मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, १३ जून, २०१५

सुज्ञता !!


 
खरंतर लेखाला Politically Correct असं शीर्षक देण्याचा मोह फार होत होता. पण वसई महानगरपालिकेच्या निवडणुका उद्या असल्याने उगाच भानगड नको म्हणून तो टाळला. 
लहानपणी इतिहासाची पुस्तके वाचण्यासाठी अगदी मस्त असत. त्यात गोष्टी वाचायला मिळत आणि आपल्या मराठी भाषेच्या नाट्यमयपणाची तिथे लयलूट असे. "शत्रूचे घोडे नदीकाठी पाणी पिण्यासाठी सुद्धा कचरत कारण त्यांना त्यात धनाजी संताजी दिसत" असं वाक्य वाचलं की माझी छाती सुद्धा अभिमानानं दोन इंच फुलून येई. मातृभाषेतील अशा वाक्यांनी आपल्या परंपरेविषयी सदैव अभिमानच वाटला. अगदी काही वर्षापूर्वी काळ बराचसा निरागस होता. अजूनही बहुदा गावात मातृभाषेत शिक्षण घेणाऱ्या लोकांसाठी तो तसा असावा. त्याच इतिहासाच्या पुस्तकात अजून काही प्रसिद्ध वाक्य होती. "मराठे युद्धात जिंकले आणि तहात हरले!" हे त्यातील एक! त्यानंतर एक होतं "दत्ताजींनी मुत्सद्दीपणाचे धोरण स्वीकारलं आणि …" "दत्ताजींनी मुत्सद्दीपणाचे धोरण स्वीकारलं.. . " ह्या वाक्याचा अर्थ समजा त्याकाळच्या मुलांना वर्गात उभं करून विचारला असता तर अगदी धमाल आली असती. 

हळूहळू वयाने मोठेपण येत जातं. जर तुमच्यासोबत एखाद्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील मुलांना लाभतं इतकं सुदैव असेल तर तुम्हांला महाविद्यालयीन शिक्षण संपेपर्यंत मुत्सद्दीपणा अंगी बाणवायची गरज भासत नाही. नाही म्हणजे तुम्ही ह्या काळात प्रेमात वगैरे पडलात तर मात्र काहीसा मुत्सद्दीपणा बाणवावा लागतो. एकदा का तुम्ही नोकरीला लागलात आणि तुमचं लग्न झालं की तुमच्या आयुष्यात अनेक नवीन लोक प्रवेश करतात. शिक्षणाचा कालावधी संपेपर्यंत तुमच्या आयुष्यात आलेली लोक आणि त्यानंतर आलेली लोक ह्यात एक मुलभूत फरक असतो. पहिल्या टप्प्यातील लोक एकतर लहानपणापासून तुम्हांला ओळखत असतात आणि दुसरं म्हणजे तुमच्याशी त्यांची व्यावसायिक स्पर्धा नसते. त्यामुळे ह्या टप्प्यात तुम्हांला तुमच्या मुलभूत अवतारात वागणं बऱ्यापैकी शक्य असते. नंतर मात्र आयुष्य क्लिष्ट होतं जातं. कार्यालयात तुम्ही व्यावसायिक यशाच्या शिड्या झपाट्याने चढून जाण्यासाठी आजूबाजूच्या लोकांशी प्रत्यक्ष / अप्रत्यक्षरित्या स्पर्धा करीत असता. आपण ज्या कंपनीसाठी काम करतो तिच्या भल्यासाठी काम करणे हे आपल्या सर्वांचे समान ध्येय असलं तरी त्यात स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याच्या अनेक संधी उपलब्ध असतात. मेहनत करून ध्येय साध्य करणे आणि त्याचबरोबर आपण हे काम केलं हे योग्य लोकांच्या लक्षात आणून देणं ह्या दोन पातळीवर आपण मेहनत घेत असतो. आता एखादे लक्षवेधी काम कोणी किती प्रमाणात केलं आणि त्याचं श्रेय वाटप त्या योग्य प्रमाणात झालं की नाही हे अगदी अचूकपणे कोणीच ठरवू शकत नाही. आणि मग मानवी भावनांचे कधी सुप्त तर कधी उघडपणे प्रकटीकरण होण्यास सुरुवात होते. आणि मग अशा वेळी Politically correct वागणं महत्त्वाचं ठरतं. एखादा माणूस अगदी फार मोठ्या प्रमाणात धूर्तपणा करत आहे हे माहित असून सुद्धा त्याच्याशी किमान व्यावसायिक संबंध टिकवणं ही आपली बऱ्याच वेळा गरज असते. एखादी खूप मेहनत करून मिळवलेली नोकरी आपण करत असतो कारण ती आपल्याला आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठी लागणारा वित्त पुरवठा करत असते. एखादा व्यवसाय आपण एका परिचिताबरोबर भरभराटीला आणला असतो आणि मग यशाच्या एका टप्प्यावर आपले त्याच्याशी मतभेद होतात. पण अगदी त्याच क्षणी टोकाची भुमिका घेत एक घाव दोन तुकडे करणे शक्य नसते. प्रिती झिंटा आणि नस वाडियाचे पहा ना!
Politically Correct च्या अनेक छटा आहेत जसे की सुज्ञता, मुत्सद्दीपणा, , व्यावहारिकपणा अथवा धूर्तपणा!! ह्यात लबाडीचे प्रमाण डावीकडून उजवीकडे हळूहळू वाढत जाते. ह्याची व्याख्या अचूक शब्दात पकडता येणं कठीण! तरी प्रयत्न करायला हरकत नाही. 

Politically Correct - एखाद्या प्रसंगी आपल्या मनात निर्माण होणाऱ्या भावनांना त्यांच्या मुळ स्वरुपात कृती अथवा उक्तीद्वारे उतरविण्याआधी दीर्घकालीन परिणामांचा, bigger picture चा विचार करून त्या भावनांना अल्प ते विस्तृत प्रमाणात बदलून मगच कृती / उक्ती करणे ह्याला Politically Correct असे म्हणता येईल. 

काही लोक थेट नोकरी करीत नाहीत. ते सामाजिक जीवनात वावरून अथवा स्वतःच्या व्यवसायाद्वारे अर्थाजन करीत असतात. सामाजिक जीवनातील त्यांची प्रतिमा ही त्यांच्यासाठी फार मोठी बाब असते. मग ते सतत Politically Correct राहायचा प्रयत्न करतात आणि काहीवेळा मग हा प्रयत्न बेगडीपणाचे, नाटकीपणाचे रूप प्राप्त करतो. Politically Correct ही गोष्ट तुम्ही सतत वापरू शकत नाहीत. ह्या गोष्टीत तुम्ही तुमचा मूळ निर्णय काही काळापुरता विलंबित ठेवत असता, आणि त्यामुळे तुमच्यात काहीशी बेचैनी असते. मग होतं काय की तुम्ही काही काळाने आपल्या उक्तीशी विसंगत अशी कृती करता किंवा निर्णयच घ्यायचे प्रदीर्घ काळापर्यंत टाळता. आणि मग लोकांच्या ही गोष्ट लक्षात 
येते. अजून एक गोष्ट तुमची मुलं, तुमचा जीवनसाथी तुम्हांला अगदी जवळून न्याहाळत असतो / असतात. तुमचे हे बाह्यजगतातील बेगडी रूप सर्वप्रथम त्यांच्या लक्षात येतं. 
Politically Correctness at the cost of what? ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला स्वतःशीच द्यायचं असतं. 

आता दुसरा टोकाचा प्रकार! ह्या माणसांना Politically Correctness हा प्रकार अजिबात झेपत नाही. ज्या व्यक्तीशी पटत नाही त्याला ते अगदी तोंडावर बोलून मोकळे होतात. एखादी भल्या मोठ्या लठ्ठ पगाराची नोकरी तिथल्या काही लोकांशी पटत नाही म्हणून सोडून ते मोकळे होतात. जोवर आपण आपले एकटेच असतो तोवर हा प्रकार ठीक असतो पण ज्या क्षणी तुम्ही एका कुटुंबाचे घटक असता, तुमच्यावर आर्थिक जबाबदाऱ्या असतात तेव्हा तुम्हांला तुमचे हे मूळ रूप कायम ठेवून चालत नाही. काळ बदलत चालला आहे. जरी तुमच्या स्वभावात मुत्सद्दीपणा मूलतः नसेल तरी दीर्घकालीन परिणामांच्या दृष्टीने एका किमान पातळीपर्यंत तरी हा गुणधर्म तुम्हांला विकसित करता यायला हवा. अगदी ते ही जमत नसेल तरी चिंता करायचं काम नाही. शेवटी It's your life!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...