतोच. लक्ष्मणझुल्यावर सोहमच्या दिशेने येणारी गाय! त्यामुळे लक्ष्मणझुल्यावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं!!

















लक्ष्मणझुला पार केल्यानंतरचे दृश्य!

 


त्यांनतर स्वर्गाश्रम आणि राधाकृष्ण मंदिर ह्यास आम्ही भेट दिली . चोटीवाले बाबा ह्या प्रसिद्ध उपहारगृहात जेवण. अतिउत्तम लस्सी प्राशन करण्याचे भाग्य आम्हांस लाभलं. ह्या लस्सिनेच आमचं पोट बऱ्यापैकी भरलं. त्यानंतर अगदी रुचकर जेवण समोर आलं. त्याचा अगदी मनमुराद आस्वाद आम्ही घेतला

मराठीतील उभरत्या लेखकाचा ह्या उपहारगृहाच्या बाहेर घेतलेला हा फोटो.



तिथं गाईडने बाबा काली कमली ह्यांची कथा सांगितली. ज्यांनी विवस्त्रावस्थेत अनेक वर्षे पुजा केली होती. तिथल्या राजास ही गोष्ट कळताच त्याने तातडीने जाऊन त्या बाबांस काळी कांबळ भेट दिली वगैरे वगैरे! एकंदरीत ह्या सर्वच भागात मोहोराने लगडलेली आंब्यांची अनेक झाडे दिसत होती. 
त्यानंतर आम्ही गीताभवन इथे आलो. इथे कृष्णाचे मंदिर होते. आणि आजुबाजुला निवासाची व्यवस्था होती. इथे छायाचित्रणास परवानगी नाही. इथलं वातावरण काहीसं वेगळंच वाटत होतं. त्यानंतर आम्ही बोटीतून गंगापार झालो. मध्यावर आमच्या बाटल्यामध्ये स्वच्छ गंगाजल भरुन घेतलं.

बसने सकाळी आम्हांला सोडल्यानंतर आम्ही जीपने, बोटीने आणि मग पायी प्रवास केला होता. जेवणानंतर बोटीने गंगा पार केल्यानंतर एकदाची आमची बस आम्हांला दिसली आणि आम्हांला हायसं वाटलं

आता बस मसुरीच्या दिशेने वेगानं दौडू लागली होती. हरिद्वार म्हणायला गेलं तर अगदी रखरखीत. रिषीकेश त्या मानाने थोडं निसर्गाचे कृपेने अधिक समृद्ध. बस जसजशी आता मसुरीच्या दिशेने निघाली तसं हिरवागार निसर्ग बसमधुन आम्हांला दर्शन देऊ लागला होता. तांदुळ, गव्हाची अगदी हिरवीगार शेतं डोळ्यांना सुखावून जात होती. ह्या शेतांचा विस्तार भरमसाट होता. अगदी नजर पोहोचू शकेल इथवर ही शेतं पसरली होती. ह्या भागात दुष्काळाचा अगदी मागमूस दिसत नव्हता. गंगा आणि इतर नद्यांच्या कालव्यांनी हा प्रदेश अगदी समृद्ध केल्याचं स्पष्टपणे जाणवत होतं



 


 



अधुनमधून गंगा नदी आपल्या विशाल पात्रासहित आमच्या भेटीस येत होती.




असंच मधल्या एका वाटेतील ठिकाणाचा हा फोटो!!


साधारणतः पावणेचारच्या सुमारास आम्ही डेहराडून शहरात प्रवेश केला होता. इथे काही सुंदर इमारती दिसत होत्या. हे शहर निवासी शाळांसाठी प्रसिद्ध आहे. डेहराडून परिसरातील एक नाक्याचे ठिकाण !

 

डेहराडून शहराच्या परिसरात चहाची वेळ झाली होती. सचिन आणि साथीदारांनी आपला नेहमीचं एक ठिकाण शोधुन काढलं होतं. पण बहुदा आज तिथं चहा उपलब्ध नव्हता. त्यामुळे दुसऱ्या पर्यायी ठिकाणी आमची  चहाची सोय करण्यात आली होती. रस्त्यावरील बोर्ड मसुरी इथून २१ किमी अंतरावर आहे असे दर्शवीत होते पण सचिन मात्र आपला ३० किमीचा आकडा घेऊन बसला होता. आणि त्यामुळे प्राजक्ता ठाकूर ह्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व त्याची टर खेचण्यात मग्न झालो होतो

ह्या ठिकाणीच नव्हे तर सहलीत पुढील सर्व चहा कॉफीच्या थांब्याच्या ठिकाणी प्रथम बिन साखरेच्या मंडळींना चहा कॉफी देण्यात असे. गप्पा चांगल्या रंगल्या होत्या. वातावरणात थंडावा जाणवत होता. पण बस क्रमांक एकच्या आसपास काही घडामोडी चालल्या होत्या. ड्रायव्हर आणि सहाय्यक मंडळीचे चेहरे काहीसे चिंताग्रस्त झाले होते. मग आम्हांला समजलं की बस क्रमांक १ च्या air pipe मध्ये काहीसा बिघाड झाला होता आणि मंडळी हा बिघाड दुरुस्त करण्यात गुंग होती. त्यामुळे बस क्रमांक दोनला सुद्धा थांबणं ओघाने आलं होतं

ह्या सक्तीच्या थांब्याचा मात्र आम्ही एकमेकांच्या ओळखी घट्ट करुन घेण्यात मस्त उपयोग केला. गेले कित्येक वर्षे एकाच निवासी कुटुंबात राहणारे पण एकमेकाला न भेटलेले तारकर आणि भिसे कुटुंबिय आज डेहराडून गावात आपसात ओळख करुन घेते झाले. घाटकोपरमधील श्री. भोर ह्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करुन air pipe मधील बिघाड दुरुस्त करण्यात मदत केली. चर्चेचा ओघ दुष्काळी परिस्थितीकडे वगैरे वळला

वीणा वर्ल्ड प्रत्येक प्रवाशाला पूर्ण सहलभर पुरेल इतका सुका खाऊ देत असते. परंतु ह्या दुकानात ठेवलेले आकर्षक रंगाचे जंक खाऊचे पुडकी पाहुन सोहमला राहवलं नाही आणि आम्ही त्यातील सर्वाधिक आकर्षक पुडा खरेदी करते झालो. परंतु हे दुकान ते बस ह्यामधील मार्गात माकडांचा उपद्रव होता. ही माकडं दबा धरुन बसली होती. परंतु सोहमने सावधगिरीने हे पुडकं बसमध्ये आणलं

आता मसुरीची चढण सुरु झाली होती. रस्ता तसा अरुंद होता. प्रत्येक वळणावर ड्रायव्हर समोरच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी हॉर्नचा इशारा देत असे. ह्या ड्रायव्हर लोकांचे कौतुक करावं तितकं थोडं! खिडकीच्या बाजुला बसुन खालची खोल दरी पाहताना सुद्धा आपल्या मनात थोडं का होईना पण भय निर्माण होतं. पण ही मंडळी मात्र दिवसभर सुद्धा अशा उंचावरील वळणावळणाच्या रस्त्यावर अगदी अचुकतेने मोठाली बस हाकत असतात

ह्या मसुरीच्या रस्त्यावरुन प्रवास करताना बाजुला दरीची काही खरोखर नयनरम्य दृश्यं दिसत होती. जमली तितकी भ्रमणध्वनीत् टिपली





 










मसुरीतील आमचं हॉटेल Brentwood Hotels and Resorts हे अगदी अरुंद भागात होतं. आणि त्यामुळे आमची बस आम्हांला बसस्थानकात सोडणार होती. आणि त्यानंतर आम्ही चालत ह्या हॉटेलात जाणार होतो. आमच्या बॅग्स आणण्यासाठी स्थानिक हमाल लोकांची तजवीज सचिन आणि कंपनीने करुन ठेवली होती. आपल्याला जिथं एक बॅ उचलताना मारामार होते तिथं आपल्या पाठीवर तीन चार बॅग्स उचलुन चढणीचा रस्ता सर करणारे हे लोक पाहुन खरोखर वाईट वाटत होतं. ह्यात काहीजण तर वयस्क सुद्धा होते. पण प्रश्न त्यांच्या उदरनिर्वाहाचा, रोजीरोटीचा होता.

हॉटेलच्या बाह्यदर्शन सुंदर होतंच पण अंतर्भाग अगदी आकर्षक होता. आमचं स्वागत गरमागरम चहाने करण्यात आलं. हॉटेलच्या मुख्य भोजनकक्षाच्या बाहेर एक आकाशछत असलेला अजून एक बैठकीचा / भोजनकक्षाचा भाग होता

  
तिथुन मावळत्या दिनकराचे अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारं दर्शन होत होतं





चहा आणि बिस्किटांचा आस्वाद घेत असताना सचिन खोल्यांचे नंबर घेऊन आला. चहाच्या एक तासाच्या गप्पांनी बर्फ फोडण्याचे (Breaking the ice) काम केलं होतं. त्यामुळे जसजसा सचिन खोल्यांची उद्घोषणा करीत होता तसतसे शाब्दिक कोट्यांना उधाण आलं होतं. आमच्या ह्या चेष्टामस्करीला तोंड देत सचिनने खोलीवाटप संपविले. 

खोलीत प्रवेश केल्यावर मन अगदी प्रसन्न झालं. आम्हांला खोली क्रमांक १०३ मिळाला होता. खोलीतुन खालच्या दरीचा अगदी नयनरम्य नजारा दिसत होता. 


दिवसभराच्या प्रवासाचा शीण अगदी नाहीसा झाला होता. बॅग्स आम्हां सर्वांच्या खोलीपर्यंत पोहोचताना थोडा वेळ लागला होता आणि त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने लॉबीत येउन चौकशी करणाऱ्या आम्हां सर्वांची भेट होत राहिली

क्रिकेट T २० विश्वचषक स्पर्धा चालु असल्याने रुमवरील टीव्हीवर क्रिकेट वाहिन्याचा शोध घेणे आवश्यक होते. सोहमने ते व्यवस्थित पार पाडले. "का रे दुरावा" चा शेवटचा भाग येत्या १ - २ दिवसात असल्याने झी मराठी वाहिनी इथे पाहता येईल का ह्याचा शोध महिला वर्ग घेत होता. त्यामुळे पुरुषवर्गाच्या मनात भय निर्माण झालं होतं

पावणेआठच्या सुमारास आम्ही भोजनकक्षात पोहोचलो. आठ वाजता दोन्ही बसमधील मंडळींच्या स्वयंओळखीचा कार्यक्रम सुरु झाला. दुसऱ्या बसमधील पुण्याची मंडळी आली होती. ही एकमेकांच्या नात्यातील, ओळखीतील साठ वर्षाच्या अलीकडील पलीकडील मंडळी होती. दरवर्षी एक निसर्गरम्य ठिकाण पाहुन घेण्याचा शिरस्ता त्यांनी गेल्या काही वर्षांपासुन सुरु केला होता. आम्हांला हे अगदी प्रशंसनीय वाटलं. त्यानंतर सचिन, आतिश आणि विक्रम ह्यांनी आपापल्या ओळखी करून दिल्या. सचिनची ही ह्या मार्गावरील ७५ वी सहल होती. सचिनने दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाची माहिती जरा जास्तच खेचली. साधारणतः सव्वा नऊच्या सुमारास आम्ही जेवणास बसलो. पुन्हा एकदा सुग्रास जेवण! वांगी बटाटे फ्राय भाजी, पनीर भाजी, दाल फ्राय आणि अनेक असेच रुचकर पदार्थ! आणि स्वीट दिश म्हणून राईपहाडी खीर! दिल खुश हो गया! बाहेरील कक्षातून मसुरीचे रात्रीचे विहंगम दृश्य दिसत होते







मंडळी गप्पांत रंगली होती. मी आणि श्री. ठाकूर थंडीचा मुकाबला करीत बाहेर उभे  होतो. ठाकुर मला गिरगावातील त्यांच्या आठवणी सांगत होते. शेवटी साडेदहाच्या आसपास सर्व मंडळीनी नाईलाजाने तिथून काढता पाय घेतला तो सचिन आणि मंडळीच्या वेक अप कॉलच्या धसक्याने!

(क्रमशः)

पहिल्या भागाची लिंक 

1 टिप्पणी:

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...