चित्रपट पाहिला गेल्या रविवारी!! एक आठवड्यानंतर आज ही पोस्ट लिहितोय. वसईत पहिला पाऊस पडल्यानंतरची जी रात्र असते त्यावेळी दिवसाचा उजेड संपून पूर्ण काळोख होण्याच्या एका क्षणी पंख फुटलेल्या मुंग्या अचानक दिव्यांच्या दिशेने झेपावतात. ह्या मुंग्यांची संख्या शेकडोनी असते. अतिशोयक्ती अलंकार वापरायचा झाला तर हजारोंच्या संख्येने असते. मग अनुभवी माणसे वयाला जमेल त्या वेगाने झटापट सर्व विद्युत दिवे बंद करण्याच्या, घराची दारे मागे लागतात. आपलाही वयोमानपरत्वे अनुभवी माणूस ह्या सदरात प्रवेश होणे ही भावना सुखद की दुःखद ह्याचा उलगडा गेली अनेक वर्षे मला झालेला नाही!! ह्या सगळ्या धडपडीनंतर पूर्वी मग देवासमोरचा दिवा पेटता राहायचा आणि मग घरात शिरलेली ही पाखरे त्या दिव्यांवर झेपावायची. क्षणभंगुर जीवन म्हणजे काय ह्याची प्रचिती मला ह्या पाखरांच्या जीवनावरून यायची.हल्ली त्यात मिणमिणत्या मोबाईलच्या उजेडाचा समावेश झाला आहे. तसा पूर्वी गल्लीतला नगरपालिकेचा दिवा सुद्धा असायचा.
ज्युरासिक वर्ल्ड आणि ह्या सर्वांचा संबंध कोठे असा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर ऐका!! कोणत्याही दिशेने हवेतून उडत येणारे पंखधारी जीव आणि त्यांच्यावर तुटून पडणारे त्यांचे भक्षक (आपल्या उदाहरणात पाली) आणि ह्या सर्व हिंसक वातावरणात भयाच्या भावनेचा अनुभव घेणारे आपण! ह्या सर्व अनुभवाची प्रत्यक्ष प्रचिती घेण्याची जी प्रत्येकात विविध पातळीवर खुमखुमी असते ती माझ्या बाबतीत दर पावसाळ्यात ही पाखरे पूर्ण करतात. त्यामुळे खास वातानुकुलीत सिनेमागृहात जाऊन त्रिमिती दृक अनुभव देणारी चाळीशी (वयाचा उल्लेख करायचा नाही म्हणता म्हणता कोठेतरी सुगावा लागून दिलाच की हो राव!!) लावून डायनासोर पाहण्याचा मला फारसा छंद नाही. पण तन्नू वेड्स मन्नू रिटर्न्स (ह्यात तन्नूने मन्नूला वेडा केला असा मराठी शब्दशः अर्थ घेण्याचा मोह टाळावा!!) पाहताना सोहम बालकाला न नेल्याने त्याचा डायनासोर पाहण्याचा हट्ट मला पूर्ण करणे भाग होते. आमच्यासोबत श्राव्या ही सोहमची पाच वर्षाची मामेबहीण होती. तिचा हा डायनासोरना प्रत्यक्ष सिनेमागृहात बघण्याचा प्रथम अनुभव असणार असल्याने एका चित्तथरारक अनुभवाची अपेक्षा मनात बाळगून आम्ही सर्व , खास करून तिचे पालक मॉलमध्ये प्रवेश करते झालो.
जीवशास्त्र आणि माझे तसे दहावीपर्यंत बरे चालले होते. म्हणजे अमीबाच्या आकृत्या काढताना बऱ्यापैकी झटापट व्हायची पण आजूबाजूचा मजकूर पाठ असल्यावर चालून जायचं. खरा प्रश्न बारावीत निर्माण झाला. रुपारेलात Zoology अर्थात प्राणीशास्त्र शिकवायला कल्याणपूर नावाच्या अगदी कडक मॅडम होत्या. म्हणजे ज्यांना हा विषय आवडायचा त्यांच्यासाठी त्या अगदी चांगल्या होत्या. पण मी PCM करीत असल्याने प्राणीशास्त्राकडे तसे दुर्लक्षच करीत होतो. पण त्या काळदिवशी (आतापर्यंत काळरात्र असा शब्द ऐकला असेल पण आता काळदिवस हा ही ऐका!!) आम्हांला बेडूक विच्छेदन पार पाडायचे होते. त्यावेळी प्राण्याविरुद्ध अत्याचार थांबवणारी संघटना फारशी कार्यरत नसल्याचा फटका मला बसला. बिचारा गुंगी दिलेला अर्धमेला बेडूक माझ्यासमोर ट्रे मध्ये ठेवण्यात आला होता. त्याला मधोमध छेद देऊन त्याच्या काही रक्तवाहिन्या कापायच्या होत्या काही ठेवायच्या होत्या. मग ज्या राखून ठेवलेल्या वाहिन्या होत्या त्यांना गाठ बांधून मग आपलं शल्यविशारद कौशल्य दाखविण्यासाठी मॅडमना पाचारण करायचं असा एकंदरीत कार्यक्रम होता. आधीच तो अर्धमेला बेडूक बघून मी वैतागलो होतो आणि मग त्यातच ह्या सर्व कापाकापीमध्ये जी ठेवायची होती ती वाहिनी कापली जाऊन तिथे थोडाफार रक्तपात झाला. आणि मग मी अजून गोंधळून जाऊन तिथे मी पूर्ण गोंधळ केला. बाकीच्या मित्रांचं व्यवस्थित चाललं होतं त्यामुळे त्यांची स्तुती करत करत मॅडम जेव्हा माझ्यापर्यंत पोहोचल्या तेव्हा मी केलेला पराक्रम पाहून त्या यं वैतागल्या. माझी त्यांनी मनसोक्त स्तुती केली. चारचौघात स्तुती होण्याचा हा माझा बहुदा पहिलाच प्रसंग असल्याने मी ही चांगलाच वैतागलो. आणि मग मी बोलून गेलो, "मॅडम मी PCM करतोय!" त्यांना आणि बाकीच्या सर्वांना मोठाच धक्का बसला. पण मॅडम मनाने चांगल्या होत्या. माझ्या ह्या रुपारेलच्या मानकदंडाप्रमाणे उद्धट मानल्या जाऊ शकले जाणारे उत्तर त्यांनी फारसे मनावर घेतलं नाही. बाकी मग वर्षभर त्यांनी माझ्याकडे आणि माझ्या पराक्रमाकडे काहीसा कानाडोळा केला. हे अजून दुसरं रामायण अशासाठी की मी मग बारावीत पोटापाण्यापुरते मार्क मिळवणे सोडता प्राणीशास्त्र ह्या विषयाकडे पूर्ण कानाडोळा केला. आणि म्हणून मला डायनासोरचे विविध प्रकार माहित नाहीत!!!
असो चित्रपट चालू झाला.चित्रपटाच्या सुरुवातीला सुट्टीवर एका थीम पार्कच्या सहलीला जाणारी दोन मुले आणि त्यांना वेळेवर विमानतळावर पोहोचवण्याच्या खटाटोपीत असणारे त्यांचे पालक आपल्या दृष्टीस पडतात. दोन मुलांच्या वयोमानात तसा बऱ्यापैकी फरक. म्हणजे मोठा दोन दिवस आपली मैत्रीण आपल्यापासून दुरावणार म्हणून मनातून दुःखी झालेला ह्याउलट छोटा आईचा दुरावा दोन दिवस सहन करावा लागणार म्हणून दुःखी झालेला आणि त्याचवेळी ज्युरासिक वर्ल्डला जायला मिळणार म्हणून अतिउत्साहात असलेला!! त्यांची मावशी ज्युरासिक वर्ल्ड मध्ये मोठ्या अधिकारावर आणि तिच्या भरवशावर ह्या दोन मुलांची आई ह्या दोघांना तिथे दोन दिवसांसाठी एकटं सोडायला तयार झालेली!! चित्रपट पुढे सरकत राहतो. काही गोष्टी आपणासमोर येत राहतात. सर्वसामान्य माणसांचे पूर्वीचे ज्युरासिक थीमचे आकर्षण आता कायम राहिलं नाही ह्याची ह्या ज्युरासिक वर्ल्डच्या चालकांना भेडसावणारी चिंता!!
त्यामुळे काहीतरी नवीन, काहीतरी विशेष नव्याने निर्माण करण्याची धडपड!! हे विशेष निर्माण करताना कोठेतरी सारासार विचार करण्याची विवेकबुद्धी बाजूला ठेवली जाते. आणि मग निर्माण केला जातो तो अगदी महाकाय शक्तीचा एक डायनासोर!!
आता बघा समजा एखाद्या अशिक्षित माणसास गणित अजिबात समजत नाहीयं आणि तुम्ही त्याला लाख, कोटी, पद्म वगैरे संख्या समजावून सांगायचा प्रयत्न करीत आहात. तो ज्या अचंब्याने एक लाखाकडे पाहील त्याच अचंब्याने एक कोटीकडे पाहील. तसाच काहीसा प्रकार माझ्या बाबतीत डायनासोरच्या विविध प्रकाराची नावे ऐकताना होतो. पुन्हा त्यातील काही अगदी भयंकर तर काही अगदी निरुपद्रवी!!
ह्या ज्युरासिक वर्ल्डचं चित्रपटातील प्रथमदर्शन अगदी नयनसुख देणारं आहे!! समजा तुम्हांला तुमच्या कल्पनाशक्तीला ताण देत जगात / ह्या विश्वात सर्वात सुंदर अशा ठिकाणाची निर्मिती अथवा वर्णन करावयास तुम्हांला सांगितलं तुम्ही कसं कराल? काहीसं गोंधळून जायला होईल की नाही राव!
जिथवर नजर पोहोचेल तिथवर हिरवेगार कुरण पसरलेलं; अगदी दूरवर हे कुरण जिथं संपल्याचा भास होईल तिथं सुरु होणारा आणि आकाशाला आपल्या हिमाच्छादित शिखरांनी स्पर्शु पाहणाऱ्या पर्वतरांगा! ह्या पर्वतरांगावर पसरलेले महाकाय सुचीपर्णी वृक्ष! ह्या पर्वतरांगातून उगम पावणारी आणि आपल्या शुभ्र पाण्याच्या खळखळणाऱ्या आवाजाने सर्व आसमंतात जिवंतपणा आणणारी नदी! आपल्या नजरेसमोर ह्या नदीचं पर्वतात असतानाचं बाल्यावस्थेतील अवखळ रूप समोर असावं आणि आयुष्यभराच्या प्रवासानं आलेल्या प्रगल्भतेने सपाट भूभागात आल्यानंतरच संयत रूपसुद्धा असावं. हिरव्यागार कुरणावर अगदी रंगीबेरंगी फुलझाडांनी दाटी केलेली असावी आणि त्यातील डेरेदार वृक्षांवर आपल्या मधुर रवाने आसमंत भारून टाकणाऱ्या पक्ष्यांचं वास्तव्य असावं. असा काहीसा प्रकार मला रंगवासा वाटतो.
ह्या हॉलीवूडच्या निर्मात्यांना मात्र दाद द्यावी तितकी थोडी!! आपल्या कल्पनेतील ह्या स्वप्नवत वाटणाऱ्या दृश्याला शब्दरूप देताना सुद्धा आपल्याला फार मोठी धडपड'करावी लागते. तर ही श्रेष्ठ मंडळी त्यांच्या मनातील स्वप्नातील ह्या दृश्याला एनिमेशनच्याच्या आधारे प्रेक्षकांसमोर हुबेहूब पुढे करतात. ज्युरासिक वर्ल्डचं चित्रपटातील प्रथमदर्शन डोळ्यांना अगदी सुखावून सोडतं.
ज्यात जैवशास्त्रीय बदल घडवून आणून त्याला महाकाय शक्ती प्रदान करण्यात आली आहे असा एक डायनासोर मोकळा सुटतो. त्यामागे सुद्धा त्याची विकसित झालेली बुद्धी असावी असा तर्क करायला वाव असतो. त्या डायनासोरच्या विध्वंसात मग ही मुले सापडतात. पण काही वेळातच आपली सुटका करून घेण्यात यश मिळवतात. प्रेक्षक जितका वेळ लहान मुलं एकटी संकटाचा मुकाबला करत असतात तोवर जीव कंठाशी आणून चित्रपटाशी एकरूप असतात. पण मग ती मोठ्या माणसांना मिळाल्यानंतर आपल्या मनावरील दडपण आपसूकच कमी होतं. परदेशी सिनेमातील संवाद काळजीपूर्वक ऐकायची आपल्याला सवय विकसित करावी लागते. लहान लहान प्रसंगातून आपल्यासमोर विविध पात्रांच्या व्यक्तिरेखा उलगडत जातात. लहान भावाच्या मनात आपले आई वडील एकमेकांपासून वेगळे होण्याचं असलेलं भय, त्यांच्या आई आणि मावशीच्या संवादातून आपल्यासमोर येणारं त्यांच्या नात्याची झलक वगैरे वगैरे!! मावशीबाई अगदी मोठ्या हुद्द्यावर असतात आणि त्यांचं एक प्रेमपात्र चार गोंडस (?) डायनासोरना प्रशिक्षित करीत असते. ह्या प्रेमपात्राचे आणि मावशीबाईचे काहीसं बिनसलेलं असल्याने ते फक्त व्यावसायिक संबंध राखून असतात. सर्वसामान्य परिस्थिती असेल तर कोणत्याही (विवाहित / अविवाहित ) जोडप्यातील संबंध ताणलेलेच असायला हवेत आणि जर ते सुरळीत व्हायला हवे असतील तर एखादी आपत्ती यायला हवी असा काहीसा समज चित्रपट पाहून होऊ शकतो. पण खरे आणि चित्रपटातील जीवन वेगवेगळ असते हे लक्षात असून द्यात!!
चित्रपट एखाद्या विशिष्ट मर्यादेपलीकडे उत्कंठा निर्माण करण्यात अयशस्वी ठरतो. महाकाय शक्तीचा मोकळा सुटलेला डायनासोर सतत विध्वंस करीत फिरणार, त्याला काबूत आणण्यासाठी चांगल्या विचाराची / मनाची माणसे प्रयत्नरत असणार; त्यात खो घालण्यासाठी व्यावसायिक वृत्तीची माणसे येणार, डायनासोर पुढचा हल्ला कोणत्या रुपात करणार ह्याची काय ती उत्कंठा असणार!! हा पुन्हा पुन्हा वापरून झालेला फॉर्म्युला!! आणि त्यात हल्लीच्या पिढीकडे असणारी गैजेट्स! ह्या गैजेट्समुळे तुम्हांला जीवनात उत्कंठादायी अनुभवाची प्रचिती घेण्यासाठी सिनेमागृहात जाण्याची गरज भासत नाही. आणि गेल्या २० वर्षात प्रेक्षकांच्या मानसिकतेत झालेला हा बदलच ज्युरासिक वर्ल्डला आधीच्या भागांइतके यश देऊ शकला नाही असे माझे वैयक्तिक मत!! बाकी लाईफ ऑफ पाय नंतर एका मोठ्या हॉलीवूड चित्रपटात काम करण्याचा इरफान खानचा हा अजून एक अनुभव!! त्याच्या अभिनयात काय खास आहे हे मला समजले नाही; बहुदा त्याचं इंग्लिश बाकीच्या ३ महानायकांपेक्षा चांगलं असावं असा मी समज करून घेतला.
सोहम आणि श्राव्या मंडळी चित्रपटानंतर खुशीत दिसली. त्रिमितीय गॉगलातून अगदी जवळपर्यंत येउन सुद्धा डायनासोरने काहीच केले नाही म्हणून श्राव्या खुश असावी तर वेगवेगळ्या फ्लेवरच्या पॉपकोर्नचे सेवन करायचा योग आला म्हणून सोहम खुश असावा!!
डायनोसोरसारखा हिडीस प्राणी मुलांना का आवडतो हा मला पडलेला गहन प्रश्न आहे. माझा ६ वर्षांचा नातू दायानोसोराचा गरागरा फि रणारा पंखा आहे. १०० तरी डायानोसोर घरात तो बाळगून आहे. आणि त्यांची भयानक नावं तो आमच्याकडून म्हणून घेतो हा आणखी भयानक भाग आहे.
उत्तर द्याहटवा