मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, १० नोव्हेंबर, २०१४

Happy New Book Reading



 
 पुन्हा एक शाहरुख खानचा चित्रपट आणि पुन्हा एकदा शंभर दोनशे कोटीचे आकडे!! जया बच्चनने अगदी तारतम्य नसलेला चित्रपट म्हणून ज्याची बोळवण केली त्याने सुद्धा दोनशे कोटीचा आकडा गाठावा? माझ्या सुदैवाने ह्या चित्रपटाची तिकिटे आम्हांला मिळाली नव्हती, परंतु ज्याने ज्याने हा चित्रपट पाहिला त्याने त्याने "तू वाचलास" म्हणून मला नशीबवान असे संबोधले. मध्येच मला ह्या आकड्यांच्या खरेपणाविषयी शंका यायची. हल्ली ही शंका सुद्धा घेणे मी सोडून दिले आहे. पण इतके लोक असा चित्रपट पाहतातच कसे? असा प्रश्न तरी मला पडतोच. मग मी मला वाटलेलं एक जुनंच उत्तर मी स्वतःला देतो. "लोकांना घरी शांतपणे बसता येत नाही!"

जया बच्चनने ह्या चित्रपटावर स्तुतिसुमने उधळल्यावर म्हणे शाहरुख नाराज झाला. वेळ अमिताभ बच्चन ह्यांनी त्यांची जाहीर माफी मागण्यापर्यंत गेली. ती शारूकने स्वीकारली नाही! वगैरे वगैरे! नायक नायिकेचे तथाकथित लफडे, कॉमेडी नाईट्स विथ कपिल वर आगामी चित्रपटातील सर्वांनी हजेरी लावणे ह्या प्रसिद्धीतंत्रासोबत जया बच्चन टीका नाट्य हे ही तंत्र अधून मधून स्वीकारायला हरकत नसावी.

सचिनने 'Playing It My Way' ह्या आपल्या आत्मचरित्राचे नुकतेच प्रकाशन केले. अपेक्षेनुसार लोकांची हे पुस्तक खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली. काल लोकसत्तेत ह्या पुस्तकाचे परीक्षणसुद्धा वाचलं. त्यात म्हटल्याप्रमाणे अगदी सावधपणे लिहिलेलं असं हे आत्मचरित्र आहे. मी गेल्या आठवडाभर ह्या पुस्तकाविषयी जे काही वाचतोय त्यानुसार ह्या पुस्तकात बेटिंग, Match Fixing वगैरे प्रकारांची वाच्यता नाही. नाही म्हणायला मंकी गेट, प्रशिक्षक चॅपेल असे सुरक्षित वादाचे विषय निवडण्यात आले आहेत. ""Politically Correct" म्हणता येईल असे हे पुस्तक. परंतु खूप खप झाला ह्याचा!

सचिनच्या आत्मचरित्रावर टीका करायचा मला काय अधिकार? त्याला जे योग्य वाटलं ते त्यानं लिहिलं आणि लोकांना आवडलं म्हणून त्यांनी विकत घेऊन वाचलं. ह्यात मी दुःखी का व्हावं! दुःख ह्याचं की बहुसंख्य भारतीय जनतेनं त्याला देव मानलं, त्यात एकेकाळी मीही होतो. मग हा देव ज्यावेळी चॅपेल पुराण चालू होतं त्यावेळी गप्प का बसला? कपिल देवला मार्गदर्शक म्हणून चांगली भूमिका बजावता आली नाही हे आत्मचरित्रात छापलं गेलं ते ठीक, परंतु विक्रीआधी पुस्तकाची जाहिरात चालू असताना ह्या मुद्द्याची मोठ्या ठळकपणे जाहिरात करणं देवानं का करावं? शेवटी एक गोष्ट मलाच जाणवली, "मला देव म्हणा" असं काही सचिन सांगत नाही. आपणच ती समजूत करून घेतो आणि असाच स्वतःला त्रास करून घेतो.

हल्ली मनाला जे योग्य वाटेल ते पैशाचा मोठा तोटा सहन करत करून दाखविण्याची हिंमत कोणाच्यात राहिली आहे? सगळ्या काही "Calculated Moves" असतात. ह्याला अजूनही काही अपवाद आहेत हे पाहून आनंद वाटतो. हल्लीच आर्थिक मानधनाच्या प्रश्नावरून वेस्ट इंडीज संघाने भारत दौरा अर्धवट सोडला! पुढे होणाऱ्या परिणामाची चिंता न करता! त्यांनी हे जे काही केले ते योग्य की अयोग्य ह्याचा विचार करून मी मेंदूचा भुंगा नाही करून घेणार! पण मनाशी प्रामाणिक राहण्याची त्यांची वृत्ती मला भावली. आणि हो त्यामुळे आपला संघ अनेक वर्षांनी दिवाळीला आपल्या स्वतःच्या घरी थांबू शकला! राहणेला सुद्धा आपली पहिली दिवाळी सासुरवाडी घालवता आली असेल.

लोक हजार हजार रुपये खर्च करून सिनेमे पाहतात. त्याच पैशातून पुस्तकं घेतली तर! पुस्तकांचं मला खूप आवडतं. काल अजून एका पुस्तकाचं परीक्षण वाचलं. आता शोधून पुरवणी सापडली नाही, अथवा नाव टाकलं असतं. १९७९ साली केवळ सायकलवरून महाराष्ट्र ते काश्मीर प्रवास केलेल्या मराठी माणसाचं ते पुस्तक आहे. त्या प्रवासातील अनुभव त्यांनी ह्या पुस्तकात मांडले आहेत. जमलं तर मी नक्की विकत घेणार. खिशात मोजके पैसे ठेवून चंबळ सारख्या खोऱ्यातून एकट्याने प्रवास करण्याचं धारिष्ट्य किती जणांत असणार? आणि त्यानंतर त्यांनी काश्मीरमध्ये जवळपास एक वर्ष सुद्धा घालवलं. मनाप्रमाणे वागून दाखविण्याची हिंमत आपल्यात नसली तरी ज्यांनी ही हिंमत दाखवली आहे त्यांच्या शब्दरूपातून स्वतःला अनुभवायला मला खूप आवडतं. चांगल्या पुस्तकातील येणारी काही वाक्य पूर्ण आयुष्यभर विचार करायला लावणारी असतात.

सिनेमा काय आणि संगणकावरील करमणूक काय, मनाच्या वरवरच्या थरांना स्पर्श करून जातात. चांगल्या लेखकाचं पुस्तक कसं मनाच्या खोलवर कप्प्यात शिरत आणि तिथून चांगल्या विचाराचा प्रवाह सतत आपल्याला देत राहतं. कधीकधी पुस्तकातील वातावरण, त्यातल्या व्यक्तिरेखा अशा काही हुबेहूब उतरतात की आपण त्यात खोलवर शिरून राहतो आणि त्याच्याशी एकरूप होतो.

एक निर्धार केला बुवा आपण - जमेल तसं चांगली पुस्तकं विकत घेत राहणार आपण!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...