मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, ११ जानेवारी, २०१६

नटसम्राट - एक सामाजिक शिकवण!!




काल संध्याकाळी नटसम्राट हा एक उत्तम चित्रपट पाहिला. मला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहित करणारा माझा मेव्हणा स्वप्निल सावेचे खास आभार! स्वप्निलला मराठी संस्कृतीची उत्तम जाण आहे आणि मराठी संस्कृतीच्या जोपासनेसाठी तो आपल्या परीने शक्य ते प्रयत्न करत असतो.  

ह्या चित्रपटाचे विश्लेषण करण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे गणपत आप्पा बेलवलकर ह्यांच्या व्यक्तीरेखेचे आणि ह्या चित्रपटातून मांडल्या गेलेल्या कथेचे विश्लेषण आणि दुसरा म्हणजे ह्या नाटकातील / चित्रपटातील कथेतून आपणास कोणता सामाजिक बोध घेता येईल ह्याविषयीचे विश्लेषण! मी इथे दुसरा मार्ग स्वीकारतो आहे. पुढे कधी ह्या नाटकाच्या मूळ संहितेचे सखोल वाचन केलं तर पहिला मार्ग स्वीकारायचा प्रयत्न करीन. 

आप्पा बेलवलकर नाटक ह्या व्यवसायातून व्यवस्थित अर्थाजन करून व्यावसायिक जीवनाच्या एका टप्प्यावर निवृत्तीचा निर्णय घेतात. हा निर्णय घेताना आपण अंतर्मनाने समोर प्रेक्षकात पाहू शकणाऱ्या दिग्गजांचे समाधान आता करू शकत नाही आहोत किंवा त्यांना अभिनयाच्या नवीन खोलीपर्यंत पोहोचवू शकत नाही आहोत म्हणून हा निर्णय अशी भावना असते. 

आपलं राहते घर मुलाच्या नावे आणि आर्थिक गुंतवणूक मुलीच्या नावे करुन ते आर्थिक जबाबदारीतून मोकळे होण्याचा प्रयत्न करतात. सुरुवातीला सुरळीत चाललेल्या संसारात मग हळूहळू छोट्या मोठ्या कुरबुरींना सुरुवात होते. आपल्या नातीला मायेचा लळा लावणाऱ्या आप्पांची आपल्या मूळ स्वभावाला, सवयींना बदलत्या काळानुसार नवीन वळण लावण्याची तयारी नसते. तोंडी येणारे अपशब्द, दारूचे व्यसन, नातीला स्नेहसंमेलनात लावणी करायला लावणे ह्या प्रकारांनी मुलगा आणि सून अप्पांवर नाराज होत राहतात. 

ही काही केवळ आप्पांच्या घरातील कहाणी नाही; ही आपल्या समाजाची प्रातिनिधिक कहाणी म्हणता येईल. दोन पिढ्या एका घरात नांदत असतात. एका पिढीचे व्यावसायिक जीवन संपून गेलं असतं आणि ती आता निवृत्तीजीवन जगत असते आणि त्यामुळे जीवनात काहीसा मोकळेपणा आलेला असतो, प्रत्येक गोष्ट अगदी गांभीर्याने घ्यायला नको असा काहीसा दृष्टीकोन विकसित झालेला असतो. ह्याउलट दुसरी पिढी व्यावसायिक जीवनात सक्रिय असते. तिथे अनुभवायला लागणारा No Non-sense दृष्टीकोन घरीसुद्धा बऱ्याच प्रमाणात आणण्याची त्यांची मनोवृत्ती असते. खास करून घरातील सून आपल्या नवीन पिढीला बाह्यजगासाठी सक्षम बनविण्यासाठी झटत असते. आणि त्यामुळे जुन्या पिढीने दिलेली काहीशी वेगळ्या पठडीतील शिकवणुक तिला बऱ्याच अंशी खटकत असते. 

मुद्दा सामंजस्याचा आहे. आजोबा आजी घरात नातवंडांना भावनिक सुरक्षिततेची जाणीव करुन देत असतात. जुन्या काळच्या मुल्यांची कळत नकळत शिकवण देत असतात. पण त्यांच्या काही गोष्टी नवीन काळाला अनुसरून नसतात. 
नवीन पिढी वरवर पाहायला गेलं तर काहीशी उद्धट आणि अगदी व्यावहारिक दृष्टीकोन बाळगणारी आणि स्वार्थी वाटू शकते. पण ह्यामागे ह्या पिढीची बाह्यजगात वावरण्यासाठी आपल्या नवीन पिढीला तयार करण्याची धडपड असू शकते. 
हे दोन दृष्टीकोन बाळगणारी दोन पिढ्यांची माणसे एका घरात वावरताना खटके उडण्याचे प्रसंग तर येणारच. पण हे प्रसंग किती झटपट विसरून आपण पुन्हा एकत्र नांदू शकतो हे महत्वाचे. आपल्या समाजात पुर्वीपासून मोडेन पण वाकणार नाही ही मनोवृत्ती आढळते. तीच काही प्रमाणात आपला घात करते.

बेलवलकरांचा आपल्या मुलांविषयीचा दृष्टीकोन काहीसा पूर्वग्रहदुषित वाटतो. मुलीचे लग्न झालं की ती मनाने परकी झाली असा समज त्यांनी आधीपासूनच करून घेतला आहे. आपल्या मुलाला फारसं स्वतंत्र व्यक्तिमत्व नाही असा त्यांचा समज विविध प्रसंगातून दिसतो. मुलगा आणि नंतर मुलगी ह्यांच्याशी एकदा गैरसमज झाल्यावर परत चर्चा करण्याची त्यांची तयारी दिसत नाही. 
आता मुलांच्या बाजूने! आपल्या वडिलांनी संपत्तीची सोय करून दिली असली तरी मुलाला आपल्या बायकोच्या आपलं मुल कसं वाढवायचं आहे ह्याच्या अपेक्षांना तोंड द्यावासा वाटतंय. मुलीला आपल्या नवऱ्याच्या कारकिर्दीची आपल्या वडिलांच्या बेजबाबदार बोलण्याने हानी होणार नाही ह्याची चिंता आहे. पण ह्या दोघांनीही वडिलांशी एकत्रपणे एकांतात बोलून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित चित्र वेगळं दिसू शकलं असतं. एका क्षणी सुनील बर्वे म्हणतो "म्हातारपण म्हणजे एक दुसरं बालपण असतं!" त्यावेळी मृण्मयी अगदी समर्पक वाक्य बोलते "पण मी त्यांच्यासाठी आई कोठून आणू!" पूर्वी म्हातारपणी स्त्रिया काही प्रमाणात ही आईची भुमिका बजावत पण हल्ली हे प्रमाण कमी होत चाललं आहे. 

एक निरीक्षण! बरीच माणसे आपल्या माणसांवर प्रेम किंवा द्वेष अगदी टोकाचं करतात. पण काळ बदलत चालला आहे. आपल्याला भावनिक संतुलन गाठीत ह्या दोन भावनांमधील सुवर्णमध्य साधता आला पाहिजे. आणि हो अजून एक! घरातील जवळच्या माणसाशी संवादकला साधता येणे ह्याचे संस्कार करण्याची मोठी गरज आपल्या समाजात आहे. बरीचशी नाती केवळ संवादाच्या अभावाने मोडताना आपण पाहतो. 

हे ह्या चित्रपटाचे खरं परीक्षण नव्हे! पण आपण सर्वांनी हा चित्रपट पाहावा तो आपल्या कुटुंबासाठी आपण ह्या चित्रपटाद्वारे कोणती शिकवण घेऊ शकतो ह्या उद्देश्याने! आणि ह्या पोस्ट्चा सुद्धा तोच उद्देश!

नाना पाटेकर आणि विक्रम गोखले ह्यांचा अभिनय लाजबाब! त्यांच्या अभिनयाविषयी अधिक बोलण्याची माझी पात्रता नाही. पण मराठीतील ह्या दोघा दिग्गजांना आणि बाकीच्या आघाडीच्या कलाकारांना एकत्र आणून एक यादगार कलाकृती बनविणाऱ्या महेश मांजरेकरांचे कौतुक करावे तितके थोडके! मला भावला तो सुनील बर्वेचा अभिनय आणि त्याची व्यक्तिरेखा! आजच्या समाजात वाढत्या प्रमाणात दिसणाऱ्या समंजस पुरुषवर्गाचे त्याने उत्तम प्रतिनिधित्व केलं असं मला वाटून गेलं! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...