मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, २० नोव्हेंबर, २०१४

दुरावा - १३


 

इवा आपल्याच विचारात गुंतली होती. मध्येच हवाई सुंदरीने तिला शीतपेयाविषयी विचारलं. विचाराच्या गुंत्यात अडकलेल्या इवाने वेळ घालवायला म्हणून एक शीतपेय घेतलं सुद्धा! मन अजूनही त्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या काळात गुंतलं होतं. 
आईने सर्जीच्या घरी विचारलं हे तिला ज्या दिवशी कळलं तो दिवस तिचा बराच दुःखातच गेला. पण जसजसा दिवस पुढे गेला तसतसं तिनं स्वतःवर नियंत्रण मिळवत आणलं. ती तीन चार दिवसाच्या सुट्टीसाठी गावी आली होती. 
मग दुसऱ्या दिवशी ती फिरायला म्हणून बाहेर पडली तर अचानक आंद्रेई तिच्या बाजूला आपली जीप घेऊन आला. 
"हाय, इवा कशी आहेस?" आंद्रेई म्हणाला. 
"मी ठीक आहे, तू कसा आहेस?" इवाने हसून प्रत्युत्तर दिलं. 
"आज तुला वेळ असेल तर आपण जेवायला बाहेर जाऊयात का?" 
आंद्रेईच्या ह्या प्रश्नाचं तिला आश्चर्य वाटलं. गाव होतं लहान आणि त्यात केवळ एक दोन हॉटेलच होती. आणि तिथं एकत्र जेवायला गेल्यास गावातले सर्व लोक पाहणार हे तर नक्कीच होतं. काही न बोलता दोघं चालत राहिली. इवाच्या डोक्यात विचारचक्र चालूच होते. ह्याला ह्याची आई सर्जीविषयी बोललीच असणार. आणि बहुदा ह्याच्या आशा आता पुन्हा पल्लवित झाल्या असणार. आणि हा मुद्दाम आपल्याला गावातील सर्व लोक पाहतील अशा ठिकाणी एकत्र जेवायला बोलावतो आहे. म्हणजे जवळजवळ हे आपल्याला विचारण्यासारखंच आहे. पण नाहीतरी जर सर्जी आपल्याशी लग्नाला तयार नसेल तर मग काय दुसरा कोणीही चालेल. आणि तसं बघायला गेलं तर आंद्रेई स्वभावाला आहे तसा चांगला, आणि दोन्ही कुटुंब राहतील आनंदात!
"ठीक आहे, संध्याकाळी सात वाजता तू मला घरी घ्यायला ये!" इवा शांतपणे म्हणाली. आंद्रेईच्या चेहऱ्यावरील आनंदाचे भाव तिला अजूनही चाळीस वर्षानंतर पक्के आठवत होते. 
सायंकाळी इवा बऱ्यापैकी चांगली तयार होऊन तयार राहिली. मग आंद्रेई सुद्धा चांगले ठेवणीतले कपडे घालून आला. गावातल्या त्या छोट्या हॉटेलात दोघे एकत्र शिरले तेव्हा सर्वांच्या नजरा त्या दोघांवरच खिळल्या होत्या. 
जेवण तसं साधंच होतं. 
"आंद्रेई, तू मला लग्नासाठी विचारायचं मनात ठेऊन आहेस का?" इवाच्या ह्या अचानक आलेल्या प्रश्नाने आंद्रेईला एक भला मोठा ठसका लागला. तो पीत असलेला सूप त्याच्या शर्टावर काहीसा उडला देखील! 
"अं म्हणजे, तसं म्हणजे…" आंद्रेईला शब्द अगदी सुचत नव्हते. 
"आंद्रेई बघ आपण आता दोघेही जाणते आहोत! मला सर्जी आवडायचा, अजून आवडतो आणि बहुतेक आयुष्यभर आवडत राहील! काही कारणांमुळे, जी मला पूर्णपणे जाणून घेता आली नाहीत आमचं लग्न होत नाहीये! तू एक सज्जन गृहस्थ आहेस आणि प्रेमळही आहेस! मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे! आणि मी आयुष्यभर तुझा संसार सुखाने करीन! पण अधून मधून मला सर्जीची आठवण आली आणि मी दुःखी झाली तर तू मला तितका काळ समजून घ्यायचंस!" एका दमात इवाने आपल्या आयुष्याला कलाटणी देणारे भाषण दिलं होतं. 
आंद्रेईला हे सारं अनपेक्षित होतं. इवाचा भूतकाळ त्याला माहितच होता. पण तिच्या भविष्यकाळातील मानसिक स्थितीविषयीच्या रोखठोक वक्तव्याने तो पूर्णपणे हबकून गेला. 
"मला विचार करण्यासाठी एक दोन दिवसाचा वेळ दे!" शर्टवरील खूप प्रयत्न करून सुद्धा न जाणाऱ्या डागांकडे बघता बघता तो म्हणाला. इवाला त्याचं हे वाक्य खूप आवडलं. तो अगदी उतावळ्या नवऱ्याप्रमाणे हो म्हणाला असता तर तिला ते आवडलं नसतं. 
पुढे दोन दिवसांनी अपेक्षेनुसार त्यानं हो म्हटलं. आणि पुढे दोन महिन्यात लग्नसुद्धा झालं. इवाने कझान मधील नोकरी एव्हाना सोडून दिली होती. 

विमान मॉस्कोला उतरलं. इतक्या वर्षांनी मायदेशी परतल्यानंतर तिला सारं काही बदलल्यासारखं वाटत होतं. कझानला जायची बस नशिबाने तिला पटकन मिळाली. कझानला पोहोचल्यावर मारियाचं घर शोधताना इवाची थोडी धांदलच उडाली. शेवटी नशिबाने तिला घर मिळालं. घरची बेल तिने वाजवली. मारियाच्या मुलानेच दरवाजा उघडला. आपण येत आहोत ह्याची इवाने अजिबात पूर्वसूचना न दिल्याने मारियाचा मुलगा इवाने आपला परिचय करून देताच अगदी हबकून गेला. क्षणभरात सावरून मग त्याने तिला घरात घेतलं. मारियाला झोप लागली होती. त्यामुळे इवाने ताजेतवाने होणे पसंत केलं. घर बऱ्यापैकी मोठं असल्याने इवासाठी एक स्वतंत्र खोली द्यायला जमून गेलं. 

इवानेही मग काही वेळ पडून राहणं पसंत केलं. जरावेळ डोळाच लागला तिचा! मग अचानक जाग आली तर तिच्या बाजूला बिछान्यावर मारिया बसली होती. अगदी कृश झाली होती तिची सखी मारिया! किती वेळ इवा जागी होण्याची ती वाट पाहत होती कोण जाणे! इवा जागी होताच तिने इवाला घट्ट मिठी मारली! दोघींच्याही डोळ्यात बराच वेळ अश्रू वाहत राहिले होते. 

"तू अशी आम्हां सर्वांना सोडून का गेलीस बरं? आणि ते ही अजिबात कोठे गेलीस तेही न सांगता!" मारिया म्हणाली. 
"आंद्रेईला नंतर नंतर ह्या वातावरणापासून दूर जायचं असं वाटायला लागलं!" इवा म्हणाली. 
इतक्यात मारियाची सून आत आली. 
"मारिया, तुम्ही आता तुमच्या बिछान्यावर पडून राहावं हेच बरं! डॉक्टरांनी इतका वेळ बोलायला आणि बसून राहायला तुम्हांला बंद केलं आहे!" ती म्हणाली. 
"इतक्या वर्षांनी जिवलग मैत्रीण भेटल्यावर डॉक्टरचा सल्ला ऐकायला मी थोडीच बसणार आहे!" मारियाने तिचा सल्ला साफ धूडकावून लावला. 
सुनेने मग इवाकडे पाहिलं. 
"ठीक आहे, मारिया मीच तुझ्या खोलीत येते!" इवाने सुवर्णमध्य काढला. 
मारियाच्या खोलीत गेल्यावर इवाने तिला बिछान्यावर झोपवलं. तिचा स्वेटर सारखा केला. हातमोजे, पायमोजे चढवले. अशी जय्यत तयारी करून दोघी जिवलग मैत्रिणी गप्पा मारायला सज्ज झाल्या. 
"मला अधूनमधून सर्जीची आठवण यायची ते बहुदा त्याला खपलं नसावं, म्हणून कशीबशी तिथे नोकरी शोधून त्याने मला पोलंडला नेलं" इवाने आपली कहाणी सुरु केली. 
अचानक सर्जीचा उल्लेख होताच मारियाच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. इवाच्याही ते लक्षात आले. 
"तू आंद्रेईला सर्जीविषयी सांगितलं होतंस?" मारियाने अगदी आश्चर्यचकित होऊन तिला विचारलं. 
"हो त्याला नाहीतरी आधीपासून सर्व माहीतच होतं आणि मी सुद्धा लग्नाआधी सगळं स्पष्ट केलं होतं!" इवा म्हणाली. 
"पण मग मला कधी कधी सर्जीची आठवण यायची ते मग आंद्रेईच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं." इवा म्हणाली. 
"मग कधीतरी एकदा मलाच त्याची बाजू पटली! आणि मग मीच त्याच्या  पोलंडला स्थलांतरित होण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं!" इवा म्हणाली. 
"सर्जीने तुला कधी पुन्हा संपर्क नाही केला? " मारियाने अगदी केविलवाण्या आवाजात विचारलं. 
"त्याने बराच प्रयत्न केला. फोनही केले! पण एकदा आंद्रेईशी लग्न करायचा निर्णय घेतल्यावर मी मात्र त्याच्याशी संपर्क ठेवणे योग्य समजलं नाही! त्याला त्याची नोकरी इतकी प्रिय होती ना! खरं प्रेम असतं तर सगळं काही सोडून तो कझानला परत नसता का आला!" इवाच्या डोळ्यात इतक्या वर्षांनी सुद्धा पाणी आलं. 
"तो सगळं काही सोडून परत आला होता इवा! आणि त्याने तुला संपर्कही करायचा प्रयत्न केला होता!" हुदंके देत देत मारिया म्हणाली. 
"काय सांगतेस काय तू मारिया!" इवाला आयुष्यातील हा सर्वात मोठा धक्का बसला होता. 
"तुझ्या एंगेजमेंटच्या दिवशी तो त्या हॉलवर आला होता. तू तयारी करीत होतीस आणि तो तुझ्या आई वडिलांना भेटला. माझ्या प्रेमाशी खेळू नकास अशी त्याने अगदी भीक घातली. तो अजिबात ऐकेनाच तेव्हा आईवडिलांनी माझी मदत मागितली. आणि … इवा तू मला ह्या बद्दल कधी माफ करणार नाहीस. पण मी त्याला खोटं सांगितलं की तू त्याला विसरलीस म्हणून! इथवर सांगितलं की तुझ्या मनात आता त्याच्याविषयी फक्त राग आहे, फसवणुकीची भावना आहे! हे ऐकल्यावर मात्र तो एक क्षणभरही तिथं थांबला नाही! मी तुझी खूप मोठी गुन्हेगार आहे!" हमसाहमशी रडत मारिया म्हणाली. आपल्या कुशीत आलेल्या आपल्या जिवलग मैत्रिणीविषयी इवाच्या मनात ह्या क्षणी कोणते भाव होते हे तीही सांगू शकत नव्हती!

(क्रमशः)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...