(प्रस्तावना - गूढ कथेचा हा प्रयत्न! ही कथा मानवी इतिहासातील कोणत्या ज्ञात काळात घडली हे शोधण्याचा प्रयत्न करू नये. कथेचं शीर्षक, त्यातील घटना ह्यांची संगती लावण्याचा प्रयत्न करू नये. ही आहे एक मुक्त कथा! जर चांगली भट्टी जमली तर पूर्ण करीन नाहीतर … )
वर्षानुवर्षे चाललेला आपला शिरस्ता कायम ठेवत अप्रमेया स्नान आटपून अंगणात आली. वयानुसार क्षीण होत चाललेल्या आपल्या नजरेला अजून ताण देत तिनं दुरवरच्या डोंगरावर नजर टाकली. अचानक तिच्या डोळ्यात जोरदार चमक भरली. त्या दुरवरच्या महाकाय पर्वतावर एक मिणमिणती ज्योत पेटलेली तिच्या अधु नजरेस दिसली. "अजेया ! अजेया " तिच्या ह्या तीव्र स्वरातील हाकेनं तिचा तरुण नातु धावतच अंगणात आला. तिच्या थरथरत्या हातांनी दर्शविलेल्या दिशेने त्याने पाहिलं आणि तो ही स्तब्ध झाला.
दूरवरच्या त्या महाकाय पर्वतावर ज्योत पेटली जाणे ही काही साधीसुधी घटना नव्हती. गेली कित्येक सहस्त्र वर्षे ह्या समुहाने त्याची प्रतीक्षा केली होती. दर शतकात ह्या समुहातील सर्वात साहसी युवकाची ह्या कामासाठी निवड केली जाई आणि त्याला मोठ्या आशेने सन्मानपुर्वक निरोप दिला जाई. पण इतक्या सहस्त्र वर्षांत ना ह्यातील एकही साहसी वीर परतला होता ना ज्योत पेटली गेली होती. गेल्या वीस वर्षांपूर्वी अप्रमेयाचा थोरला मुलगा कपाली ह्याने ज्ञातीतील सर्व युवकांचा नायक म्हणून अनेक काठीण्यपातळीच्या परीक्षेनंतर स्थान मिळविले होते आणि प्रथेनुसार तो त्या ज्योतीच्या शोधार्थ निघाला होता. आपल्या मुलाच्या विरहाचे हे दुःख अप्रमेयाने गेली कित्येक वर्षे उराशी बाळगलं होतं. मनी एकच आस बाळगली होती, आपला पुत्र इतिहासात अजरामर व्हावा. आज ही आस पूर्ण झाली होती.
अजेयाने एव्हाना आपला पिता मेधराज ह्यास ह्या घटनेविषयी सुचित केलं होतं. थोड्याच वेळात ही बातमी पुर्ण गावभर झाली होती. गावाच्या मध्यभागी असणाऱ्या मैदानात सर्व गावकरी जमा झाले होते. गावात सर्वात वयस्क असणारे जांबुवंत ह्यांच्या सभोवताली सर्वजण जमा झाले होते. मुखियाने शंख जांबुवंत ह्यांच्या हाती दिला. जांबुवंतांनी आकाशाकडे रोखून पाहिलं सुर्य अजुनही माथ्यावर आला नव्हता. काही क्षणांनंतर त्यांनी जोराने शंख फुंकिला. शंखाचा असला नाद गावकऱ्यांनी आजवर कधीही ऐकला नव्हता. अचानक आकाशात पक्षांची दाटी झाली. विविधरंगी, विविध आकाराचे पक्षी मुक्त विहार करू लागले. त्यातील काही प्रकारचे पक्षी तर गावकऱ्यांनी आपल्या आयुष्यात पुर्वी कधी पाहिले सुद्धा नव्हते. आतापर्यंत मंदगतीने संचार करणारे मेघ आता वेगाने संक्रमण करू लागले होते. सुर्याला झाकोळून टाकण्याचा त्यांचा इरादा स्पष्ट होता. अप्रमेयाची नजर त्या ढगांमधील एका मोकळ्या जागेत गेली. तिथून तिला स्वर्गलोकाचे स्पष्ट दर्शन होत होते. संदेश स्पष्ट होता. लहानपणापासुन ऐकलेली ही गोष्ट खोटी नव्हती तर! तिचं पृथ्वीवरील वास्तव्य संपत आल्याचा हा इशारा होता.
ह्या एकंदरीत प्रकाराने सर्वांच्या मनात क्षणभर एक अनामिक भिती दाटली होती. अजेयाला मात्र हृदयात एका उत्स्फुर्त भावनेनं उचंबळून आलं होतं. जांबुवंत आपली तीक्ष्ण नजर सर्व गावकऱ्यांवर फिरवीत होते. सर्वांच्या नजरा भयाने जमिनीकडे झुकल्या होत्या. एकच धाडसी युवक त्यांच्याकडे पाहण्याचं धारिष्ट्य दाखवू शकत होता आणि तो म्हणजे अजेय! जांबुवंतांनी आपली नजर अजेयाच्या नजरेशी भिडविली. बराच वेळ ही नजरबंदी चालू होती. शेवटी जांबुवंतांना आपली नजर झुकवावी लागली. आपल्या पराजयात ह्या समूहाचे हित आहे ह्या भावनेनं प्रसन्न होत त्यांनी शंख पुन्हा हाती घेतला. आताच्या शंखनादाने मात्र सर्व काही प्रसन्न होऊन गेलं. भयप्रद पक्षी, काळे मेघ आकाशातून गायब झाले.
"कपालीच्या स्वागतासाठी समुहातर्फे अजेया त्याच्या मार्गावर जाईल!" जांबुवंतांच्या ह्या घोषणेने प्रफुल्लित होत समूहाने चित्कार केला. अनेक पक्षी अजेयाच्या माथ्यावर येऊन नृत्य करू लागले. समुहातील काही व्यक्ती मात्र ह्या घोषणेवर नाराज होत्या. त्यात एक होती अजेयाची आई अनुप्रिता आणि दुसरी म्हणजे एक युवती मैथिली! ह्या छोट्या वस्तीला एका दाट जंगलाने व्यापलेलं होतं. ह्या वस्तीपलीकडे कसं जग आहे ह्याची जाणीव कोणालाच नव्हती. हे सारं खरं असलं तरी ह्या समुहातील प्रत्येकाला त्या दूरवरच्या ज्योतीने आकर्षित केलं होतं. त्या ज्योतीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग संकटाने भरलेला आहे ह्याची जाणीव प्रत्येकाला होती. त्यामुळेच कपालीविषयीच्या अभिमानाने प्रत्येकाचा ऊर भरून आला होता. पण आपल्या इतक्या प्रिय अजेयाला पुन्हा त्या संकटात टाकण्याच्या कल्पनेने त्या दोघींच्या अंगावर काटा उभा राहिला होता.
(क्रमशः)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा