मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, २५ जून, २०१५

व्यावसायिक संज्ञा !!!


 
व्यावसायिक जगात कानावर पडणाऱ्या अनेक संज्ञा उपयुक्त असतात. त्यातील काहींचा उहापोह करण्याचा हा प्रयत्न!!
१> Seat At the Table
व्यावसायिक जगतातील महत्वाचे निर्णय ज्या बैठकीत घेतले जातात त्या बैठकीला उपस्थित राहायला मिळणे हा एक सन्मान आणि महत्वाची जबाबदारी असते. 
  • ज्या टीमचे तुम्ही प्रतिनिधित्व करता त्या टीमची सर्व माहिती तुम्हांला असणे आवश्यक असते. 
  • बैठकीतील चर्चा बऱ्याच वेळा अनपेक्षित वळण घेते अशा वेळी आपल्या टीमला न्याय देईल असा निर्णय घेण्याची क्षमता अशा व्यक्तीकडे असणे आवश्यक असते. 
  • ह्या व्यक्तीला केवळ आपल्या संघाचेच हित लक्षात घेऊन चालत नाही तर संघटनेच्या व्यापक हिताच्या दृष्टीने एखादा निर्णय घेतला जात असेल तर प्रसंगी आपल्या संघाचे हित बाजूला ठेवावं लागतं आणि मग बैठकीनंतर आपल्या संघाला हे पटवून द्यावं लागतं. 
  • बैठकीतील चर्चा जर काही अगदीच निरस, गंभीर अथवा वादाचे वळण घेत असेल तर प्रसंगाला अनुरूप अशा विनोदाची पेरणी करून वातावरण निवळण्याची क्षमता सुद्धा ह्या व्यक्तीकडे असावी.
  • बैठकीत भाग घेणाऱ्या दुसऱ्या संघांची योग्य ती माहिती असावी जेणेकरून त्यांनी परिस्थितीचे विपर्यस्त वर्णन केल्यास वेळीच त्यांना ओळखता आले पाहिजे. त्याच प्रमाणे दुसरा संघ जर खरोखर अडचणीत सापडला असेल तर उदारमतवादी भूमिका घेता आली पाहिजे. हृदय तितकं मोठं हवं पण त्याच वेळी मेंदू शाबूत हवा!!

पूर्वी एकत्रित मोठ्या कुटुंबात ही संज्ञा काही प्रमाणात लागू पडायची. मोठ्या कुटुंबातील मालमत्तेच्या वाटपाच्या वेळी केवळ जेष्ठ मंडळीना ह्या बैठकीतील ही खुर्ची मिळायची!!

२> Auto Pilot
एखाद्या व्यवस्थापकाच्या अनुपस्थितीत किंवा त्याने जाणूनबुजून दुर्लक्ष केलं असता एखादा संघ आपल्याला नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थित पार पाडत असेल तर तो संघ 'Auto Pilot' अवस्थेत आहे असे म्हणतात. हे व्यवस्थापकाच्या व्यवस्थापन कौशल्याचे यश मानलं जातं. पण मग 'No one is indispensable' ह्या उक्तीचं ह्या व्यवस्थापकाला भय वाटू शकतं. जर संघ ह्या व्यवस्थापकाच्या अनुपस्थितीत सुद्धा इतकं चांगलं काम करू शकत असेल तर ह्या गड्याला डच्चू देऊ शकतो अशी दृष्ट बुद्धी वरच्या लोकांना सुचू शकते. 
 
घरच्या कारभारात जर तुमचे अपत्य सकाळी फारसा आरडाओरडा न करता उठत असेल, वेळच्या वेळी शुचिर्भूत होऊन शाळा कॉलेजात जात असेल आणि आपला अभ्यास व्यवस्थित पार पाडत असेल तर तो / ती 'Auto Pilot' अवस्थेत आहे असे आपण म्हणू शकतो. 

बाकी बायका आपल्या यजमानांचे (ही संज्ञा आता दुर्मिळ होत चालली आहे) formatting करण्याचा सतत प्रयत्न करीत असतात. काही अत्यंत दुर्मिळ उदाहरणात यजमान हे आपल्या पत्नीच्या आज्ञेनुसार व्यवस्थित वागू लागल्यास ते 'Auto Pilot' अवस्थेत आहे असे म्हणू शकतो. काही चलाख नवऱ्याकडे आपल्या मर्जीनुसार वागून सुद्धा आपण बायकोच्या दृष्टीने 'Auto Pilot' अवस्थेत आहोत असा भास निर्माण करण्याची शक्ती असते.

३> 1:1 
एका मीटिंग रूम मध्ये जाऊन दोन लोकांनी साधारणतः ३० मिनिटे बोलून एकंदरीत कामाची प्रगती, वैयक्तिक समस्या, व्यावसायिक प्रगतीचा टप्पा वगैरेंची चर्चा करणे ह्या प्रकारास १:१ म्हटलं जातं. ह्यात आपल्या व्यवस्थापकाचा खास वेळ आपल्यासाठी मिळू शकतो ज्यात त्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या बाकीच्या गोष्टी नसतात. एखादा व्यवस्थापक किती प्रभावीपणे हे १:१ घेतो ह्यावर त्याचे जनमानसातील आदराचे स्थान अवलंबून असतं.

घरगुती पातळीवर नवरा बायको ह्यांनी शांतपणे बसून १:१ केल्यास बऱ्याच प्रमाणात नात्यात चांगुलपणा टिकून राहतो. परंतु लग्नानंतर लगेचच  जे नवराबायको एकत्र तासभर चर्चा करू शकतात त्यांची ही शांततापूर्ण चर्चेची क्षमता दरवर्षी ५ मिनिटे कमी होत जाते असा माझा सिद्धांत आहे!!! थोडं गंभीर होत, पती पत्नींनी आपली आर्थिक स्थिती, मुलांचे शिक्षण, वार्षिक प्रवास वगैरे विषय अशा चर्चेत घ्यायला हरकत नाही.

पिता आणि मुलगा ह्यांचे १:१ हे फक्त दम देण्यापुरत सीमित असण्याची मराठी कुटुंबात प्रथा आहे. पण शाळेत अभ्यासाव्यतिरिक्त काय चालत, त्याचे मित्र कसे आहेत, त्यांच्या चर्चा कोणत्या विषयावर होतात असे विषय साधारणतः आठवी पर्यंतच्या अपत्याशी चर्चेस घ्यायला हरकत नाही. त्याहूनही मोठ्या वयाच्या मुलांशी व्यावसायिक क्षेत्राची निवड वगैरे विषय निवडायला हरकत नाही. अमेरिकेत वगैरे मुलं आपल्या खास मैत्रिणीविषयी वगैरे वडिलांना सांगतात. आपलं BP वगैरे वाढण्याचं भय नसल्यास आपण ही हा मोकळेपणा आपल्या अपत्यास द्यावा!!

४> SME
एखादा कर्मचारी एका विषयात खास तज्ञ बनला की त्याला SME (Subject Matter Expert) म्हटलं जातं. ह्यावर अजून काही खास बोलण्याची गरज नाही.

मराठी कुटुंबात ज्यांना पुरणपोळ्या, उकडीचे मोदक, शेवाळाची आमटी हे प्रकार अप्रतिम जमतात त्यांना आपण SME म्हणू शकतो. आपल्या बायकोच्या उपस्थितीत आपली माता, भगिनी, बायकोच्या मैत्रिणी किंवा अन्य परस्त्री ही एखाद्या पदार्थात SME आहे असे म्हणण्याचे दुःसाहस माझे हृदय सिंहाचे आहे असा दावा करणारे मराठी नवरे सुद्धा करीत नाहीत असा आपल्या सर्वांचाच अनुभव आहे. अजून बऱ्याच संज्ञा आहेत पण वेळेअभावी आज इतकेच!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...