मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २८ नोव्हेंबर, २०१५

व्यावसायिक मनाचा वेध!

व्यावसायिक जीवनात यशस्वी होणाऱ्या किंबहुना वरिष्ठ पदे भूषविणाऱ्या लोकांसाठी स्वतःविषयीची स्वतःच्या मनात असणारी प्रतिमा उंचावर असणे आवश्यक असते. जितकं क्षेत्र अधिक क्लिष्ट तितकी ही गरज जास्त असते. 

आता ह्याविषयी कारण काय असावं ? कोणी उघडपणे ही बाब चर्चित नसलं तरी प्रत्येक थरावर असणाऱ्या व्यावसायिकाची त्याच्या लगेचच असणाऱ्या वरच्या आणि खालच्या अशा दोन्ही थरावरील माणसांची तुलना होत असते. म्हणजे हा आपल्या बॉसची जागा घेऊ शकेल काय किंवा ह्याची जागा ह्याच्याखालचा कर्मचारी घेऊ शकेल काय वगैरे वगैरे. ही तुलना केवळ वर्षाअखेरीस होणाऱ्या मुल्यमापनाच्या वेळीच होत नाही तर दररोज कार्यालयात होणाऱ्या मिटींग्स, ह्या माणसाने दिलेल्या भाषण आणि ई - मेल ह्यामधून प्रकट होणारं त्याचं ज्ञान, लोकांना सांभाळून घेण्याची त्याची / तिची वृत्ती ह्या सगळ्या घटकांची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या नोंद ह्या व्यावसायिकाचे केवळ बॉसच नव्हे तर एकंदरीत सर्व कर्मचारी घेत असतात. कळत नकळत ह्या व्यावसायिकाची एक प्रतिमा निर्माण झालेली असते जी निर्माण करण्यात त्या व्यावसायिकाच्या दैनंदिन वर्तणुकीचा मोठा वाटा असतो. 






कार्यालयातील आपली दररोजची वागणूक, कामगिरी  आपल्या मूल्यमापनात, प्रतिमेत कणाकणाने हातभार लावत असल्याने दररोज आपली सर्वोत्तम कामगिरी द्यावी अशीच खऱ्या व्यावसायिकाची इच्छा असते. ह्यासाठी आपण आपल्या सर्वोत्तम मनःस्थितीत असावे असाच ह्या व्यावसायिकाचा प्रयत्न असतो. त्यामुळे घरगुती पातळीवरील समस्या, दैनंदिन प्रवासाचा होणारा त्रास इत्यादी विपरीत घटक (ज्याला व्यावसायिक जगात Noise म्हणून संबोधण्याची प्रथा आहे) कसोशीने कमी करण्याचा व्यावसायिक सदैव प्रयत्न करतो. हे सर्व घटक वगळल्यावर मग उरतं ते फक्त तुमचं त्या क्षेत्रातील ज्ञान! प्रत्येक क्षेत्रात आवश्यक असणाऱ्या ज्ञानाची व्याप्ती दिवेसंदिवस व्यापक होत चालली आहे. ह्या दिवसागणिक विस्तृत होत जाणाऱ्या ज्ञानाबरोबर सदैव आपल्या ज्ञानाचा आलेख ठेवण्याचा प्रयत्न हा व्यावसायिक करतो. ह्या प्रयत्नात आपण ह्या पोस्टच्या आरंभीस उल्लेखलेली स्वतःच्या मनातील स्वयंविषयीची प्रतिमा महत्वाचा भाग घेते. 

काहीजणांना आपल्या ज्ञानाच्या मर्यादेविषयी जाणीव असते. त्यामुळे मग केवळ ज्ञान ह्या साधनाचा वापर करून यशाच्या शिड्या झरझर सर करणे शक्य होणार नाही ह्याची त्यांना जाणीव असते. त्यामुळे मग ते कार्यालयातील वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याचा, त्यांच्या चांगल्या पुस्तकात राहण्याचा प्रयत्न करतात. ह्या पद्धतीला ज्ञानामार्गे यश संपादन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वर्गात कमी समजण्याची प्रथा आहे. परंतु ह्या गोष्टीकडे काहीशा मुक्त नजरेने बघण्याची गरज आहे. कार्यालयातील अत्युच्च पदावर बसलेल्या व्यक्तींची एक कार्यशैली असते; बहुतेकवेळा ही शैली त्या कंपनीच्या विचारधारणेशी मिळतीजुळती असते. त्यामुळे ह्या विचारसरणीशी, ह्या कार्यशैलीशी साधर्म्य दर्शविणारे व्यावसायिक त्या संघटनेत वेगाने पुढे जाताना दिसतात. ह्या सर्वांना सरसकट वशिल्याचे तट्टू, बॉसचा चमचा अशा विशेषणांनी संबोधिणे योग्य नव्हे. ह्या व्यक्ती ज्ञान ह्या केवळ एका माध्यमावर अवलंबून न राहता दुसऱ्या माध्यमाचा देखील वापर करतात असा काहीसा व्याप्त दृष्टीकोन घेऊन त्यांच्या वागण्याचे विश्लेषण करू शकतो. 


स्वयंप्रतिमा घडविण्यात केवळ तुमच्या व्यावसायिक जीवनातील यशाचाच भाग असतो असे नाही तर तुमचं सामाजिक जीवनातील  स्थानसुद्धा ह्यात काही प्रमाणात भाग घेतं. आजचा व्यावसायिक त्यामुळे सभोवतालच्या घटनांविषयी आपली मते सोशल मीडियामध्ये हिरीरीने मांडताना दिसतो. ही मते मांडताना कधीकधी वादविवाद घडतात, हे वादविवाद सोडविताना त्यांच्याकडे व्यावसायिक जीवनातील वादविवाद सोडविण्याचा सराव म्हणूनसुद्धा पाहता येतं. ह्या सोशल मीडियामध्ये आपली मते मांडताना काही योग्य ठिकाणी आपल्या लिखित संवादकलेचा सुद्धा सराव होऊ शकतो. Political Correctness  हा प्रकार व्यावसायिक जगाच्या बाहेर पाळण्याचा प्रयत्न काहीजण करतात तर काहींना त्याची पर्वा नसते. 

जर तुम्हांला तांत्रिक ज्ञान, दूरदृष्टी, संभाषण चातुर्य आणि अशाच काही तत्सम गुणांच्या बाबतीत समजा दैवी वरदान लाभलं असेल तर तुम्हांला तुमची प्रतिमा सांभाळणे वगैरे प्रकारांवर फारसं लक्ष द्यावं लागत नाही, तुम्ही तुमच्या मर्जीने राहून सुद्धा यशाची शिखरं गाठू शकता. पण अशी लोक थोडकी, बाकी बहुतेकांना आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचे सतत विश्लेषण करत राहून आपल्या प्रगतीचा आलेख गाठायचा असतो. 

आतापर्यंत आपण ज्या व्यावसायिक वर्गाला संबोधलं तो खाऊन, पिऊन सुखी असा वर्ग आहे. ज्यावेळी माणसाच्या प्राथमिक गरजा पूर्ण होतात तेव्हाच तो मग अशा बाकीच्या उद्योगावर लक्ष देऊ शकतो. सोशल मीडियात सहभागी होणाऱ्या सर्वच व्यावसायिकांचा आपल्या व्यवसायात लागणारी कौशल्य परजून पाहणे हा हेतू नसतो. काहीजण फावल्या वेळातील उद्योग म्हणून ह्याकडे बघतात. 

एकंदरीत भारताकडे पाहिलं तर विविध गट आढळून येतात. 
१> वर उल्लेखलेला व्यावसायिक वर्ग, 
२> त्यांच्या आसपास वावरणारा आणि दररोज संसार चालविण्याची मारामार असणारा वर्ग 
३> श्रीमंतीची शिखरं गाठून तिथून वर उल्लेखलेल्या वर्गांकडे पाहणारा अतिश्रीमंत वर्ग. 

प्रसिद्धीमाध्यमातील बहुतांशी लोक हे पहिल्या गटात येऊ शकतात. त्यांना उपजीविका चालविण्यासाठी ज्या बातम्या लागतात त्याचे दोन प्रकार असतात. 
१> सवंग प्रसिद्धीच्या उथळ बातम्या 
२> बहुतांशी वर्गाशी संबधित असणाऱ्या पण ज्याचे बाजारखप मुल्य फारसे आकर्षक नाही अशा बातम्या. 

अतिश्रीमंत वर्ग पहिल्या प्रकारातील बातम्यांचा नियमितपणे रतीब घालत असतो. किंबहुना प्रसिद्धीमाध्यमातील लोकांचा आणि त्यांचा बहुदा करारच असावा की तू मला महिन्याला इतक्या बातम्या पुरवाव्यात. 
आता व्यावसायिक वर्गाला खरतर दोन प्रकारच्या बातम्या उपलब्ध असतात. परंतु सामान्यवर्गातून उगम पावलेल्या बातम्या बऱ्याच वेळा समस्यांशी संबंधित असतात. जसे की पेट्रोलचे भाव वाढले, वाहतूककोंडी वगैरे वगैरे. सरकार ह्या सर्व समस्या सोडवू शकेल ह्यावर बहुतांशी व्यावसायिक वर्गातील लोकांचा विश्वास उडाला आहे. एकतर परदेशगमन करून किंवा भरपूर पैसा कमवूनच ह्या समस्या सुटू शकतात असा बहुतेकांचा समज झाला आहे. त्यामुळे ज्या समस्यांपासून आपण पळू पाहत आहोत त्यासंबंधित बातम्या वाचण्याची त्यांची फारशी इच्छा नसते. मग साहजिकपणे ते अतिश्रीमंत वर्ग ज्यांचा स्त्रोत आहे अशा बातम्यांकडे वळतात कारण हेच आपले भविष्य आहे /असावे असा त्यांचा विश्वास असतो. 
बातम्या येत राहतात, गदारोळ माजत राहतो, आणि समाजातील प्रत्येकजण आपल्या श्रेणीनुसार आपल्या जीवनमार्गावर क्रमण करत राहतो. भाषेतील काहीशी अडगळीला पडलेली नामे, विश्लेषणे अधूनमधून उजेडात आणण्याचे काम मात्र प्रसारमाध्यमे चोख बजावीत असतात. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...