"आई, हा आमच्या कॉलेजातील सुशांत बरं का! अगदी स्कॉलर मुलगा आहे!" नीला मोठ्या कौतुकाने आईशी सुशांतची ओळख करून देत होती. तिचे बाबा मात्र शांतपणे आपल्या डिशचा आस्वाद घेण्यात दंग होते. "नमस्कार!" सुशांतने हात जोडून नीलाच्या आईला प्रणाम केला. "हिचे वडील थोडे खाष्टच दिसतात!" चिकन लेगचा आस्वाद घेण्यात मग्न असलेल्या तिच्या बाबांकडे नजरेचा कटाक्ष टाकत सुशांत मनातल्या मनात पुटपुटतो इतक्यात "हाऊ आर यु यंग मॅन !" म्हणत त्यांनी त्याला त्यांच्यात सामील होण्याची विनंती केली. "आणि हो त्या दिवशी नीलाला कॉलेजात लिफ्ट दिल्याबद्दल धन्यवाद!" बाबांच्या ह्या मनमोकळ्या बोलण्याने आपण उगाचच ह्यांच्याविषयी मत बनविण्याची घाई करत होतो ह्याचा सुशांतला मनातल्या मनात पश्चात्ताप झाला.
आपण एकटेच इथे हॉटेलात का आलो होतो ह्याचे स्पष्टीकरण देणे सुशांतला काहीसं जड गेलं. पण मग नीलाने लगेचच त्याची परिस्थिती ओळखून विषय बदलण्यात त्याची मदत केली. मग निरोप द्यायची वेळ आली तेव्हा सुशांतचा मूड बराच सुधारला होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठायला नीलाला तसा उशीरच झाला. आज आपल्याला असं अगदी छान का वाटतंय ह्याचा तिला उलगडा होत नव्हता. चांगलासा ड्रेस घालून ती आरशासमोर केस विंचरत उभी होती. आणि अचानक तिला मागे सुशांत उभा आहे असा भास झाला. अगदी दचकून तिनं मागे वळून पाहिलं पण तिला झालेला हा भास होता.
रिक्षाने कॉलेजात जाताना भिरभिरणारी तिची नजर प्रत्येक बाईकवाल्यावर पडत होती. हे आपल्याबाबतीत असं होऊ शकत ह्यावर तिचा विश्वास बसत नव्हता.
त्या दिवशी सुशांतची एका पाठोपाठ एक लेक्चर्स होती. मध्ये नीलाला एक फ्री लेक्चर मिळताच आपल्या मैत्रिणीला घेऊन उगाच तिने सुशांतच्या वर्गावरून चक्कर मारली. पाठमोरा सुशांत अगदी एकाग्रतेने प्रोफेसरकडे लक्ष देऊन ऐकत होता. "बाय द वे आपण ह्या वर्गापाशी का थबकलो आहोत?" चाणाक्ष शलाकाच्या ह्या प्रश्नाने भानावर आलेल्या नीलाने तातडीने आपल्या पावलांचा वेग वाढवला. तिच्या सुदैवाने शलाकाचे लक्ष कोठे दुसरीकडे वेधले गेले म्हणून ठीक नाहीतर तिची आज काही खैर नव्हती.
दोन दिवसानंतर मात्र नीलाच्या प्रयत्नांना यश लाभलं. पुस्तक परत करायला लायब्ररीमध्ये ती प्रवेश करणार आणि सुशांत तिथून बाहेर पडायला एकच गाठ पडली. "हॅलो!" सुशांतने आपल्या मित्रांच्या अस्तित्वाचे भान ठेवत हळूच तिला अभिवादन केलं. त्याच्यासोबत ह्या वेळी त्याचा जीवलग मित्र निखिल होता. एकंदरीत परिस्थितीचा त्याला साधारणतः अंदाज आलाच होता. सुशांतला अनुकूल वातावरण निर्माण करण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात अचानक उबाळून आली. "ओह नो! माझे अजुन एक पुस्तक परत करायचं राहून गेलं! सुशांत माझं एक काम करशील? ही रांग भलीमोठी वाढतच चालली आहे. तू इथंच उभा राहा मी हा असा गेलो आणि पुस्तक घेऊन परत आलो!" निखिलचे हे उदगार सुशांतला कितीसे पसंत पडले हे जरी त्याला समजलं नसलं तरी नीलाच्या चेहऱ्यावर उमटलेलं छुपं हासू त्याच्या तीक्ष्ण नजरेतून सुटलं नाही.
"त्या दिवशी रात्री हॉटेलात तू असा अगदी टेन्स का दिसत होतास?" रांगेत सुशांतच्या पुढे उभ्या असलेल्या नीलाने त्याला विचारलं. "आणि हो असा एकटाच कसा काय आलास हॉटेलात?" तिच्यासोबत रांगेत एकत्र उभी रहायची पाळी आली तेव्हा सुशांतने अशा प्रश्नांना सामोरं जाण्याची तशी तयारी केलीच होती. गेले दोन दिवस घरी वातावरण तंगच होतं. अंगात ताप असल्याने बाबा घरीच होते आणि त्यामुळे आईशी ह्या परिस्थितीवर चर्चा करायची सुद्धा संधी त्याला मिळत नव्हती. त्यामुळे आता हिच्याशी ह्या विषयावर बोलण्याशिवाय पर्याय नाही असा निर्णय सुशांतने घेतला.
"तुला थोडा वेळ असेल तर आपण कॅंटीन मध्ये चहा घेऊयात का?" सुशांतने तिला विचारलं तेव्हा नीला अगदी खुष होऊन गेली. त्या दोघांची एकत्र एंट्री कॅंटीन मध्ये झाली तेव्हा एका कोपऱ्यात बसलेल्या सुशांतच्या मित्रांच्या तोंडाचा उघडलेला आ तसाच काही वेळ कायम राहिला. नीलाने एका कोपऱ्यातील टेबल पकडलं आणि तोवर सुशांत दोन कप चहा हातात घेऊन तिथवर आला. "अबे क्या तू भी वही देख रहा हैं जो मैं देख रहा हूँ?" अशा ऐतिहासिक प्रसंगी हिंदी चित्रपटातील संवाद बोलण्याची सवय तशी सुशांतच्या मित्रांना होतीच. आतापर्यंत सुशांतने अनाथ सोडलेला निखिल सुद्धा त्यांच्यात सामील झाला होता. आपण सुरु केलेलं अभियान सुशांत इतक्या लगेच इतकं पुढे नेईल ह्याची कल्पना नसलेला निखिल मनातून खुश झाला.
"हं तर अशी परिस्थिती आहे तर!" सुशांतच्या घरी हे वादळ घडवायला अप्रत्यक्षरित्या आपण कारणीभूत झालो ह्याचे नीलाला खूप वाईट वाटत होते. चहाचे घुटके घेत असताना ह्या परिस्थितीत कशी सुधारणा घडवता येईल ह्याची चक्रे तिच्या डोक्यात फिरू लागली. चहा आटपून मग काही वेळाने दोघंजण एकत्रच बाहेर पडली. सुशांतने कंपूला आपल्या नजरेतून कॅंटीनमध्ये प्रवेश करता करताच पाहिलं होतं. नीलाशी बोलल्यावर सुशांतला काहीसं हलकं वाटू लागलं होतं. त्या मूडमध्ये त्याने बाहेर पडताना कंपूला लांबूनच आत्मविश्वासपूर्ण हात केला. एव्हाना कंपू पूर्णपणे थंडगार झाला होता.
आज सुधीररावांना तसं बरं वाटू लागलं होतं. सकाळीच उठून अंगणात एक फेरफटका मारून ते हॉलमध्ये बसले होते. त्यांना चहा घेऊन गीताताई आल्या. कप टीपॉय ठेवून स्वयंपाक घरात जायला निघतात तितक्यात दारची बेल वाजली. इतक्या सकाळसकाळी कोण आलं असेल असा विचार करतच त्यांनी दार उघडलं तर समोर एक सुंदर आकर्षक महाविद्यालयीन युवती उभी होती. "माझं नाव नीला! मला सुधीररावांना भेटायचं होतं. फोन न करता अचानक आल्याबद्दल क्षमस्व!" गीताताई अगदी आश्चर्यचकित झाल्या होत्या. "अहो ऐकलं का!" आपली ठेवणीतील हाक मारता मारता ही मुलगी कशी सोज्ज्वळ दिसते हा विचार त्यांच्या मनात डोकावलाच!!
(क्रमशः)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा