मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, ५ ऑगस्ट, २०१५

वारसदार - भाग १


 
 सुधीररावांच्या आक्रस्ताळपणाकडे दुर्लक्ष करून सुशांतने आपला अभ्यास सुरूच ठेवला. "असली पुस्तकं वाचत बसलो असतो तर हा बंगला, ही जमीन कधीच मिळवता आली नसती!" सुधीररावांनी आपला संताप सुरूच ठेवला तसा न राहवून सुशांत म्हणाला, "हवीय कोणाला तुम्हांला तुमची संपत्ती!" त्यांच्या वाक्याने होऊ घातलेला सुधीररावांच्या संतापाचा स्फोट बाहेरून येणाऱ्या SUV च्या दर्शनाने त्यांना आवरता घ्यावा लागला. 
"तू आपलं शांतपणे जेवून घे पाहू!"  रावांची कार्यकर्त्यांबरोबर बैठक सुरु झाली तसं गीताताई सुशांतला म्हणाल्या. बापलेकांचे खटके तसे हल्ली वारंवार होऊ लागले होते. गेले नऊ वर्षे आमदारकीपासून वंचित राहिलेल्या रावांचा संयम हल्ली काहीसा सुटत चालला आहे असंच ताईंना वाटू लागलं होतं. नाहीतर अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षाला असणाऱ्या सुशांतच्या मागे पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता बनण्याचा घोषा त्यांनी उगाच का लावला असता! 
सुशांतने थोडक्यातच आपलं जेवण आटपून घेतलं आणि तसाच तडक तो आपली बाईक काढून महाविद्यालयाच्या दिशेने सुसाट निघाला. नुकताच पाचव्या सेमिस्टरला महाविद्यालयात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने तसा त्याचा जीव महाविद्यालयात चांगलाच रमला होता. आता सहाव्याला पहिलाच क्रमांक काढायचा असा त्याच्या मनाने ठाव घेतला होता. त्यामुळे एव्हाना महाविद्यालयाच्या वाचनालयातच त्याचा अधिकाधिक वेळ जायचा. 
सिग्नलला बाईक थांबवून त्याने क्षणभरासाठी हेल्मेट बाजूला केलं तशी बाजूच्या कारची काच वर झाली. "हॅलो सुशांत!" कारमधून एक मंजुळ आवाज आला. अचानक आलेल्या ह्या आवाजाने सुशांत दचकला. मेंदूला थोडा ताण दिल्यावर ही तर आपल्या कॉलेजातील मुलगी हे त्याने ओळखलं. "हाय !" त्याने काहीसा थंड प्रतिसाद दिला. हिचं नाव काय बर असा मनात येणारा विचार त्याने त्यात यश न मिळण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन सोडून दिला. सिग्नल कधी हिरवा होतोय ह्याची वाट पाहत असताना पुन्हा तिचा आवाज आला, "माझ्या वडिलांना किन्नई मीटिंगला जायला थोडा उशीरच होतोय, मी तुझ्यासोबत बाईकवर आले तर चालेल का?" वडिलांशी थोडा वेळ जास्त भांडलो असतो तर हा अनावस्था प्रसंग ओढवलाच नसता असा त्याच्या मनात विचार आला. पण स्त्रीदाक्षिण्याच्या विचाराने त्याने शेवटी तिला मानेनेच होकार दिला. 
महाविद्यालयाच्या बाहेर टपरीवर कटिंगचा आस्वाद घेत असलेल्या सुशांतच्या मित्रमंडळीच्या ग्लासातील चहा आपल्या नव्याकोऱ्या बाईकवरून येणाऱ्या सुशांतला पाहून हिंदकळला. सुशांत बाईकवरून येणे ह्यात काही नाविन्य नव्हतं पण त्याच्या मागे बसलेल्या नीलाचे दर्शन त्यांना अनपेक्षित होते. नीला ही कॉलेजातील बऱ्यापैकी फ़ेमस होती आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे कॉलेजातील जवळजवळ प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमातील तिचा सहभाग! वक्तृत्वस्पर्धा असो की गायनस्पर्धा वा नृत्यस्पर्धा, एकतर स्पर्धक किंवा सूत्रधार म्हणून तिचा सहभाग ठरलेलाच असायचा! हिची आणि सुशांतची ओळख कधी झाली हाच गहन प्रश्न सर्व मित्रमंडळीना पडला; आणि त्याहूनही आपल्या गुप्तहेर खात्याचं इतके मोठे अपयश त्यांना पचवणं जरा कठीणच गेलं. त्यातील काहींच्या असूयेची भावना निर्माण झाली हा अजून एक भाग!! ह्या मित्रांच्या घोळक्यासमोरून जाताना सुशांतने बाईक जरा अजून जास्तच झुपकन जोरात नेली. त्यातील काहींनी त्याला नजरेनेच "तू ये तर खरा इथे घोळक्यात, मग पाहून घेतो तुला!!" असे धमकावलं. 
"भेटली वाटेत आणि दिली तिला लिफ्ट! त्यात काय मोठं आभाळ कोसळून पडलं काय!" मित्रांच्या चेष्टामस्करीने मनातून सुखावलेला सुशांत उसने अवसान आणून त्यांच्याशी फुल फाईट देत होता. शेवटी सुशांतकडून कॅंटीनमधल्या प्रसिद्ध पावभाजीची पार्टी घेइस्तोवर मित्रांनी त्याचा पिच्छा सोडवला नाही. 
दिवस शांतपणे चालले होते. पितापुत्रांचा अबोला काहीसा कायमच होता. नीला आणि सुशांत पातळीवर सुद्धा काही विशेष घडामोड नव्हती. चुकून समोरासमोर आले तर "हाय, हॅलो"  व्हायचं इतकंच!! सुशांतचे लक्ष महाविद्यालयात सातव्या सत्रात येणाऱ्या कंपन्याद्वारे नोकरी मिळवण्याकडे लागून राहिलं होतं. कोठे बाहेरगावी नोकरी मिळवली तर बाबांच्या कटकटीपासून काही दिवस का होईना मुक्तता मिळेल असाही त्यामागचा हेतू होता. 
कॉलेजच्या वार्षिक कार्यक्रमाचे वारे एव्हाना जोरात वाहू लागले होते. आयोजनात अर्थातच नीलाचा पुढाकार होता. खरेतर राजकीय पक्षांपासून हा कार्यक्रम दूर ठेवण्याचा व्यवस्थापनाचा कटाक्ष होता, पण पुढील वर्षाच्या निवडणुका लक्षात घेता महाविद्यालयीन विद्यार्थांच्या मनात एकंदरीत विविध पक्षांच्या आर्थिक धोरणांबाबत जागृती निर्माण व्हावी असा प्रस्ताव नीलाने मांडला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्राचार्य आणि व्यवस्थापनाने हा प्रस्ताव फारसे आढेवेढे न घेता उचलून धरला. 
नीलाने स्थानिक पातळीवरील विविध पक्षांशी संपर्क साधला आणि आपला प्रतिनिधी पाठविण्याची विनंती केली. बदलत्या वातावरणाचे भान असलेल्या सर्व पक्षांनी तत्परतेने आपल्यातील तरुण जाणकार नेत्यांची ह्या कार्यक्रमासाठी निवड केली. महाविद्यालयीन तरुणांसमोर आपल्या पक्षाची तरुण प्रतिमा निर्माण व्हावी हा त्यामागचा हेतू होता. 
सुधीररावांपर्यंत ही बातमी इथून तिथून का होईना पण पोहोचली. आपल्या मुलाच्याच कॉलेजातील कार्यक्रमात आपल्यासारख्या जेष्ठ नेत्याला बोलावलं जात नाही हे त्यांच्या मनाला अगदी लागलं. अगदी खवळूनच ते रात्री घरी पोहोचले. सुशांत शांतपणे आपल्या खोलीत अभ्यासाला बसला होता. "बस झाली ही नाटकं!" त्याच्या खोलीचा दरवाजा धाडकन उघडत सुधीररावांनी त्याच्यावर आग ओकली. "बापाच्या पैशाने फी भरतो आणि बापाला कॉलेजात बोलवायला तुला लाज वाटते की काय!" त्यांच्या तोंडाचा पट्टा चालूच होता. क्षणभर काय झालं ते सुधीरला कळलंच नाही. पण क्षणभर विचार करता त्याची ट्यूब पेटली. "अहो बाबा, तसं काही नाहीय! ह्या कार्यक्रमाच्या आयोजनात माझा अजिबात सहभाग नाही! आणि आयोजकांनी असा कार्यक्रम आयोजित केला इतकंच मला माहितेय, पण त्यांनी प्रवक्त्यांना निमंत्रण पाठवली हे मला बिलकुल माहित नाही!" त्याच्या ह्या बोलण्याचा काही प्रभाव न पडल्याने रावांनी आपला पट्टा चालूच ठेवला. 
सुशांतने आपला शांतपणा कायम ठेवला. "आई मी बाहेर एक चक्कर मारून येतो!" आपल्या बाईकची चावी उचलत तो म्हणाला. आईनेही त्याला अडविले नाही. "तू ह्याला पूर्ण बिघडून ठेवला आहे! माझी ह्या घरात काहीच किंमत राहिली नाही !" सुधीररावांची धुसफूस सुरूच राहिली. 
ह्या वेळी कोठे जायचे हे सुशांतला समजत नव्हते. समोर एक हॉटेल दिसलं त्यात एक कॉफी पिऊन मग घरी जावं असा त्याने विचार केला. 
हॉटेलाच्या वातानुकुलीत कक्षाचा दरवाजा उघडून कोठे मोकळी जागा मिळते का ह्याचा शोध त्याची नजर घेत असतानाचा अचानक त्याला "हाय सुशांत !" अशी हाक ऐकू आली. हाकेच्या दिशेने नजर वळवून पाहतो तो आपल्या आईवडिलांसोबत जेवण घेत असलेली नीला त्याच्या नजरेस पडली!

(क्रमशः)

1 टिप्पणी:

२०२४ अनुभव - भाग २

१. मनःस्वाथ्यासाठी लोक खरोखर संघर्ष करताना दिसताहेत. मी सुद्धा करतोय. माझा संघर्ष वेगळा आहे, तुमचा वेगळा असेल. जीवनातील एका क्षणी आपल्याला त...