मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, ३० नोव्हेंबर, २०१४

रम्य ते बालपण - १



 
बालपण बहुतेक सर्वांना आवडतं. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या बहुतेकांना हे भावतं. पूर्वी तर हे खूपच सुंदर असायचं. वसईसारख्या गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि एकत्र कुटुंबात वाढलेल्या माझ्यासारख्याला तर हे खूपच सुंदर वाटायचं. जबाबदाऱ्या बहुदा नसायच्याच आणि असल्या तरी जीवनातल्या जबाबदाऱ्या काय असतात ह्याची जाणीव नसायची. त्यामुळे आयुष्य अगदी सुखाने भरलेलं वाटायचं.
प्रत्येकाला किती वर्षापासूनच्या आठवणी लक्षात राहतात हे नक्की माहित नाही. मलाही चार ते पाच वर्षापासूनच्या काही आठवणी अंधुकशा आठवतात. माझा जन्म १९७२ सालचा, मी जन्मलो त्या वर्षीच फेब्रुवारीत माझे आजोबा श्री. पांडुरंग पाटील निवर्तले. त्यामुळे त्यांच्या सहवासाचं भाग्य काही मला लाभलं नाही. त्यांना चार पुत्र आणि तीन कन्या. माझी आजी ही वसईच्याच घरत कुटुंबातली. तिचं माहेर होळीवर.
माझी धाकटी आत्या वत्सला (हे तिचं माहेरचं नाव!) लग्न वसईच्या घरीच झालं. हे घराच्या हॉलमध्ये लागलं. हे लग्न १९७५ साली झालं. हे लग्न हॉलमध्ये लागताना पाहिल्याचा मला भास होतोय. भास अशासाठी की तीन वर्षाचा असतानाची आठवण लक्षात राहण्याची शक्यता कमीच! बहुदा ह्या लग्नाचे जुने फोटो एकदा पाहून त्यानंतर मला स्वप्न वगैरे पडलं असेल आणि त्यामुळे ही आठवण माझीच असावी असा मला भास होत असावा.

हे घर बांधलं आजोबांनी १९५२ साली! त्यावेळी ते एक मजली होतं. घरात एक मोठा हॉल, चार खोल्या, एक पंगतीची खोली आणि एक स्वयंपाकघर होतं.  मला कळायला लागलं तेव्हा चौघाही भावांची लग्न झाली होती. आणि धाकट्या काकांनी म्हणजे दाजींनी वरती गच्चीवर त्यांच्यासाठी खोली बनवली होती. चार खोल्यातली एक खोली म्हणजे देवाची खोली त्यात देवघर आणि आजीचं वास्तव्य असे. ह्या खोलीत आजीची खाट असे. आजीच्या खाटेखाली काही महत्वाच्या गोष्टींचा साठा असे. 

माझी चुलतबहिण योगिता ही माझ्यापेक्षा आठ महिन्यांनी मोठी, पण शाळेत ती माझ्यापेक्षा एक वर्षे पुढे होती. तिची पहिली चालू असताना मला बालवाडीत टाकण्यात आलं.  बालवाडीचा वर्ग आमच्या शाळेच्या वाचनालयात त्या काळी भरत असे. सुरुवातीला शाळा हा प्रकार मला फारसा आवडत नसे. मी बराच वेळ शाळा सुटायची वाट पाहत असे. अशा वेळी मध्येच माझ्या धाकट्या काकू नंदिनी (दादी) आपल्या सहशिक्षिका मांजरेकर मॅडम बरोबर मला भेट देऊन जात. आणि त्यामुळे माझा मूड चांगला व्हायला मदत होत असे. भेंड्याची भाजी त्याकाळी मला आवडत नसे आणि त्यामुळे ती डब्यात असली की मला खूप कंटाळा येई.
घरी एकत्र कुटुंबात खूप धमाल असे. आजी आपल्या चारही सुनांवर बारीक लक्ष ठेऊन असे. ह्यातील दोन सुना म्हणजे माझी आई आणि दादी ह्या शिक्षिका होत्या, तर मोठी आई आणि प्रतिभाकाकी ह्या पूर्ण वेळ गृहिणींचे काम करीत. एकत्र स्वयंपाक करायचा म्हणजे कसरतीचे काम असे. सकाळी वाडीतला बाजार काढला जाई आणि मोठीआई, काकी बाजार विकायला जात असत. त्यावेळी पानवेलीचा बाजार मोठ्या प्रमाणात काढला जाई. मोठे काका अण्णा (मधुकर पाटील) ह्या पानवेलीचा व्यापार करणाऱ्या सोसायटीचे सभासद होते. ही पान उत्तर भारतात, गुजरातेत विक्रीसाठी जात आणि मग वर्षातून एक दोन वेळा अण्णा ह्या पानाच्या वसुलीसाठी गुजराथेत, उत्तर भारतात ट्रेनने जात. हा त्यांचा दौरा आठ आठ किंवा कधी कधी पंधरा दिवसापर्यंत चाले. त्याकाळात फोनचा वापर फार कमी असल्याने आणि अण्णांकडून पत्र वगैरे लिहिण्याची अपेक्षा बाळगता येत नसल्याने इतके दिवस केवळ फक्त त्यांची वाट बघण्याशिवाय मोठीआईकडे आणि आम्हा सर्वांकडे पर्याय नसे. मग अचानक अण्णा एखाद्या सकाळी परतत. येताना ते बरीच मिठाई वगैरे घेऊन येत असल्याने आम्हां मुलांची खूप मजा होई. पानवेलीची वाडी करणे हा फार कौशल्याचा प्रकार असे. असे म्हणण्याचं कारण की आता आमच्या वाडीतील पानवेली गायब झाल्या आहेत. पानवेलीची वेल बारीक कारवीच्या सहाय्याने उभी केली जात असे. दोन पानवेलीला आधार देणाऱ्या कारवीमध्ये विशिष्ट अंतर ठेवले जाई. ह्या वेलींना थेट सूर्यप्रकाशाचा मारा सहन न होत असल्याने त्या वेलींमध्ये केळी वगैरे लावण्याची प्रथा असे. 
हल्ली एकंदरीत वसईत पानवेली फार दुर्मिळ होत चालल्या आहेत. वसईतील माझे मित्र श्री. संदेश वर्तक ह्यांच्या सौजन्याने मिळालेली पानवेलीची काही छायाचित्रे!





ह्या वेलींची वारंवार खूप काळजी घ्यावी लागते. उंच झालेल्या आणि कारवीपलीकडे पोहोचलेल्या वेलींना खाली आणणे, त्यांच्या नाजूक खोडाला घट्ट कारवीला बांधून ठेवणे, काही काळाने नवीन वेली आणून लावणे असले कौशल्याचे प्रकार करावे लागत. ही कामे कोणी ऐरा गैरा माणूस करू शकत नसे. त्यासाठी कुशल कामगारांचा संघ लागे. ह्या कुशल कामगारांना वसईच्या भाषेत गो असे म्हणत. ह्या गो मंडळींचा खूप मान ठेवावा लागे. त्यांना सकाळी न्याहारीला होळीवरून जिलेबी, बटाटवडे आणि घरचा चहा द्यावा लागे. हा चहा एका मोठ्या तांब्यातून वाडीत पाठवला जाई आणि मग हे गो लोक केळीच्या पानातून (खोल्यातून) हा चहा पीत. ह्या गो लोकांची न्याहारी वाडीत पोहोचविण्यासाठी बहुदा आमची नेमणूक केली जात असे. ह्या वेलीमध्ये अळू, पालेभाज्या ह्यांची लागवड केली जाई. ह्या वेलीत लावलेली माठ भाजी अगदी ताजी आणि मस्त लागे. का कोणास ठाऊक पण ह्या भाजीस सिनेमातील भाजी असे माझे वडील म्हणत. बहुदा अरुण सरनाईक आणि जयश्री गडकरच्या काळातील मराठी चित्रपटात बायको नवऱ्याला भाजी वाढतानाचे जे दृश्य असे त्या भाजीशी त्यांना माठ भाजीचे साधर्म्य वाटत असावे.
ही पाने वाडीत काम करणाऱ्या कामगार स्त्रिया खुडून घरी आणत. मग रात्री जेवण आटपली की महिला वर्ग ती व्यवस्थित जोडून त्याची कातळ करून ठेवायला बसे. पानाचे दोन प्रकार असत, मोडवण आणि बिबला. छोट्या पानांना मोडवण आणि मोठ्या आकाराच्या पानांना बिबला म्हणत! दुसऱ्या दिवसाला ह्या पानाच्या पाटीला काय भाव मिळणार ह्याची उत्सुकता ह्या पाने करणाऱ्या बायांना असे.

आमच्या घराजवळ एक वाडी आहे आणि दुसरी वाडी थोडी दूर आहे. ह्या दूरच्या वाडीला मसूरवाडी असे म्हटलं जातं. ह्या मसूरवाडीतील सिंचनासाठी वापरली जाणारी विहीर गावातील मुलांमध्ये खूप प्रसिद्ध होती. ह्या विहिरीचे हे चित्र!

मे महिन्यात मुले ह्या विहिरीत पोहायला येत. पहिल्या एक दोन दिवशी त्यांच्या पाठीला डबा बांधून त्यांना विहिरीत सोडलं जाई. नंतर मात्र थेट विहिरीच्या वरच्या पायरीवरून त्यांना पाण्यात ढकललं जाई. एकदा का नाका तोंडात पाणी गेलं की पोरगं आपसूकच पोहायला शिके आणि मग नव्या येणाऱ्या मुलांना विहिरीत ढकलायला तयार होई.

आमच्या पाटील कुटुंबाच्या मूळ घराच्या बाजूला मसूरवाडी आहे. ह्या मूळ घराला आम्ही जुनं घर असेही म्हणतो. ह्या जुन्या घरी कुटुंबाचे गणपती बसतात. इथे जाताना एक पाण्याचा ओहोळ लागतो. त्याला बोली भाषेत वळ असे म्हणतात. हा वळ आमच्या घराशेजारील तळ्याला (बावखल) वसईच्या खाडीला जोडतो. ह्या वळात साधारणतः डिसेंबर जानेवारीपर्यंत पाणी असते. पूर्वी ह्या वळातील पाणी एकदम शुद्ध असे. आणि आम्ही गणपतीला जाण्यासाठी ह्या पाण्यातून बिनधास्त जात असू. लहानपणी गणपतीची आठवडाभर सुट्टी असल्याने आम्ही बऱ्याच वेळ जुन्याघरी गणपतीत जात असू. अगदी रात्रीच्या आरतीला सुद्धा! मग रात्री अंधारातून'ह्या वळातून येताना बऱ्यापैकी भिती वाटे. ह्या रस्त्याच्या बाजूच्या झाडीचे दिवसाचे चित्र!



पहिली दुसरीपर्यंत आमच्या घरात सर्वजण एकत्र जेवण करीत. मग एकदा कधीतरी चार भावांनी वेगळा स्वयंपाक करण्याचे ठरविलं. त्यावेळी आम्हा सर्व लहान मुलांना खूप दुःख झालं होतं.

त्याकाळी मे महिन्यात आम्ही मुले वाडीत खूप खेळत असू. दगड का माती, लपालपी, विटी दांडू आणि गोट्या, क्रिकेट असले खेळ चालू असत. पकडापकडी खेळताना वाडीत लपायला बरे जाई. आमच्या घराच्या बाजूलाच बेडे होते. ह्या बेड्यातील चुलीवर पूर्वी स्वयंपाक केला जाई. पूर्वी आमच्या कुटुंबाची भाताची शेती वालीव ह्या ठिकाणी होती. सुगीच्या दिवसानंतर आलेला तांदूळ साठविण्यासाठी ह्या बेड्यात कणगे होते.



ह्या बेड्याच्या माळ्यावर लाकडे वगैरे साठवलेली असत. लपालपी खेळताना ह्या माळ्यावर आणि पानवेलीत लपायला चांगली जागा मिळे. बेड्याच्या माळ्यावर जायला शिडीवरून चढून जायला लागे. बऱ्याच वेळा ह्या शिडीच्या मधल्या पायऱ्या तुटलेल्या असत त्यामुळे बरीच कसरत करावी लागे.

दोन नंबरची आत्या इंदिरा (जिजी) मालाडला राहते. अनाघाअक्का आणि अभिजीत ही तिची मुले. अभिजीतला लहानपणी वसई खूप आवडायचे. वसई ढकलत मालाडला नेली पाहिजे असे तो म्हणायचा. त्याला भिती हा प्रकार माहीत नव्हता. कोंबड्यांची खुराडी त्यावेळी मोठी असत. त्यात शिरून आतून दरवाजा बंद करून तो कोंबड्यांना घाबरवायचा. बिचाऱ्या कोंबड्या भितीने कलकलाट करायच्या. मग आजी घरातून ओरडायची. मग नाईलाजाने अभिजीतला बाहेर यावं लागे. मे महिन्यात उद्योग कमी असल्याने आम्ही मग बरेच खटाटोप करत असू. करवंटीत पाणी घेऊन त्यात जास्वंदीची फुले पिळून काढून त्यापासून तेलसदृश्य द्रवाची निर्मिती करणे, कैऱ्या पाडून त्याचे पन्हे करणे अशा प्रकारांचा समावेश होई. पन्हे करण्याच्या उद्योगात साखर आवश्यक असल्याने आम्ही काहीसे पेचात पडू. मग मोठीआई आजीची करडी नजर चुकवून एकतर घरातील साखर काढून देई किंवा दोन तीन रुपये देऊन सोसायटीमध्ये साखर आणायला पाठवे.

संध्याकाळी कोंबड्या खुराड्यात झाकणे हा एक मोठा उद्योग असे. खट्याळ कोंबड्या जांभळाच्या आणि आंब्याच्या झाडावर चढून बसत. मग दगडे मारून, काठी फेकून वगैरे त्यांना खाली आणावे लागे. एकाच खुराड्यात अनेक कोंबड्या असत, त्यातील काही कोंबडे / कोंबड्या दादागिरी करून बाकीच्या कोंबड्यांचे हाल करीत. अशा दादागिरी करणाऱ्या कोंबड्यांना काठीने मारून आम्ही वठणीवर आणण्याचा अयशस्वी प्रयत्न करत असू. कोंबड्या अंडी घालत. शिस्तीतल्या कोंबड्या खुराड्यात वेळच्या वेळी अंडी घालत आणि कलकलाट करीत. मग त्यांना सोडण्यात येई. काही कोंबड्या अगदी मुक्त संस्कृतीतील असत. त्या खुराड्यात अजिबात अंडी घालत नसत. मग मोकळ्या सुटल्यावर गोठ्याच्या वरच्या भागात पेंढा वगैरे ठेवला असे तिथे अंडी घालत. बहुदा ही वेळ दुपारची असे. मग त्यांच्या कलकलाटाने झोपलेली आजी उठे. चार सुनांपैकी जी कोणी पहिली नजरेस पडेल तिला अंडे आणण्यासाठी पाठवे. ती सून मनातल्या मनात नाखूष होत नाईलाजाने अंडे आणायला जाई.

वर्षातील काही काळात मोठीआई एखाद्या कोंबडीला अंड्यावर बसवे. बेड्यात एका टोपल्यात पेंढा वगैरे ठेवून त्यात ही गावठी अंडी त्या कोंबडीला दिली जात. साधारणतः एकवीस दिवसांनी पिल्ले बाहेर येत. सुरुवातीला कोंबडीला ह्या अंड्याविषयी इतकीच आत्मीयता नसे पण कालांतराने त्या फक्त पाणी पिण्यासाठी आणि दाणे खाण्यासाठी अगदी थोडा वेळ बाहेर पडत. पिल्ले बाहेर आली की मग अजून कसरतीचा काळ सुरु होई. त्यांना नेहमीच्या खुराड्यात ठेऊन फायदा नसे कारण तिथल्या भोकातून ही खट्याळ पिल्ले बाहेर येऊ शकत असत. त्यांना बहुदा सुरुवातीला टोपल्यातच ठेवलं जाई. मग चार पाच दिवसांनी कोंबडीचा एक पाय दोरीने बांधून तिच्यासोबत ह्या सर्वांना बाहेर सोडलं जाई. कोंबडी मग ह्या सर्वांना दाणे शोधण्याचं आणि खाण्याचं प्रशिक्षण देई. तिला गांडूळ वगैरे मिळाले की घशातून एक वेगळाच आवाज काढून ती ह्या सर्व पिल्लांना बोलवे. असा आवाज आला की सर्व पिल्लं मग आपले उद्योग सोडून तिच्याकडे पळत येत. मग त्यांची ह्या खाद्यासाठी खूप मारामारी होई. आकाशात कावळे मंडळी ह्या पिल्लांवर लक्ष ठेऊन असत.एखादं खट्याळ पिल्लू कोंबडीपासून बरंच लांब गेलं आणि आम्ही पहारेकरी बच्चेमंडळी समजा तिथे नसू तर एकदम झेप घेऊन मग तो कावळा पिल्लाला उचलून नेई. पुन्हा मग एकदा कोंबडीचा कलकलाट होई. समजा कोंबडीला वीस अंडी देऊन बसविली असेल तर त्यातून १२ - १४ पिल्लं बाहेर येत. ह्या एकवीस दिवसांच्या कालावधीत ढगांचा गडगडाट झाल्यास ती गोष्ट अंड्यातील जीवाच्या दृष्टीने चांगली नसे. माझ्या लहानपणी (पहिलीत असताना!) मला एक राखाडी कोंबडी आवडायची. पण ती अचानक गायब झाली. ती बावलाने वगैरे पळविली असा समज करून मी आणि आम्ही सर्व खूप दुःखी झालो. पण अचानक एके दिवशी यशवंतकाका (आमच्या वाडीत काम करणारे) ह्यांना गोठ्याच्या वरती रचलेल्या पेंढ्याच्या राशीतून पिल्लांचा आवाज आला. मग अधिक शोध घेता पेंढ्यात माझी आवडती कोंबडी आपल्या दोन पिल्लांसहित सापडली. त्यावेळी मला कोण आनंद होऊन माझ्या डोळ्यातून पाणी आलं होतं.

ह्या कोंबड्यांच्या शत्रुमध्ये बाउल हा प्राणी वरच्या स्थानावर गणला जाई. हा मांजर वर्गातील प्राणी. काही आक्रमक मांजरांचे बाऊल मध्ये रुपांतर होते अशी माझी लहानपणी समजूत होती आणि अजून तशीच आहे. तर हे बाऊल कोंबडी आणि त्यांच्या पिल्लांना पळवून नेत. एकदा अशाच एका बावलाने खूप कहर केला होता. त्याने पाच सहा कोंबड्यांचा फडशा पाडल्यावर आजीने बैठक बोलावली. आणि मग वाडीत काम करणारी गडी मंडळी आणि अजून काहीजण असे मिळून ह्या बावलाचा नायनाट करण्याचे ठरविण्यात आले. एके दिवशी यशवंतकाकाने हा बाऊल गोठ्याच्या वरच्या भागातील पेंढ्यात लपल्याची खात्रीची खबर आणताच ह्या सर्व मंडळींना बोलावण्यात आले. सर्व मंडळीनी मिळून गोठ्याला वेढा घातला. प्रत्येकाच्या हातात काठी किंवा वाडीत काम करण्यासाठी हत्यार वगैरे होते. या मोहिमेत भाग घेण्याची आमची तीव्र इच्छा असून देखील आम्हांला त्यासाठी योग्य नसल्याचे समजण्यात आले होते. पण खिडकीतून हे सारे पाहण्यात सुद्धा केवढा आनंद आहे हे आम्हांला समजून चुकलं होतं. मंडळींनी चोहो बाजूंनी आवाज करण्यात सुरुवात केली. बहुदा बाऊल भेदरला असावा. काही कोंबड्या खाल्ल्या तर त्याचा ह्या मंडळींनी इतका बाऊ का करावा हे त्याला बहुदा समजले नसावे. 
हा तज्ञ मंडळीनी त्या बावलाला एका कोपऱ्यात घेरले. आम्ही अगदी डोळे मोठे करून हे सारे पाहत होतो. आणि अचानक तो बाऊल रुपजी काकासमोर आला. अचानक आलेल्या बावलाच्या दर्शनाने चकित झालेल्या रुपजीकाकाने आपल्या हातातील हत्यार त्याच्या अंगावर मारण्याआधीच उडी मारून तो बाऊल गायब झाला. खिडकीतून हे सारे पाहत असलेल्या आजीने रुपजीकाकाचा उद्धार केला. हे प्रकरण जीवावर बेतलले पाहून मग बिचाऱ्या बावलाने आमच्या कोंबड्याकडे नंतर आपली वक्रदृष्टी फिरवली नाही.

गोठयामध्ये बऱ्याच गाई आणि बैलही असत. त्यांच्यासाठी वर्षभराचा पेंढा आणून ठेवावा लागे. ह्यात आमचे काका जगदीश (ज्यांना आम्ही बाबा असे संबोधित असू) हे पुढाकार घेत असत. वालीवच्या शेतावरून किंवा मग विकत घेऊन ते लॉरीत टाकून घरी आणत असत. ही लॉरी गल्लीच्या निमुळत्या रस्त्यातून कशीबशी अंगणात पोहोचे. ह्या लॉरीत पेंढा अगदी तिच्या उंचीच्या दीडपट प्रमाणात भरलेला असे. त्यामुळे क्वचितच वरच्या विजांच्या तारांना चुकवून आणण्याची सुद्धा कसरत लॉरीवाल्याला करावी लागे. अशा प्रकारे आडव्या आणि उभ्या अशा दोन्ही पातळीवरून कसरत करून मग पेंढा अंगणात पोहोचे. मग त्यातील कामगार हा पेंढा पटापट अंगणात फेकून टाकत. त्यावेळी पेंढ्यातून त्याचा बराच हलका भाग (नक्की शब्द आता आठवत नाही) घरात शिरण्याची शक्यता निर्माण होई. अशा वेळी घराच्या सर्व खिडक्या झटापट बंद कराव्या लागत.

मग पुढे दोन तीन दिवस हा पेंढा व्यवस्थित एकावर एक लावून ठेवण्यासाठी कामगार मंडळी येत. हा पेंढा व्यवस्थित लावून ठेवला की त्याच्यावर उडी मारण्यासाठी तो लहान मुलांना अगदी आकर्षित करे. कधी एकदम खूप पेंढा आणला की मग त्याचे दोन तीन थर बनत. मग  अंगणात क्रिकेट खेळताना मुद्दाम चेंडू ह्या पेंढ्याच्या राशीवर मारला जाई. त्यावर आम्ही चढलो असता आजी किंवा मोठ्या लोकांनी पकडल्यावर मग आमची काशी होत असे.

माझे वडील कुलाब्याला भाभा अणुशक्ती केंद्रात कामाला होते. समजा गडी आला नाही तर ते ऑफिसला साडेसातला निघण्याआधी गाईचे दुध काढून जात. आणि संध्याकाळी परतल्यावर गाईला बादलीत पाणी देत आणि पेंढ्याची किंवा सुक्या गवताची एक गुंडी देत असत. समजा त्यांना उशीर झाला किंवा ते बाहेरगावी गेले की मग ही जबाबदारी आमच्यावर येई. रात्रीच्या वेळी गोठ्यात जाणे हा अगदी उत्कंठावर्धक अनुभव असे. विहिरीचे पाणी हाताने काढून बादलीत भरायच आणि मग ती बादली घेऊन गोठ्यात जायचं. खाली बसलेली गाय मग शांतपणे उठे आणि हळूहळू पाणी पीत असे. तितक्या वेळ त्या अंधारात थांबावे लागे. लहान असल्याने त्यावेळी उगाच कोठून छोटं जनावर वगैरे निघेल कि काय अशी भीती वाटे.  शुद्ध पक्ष चालू असल्यास आकाशातील चंद्र दर्शन देई. मग केव्हातरी तयार खाण्याचा प्रकार निघाला. सुग्रास, चुनी, भरडा असे प्रकार आले. गाईचे दुध काढण्याआधी त्यांना एका घमेल्यात ह्या सर्वांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून खायला दिले जाई.

गाई व्याल्या की सुरुवातीच्या दिवसातल्या चिकट दुधाचा खरवस बनवला जाई

माझी आई बोर्डीची. तिच्या वडिलांनी म्हणजे बोर्डीच्या अण्णांनी तिला एकदा म्हैस पाठवली होती. ही म्हैस अगदी धष्टपुष्ट होती.एकदा ही म्हैस तिच्या गळ्याला बांधलेली वेसण तोडून पळाली. पळाली ती पळाली आणि वर मग वाडीत दुध्याचा मांडव होता तिथे जाऊन पोहोचली. तिच्या अंगातील शक्तीला बाहेर पडण्यासाठी तिच्याकडे दुसरे काही साधन नव्हते. म्हणून तिने थेट  संपूर्ण मांडव आपल्या डोक्याने आणि शिंगाने जोरात हलवायला सुरुवात केली. संपूर्ण पाटील कुटुंब हा बाका प्रसंग अगदी प्रचंड तणावाखाली येउन पाहू लागले. तिच्या माहेरची म्हैस असल्याने माझ्या आईला अधिकच तणाव आला.  सर्व पाहणाऱ्या माझ्या मोठ्या भावाने मग प्रसंगाला आवश्यक असणारे धैर्य दाखवलं. सरळ चालत जाऊन त्याने हातात घेतलेली वेसण थेट त्या म्हशीच्या डोक्यात घुसविली आणि एका मोठ्या शूर वीराच्या थाटात गोठ्यात नेऊन बांधली. त्याच्या ह्या थोर पराक्रमावर सर्व पाटील कुटुंबीय (दुधीचा मांडव वाचल्याने) आणि खास करून आई खूप खूष झाली.



(क्रमशः)
Me Marathi!

1 टिप्पणी:

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...