अण्णांना कुत्रे बाळगायचा म्हटला तर तसा शौक होता आणि म्हटली तर ती गरजसुद्धा होती. चार्ली - ब्राऊनी ही जोडी, मोती हा कुत्रा आणि राणी ही भयंकर आक्रमक कुत्री ही अण्णांनी बाळगलेल्या श्वान मंडळीतील काही उल्लेखनीय नावे! गल्लीत चार्ली - ब्राऊनीचा दरारा होता. अंगणातून मंडळी विचारत, "अहो, कुत्र्यांना बांधलं आहे का?" आणि मगच अंगणात शिरायची हिंमत दाखवीत. अण्णा बऱ्याच वेळा मसूरवाडीत शिपायला जात. मागच्या पोस्टमध्ये दाखविलेल्या विहिरीवर पाण्याची मोटार होती. उन्हाळ्यात ह्या विहिरीचे पाणी खूप खाली जाई. ह्या विहिरीच्या पाण्यावर पाटील कुटुंबाच्या अनेक वाड्यांचे सिंचन अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्येकाचा नंबर लावला जाई. सायंकाळी अगदी काठाला गेलेली विहीरीतील पाण्याची पातळी सकाळपर्यंत तिच्यातील झऱ्यांनी बऱ्यापैकी
वर आणून ठेवलेली असे. आणि त्यात अजून विद्युतपुरवठ्याची अनिश्चितता भर घालत असे. त्यामुळे अण्णा भल्या पहाटे उठून वाडीत शिपायला जात. अशा अगदी सकाळच्या वेळी अंधारात चार्ली - ब्राऊनीची जोडगोळी अण्णांना साथ देई. वाडीत सापांचे स्थानिक प्रकार जसे की अदिलवट, दिवड वगैरे निघत. ह्या दोघांना अशा जनावरांचा लगेचच सुगावा लागे आणि मग भुंकून - भुंकून ते अशा उपद्रवी प्राण्यांना बेजार करीत आणि निघून जायला परावृत्त करीत. एकदा का वाडीत पोहोचले की ही जोडगोळी मोक्याची जागा पकडून बसून राहत. आणि अण्णांची चाहूल घेत राहत. अण्णांचे काम आटपल की "चला रे!" अशी साद घातली की ही मंडळी तडक उठून घरचा रस्ता पकडीत. ते पुढे आणि अण्णा मागे असा प्रवास चालू राही. मी लहान असताना मी सुद्धा अण्णांबरोबर वाडीत जाई. हा वाडीचा रस्ता अगदी घनदाट झाडीने व्यापलेला असे. त्यात पिवळे वेल झाडांवरून लटकत असत. ह्या वेलांमध्ये पाचपावली नावाचं खतरनाक जनावर वास्तव्य करून असतं असे भय आम्हांला दाखविण्यात येत असे. हे जनावर थेट मेंदूचा वेध घेते आणि त्यानंतर माणूस पाच पावलं टाकताच मरून जातो असे आमचे खट्याळ मोठे मित्र आम्हांला सांगत असत.आमच्या शाळेतून परत यायच्या दोन तीन रस्त्यांपैकी एक हा मसूरवाडीतून असायचा. त्यामुळे कधीकाळी ह्या रस्त्याने एकटं यायची वेळ आली की मग ह्या पाचपावलीच्या भयाने थरकाप उडे.
पहिलीची शाळा व्यवस्थित चालू होती. रोहिणी चौधरी बाई ह्या आमच्या पहिलीच्या वर्गशिक्षिका होत्या. शालेय जीवनातील आमच्या त्या आवडत्या बाई होत. बालवाडीत एकत्र असलेले राकेश आणि निलेश राऊत ह्या राऊतबंधूंना पहिल्या इयत्तेत वेगळ्या तुकडीत जावे लागल्यामुळे त्यांच्या निरागस मनांवर फार मोठा आघात झाला. पहिलीत जमिनीवरील बैठी बाके आणि सतरंजी अशी आमची बैठक व्यवस्था असे. वर्षात एकंदरीत चार परीक्षा असत, दोन घटक चाचण्या, सहामाही आणि वार्षिक परीक्षा. बाकी पहिलीचा अभ्यासक्रम वगैरे काही लक्षात नाही. पहिलीत असलेली स्मरणशक्ती स्पर्धा मात्र आठवते. एका खोलीत १० वस्तू ठेवल्या होत्या. आम्हा सर्व मुलांना तिथे नेवून २ मिनटे त्या वस्तू दाखवण्यात आल्या आणि मग परत येवून त्या वस्तूंची नावे लिहिण्यास सांगण्यात आली.
आमचे क्रिकेट वेड पहिलीपासून होते. शाळेच्या मागील बाजूस असलेल्या शिक्षक वसाहतीतील पिंगळे सरांच्या दिवाणखान्यातील दूरदर्शन संच आम्ही बाहेरून पाहत असू. त्यावेळी आलेला इंग्लंडचा संघ अजून लक्षात आहे. त्यावेळी थम्स अपच्या बाटल्यांच्या झाकणात चित्र मिळत आणि ह्या चित्रांचा एक समूह गोळा केल्यास एक छोटी पुस्तिका मिळे. अशा एका पुस्तिकेत असणारी कपिल देवची असंख्य चित्रे भराभर चाळल्यास तयार होणारी गोलंदाजीची लयबद्ध धाव अजून लक्षात आहे. वर्गातील बहुसंख्य मुले वसई गावातीलच असल्यामुळे त्या सर्वांचे पालकही एकमेकांचे ओळखीचे असत. बालवाडीतील एक दुःखद प्रसंग म्हणजे वर्गशिक्षिका न येण्याचा दिवस. त्या दिवशी पूर्ण वर्ग फोडला जावून बाकीच्या तुकड्यांमध्ये तो विभागला जाई. मधल्या सुट्टीत हे सर्व बिछाडलेले जीव एकत्र येण्याचा क्षण फारच हृदयस्पर्शी असे!
दुसऱ्या इयत्तेत बऱ्याच काळापर्यंत आम्हाला वर्गशिक्षिका नसल्याने आम्ही वर्ग फोडण्याच्या दुर्धर प्रसंगास बराच काळ सामोरे गेलो. काही काळानंतर कुंदा बाई ह्या वर्गशिक्षिका म्हणून आल्या. उंच वैद्य बाई आम्हाला विज्ञान शिकवीत. त्यांनी शिकवलेली वाऱ्याची 'हलत्या हवेला वारा म्हणतात' ही व्याख्या अजूनही माझ्या ध्यानी राहिली आहे. त्याच प्रमाणे विरारच्या चोरघे बाई आणि छबीला बाई ह्या आम्हास शिकविण्यास होत्या. त्यावेळची मुले चळवळी असत, वर्गात, पटांगणात, मैदानात नियमितपणे पडत. पडल्यावर त्यांना जखमा होत आणि अशा वेळी बेबीताई धावून येई आणि मग ते प्रसिद्ध लाल औषध जखमेवर लावले जाई. बहुतांशी जखमा ह्या औषधापुढे माघार घेत. शाळेच्या शिक्षकांसाठी एक कठीण प्रसंग म्हणजे शाळा तपासणी अर्थात इन्स्पेक्शन! मुलांच्या कामगिरीवर शिक्षकांचे भवितव्य ठरत असे. अशाच एका शाळा तपासणीच्या प्रसंगी आमच्या वर्गातील एका मुलास केवळ प्रसंगाच्या दडपणामुळे सीता कोण ह्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही.
गल्लीत आमचे क्रिकेट अगदी जोरात चालू होते. आमचा एक पूर्ण संघच होता. मी, बंधू, स्टीफन, विजय ही लेमॉस बंधुची जोडी, वेंझील, ह्युबर्ट, लॉइड, रॉलस्टन हे लोपीस बंधू, नितीन (बाळ्या), बिट्ट्या हे देखमुख बंधू, नेपोलियन आणि एस्टानि ही अजुन एक बंधुची जोड़ी, दर्शन हटकर, नेल्सन, डेनिस घोन्सालवीस, अमोल, रोबर्ट, झेवियर (जेवी), ख्रिस्तोफर (किरी) हे चौधरी कुटुंबीय असा मोठा समूह होता. मे महिन्यात सकाळी नऊ ते अकरा आणि दुपारी चार ते सहा अशी खेळाची दोन सत्रे होत.
हे सर्वजण विविध वयोगटातील होते. किरी हा वसईत ठिकठिकाणी टेनिस सामन्यात कप्तान असे. त्यामुळे गल्लीत खेळताना तो बऱ्याच अधिकारवाणीने सर्वांना ओरडे. विजय, जेवी आणि बंधू हे आमचे वेगवान गोलंदाज. त्यातील पहिल्या दोघांना किरी त्यांच्या गोलंदाजीच्या टप्प्याविषयी आणि दिशेविषयी सतत ओरडत असे.
सायंकाळी शाळेतून येतानाचा रस्ता प्रामुख्याने ख्रिश्चन वस्तीतून येत असे. पावसाळ्याच्या दिवसात हा रस्ता बऱ्याच वेळा पाण्याने भरलेला असे. ख्रिश्चन लोक त्यावेळी सायंकाळी आंघोळ करत. त्यामुळे त्यांच्या पाण्याच्या चुली पेटलेल्या असत. त्यांच्या अंगणात धूर पसरलेला असे. अशा वातावरणात घरी परतायला मजा येई.
ह्या मागच्या रस्त्याला बिदीचा रस्ता असेही संबोधिल जाई. ह्या रस्त्याच्या कडेला गावातील विविध बावखल वसई खाडीला जोडणारे ओहोळ वाहतात. शाळेतील मुले शाळा सुटल्यावर किंवा बऱ्याच वेळा शाळेतील तासांना दांडी मारून ह्या ओहोळातील मासे पकडण्याचा उद्योग करीत.
क्रिकेट खेळताना गल्लीतील आमच्या गटात एकमेकांना प्रेमाने संबोधिले जाई. एखादा खेळाडू वेडावाकडा फटका मारून बाद झाला कि त्याचा कप्तान त्याची बरीच निंदानालस्ती करे. "ह्यो खकाटलाय" किंवा "ह्यो इस्टावलाय" असे ठेवणीतले शब्द काढले जात. ह्या शब्दप्रयोगात संबोधल जाणारं मुख्य पात्र हे "नाळ" (नारळ ह्या शब्दाचा अपभ्रंश) आहे हे ह्यातील मुख्य गृहीतक असे.
पूर्वी आमच्याकडे खेळायचे चेंडू फार नसायचे. त्यामुळे झाडात वगैरे चेंडू हरवला की सर्व मंडळी जीवाचा आटापिटा करून हा चेंडू शोधायला जात. ह्यात अमोल उगाचच "मी आला!" असं "मिळाला" ह्या शब्दाशी नाद साधर्म्य असणारं वाक्य बोलून सर्वांचा रोष ओढवून घेई.
ख्रिश्चन लोक पूर्वी घराच्या भोवती डुक्कर पाळीत. एखादा मुलगा लग्नाच्या वयाचा झाला की मग तीन चार वर्षाआधीच असा डुक्कर पाळायला आणून ठेवला जाई. आणि मग त्याला चांगला आहार देऊन धष्टपुष्ट केला जाई. ही डुक्कर लग्नाच्या आदल्या दिवशी शहीद होत असत. त्यांच्या तेलात वडे तळले जात. आदल्या दिवशीचा हा कार्यक्रम बराच रंगे. जवळच्या नातेवाईक स्त्रिया येउन ह्या वडे तळण्याच्या कार्यक्रमात भाग घेत. आणि पारंपारिक गाणी गात. रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम चाले.
परंतु डुकराचे मांस तब्येतीला चांगले नाही असे डॉक्टर लोकांनी सांगितल्याने ह्या प्रथेचे हल्ली प्रमाण कमी झाले आहे. तरीही रात्रीची गाणी आणि नाच अजून चालू आहेत. ह्या गाण्यांना असलेली सुरेख लय आणि पारंपारिक जोड वातावरणात अगदी उत्साह निर्माण करतात.
पूर्वीच्या काळाचं एक वैशिष्ट्य म्हणजे माणसाचं वृक्षांशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं! अंगणात आणि वाडीत माझेही असे अनेक सुहृद होते.
पांगारा
आमच्या अंगणात असलेल्या पांगाऱ्याच्या झाडावरची आधीची पोस्ट पुन्हा एकदा इथे!
वसईची थंडी मार्च सुरु झाला तरी मागे सरण्याचे नाव काढत नसे. शाळेतील क्रीडा महोत्सव फेब्रुवारी मध्ये व्हायचा. त्यानंतर स्नेहसंमेलन वगैरे झाले की वार्षिक परीक्षांचे वारे सुरु व्हायचे. दहावी बारावीच्या परीक्षा सुरु झाल्यावर आमची शाळा अर्धवेळ म्हणजे दुपारी ३ वाजताच्या सुमारास चालू व्हायची. अशा सुमारास मला अभ्यासासाठी गच्चीवर जायला आवडायचे. आंघोळ, न्याहारी आटपून सकाळी साडेआठ - नऊच्या सुमारास मी दोन तीन विषयाची पुस्तके घेवून जात असे. अभ्यासाबरोबर तिथला एक उद्योग म्हणजे गच्चीजवळील पांगार्याच्या झाडाचे निरीक्षण. मार्च महिन्याच्या सुरुवातीस हे झाड लाल फुलांनी बहरून जाई. आजूबाजूच्या परिसरातील पक्षी ह्या झाडावर गर्दी करीत. पोपट, कोकिळा, कावळा अशा नेहमी आढळणाऱ्या पक्ष्यांसोबत बाकीचे पक्षीही गोळा होत. मग झाडावर चाले तो ह्या पक्ष्यांचा सुमुधुर कलकलाट! ह्या कलकलाटासोबत अभ्यास करण्याचा आनंद वेगळाच. हे सर्व पक्षी ह्या फुलांचा मध पिण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करीत. कावळे थोडीफार दादागिरी देखील करीत. एप्रिल मध्ये परीक्षा सुरु होईपर्यंत ही फुले मग हळू हळू नाहीशी होत. उरे मग केवळ काट्यांनी व्यापलेले पांगार्याचे झाड! पुढे पावसाला आला की हेच झाड हिरव्या पानांनी बहरून जाई. आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला आपला पर्णसंभार झाडून देई! ह्या पांगार्याच्या झाडाच्या बिया दगडावर घासल्या की बर्यापैकी गरम होत आणि मग बालमित्रांना चटका द्यायला उपयोगी पडत!
पुढे काळ बदलला. हे झाड आमच्या आणि शेजार्याच्या बरोबर हद्दीवर होते. ह्या जगात नुसत्या कलात्मक सौंदर्याला किंमत नसते, टिकायचे असेल तर एकतर ही कला बाजारात विकता यावी किंवा त्या वस्तूचे व्यावसायिक मोल असावे लागते. बिचाऱ्या पांगार्याच्या झाडाच्या लाकडाला काही व्यावसायिक किंमत नव्हती आणि एके दिवशी येवून लाकूडतोड्यांनी ह्या झाडाला तोडून टाकले. ते झाडही गेले आणि त्याबरोबर नाहीसा झाला तो मार्चच्या सुंदर सकाळचा पक्ष्यांचा सुमधुर किलकिलाट. ह्या नष्ट झालेल्या आनंदस्थळामुळे त्या परिसरातील पक्ष्यांचे दुखावलेले भावविश्व आपणास कसे कळावे?
सुबाभुळ
अण्णांची धाकटी मुलगी सुनितामाई. तिचा ८४ साली सुप्रसिद्ध कृषीतज्ञ जयंतराव पाटील ह्यांचे कनिष्ठ चिरंजीव प्रदीप पाटील ह्यांच्याशी विवाह झाला. जयंतराव पाटील हे कृषी विषयावर बरंच लिखाण करीत. त्यांच्या अशाच एका लेखात सुबाभूळ ह्या वृक्षाविषयी मी वाचलं. त्याचा पाला कसा सकस असतो आणि गुरांसाठी कसा उपयुक्त असतो त्याची वाढ कशी झपाट्याने होते हे सर्व मुद्दे त्यांनी अगदी सुरेखपणे मांडले होते. माझ्या मोठ्या आत्याचा मुलगा शशीभाई ह्याच्याकडे ह्या सुबाभुळाची काही झाडे आहेत असे मला कळलं. मग मी त्याच्याकडे जाऊन त्याच्या काही सुकलेल्या शेंगा आणल्या आणि त्यातील बिया एकत्र लावल्या. काही दिवसांनी त्यातून छोटे रोपे एकदम सर्व अचानक वर आली. मग वाडीच्या एका कोपऱ्यात नेउन मी ते लावले. पाचवी ते सातवी माझी शाळा सकाळची असे. शाळेतून बाराच्या सुमारास परत आल्यावर मी जेवणाआधी मोठ्या श्रद्धेने बादलीतून ह्या झाडांना पाणी देत असे. जयंतरावांनी (दादा) सांगितल्याप्रमाणे ही झाडे अगदी झपाट्याने वाढत होती. दोन महिन्यांनी ह्यातील चार झाडे अगदी फोफावली. एका वर्षानंतर त्यांची उंची चांगली दोन तीन मीटरच्या आसपास झाली. त्यांचा पाला सुद्धा हळूहळू गायींना मिळू लागला होता. पण मग नंतर त्यांना बिया आल्या. एका पावसाळ्यात ह्या सर्व बिया वाडीच्या भागात पडल्या. आणि मग नंतरच्या पावसाळ्यात वाडीच्या त्या भागात सुबाभुळाची असंख्य रोपे फैलावली. ती काढून टाकण्यासाठी खास कामगार लावावे लागले. पुढे ह्या झाडांच्या ह्या बालरोपांचा उपद्रव इतका वाढला की ही चारही झाडे तोडण्याचा कठोर निर्णय घेण्यात आला. त्यावेळी हळव्या मनाचा असलेल्या मला ह्याचे खूप दुःख झाले होते. नंतर काही दिवसांनी मी एक झाड अंगणात लावलं. परंतु हे ही झाड झपाट्याने वाढलं आणि एके दिवशी तुलनेने कमकुवत बुंध्याच असलेले हे झाड पावसामुळे गॅलरित कोसळलं, नंतर एकदा विजेच्या तारांवर त्याची फांदी पडली. मग हे ही झाड तोडण्यात आलं. माझ्या मनावर ह्याचे आघात झाल्याने ह्या पुढे आपण ज्यांना वाचवू शकत नाही, त्या सुबाभुळ वृक्षांची लागवड न करण्याचा मी निर्णय घेतला.
चिंच
घराच्या दक्षिण सीमेवर चिंचेचे दोन मोठे वृक्ष होते. लहानपणी आमच्या समाजाचे महामंडळ २६ जानेवारीला जानकी चित्रपटगृहात चित्रपट दाखवत असे. मामासाहेब मोहोळ महामंडळाला बहुदा हे चित्रपटगृह विनाशुल्क उपलब्ध करून देत असत. अशाच एका मराठी चित्रपटात "हे चिंचेचे झाड दिसत असे चिनार वृक्षापरी!" हे बहुदा काशिनाथ घाणेकरांवर चित्रित केलेलं गाणं मी पाहिलं होतं. माझ्या माहितीत मराठी चित्रपट संगीतात श्रुंगाररसात वापरलं गेलेलं हे एकमेव झाड असल्याने एकंदरीत चिंचेच्या झाडांविषयी आणि आमच्या दोन झाडांविषयीचा माझा आदर अगदी दुणावला होता. ह्या चिंचेवर आमचे आणि आजीचे बारीक लक्ष असे. कच्च्या चिंचा लागल्या की त्या सगळ्याची नजर चुकवून कधी पाडून
खाता येतील ह्याकडे आम्ही लक्ष ठेवून असायचो तर झाडाला लागलेल्या चिंचेच्या संख्येवरून कंत्राटदाराला हे झाड कितीला देता येईल ह्याचा आजी अंदाज बांधत असायची. सिमेपलीकडे चौधरी कुटुंबाची वाडी होती. ह्या चिंचेच्या झाडांमुळे त्यावर बरीच सावली पडून त्यात चांगलं उत्पन्न मिळत नसे त्यामुळे त्यांचा थोडा रोष असे. चिंचा पाडणारा कंत्राटदार आला कि मग थोडीफार भांडणं होत. शेवटी मग एकदा कधीतरी ही डेरेदार चिंचेची झाडेसुद्धा कापून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. ह्यावेळी सर्व कुटुंबियांना खूप दुःख झालं.
अजून काही झाडांच्या आठवणी पुढच्या भागात!
ही श्रुंखला आवडली असल्यास नक्की कळवा! जमल्यास ब्लॉगला फॉलो करा :)
(क्रमशः)
मनोरम्य blog. पुढील blog ची वाट पाहत आहे.
उत्तर द्याहटवा