गावाच्या वेशीपर्यंत आलेल्या समस्त गावकरी लोकांकडे अजेयाने स्थिर नजर टाकली. एक मोठा दीर्घ श्वास टाकला आणि मोठ्या स्वरात "येतो मी" म्हणत त्याने गावकऱ्यांचा निरोप घेतला.
काही वेळातच दाट जंगलाचा रस्ता सुरु झाला होता. जंगलात शिरण्याआधी त्याने एक वेळा ज्योतीची दिशा आपल्या मेंदूत घट्ट नोंदवुन ठेवली होती. आता रस्त्याच्या खुणा सुद्धा अगदी विरळ होत चालल्या होत्या. पाठीशी लावलेल्या अनेक शस्त्रांपैकी एक योग्य ते शस्त्र घेत त्याने त्या घनदाट जंगलातून मार्ग काढण्याचा आपला प्रयत्न चालू ठेवला होता. अचानक त्याला मागे पडलेल्या पालापाचोळ्यातून पावलांचा आवाज ऐकू आला. एव्हाना तो अगदी सावध झाला होता. ह्या इतक्या दाट जंगलात पावलांचा आवाज येताच तो काहीसा आश्चर्यचकित झाला. त्याने मोठ्या शिताफीने एका झाडामागे दडला. मिनिटभरातच मागून एक मनुष्याकृती येताना त्याला दिसली. बहुदा अजेयाची चाहूल न लागत असल्याने ती आकृती विचारात पडली होती आणि तिच्या चालण्याचा वेग मंदावला होता.
ही व्यक्ती आपल्या मागावर आहे असा पक्का ग्रह अजेयाने करुन घेतला होता. त्यामुळे आपण दडलेल्या झाडाच्या जवळ ती व्यक्ती येताच अजेयाने शिताफीने त्या व्यक्तीस जमिनीवर लोळवले आणि त्या व्यक्तीच्या उराशी आपला भाला टेकवून "कोण आहेस तू ? आणि माझा पिच्छा का करीत आहेस?" असे मोठ्या क्रोधाने विचारलं. त्या व्यक्तीचा पेहराव जरी पुरुषाचा असला तरी अजेयाला त्या व्यक्तीने आतापर्यंत केलेल्या प्रतिकारावरून काहीतरी गडबड जाणवली होती.
"मी मैथिली आहे, अजेया!" भाल्याचे टोकापासून कशीबशी आपली सुटका करून घेत ती म्हणाली.
"तू आणि इथे?" मोठ्या आश्चर्याने अजेयाने विचारलं. "तुला माझ्यासोबत येण्यास परवानगी कोणी दिली?"
"कोणाची परवानगी'घेण्याची मला गरज वाटली नाही! इतक्या अज्ञात संकटाने भरलेल्या मार्गाने तु एकटा जाणार आणि तुझ्या सोबतीला तुझी मदत करायला कोणीच नसणार हा विचार मला काही पटला नाही!" मैथिली ठाम स्वरात म्हणाली.
"मी ज्या मार्गावरून चाललो आहे ती एक मोठी तपस्या आहे. तिथं मला कोणतीही लक्ष विचलित करणारी प्रलोभनं नको आहेत!" अजेय काहीशा नाराजीच्या स्वरात म्हणाला.
"तुझी तुझ्या ध्येयावरील श्रद्धा अटल असेल तर कोणतेही प्रलोभन तुला विचलित करू शकणार नाही! बाह्यजगतातील घटकांवर आपलं यश अपयश अवलंबून आहे असे मानणाऱ्या सामान्य जनांपैकी तू नाहीयेस ह्याची मला ठाम खात्री आहे!" मैथिली एका दमात म्हणाली.
त्या दोघांचं हे बौद्धिक बराच काळ टिकलं होतं. शेवटी तू माझ्या पुढे न जाता मागेच चालत राहायचं आणि जोवर तू संकटात सापडत नाहीस तोवर माझ्या नजरेस पडायचं नाही ह्या अटीवर अजेयाने तिचं त्याच्या सोबत येणं मान्य केलं.
प्रवास अधिकाधिक खडतर होत चालला होता. दाट जंगल आणि तीव्र चढ ह्यामुळे वेगाने अंतर कापण्यास कठीण जात होतं. मध्ये अचानक काहीसा विरळ जंगलाचा भाग आला. त्यावेळी अजेयाच्या डोक्यात एक विचार आला, त्यानं झाडावर सरसर चढून पाहिलं. प्रवास ज्योतीच्या दिशेने योग्यच चालला होता. अधुनमधून पावलांच्या आवाजाने अजेय मैथिलीची चाहूल घेत असे. जंगलातील खाण्यायोग्य फळांचाच काय तो पोटासाठी आधार होता. त्यातली काही फळे मागे ठेवण्याची तो काळजी घेत असे.
दिवसांची गणती करण्यात फारसा मतलब नव्हता. दिवाकर आकाशात असला की त्या जंगलातील अंधार काहीसा कमी होई इतकंच! एके दिवशी असाच प्रवास चालू असताना अचानक नदीच्या पाण्याचा खळखळ आवाज अजेयाच्या कानी पडला. ह्या आवाजाने त्याच्या चित्तवृत्ती उल्हसित झाल्या. धावतच तो त्या आवाजाच्या दिशेने धावला. त्या थंडगार पाण्यात आपलं अंग झोकून देताना त्याला झालेल्या आनंदाला सीमा नव्हती. त्यात मनसोक्त डुंबत असताना अचानक त्याच्यावर एक जोरदार पंज्याचा घाव पडला. त्या घावाने आपला तोल गमावुन बसलेला अजेय पाण्यात खोलवर ढकलला गेला. पण काही क्षणातच त्याने स्वतःला सावरलं. त्या हिंस्त्र सिंहाशी त्याचा आता जोरदार मुकाबला सुरु झाला होता. आपल्या विशाल बाहूंनी त्या वनराजाला अजेयाने घट्ट जखडून ठेवलं होतं. तरीही त्या वनराजाने आपल्या तीक्ष्ण दातांनी त्याच्या बाहूंवर खोलवर घाव केले. अजेयाला हा मुकाबला क्षणाक्षणाला कठीण जाऊ लागला होता. अचानक हवेतून उड्डाण करीत आलेल्या एका मनुष्याकृतीने सिंहाच्या पाठीवर भाल्याचा एक जीवघेणा घाव केला. आणि त्यानंतर मात्र अजेयाने त्या वनराजावर बाजी पालटवली. काही वेळातच त्या वनराजाचा निष्प्राण देह पाण्यात तरंगू लागला होता.
पुढील कित्येक दिवस अजेयाचा नियम मैथिलीला मोडावा लागला. वनराजाने केलेल्या घावाच्या जखमा खुप खोलवर होत्या. मनोभावे केलेल्या सेवेमुळे त्या लवकरच भरल्या गेल्या. हवाई हल्ल्याने आपल्याला वाचवणाऱ्या मैथिलीचे आभार कसं मानायचं ह्याचा काही काळ अजेयाने विचार केला, पण बहुदा उत्तर न सापडल्याने त्याने तो विचार सोडून दिला. एकदा त्या जखमांतून सावरुन गेल्यावर मात्र अजेय पुन्हा पुर्वीच्याच जोमाने मार्गक्रमणास लागला. आणि आपल्या नियमाची सुद्धा तितक्याच कठोरपणे अंमलबजावणी करून!
अधिक उंची गाठल्याने वातावरणात थंडावा वाढला होता. अजेयवर त्याचा कसलाही परिणाम झाला नसला तरी मैथिलीला मात्र ही बोचरी थंडी जाणवू लागली होती. त्यावर तिच्याकडे उपाय होता म्हणा. वृक्षांच्या दाट पर्णांची खास वस्त्रे बनवुन तिने आपलं रक्षण करुन घेतलं होतं. मार्गात आता काहीसा बदल जाणवु लागला होता. जंगल काहीसं विरळ होऊ लागलं होतं. आणि एका वळणावर अचानक दृश्य अचानक पालटलं. अचानक एक रम्य नगरीचा नजारा अजेयासमोर आला. इतक्या उंचावर इतकी आखीव रेखीव नगरी पाहुन अजेयाला आश्चर्य वाटलं. तो त्या नगराच्या दिशेने कुच करण्याचा विचार करीत काही पावलं पुढे जातो इतक्यात आकाशातून उड्डाण करीत काही सैनिक त्याच्या दिशेने येताना त्याला दिसले. अजेयाने सुद्धा काही काळ त्यांना आपल्या उड्डाणकलेचा प्रताप दाखविला. त्या सैनिकांना आपल्याला पकडणं कठीण जाणार हे अजेय समजुन चुकला होता. शेवटी त्याने थकल्याचे नाटक करीत त्यांच्या ताब्यात जाणं पसंत केलं.
"ओ हो आतापर्यंत शतकातून केवळ एकदाच ह्या जमातीच्या माणसांचं आपल्याला दर्शन होत असे. आता गेल्या वीस वर्षातील हा दुसरा!" एका दिमाखदार सिंहासनावर बसलेल्या राजाच्या बाजुला बसलेली एक वयोवृद्ध स्त्री आपल्या किरक्या स्वरात उच्चारली. "ही बहुदा राजमाता असावी" अजेयाने मनात ग्रह बांधला. राजा मात्र गंभीर मुद्रेत बसला होता. ह्यांची आणि आपली भाषा एकच आहे ह्याचा मनातल्या मनात अजेयाला आनंद झाला. दरबाराचा थाट अगदी शाही होता. सुवर्णाने बनलेलं सिंहासन अगदी झळाळून दिसत होतं. दरबारात जागोजागी हिऱ्यांनी जडलेली झुंबरं छताला टांगलेली दिसत होती. राजाच्या बाजूला बसलेली खाशी मंडळी आपल्या चषकातील द्रवाचे प्राशन करण्यात मग्न होती. ह्या सर्वांचं अगदी बारकाईने निरीक्षण करण्यात गुंतलेल्या अजेयाच्या नजरेतुन राजाने आपल्या उजव्या बाजूच्या खास मंत्र्याला केलेली खुण सुटली नाही.
काही क्षणांतच दरबारात हवेत गिरक्या घेत काही सैनिक आले. आणि त्यांच्यासोबत मग सरकत्या खुर्च्यांवर बसुन वेगाने येणारी काही वयोवृद्ध मंडळी त्याला दिसली. त्यांना बघताच अजेय दचकलाच. ही वयोवृद्ध मंडळी निःशंकपणे त्याच्या जमातीतील होती. गावाच्या मध्यभागी असलेल्या प्रार्थनेच्या ठिकाणी लावलेल्या रेखीव चित्रात त्यातील काही चेहरे पाहिल्याचे त्याला स्मरत होते. "म्हणजे ज्योतीच्या शोधात गेलेल्या ह्या आपल्या पुर्वजांची मजल ह्या नगरीच्या पुढे गेलीच नाही म्हणायची!" मनातल्या मनात अजेयाने विचार केला.
काही क्षणांतच ह्या मंडळींनी अजेयाला घेरलं. आपल्या ज्ञातीची पारंपारिक प्रार्थना ऐकुन अजेय काहीसा भावुक झाला. मग त्यातील सर्वात वयोवृद्ध गृहस्थाने अजेयाचा हात हाती घेतला. आता साऱ्या दरबाराचे लक्ष त्या दोघांकडे लागुन राहिलं होतं.
"हे सिरीनगरीच्या नवयुवका! ह्या वैभवशाली सुवर्णनगरीत तुझे स्वागत असो! मित्रांसाठी अपरंपार मैत्री आणि शत्रुंसाठी अनंत शत्रुत्व देणाऱ्या ह्या नगरीतील लोकांसोबत कोणतं नातं जोडायची तुझी इच्छा आहे हे तु ह्या सर्वांसमोर स्पष्ट करावं अशी आमची इच्छा आहे. केवळ तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगतो की तुझ्याप्रमाणे आम्हांला सुद्धा हा निर्णय घ्यायची वेळ आली होती आणि आम्ही ह्या नगरीचे मित्र बनण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्या निर्णयाची गेली चारशे वर्षे तरी मला अजिबात खंत करावी लागली नाही!"
त्याचे इतके जोरदार भाषण ऐकून अजेय खचितच प्रभावित झाला होता. म्हणजे त्याच्या चारशे वर्षे वयाच्या उल्लेखाने! क्षणभर विचारात पडलेल्या त्याला पाहुन तो वयोवृद्ध माणूस पुन्हा त्याला आठवण करता देता झाला.
"आपला निर्णय तु त्वरितच ह्या दरबारी लोकांना सांगावास असे मला वाटत आहे!"
"हे सिरीनगरीच्या ज्ञानी पितामहा!" अजेयाची ही प्रस्तावना त्या वृद्ध माणसास फारशी आवडली नसल्याचं त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं.
"मी पुर्वी जरी सिरीनगरीचा रहिवासी असलो तरी मला आता सुवर्णनगरीचा नागरिक म्हणूनच संबोधिलेल आवडेल!" त्या वृद्ध माणसाने त्याला जाणीव करून दिली.
"ठीक आहे! तर मला इतक्या घाईघाईने निर्णय घेण्यास जमणार नाही!" खंबीर स्वरात अजेय उदगारला.
"तुला निर्णय आताच घ्यावा लागेल!" राजाच्या बाजुला बसलेला त्याचा प्रधान क्रुद्ध स्वरात ओरडला.
"मग माझा निर्णय नाही असाच असेल!" अजेयाने सुद्धा आपला खंबीर बाणा दर्शविला.
"पकडा ह्या उद्धट युवकाला!" प्रधान राग अनावर होत म्हणाला.
आपल्या अंगावर येणाऱ्या सैनिकांच्या समाचारासाठी अजेयने मानसिक तयारी केलीच होती. त्याने आपले बाहु इतके फुगविले की त्याचे बंध जोरात उन्मळुन पडले. एक हवेत उंच उडी मारत त्याने काहीशा कमकुवत दिसणाऱ्या सैनिकाच्या हातातील भाला आपल्या ताब्यात घेतला आणि आपल्या रक्षणार्थ त्या भाल्याचा वापर करीत त्याने विविध दिशेने आपल्या अंगावर चालुन येणाऱ्या सैनिकांना चुकवत दरबाराबाहेर झेप घेतली.
(क्रमशः)
Awesome, keep on.
उत्तर द्याहटवा