मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, ९ नोव्हेंबर, २०१४

एकवीरा देवी, महड गणपती दर्शन


प्रसिद्ध ठिकाणच्या देवदर्शनाच्या बाबतीत मी फारसा उत्साही नसतो. वसईच्या घराजवळ शनी, मारुती आणि गणपतीची साधी पण सुंदर मंदिरे आहेत. शनिवार सोडला तर ती फारशी गजबजलेली नसतात आणि मला त्या मंदिरात जाऊन शांतपणे दर्शन घेण्यास आवडते. परंतु काही प्रसंग खास असतात तिथे आपणास आपल्या आवडीनिवडीत काहीसा बदल करून वागावं लागतं. तर झालं असं की माझ्या सासरची मंडळी फार उत्साही. लग्नसमारंभ, सहली ह्यात विशेष रस घेणारी! आणि मी हा असा! असो दरवर्षी सासरची मंडळी कार्ला येथील एकवीरा देवीच्या दर्शनास जातात. दरवर्षी मला बोलावतात आणि दरवर्षी मी कामाचे निमित्त (म्हणजे खरोखर काम असतं!) पुढे करून हे आमंत्रण टाळतो. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, हा ब्लॉग सासरची मंडळी वाचण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे माझ्यासारखा शुरवीर सुद्धा काही ठिकाणी आवरते घेईल ह्याची सुज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी. तर दरवर्षीप्रमाणे सासरच्या लोकांचा कार्यक्रम ठरला. पत्नीचे तिच्या घरच्यांशी दररोज दूरध्वनीवरून होणाऱ्या बोलण्याकडे मी सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करीत होतो. परंतु शेवटी 'जिसे डरते थे वोही बात हो गयी!' "तू एकविराला आमच्याबरोबर येणार का?" असा गर्भित धमकी असलेला प्रश्न एका क्षणी माझ्या कानावर आला. मी एकंदरीत घरातील वातावरणाचा अंदाज घेतला. थेट नकार दिल्यास काय परिणाम होऊ शकतात ह्याचे झटपट विश्लेषण केले. "आज ऑफिसात कामाचा अंदाज घेऊन रात्री सांगतो" असे उत्तर देऊन मी वेळ मारून नेली. ऑफिसात गेल्यावर कळले की खरोखर शनिवारी काम होते पण ह्यावेळी थोडा बदल करून मी माझ्या टीमवर पूर्ण जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला. एकूण १६ जण ह्या देविदर्शनाच्या सहलीत सहभागी होणार होते. लोणावळा इथे आमच्या ज्ञातीतील एका बँकेचे विश्रामगृह आहे. तेथील दोन बंगल्यांचे आरक्षण करण्यात यश आले होते. एकदा होकार दिल्यावर मीसुद्धा थोडंस घाबरत काही अटी घातल्या. जसे की मी फक्त बसमध्ये येवून बसणार, माझी सर्व तयारी तूच करायची वगैरे वगैरे! आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या सर्व मान्य झाल्या. चर्चा संपल्यावर अजून काही अटी घालता आल्या असत्या अशी खंत उगाचच मनाला लागून राहिली! थोडे विषयांतर! माझ्या मोठ्या चुलतबहिणीचे यजमान बोर्डीचे आहेत. सासरच्या लोकांशी कसे संबंध ठेवावेत ह्याबाबतीत मी त्यांना आदर्श मानतो. त्यांचे लग्न होऊन आता तीस वर्षे होतील. पण ह्या तीस वर्षात पहिली दिवाळी सोडली तर बाकी सर्व वेळी त्यांनी सासुरवाडी राहण्याचा आग्रह कोणालाही नाराज न करता फेटाळला आहे. साधारणतः जेवणं वगैरे आटोपली की "हा मी इथेच पारनाक्यावर एक चक्कर मारून येतो" असं सांगून ते थेट बोर्डीला पोहोचल्यावर "मी पोहोचलो" असा फोन करतात. आता त्यांच्या मोजक्या वेळ आमच्यासोबत घालविण्यावरच आम्ही समाधान मानून घेण्याची सवय करून घेतली आहे. व्यावसायिक जगात म्हटलं जात, "सर्व काही तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षांची पातळी कशी ठरविता ह्यावर अवलंबून असतं!" प्रवासासाठी टेम्पो ट्रेवलर आरक्षित करण्यात आला होता. प्राजक्ताचे धाकटे काका दहिसरला राहतात तिथून प्रवासी मंडळी टेम्पो ट्रेवलरमध्ये प्रवेश करण्यात सुरुवात झाली. धाकट्या काकांचा हरहुन्नरी मुलगा सौरभ आणि प्राजक्ताचा भाऊ स्वप्नील हे ह्या सहलीचे संयोजक होते. आम्हाला सात वाजता तयार राहण्याची सूचना देण्यात आली होती. "सात वाजता सांगितलं म्हणजे साडेसात वाजेपर्यंत आपल्याकडे येतील" हे प्राजक्ताचं वाक्य शुक्रवारी रात्री ऐकून मला गेल्या कित्येक वर्षात काही बदललं नाही ह्याचा आनंद झाला. दहिसर नंतर गोविंदनगरचा थांबा होता. तिथे प्राजक्ताच्या मधल्या काकांचे कुटुंब आणि आजी चढले. सकाळी whatsapp वर टेम्पोचा प्रवास नोंदविला जात होता. आम्ही सकाळी साडेपाच वाजता उठल्याने आमच्या आंघोळी आटोपल्या होत्या. टेम्पो गोंविंदनगरला पोहोचल्याचा अपडेट whatsapp वर आल्यावर सोहमला आंघोळीस धाडण्याचा निर्णय घेण्यात आला. धन्य ते इंटरनेट, धन्य ते whatsapp आणि धन्य तो सोहम! टेम्पो स्वप्नीलकडे बाभईला पोहोचल्यावर आम्हाला बिल्डींगच्या खाली उतरून राहण्याचा फोन आला. "थांबतील ते पाच मिनटे" हे उद्गार अपेक्षेनुसार कानी आले. थोड्याच वेळात टेम्पोट्रेवलर खाली आला, आम्ही कुलपं वगैरे लावली आणि शेवटी एकदाचे साडेसातच्या सुमारास आम्ही खाली उतरलो. आमच्या आगमन होताच स्वागताचे वयोगटानुसार स्वागतपर शब्द, उद्गार, बोंबा ऐकू आल्या. स्वप्नीलची मुलगी श्राव्या हिला सोहम आणि मोठ्या आत्याच्या आगमनाचा कोण आनंद झाला. टेम्पोट्रेवलरच्या पुढे नारळ फोडून प्रवासाचा शुभारंभ करण्यात आला. जावईबापूंना पुढची मानाची सीट देण्यात आली होती. एकंदरीत सर्व पुरुष मंडळी पुढे बसली होती. रस्त्यांचा आणि मुंबईतील पोलिसमंडळींच्या मानसिकतेचा जाणकार सौरभ चालकाच्या बाजूच्या आसनावर स्थानापन्न झाला होता आणि तज्ञ स्वप्नील माझ्या बाजूला बसला होता. शनिवारचे जाडेजुडे पेपरांचे गठ्ठे काकांनी आणले होते त्याचा मी कब्जा घेतला. गाडी थोड्याच वेळात पश्चिम द्रुतगती मार्गावर धावू लागली. प्राजक्ता लेक लाडकी असल्याने तिच्यावर न्याहारीच्या व्यवस्थेची जबाबदारी नव्हती. परंतु बाकीच्या मंडळीनी ठेपले, रवळी (हा सोमवंशीय क्षत्रिय समाजातच बनणारा गोड पदार्थ असावा असा माझा समज!) असे रुचकर पदार्थ बनवून आणले होते. त्याची रसद थोड्या थोड्या वेळाने पुढे पाठवली जात होत होती. जावईबापू एकंदरीत ह्या न्याहारीच्या पदार्थांवर आणि प्रवासावर खुश दिसत होते. श्राव्या आणि सोहमची मागे गडबड सुरु होती. प्राजक्ताची धाकटी बहिण प्रांजली आता सक्रिय झाली होती आणि मागे सुश्राव्य (?) गायन कार्यक्रमास सुरुवात झाली होती. सकाळचा प्रवास असल्याने वातानुकुलीत टेम्पोट्रेवलरची गरज नाही हे केलेलं गृहीतक वाढलेल्या उकाड्यामुळे चुकीचे ठरल्याचे भाव सर्वांच्या चेहऱ्यावर होते. थोड्याच वेळात टेम्पो ट्रेवलर जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर धावू लागला. सीप्झ, पवई भागात कार्यालये आहेत त्यांना हा लिंक रोड हा शब्द उच्चारला की वाहतूककोंडीची दुःस्वप्ने पडू लागतात. सुदैवाने सकाळची वेळ असल्याने वाहतूककोंडी नव्हती. मुंबईचे हेच वैशिष्ट्य आहे, तुम्हांला चांगला प्रवास हवा असेल तर तुम्हांला सकाळी लवकर निघावयास हवे. ह्या लिंक रोडवर टेम्पो ट्रेवलरमध्ये इंधन भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पवई मागे टाकून टेम्पो ट्रेवलर पूर्व द्रुतगती मार्गाला लागला. ह्या मार्गावर काही उपनगरे, वस्त्या (त्यांची नावे घेत नाही, तेथील रहिवाश्यांच्या भावना दुखावायला नकोत!) अस्वछ आहेत आणि तिथे असह्य दुर्गंधी पसरलेली असते. आपणास केवळ ह्या भागातून जाताना इतका त्रास होतो मग तिथे राहणारे हे कसे काय २४ तास सहन करीत असतील हे समजत नाही. एकंदरीत हे आपले अपयश समजायला हवे. बाकीचा इतका मोठा सुंदर देश मोकळा असताना तिथे केवळ आपण रोजगाराच्या संधी उपलब्ध करू शकत नाही म्हणून शहरात येऊन लोकांना अशा दयनीय अवस्थेत राहावे लागते. पुढे वाशी आणि नवीन मुंबईचा परिसर सुरु झाला. इथील रस्ते रुंद आणि त्यामुळे वाहनेही वेगात प्रवास करीत होती. त्यामुळे आपल्या टेम्पो ट्रेवलरचा वेग जास्त असायला हवा होता अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. थोड्या वेळातच यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आमच्या वाहनाने प्रवेश केला. इथील वाहनांचा वेग भन्नाट, त्यामुळे मला कसेसेच वाटू लागलं. आमचा चालक सुद्धा आपल्या वाहनाची मर्यादा ओळखून टेम्पो चालवत होता. आमच्याहून हळू वाहने चालविणारे चालक अधूनमधून दिसत होते. त्यांनी खरेतर सर्वात डाव्या मार्गिकेत राहायला हवे, पण त्यातील काही नमुने मधल्या मार्गिकेत वाहने चालवीत होते. त्यांना मागे टाकण्यासाठी आमच्या चालकास बरीच मेहनत करावी लागत होती. तो अगदी शेवटपर्यंत त्यांच्या मागे जाई आणि मग उजव्या बाजून पुढे जाई. अजून काही वाहनचालक आपल्या मोटारगाडीत सामान खचोखच भरून जाताना दिसले. सोय म्हणून एकाच वेळी इतके सामान भरून ठीक आहे पण आपली मागून येणाऱ्या वाहनांचे दृश्य ह्या खचाखच भरलेल्या वाहनांमुळे अडले जात आहे ह्याचे भान त्यांनी ठेवावयास हवे होते. मध्ये दोन बोगदे लागले. त्यातील अंधारात मागील पार्किंग लाईट सुरु ठेवून वेगात जाणाऱ्या गाड्यांचे दृश्य सुंदर होते. थोड्या वेळाने सौरभ आणि चालकाची परमिट ह्या विषयावर चर्चा सुरु झाली. ह्या प्रवासासाठी सर्व प्रवाश्यांच्या नावाची यादी देऊन परवाना घेणे आवश्यक होते. परंतु घाईगडबडीत हे राहून गेले होते. हे कळल्यावर रस्त्याबाजूच्या वाहतूकपोलिसाकडे आमची नजर उगाचच जास्त वळू लागली आणि थोड्या वेळातच त्यातील एकाने आम्हांला बाजूला थांबण्याचा इशारा केला. चालकाने व्यवस्थित गणवेष परिधान केला होता. त्याचे आणि वाहतूक पोलिसाचे बोलणे आम्ही टेम्पोतून पाहत होतो. अशा वेळी प्रवाशांनी चर्चेत भाग घेऊ असे म्हणत इच्छुक सौरभला त्याच्या वडिलांनी रोखले. त्यांच्या म्हणण्यात तथ्य होते. पाच मिनिटातच दोनशे रुपयाचा दंड आणि पावती घेऊन आम्ही पुढे निघालो. थोड्याच वेळात लोणावळ्याला बाहेर पडण्याचा गच्छंतीमार्ग आला. लोणावळ्यातील हवेत थंडावा जाणवत असल्याचे लक्षात येताच काकांनी टेम्पोत वातानुकुलीत यंत्रणा सुरु केल्याची टिपण्णी केली. लोणावळ्याच्या मुख्य नाक्यावर पुन्हा एकदा वाहतूकपोलिसांची मेहेरनजर आमच्यावर पडली. चालकाने मोठ्या आत्मविश्वासाने त्याला दोनशे रुपयाची दंडपावती दाखविली. "ही चालणार नाही, कारण ती लोणावळ्याच्या बाहेरील आहे" साहेब उद्गारले. चालकाने कार्यालयात बसून हा सर्व प्रकार पाहणाऱ्या मोठ्या साहेबाकडे "जावू द्याना आता" अशी विनवणीच्या नजरेत विनंती केली. त्याचा फायदा होऊन त्याने साहेबास आम्हांस जाऊ देण्यास सांगितले. "बाकी सर्व कागदपत्रे तर आहेत ना?" जाऊ देता देता साहेब विचारते झाले. इतका वेळ फक्त परमिटची चर्चा सुरु होती म्हणजे बाकीची कागदपत्र तर व्यवस्थित असणार अशा भोळ्या समजुतीने १६ मुखावर हो असे उत्तर आले. परंतु जे सर्वात महत्वाचे होते त्या सतराव्या (चालकाच्या) चेहऱ्यावरील अनिश्चिततेचे भाव अनुभवी साहेबांनी लगेचच जाणले. पुन्हा एकदा गाडी बाजूला लावण्याचा आदेश देण्यात आला. काकांनी गाडीच्या मालकांना फोन लावला. गाडीत असणारी कागदपत्रे पुरेशी नव्हती. आताची साहेब, मोठे साहेब आणि चालक ह्यांची बोलणी बराच वेळ रंगली. टेम्पोतील सर्वाचे लक्ष आता सौरभकडे वळले. सौरभच पोलिसांचे लक्ष वेधून घेत असावा असे सर्वांचे म्हणणे पडले. सौरभ टेम्पो चालवू शकत असल्याने त्याने तसाच टेम्पो घेवून विश्रामधामाकडे कूच करावे असेही काहींचे म्हणणे पडले. सौरभ बिचारा हे सर्व शांतपणे ऐकून घेत होता. काहीवेळाने अजून एक फोडणी देऊन आमचे चालक टेम्पोत परतला. "नऊशे रुपयाचे परमिट मी काढायला सांगत होतो. ते जर काढले असते तर ही सर्व कटकट झाली नसती" टेम्पो सुरु करता करता तो उद्गारला. त्यानंतर मात्र आम्ही विश्रामधामापर्यंत व्यवस्थित पोहोचलो. तिथे निवासासाठी चार बंगले होते. त्यातील दोन आम्ही आरक्षित केले होते. बाकीच्या दोन बंगल्यात कोणी राहण्यास आले नव्हते. त्यामुळे एकंदरीत शांतता होती. महिलावर्गास आणि पुरुषवर्गास प्रत्येकी एक बंगला अशी निवासव्यवस्था होती. फक्त साडेदहाच झाले होते. महिलावर्गाने ब्रेडचे बरेच पुडे काढले. त्यानंतर काकड्या, उकडलेली बटाटी, सॉस असे रुचकर सँडविचला आवश्यक असणारे जिन्नससुद्धा बाहेर काढण्यात आले. त्यामुळे पुरुषवर्गात अचानक खुशीचे वातावरण पसरले. सँडविच होण्यास अजून बराच वेळ लागेल हे लक्षात घेऊन मी पुरुषवर्गाच्या बंगल्यात परत गेलो. सुदैवाने तेथील दूरदर्शन संच चालू अवस्थेत होता आणि त्याहून नशिबाची गोष्ट म्हणजे केबलही सुरु होते. केबलवर क्रिकेटवाहिनीवर २००७ साली भारताने इंग्लंडला हरविलेल्या एका सामन्याची क्षणचित्रे दाखविली जात होती. ज्यादिवशी आपला सामना नसतो अशा वेळी क्रीडा वाहिन्या जुन्या जिंकलेल्या सामन्यांची क्षणचित्रे दाखवितात. ती आपले क्रिकेटपटू पाहत असावेत आणि त्यांचे मनोधैर्य वाढत असावे असा माझा अंदाज आहे. सँडविच तयार झाल्याची हाक येताच मी त्वरित समोरच्या बंगल्यात पोहोचलो. सँडविच खरोखर रुचकर होते. ते फस्त करून मंडळी ताजीतवानी झाली. श्राव्याला एका विशिष्ट प्रकारे सँडविच बनवून हवे होते ते कोणाला समजत नसल्याने काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु ह्यात ब्रेडच्या स्लाईसच्या बाजूला सॉस हा महत्वाचा घटक असल्याचे ध्यानात येताच प्रश्न मिटला. संयोजकांनी फावल्या वेळातील उद्योगाकडे फारसे गांभीर्याने पाहिले नसावे. नशिबाने प्लास्टिकची छोटी बॅट आणि तत्सम पदार्थाचा मऊ चेंडू ह्यांनी प्रश्न मिटविला. सुरुवातीला सराव करण्यात मंडळींनी धन्यता मानली. सोहम आणि श्राव्या ह्यांना वयोमानामुळे फलंदाजीचा हक्क प्राप्त झाला होता. त्यांना गोलंदाजी करण्यात स्वप्नील आणि प्रांजली ह्यांनी पुढाकार घेतला होता. ह्या दोघांची गोलंदाजी भन्नाट होती. भारतीय गोलंदाज स्वैर मारा करतात परंतु त्यांची स्वैरता केवळ यष्ट्याच्या डाव्या उजव्या बाजूला मर्यादित असते. पण स्वप्निल आणि प्रांजली ह्यांनी त्यावरही कळस केला. त्यांचा मारा यष्ट्यापासून डावी उजवीकडे १०-१० फुट जाऊ लागला. आणि मग त्यांनी गगनभेदी मारा सुरु केला. चेंडू पहिल्या मजल्याच्या बाल्कनीत, किंवा दुसऱ्या मजल्याच्या पातळीवर असलेल्या पत्र्यांना भेदून जाऊ लागला. हा मारा पाहून बच्चेमंडळी सोहम आणि श्राव्या ह्यांचा फलंदाजीतील रस कमी होऊ लागला. उत्कृष्ट खेळाडू सौरभ आणि स्वयंघोषित उत्कृष्ट खेळाडू जावईबापू ह्यांचाही मारा काही खास पडत नव्हता. त्यामुळे सुज्ञपणे सर्वांनी बॉक्स क्रिकेटकडे वळण्याचा निर्णय घेतला. सौरभ, सोहम, प्राजक्ता आणि सुप्रिया (स्वप्निलची पत्नी) विरुद्ध प्रांजली, चिन्मय, स्वप्निल आणि जावईबापू अशी संघाची निवड करण्यात आली. बसमधून उतरल्यानंतर सौरभ आणि त्याची पत्नी अर्पिता ह्यांचे काहीसे बिनसले असावे त्यामुळे ती प्रेक्षकवर्गासाठी असलेल्या वऱ्हांड्यातून सौरभला "चीटर चीटर" असे सतत संबोधित होती. पहिल्या सामन्यात स्वप्नीलच्या संघाची कामगिरी बेताचीच झाली. सासुरवाडीच्या समस्त वर्गाला प्रभावित करण्यासाठी जावईबापूंनी मारलेला फटका थेट सीमारेषेबाहेर गेल्याने ते बाद झाले. घोषित केलेल्या १, २ धावांच्या सीमारेषेवरून दोन्ही संघात वाद होत होते. अर्पिता थेटसौरभच्या विरुद्ध पक्षात होती आणि तीन सासूबाई, एक आजेसासू आणि दोन सासरे ह्यांना जावईबापूंच्या उघडपणे विरोधात जाणे योग्य वाटत नसावे त्यामुळे बरेचसे विवादास्पद निर्णय जावईबापू असलेल्या स्वप्नीलच्या संघाच्या बाजूने घोषित करण्यात येत होते. इतके करून सुद्धा पहिला सामना सौरभच्या संघाने जिंकला. दुसऱ्या सामन्यात मात्र चिनुने चांगली फलंदाजी करून ४ षटकात २९ धावा बनवून देण्यास हातभार लावला. त्यानंतर स्वप्निल, चिनु आणि प्रांजलीने उत्तम गोलंदाजी करून सामना जिंकून दिला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. निर्णायक सामन्यात जावईबापूंना सूर गवसला. त्यांनी गेल्या ५ वर्षातील सुरुच्या बागेतील आणि शाळेतील बॉक्स क्रिकेटचा अनुभव पणाला लावला आणि ३ षटकात २९ पर्यंत धावसंख्या पोहोचवली. ह्यात त्यांनी फटक्याचा पहिला टप्पा जमिनीवर आपटून दुसरा टप्पा सीमारेषेबाहेर चौकारासाठी पोहोचविण्याच्या गनिमी काव्याचा वापर केला. चिनुने शेवटच्या षटकात १० धावा फटकावून४ षटकात ३९ अशी मजबूत धावसंख्या उभारली. सौरभचा संघ अगदी दडपण घेऊन खेळला आणि सर्वजण ४ षटकात केवळ ५ धावा काढून बाद झाले. ह्यात सुप्रियाने दोन निर्धाव षटके खेळून बराच हातभार लावला! एव्हाना जेवणाची वेळ झाली होती. सकाळी चार वाजता उठून सौरभच्या आईने बनविलेल्या स्वादिष्ट पुलावाचा स्वाद घेण्याची वेळ झाली होती. ह्या पुलावातील समाविष्ट असलेल्या सर्व भाज्यांची नावे सौरभने आधीच अचूक सांगितली होती ह्याचे मला बरेच आश्चर्य वाटले. तेव्हा सकाळी उठून मीच ह्या भाज्या कापल्या असा दावा त्याने केला. त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हे मला समजले नाही. नंतर त्या भाज्या अर्पिताने कापल्या होत्या असा खुलासा खात्रीलायक गोटातून करण्यात आला तेव्हा अर्पिता सौरभच्या मागे चीटर म्हणून का लागली असावी ह्याचा थोडा अंदाज आला. पुलाव खरोखर रुचकर होता आणि गरमागरम पापड त्याच्या चवीत भर घालीत होते. समोर पराभूत संघ बसला असल्याने त्यांची चेष्टा करताना दोन घास अधिकच गेले. दुपारचे दोन वाजले होते. सकाळी लवकर उठलेले डोळे केबल टीव्हीवर धन्य मराठी मालिका लागताच निद्राधीन झाले! दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास जाग आली. वाफाळलेल्या चहाने सुस्ती घालविली. आता सहलीतील मुख्य कार्यभागाची म्हणजेच देविदर्शनाची वेळ होती. १४ जणांना झोपेतून उठवून तयार करून टेम्पो ट्रेवलरमध्ये प्रवेश करण्यास भाग पाडणे ही कठीण बाब होती. सोहम चिनुला साथीला घेवून दुपारच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी जोरदार सराव करत होता. तरुण महिलावर्गाने तयारीसाठी बराच वेळ घेतला. तोवर आकाशात पश्चिम दिशेला काळ्या ढगांनी बरीच गर्दी केली होती. सूर्याची किरणे त्या काळ्या ढगांवर चंदेरी कडांचे विलोभनीय दृश्य निर्माण करीत होती. ह्या काळ्या ढगांचे अनेक थर आकाशात दिसत होते. मला हे ढग नेहमीच आकर्षित करतात. मी ह्या ढगांची ब्लॅकबेरीवर अनेक सुंदर (माझ्या म्हणण्यानुसार) छायाचित्रे काढली. वेळ मिळाल्यावर मी ती ह्या पोस्टला जोडीन. आकाशात पूर्वेला अगदी विरळ इंद्रधनुष्य दिसू लागले होते. माझ्या नजरेस ते पडले मग ते मी बाकीच्या सर्वांना दाखविले. मग अधिक क्षमतेच्या कॅमेरांच्या साथीने मंडळींनी ह्या इंद्रधनुष्याला छबिबंद केले. तरुण महिलावर्गाची तयारी एव्हाना आटपत आली होती. परंतु आजूबाजूच्या नयनरम्य परिसराच्या साथीने आपली छायाचित्रे काढून घेण्याचा मोह त्यांना आवरला नाही. हे फोटोसेशन काही काळ चालले. मग वडिलधाऱ्या मंडळीनी गडबड केल्यावर सर्वजण वाहनात शिरले. बहुदा जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून आम्ही निघालो. ह्या भागात काही वेळापूर्वी पाऊस पडून गेला होता. आणि आता सूर्याची पिवळी किरणे महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या तयार होत आलेल्या भाताच्या पिकांवर पडून सुंदर दृश्य निर्माण झाले होते. महामार्गाच्या डाव्या बाजूला किनारा विलेज आणि इतर काही ढाबे दिसत होते. रात्रीचे जेवण ह्यातील कोणत्या ढाब्यात घ्यावे ह्याविषयी मंडळीत चर्चा सुरु झाली. थोड्या वेळाने आम्ही कार्ला लेण्याच्या डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो. अचानक १६ जणांचा समूह आलेला पाहून रिक्षावाले खुश झाले. आमच्या गटात महिलावर्ग आणि त्यातही सर्वच तरुण नसल्याने आम्हांला रिक्षांची गरज भासणार हे स्वाभाविक होते. प्रश्न इतकाच होता की सर्वांनी रिक्षा करायची की काही जणांनी आपल्या शारीरिक तंदुरुस्तपणाची परीक्षा घेत पायीच टेकडीवर कूच करायचे हा प्रश्न होता. एकंदरीत संपूर्ण गटाची द्विधा मनःस्थिती पाहता सौरभने पुढाकार घेत चार रिक्षा ठरविल्या आणि आम्ही टेकडीवर निघालो. तीव्र चढ कूच करण्यासाठी रिक्षाला धाप लागत होती. आमच्यासमोर एका जोडप्यातील पत्नी चालकाची भूमिका बजावीत होती. चढणीच्या रस्त्यावर क्लच, ब्रेक आणि वेगसंवर्धक ह्यांचा ताळमेळ जुळून न आल्याने तिची गाडी अधूनमधून बंद पडत होती. आणि त्यामुळे मागची रहदारीची कोंडी होत होती. एकदाचं तिला ओवरटेक करून आमची रिक्षा टेकडीच्या मध्यभागी असलेल्या रिक्षातळावर जाऊन पोहोचली. ह्यापुढील मार्ग पायी कूच करायचा होता. एकंदरीत रिक्षावाल्यांच्या ह्या अनुभवाने माझी निराशा झाली. त्यांनी ५ मिनिटाच्या ह्या प्रवासाचे एका रिक्षामागे १२० रुपये घेतले. श्रद्धास्थानी येणाऱ्या भाविकांची अशी अडवणूक करणे योग्य नव्हे. पुढील चढणीच्या रस्त्यात सोहमने आघाडीचे स्थान राखण्याचा हट्ट धरला. आणि बाकी सर्वांनी त्याला बरं वाटावं म्हणून त्याला आघाडीस राहून दिलं. ह्या चढणीच्या रस्त्यावरून खालच्या भागातील वस्तीचे दिसणारं दृश्य नयनरम्य होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हार. पूजेचे साहित्य विकणाऱ्या विक्रेत्यांची दुकाने होती. साधारणतः दहा मिनिटाच्या चढणीनंतर आम्ही देवळाच्या ठिकाणी पोहोचलो. कारण काही असेना पण आज गर्दी एकदम तुरळक होती. बहुदा दिवाळीचा आधीचा सप्ताह असल्याने लोक दिवाळीच्या तयारीत असतील आणि सर्वांच्याच परीक्षा अजून आटोपल्या नसतील अशी अटकळ आम्ही बांधली. सर्वजण वर येईपर्यंत आम्ही थांबलो. प्राजक्ताच्या आजीनेही जवळजवळ अर्धी चढण पार केली होती. परंतु त्यानंतर तिथल्या ओल्या रस्त्यामुळे तिने परत फिरण्याचा निर्णय घेतला. प्राजक्ताचे काका प्रदीप हे तिच्यासोबत खाली थांबले. ओटी, फुले अशी सर्व तयारी झाल्यावर महिलावर्गाने आम्हास मंदिरात प्रवेश करण्याची संमती दिली. मंदिराच्या प्रवेशद्वाराशी एक हसतमुख माणूस ढोलक्यावर लयबद्ध नाद निर्माण करून येणाऱ्यांचे स्वागत करीत होता. अशी हसतमुख माणसे भेटली कि खूप बरं वाटतं. दर्शनासाठी अजिबात रांग नव्हती. त्यामुळे शांतपणे डोळेभरून, मनभरून एकविरा देवीचे दर्शन घेता आलं. प्राजक्ताने ओटी भरली. देवीला साडीही भेट दिली. अशा देवळांत शांतपणे देवीचे दर्शन घेणे हा एक खास अनुभव असतो. एका अलौकिक शक्तीच्या अस्तित्वाची तिथलं शांत वातावरण आपणास जाणीव करून देतं. मनुष्यापेक्षाही श्रेष्ठ अशी शक्ती ह्या विश्वात आहे हे नक्की, ह्या शक्तीच्या कोणत्या रूपावर विश्वास ठेवावा हा ज्याचा त्याचा प्रश्न. मला जिथे जिथे ह्या शक्तीच्या अस्तित्वाची अनुभूती होते तिथे मी नतमस्तक होतो. असाच अनुभव मला वसईतील बेण्यावरील आमच्या कुलदेवता आनंदीभवानी हिच्या दर्शनाने होतो. मंदिरातून पाय निघत नसला तरीही मागे जमू लागलेल्या गर्दीचे भान राखणे आवश्यक होते. आम्ही मंदिराबाहेर आलो. त्या समाधानी माणसास आम्ही थोडी रक्कम स्वखुशीने दिली. त्याने एकदम खुशीने ती स्वीकारली. माणसाने कसं असावं तर ह्या माणसासारखं! पुन्हा एक फोटोसेशन झालं. उतरणीचा मार्ग सोपा होता. आजीसोबत थांबलेल्या प्रदीपकाकांनी आम्ही परतताच वरती दर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेतला. सोबतीला स्वप्नील होताच. तोवर बाकी सर्वांनी रिक्षा करून परतीचा मार्ग पत्करला. बसमध्ये डासांनी धुमाकूळ घातला होता. त्यांच्या बंदोबस्तासाठी समोरच्या दुकानातून कॉईल घेण्यात आली. बाकी रिक्षातून उतरल्यावर बाहेर उभ्या असलेल्या सासूबाईच्या पायाच्या कडेवरून सुरु झालेल्या रिक्षाचे चाक गेले होते त्यामुळे त्या वेदनेत होत्या. १४ जण आता डोंगरावरून परतीच्या रस्त्याकडे वाट पाहत बसले होते. काही वेळातच काका आणि स्वप्निल ह्यांच्या परिचित आकृत्या उतरणीच्या मार्गावरून येताना दिसल्या आणि बसमध्ये थोडा कलकलाट झाला. आपल्याकडे सर्वांचे लक्ष असणार ह्याची त्या दोघांना जाणीव होतीच. त्यामुळे त्या संधीचा फायदा उठवीत त्यांनी त्या उतरणीच्या रस्त्यावर आपल्या नृत्यकौशल्याची थोडी झलक दाखविली. बसमधील सर्वांनी त्याला उत्स्फूर्त दाद दिली आणि "पुन्हा एकदा" अशी मागणी केली. शेवटीच्या टप्प्यात आल्यावर त्या दोघांनी पुन्हा एकदा त्या पदलालित्याची झलक दाखविली. आता पोटोबाची सोय करणे भाग होते. बसमध्ये दोन गट होते. एक गट किनाराच्या बाजूने होता तर दुसरा दुसऱ्या एका हॉटेलच्या बाजूने! शेवटी किनाऱ्याचा विजय झाला आणि टेम्पो ट्रेवलर किनाऱ्याच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश करता झाला. प्रवेशद्वारापाशी उंट, घोडे होते. थोडं आत गेल्यावर गीरच्या प्रसिद्ध गाईचे दुध मिळेल असा बोर्ड लावण्यात आला होता. त्या गाईचा गोठा थोडा पुढे होता. मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त भाग राखून ठेवण्यात आला होता. इतक्या विस्तृत परिसराच्या मध्यभागी एक गझल गायक आपल्या साथीदारांसमवेत आपल्या सुरेल आवाजात दर्दभऱ्या गझल गात होता. सर्व परिसरात मंद प्रकाशयोजना करण्यात आली होती. एकंदरीत वातावरण सुंदर होते. लहान मुले उंट, घोड्यावरून रपेट घेत होती. आम्ही आधी जी बसण्याची जागा स्वीकारली होती तिथे सोहमला काहीसा वेगळा दर्प आल्याने आम्हांला जागबदल करावा लागला. शनिवार असल्याने मी शाकाहारी पर्याय स्वीकारला, बहुमत मांसाहारी पर्याय स्वीकारलेल्या गटाचे होते. त्यातसुद्धा चिकनचे स्टार्टर आल्यावर शाकाहारी गटातील दोघांनी न राहवून पक्षांतर केले. त्यामुळे आम्ही अगदीच अल्पमतात आलो. जेवण चांगले होते. मी शाकाहारी असलो तरी त्यावर आडवा हात मारला. बच्चेमंडळी एव्हाना पेंगुळायला लागली होती. मग आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. परतल्यावर बाकीच्या दोन बंगल्यात पाहुणेमंडळींचे आगमन झाल्याचे आढळून आले आणि त्यामुळे आमची थोडी निराशा झाली. नाहीतर त्या बंगल्यावर कब्जा करण्याची सुप्त इच्छा आम्ही मनी बाळगून होतो. पुढील पंधरा वीस मिनिटात मंडळी घरच्या कपड्यात स्थिरस्थावर झाली. एव्हाना रात्रीचे दहा सव्वादहा झाले होते. विश्रामस्थानी परतताच बच्चेमंडळीची झोप उडाली होती आणि ती पूर्ण सक्रिय झाली होती. सोहमची सौरभला उनो ह्या पत्त्यांच्या खेळात हरविण्याची सुप्त इच्छा सायंकाळपासून जागृत झाली होती. त्या दोघांच्या एकमेकाला पराभूत करण्याच्या ललकारी बराच वेळ सुरु होत्या. त्यांना आता प्रत्यक्ष खेळाचे रूप लाभले. बाजूला श्राव्या आणि स्वप्निल पत्त्यांचा नियम नसलेला मुक्त खेळ खेळत होते. थोड्याच वेळात श्राव्याचे लक्ष दुसरीकडे खेचण्यात आम्ही यश मिळविले आणि पत्त्यांवर आणि बसण्याच्या जागेवर कब्जा मिळविला. आणि मग माझा आवडता खेळ मेंढीकोट सुरु झाला. सुरुवातीला मी आणि स्वप्निल विरुद्ध प्राजक्ता आणि प्रांजली असे संघरचना होती. कट हुकुम ह्या पद्धतीने हुकुम ठरविण्यात येणार होता. मेंढीकोट ह्या खेळात आपल्या साथीदाराला खाणाखुणा करणे, पकडले न जाता लबाडी करणे ह्यावर तुमचा विजय अवलंबून असतो. ह्यातील काही तंत्रे अशी. १> लपवून हुकुम करण्याची पद्धत अवलंबली असल्यास, ज्याने हुकुम लपविला आहे तो हळूच पायाच्या हालचालीने आपल्या साथीदारास पत्ता दाखवितो. मग तो समोरचा साथीदार कान, नाक, जीभ ह्यांच्या मदतीने हुकुम लपविलेल्या व्यक्तीस हुकुम सांगतो. २> समजा तुमच्याकडे एका प्रकारचे (किल, बदाम, इस्पिक किंवा चौकट) ह्यातील एकच पान आणि तेही मेंढी असल्यास तिचे भवितव्य साथीदाराकडे असलेल्या एक्क्यावर किंवा त्याने हुकुम फोडण्यावर अवलंबून असते. अशा ते सुद्धा तुम्हांला खुणेने त्याला सांगता आले पाहिजे. बऱ्याच वेळा मेंढी जाऊ नये म्हणून आपण कट नसताना सुद्धा कट असल्याचा भाव आणून हुकुम फोडावा किंवा नवीन हुकुम करावा. पुढे प्रतिस्पर्धी जर आपल्यावर खास लक्ष ठेवून असेल तर शेवटचे एक दोन हात बाकी असताना आता सर्व मेंढ्या संपल्या असे म्हणून तो डाव संपवावा. प्रांजली आता पूर्ण फॉर्ममध्ये आली होती. किलवर हुकुम प्राजक्ताला सांगण्यासाठी तिने अचानक 'फुलाफुलांच्या घालून माळा' हे गाणे म्हणण्यास प्रारंभ केला. नियमाचे उल्लंघन होतेय हे सांगून आम्ही हा डाव फोक्स (ह्या शब्दाची व्युत्पत्ति कशी झाली असावी हा संशोधनाचा विषय!) केला. तिने अजून एक गाणे किलवर ह्या हुकुमासाठी वापरले ते आता आठवत नाही. त्यानंतर सौरभ आणि अर्पिता सहभागी झाले. आता तीन महिला विरुध्द तीन पुरुष अशी संघरचना झाल्याने शाब्दिक चकमकींना जोर चढला होता. मध्येच सौरभनेही 'मी असा कसा, मी असा कसा' असे गीत गात चौकट हुकुमाचा संकेत करण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत डाव फोक्स करून घेतला. मध्यंतरीच्या काळात महिला वर्गावर दोन कोट चढविण्यात आले होते आणि बराच वेळाने त्यांनी आमच्यावर कसाबसा एक कोट चढविला. बाजूला झोपलेले अरुण काका आपल्या अधूनमधून घोरण्याच्या आवाजाने ह्या शाब्दिक चकमकींना उत्तम पार्श्वसंगीत देत होते. शेवटी साडेबाराच्या सुमारास दोन्ही संघांनी एकमेकांच्या फसवणुकीला कंटाळून हा खेळ संपविण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे पुरुषवर्गाने हा सामना २ -१ असा जिंकला. महिला संघातील कोणी हा ब्लॉग वाचून २-१ ह्या गुणसंख्येविषयी शंका उत्पन्न करणारी कॉमेंट टाकल्यास वाचकांनी त्या कडे दुर्लक्ष करावे! (क्रमशः)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...