मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, ९ नोव्हेंबर, २०१४

सिमला कुलू मनाली वीणा वर्ल्ड


गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया उंदीर मामा की जय! साधारणतः फेब्रुवारी - मार्च महिन्यातील गोष्ट, सोहमच्या परीक्षेची तयारी सुरु असताना यंदाच्या मे महिन्याच्या सुट्टीत कुठे फिरायला जायचे विषयी घरी चर्चा सुरु होती. मे महिन्याचा उन्हाळा आपल्या देशात बऱ्याच ठिकाणी असह्य होत असल्याने तसे मर्यादित पर्याय उपलब्ध असतात. अशातच वीणा वर्ल्डची मे महिन्यातील सहलींची जोरदार जाहिरात घरी वाचनात आली. आमचं एक तसं बरं असतं, आमचे बरेच महत्वाचे निर्णय फारसा विचार न करता होत असतात, अशाच प्रकारे हा निर्णय सुद्धा आम्ही झटकन घेतला आणि सुरुवातीची रक्कम भरली सुद्धा. आता मे महिन्यातील नक्की कोणत्या आठवड्यातील सहल बुक करायची हा प्रश्न लग्नाच्या वाढदिवसाने सोडविला. मुंबईतील आयुष्य किती धकाधकीचे असतं हे पुन्हा एकदा इथे मी सांगू इच्छित नाही. एखादी गोष्ट अगदी गळ्यापर्यंत येऊन पोहोचली की मग आपण तिच्या मागे लागतो. सहलीच्या तयारीचे सुद्धा असेच झाले. प्राजक्ता आणि वीणा वर्ल्ड ह्यांचा सुसंवाद चालूच होता. आमचं तसं ठीक असतं. म्हणजे मी मोजक्या मोठ्या गोष्टींची चिंता करतो आणि ती सर्व गोष्टींची काळजी घेत असते. ह्या सहलीच्या तयारीत माझा सहभाग तिला वेळेवर पैसे भरण्याची आठवण करून देणे, ई तिकीट वीणावाले आधी का देत नाहीत हा प्रश्न विचारणे आणि आधार कार्ड तयार ठेवणं ह्या पुरता मर्यादित असल्याची समजूत मी करून ठेवली होती. पण शुक्रवारी संध्याकाळी अचानक एक नवीन बॅग खरेदी करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली. सुदैवाने ऑफिसच्या कामाने शनिवारी दगा न दिल्याने ही जबाबदारी मी यशस्वीरित्या पार पाडली. मे महिन्याच्या सुट्टीचा वसईला आनंद लुटत असलेल्या सोहम आणि प्राजक्ता ह्यांचे वसईहून शनिवारी सायंकाळी बोरीवलीला आगमन झाले. आणि मग बॅगा भरायच्या कार्यक्रमाला जोर चढला. हा कार्यक्रम साडेनऊ - दहापर्यंत आटोपला. सकाळी साडेसहा वाजता विमानतळावर हजर व्हावे असे वीणा वर्ल्डने सुचविले / सांगितलं होते. त्यामुळे पावणेसहाची टॅक्सी मी आरक्षित करून ठेवली होती. चारच्या गजराला सोहम स्वतःहून उठला. ऑफिसात काम करताना महत्वाच्या मोजक्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची सवय मला लागली आहे. परंतु ह्या बाबतीतील प्राजक्ताच्या संकल्पना वेगळ्या आहेत. सकाळी चार वाजता उठून सैंडविच बनविण्याच्या तिच्या प्रस्तावाला विरोध करण्यात अर्थ नाही हे इतक्या वर्षाच्या अनुभवाने मी शिकलो आहे आणि त्यामुळे ह्या प्रस्तावावर उद्बोधक चर्चा करण्याचे मी टाळले! पण कौतुकाची गोष्ट म्हणजे ह्यानंतर सुद्धा आम्ही पावणेसहा वाजता तिघेजण तयार होतो. सव्वापाच वाजता मला टॅक्सी कंपनीचा SMS आल्याने मी तसा निर्धास्त होतो. परंतु नियोजित वेळी म्हणजे पावणेसहा वाजले तरी चालकाचा मागमूस दिसत नसल्याने मी त्याला त्याच्या भ्रमणध्वनीक्रमांकावर संपर्क करण्याचे ठरविलं. मुंबईत तुम्ही टॅक्सी आरक्षित केली असेल तर आपल्या उत्तर भागातील देशवासीय तुमचा चालक असल्याची शक्यता ९८ टक्क्याच्या वर असावी असा माझा प्राथमिक अंदाज आहे. गडी झोपेतून नुकताच उठला असावा. तो नक्की कोठे आहे आणि माझे घर नक्की कोठे आहे ह्यावर चर्चा करण्यात आम्ही काही वेळ घालविला. मग काही प्रयत्नानंतर आमची इमारतीच्या खाली भेट झाली. अरविंदकुमार यादव ह्यांनी आम्हाला पुढील वीस ते पंचवीस मिनिटात विमानतळावर पोहोचवलं. 'On the edge of the seat' ह्या इंग्रजी म्हणीची त्याने आम्हांला ह्या प्रवासात आठवण करून दिली. तो वाटेतील बहुतेक सर्व गाड्यांना मागे टाकीत असल्याने सोहम आनंदित होता. नोंदीसाठी ह्या प्रवासाचे भाडे ३६७ रुपये झाले. शंभर वर्षानंतर कोणी हा ब्लॉग वाचला तर त्याने अचंबा व्यक्त करावा म्हणून ही नोंद! अरविंदकुमार ह्यांच बिल चुकतं करून आम्ही विमानतळावर प्रवेश करण्याच्या तयारीत असतानाच वीणा वर्ल्डच्या जोशी ह्यांनी आम्हांला आमच्याकडील बॅगावरून ओळखले. आता आमची तिकिटांची चिंता मिटली होती. सोहम आता चेकइनच्या बॅगा खेचण्याइतपत मोठा झाल्याने आम्ही एकंदरीत मजेत होतो. चेकइनच्या रांगेत मोदीराज्यातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (हे प्रवासवर्णन २०१४ च्या मे महिन्यातील आहे) त्यातील बहुतेकांकडे आंब्यांच्या पेट्या दिसत होत्या. पुन्हा जेव्हा कधी मे महिन्यात भारतात फिरायची वेळ येईल तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवण्याचा मानस प्राजक्ताने व्यक्त केला. सुरक्षातपासणीच्या आधी पाणी आणि सैंडविच संपविणे आवश्यक असल्याने आम्ही ते काम तत्परतेने पार पाडले. गो एयरच्या छोटेखानी विमानातील स्वच्छता वाखाणण्याजोगी होती. सुटण्याआधी एका अतरंगी वेष परिधान केलेल्या प्रवाशाला कर्मचारी विमानाबाहेर घेऊन गेले त्यावेळी आम्ही चिंतीत झालो. तो बहुदा चुकीच्या विमानात शिरला असावा अशी समजूत आम्ही करून घेतली. विमानाच्या कप्तान सोनिया ह्यांनी सर्वांचे स्वागत केले. ह्या प्रवासासाठी एकंदरीत अडीच तास लागतील असे त्यांनी घोषित केले. विमान बऱ्यापैकी वेळेवर निघाले. सोहमने खिडकीची जागा पटकावली होती. परंतु खाली दिसणारा गुजरात, राजस्थान (हा आमचा अंदाज) रखरखीत भाग त्याला काहीसा आवडला नाही आणि त्यामुळे मला खिडकी देण्यात आली. ह्या रखरखीत भागाचे एक छायाचित्र! 

जसजसं चंदीगड जवळ येऊ लागलं तसतसं शालेय जीवनात शिकलेल्या 'चंदीगड हे एक सुनियोजित शहर आहे' ह्या विधानाची आठवण देणारी दृश्य खिडकीतून दिसू लागली. प्राजक्ताला वीणा वर्ल्डने सांगितल्याप्रमाणे विमान पावणेअकरा वाजता म्हणजेच सव्वादोन तासाच्या प्रवासानंतर चंदीगडला उतरलं. विमानतळावर उतरल्यावर आमच्या बॅगा मिळवण्यात फारशी अडचण आली नाही. ह्या विमानतळावरील वातावरण सोनियाच्या अपेक्षित आगमनाने भारून गेलेलं होते. एका वैमानिक कप्तानाच्या आगमनासाठी इतकी सुरक्षा व्यवस्था का असा प्रश्न मला पडण्याआधीच ही सोनिया म्हणजे बाळ राहुल ह्यांची माताश्री असल्याचं आम्हांला सांगण्यात आले. वीणा वर्ल्डचे जितेश हे ह्या सुरक्षाव्यवस्थेमुळे आत येऊ शकले नाहीत. आम्ही वीणा वर्ल्डच्या सदस्यांनी जमेल तितका एक गट करून बाह्यविभागात प्रवेश केला. तिथे पिवळ्या रंगाच्या टी शर्ट मध्ये जितेश हे वीणा वर्ल्डचा झेंडा घेऊन हजर होते. पुढे आठ दिवस हा टी शर्ट आणि झेंडा ह्यांनी आम्हांला 'ये पिला रंग अब मुझे छोडे ना!' ह्या गाण्याची (लाल ऐवजी पिवळा रंग वापरण्याची मुभा आम्हाला असावी!) आठवण करून दिली. सोनियाप्रभावामुळे बस पार्किंग लॉटमध्ये असल्याने आम्हांला तिथपर्यंत बॅगा न्याव्या लागल्या. ह्या क्षणापासून ते पुढील रविवारी ह्याच विमानतळावर प्रवेश करेपर्यंत आम्हांला एकदाही ह्या जड बॅगा परत उचलाव्या लागल्या नाहीत. वीणा वर्ल्डचे ह्या बाबत आभार मानावे तितके थोडे! बसमध्ये सर्व मंडळी स्थानापन्न झाल्यावर जितेश ह्यांनी सर्वांचे स्वागत करून त्या दिवसाच्या कार्यक्रमाची थोडक्यात माहिती करून दिली. प्रत्येकाला दिलेले आसनक्रमांक आठ दिवसाच्या प्रवासात कायम राहणार होते. दररोज प्रत्येक सदस्याला एक बिसलेरीची पाण्याची बाटली सकाळी देण्यात येणार होती. बाहेरील पाणी प्यायचं टाळा असा प्रेमळ सल्ला द्यायला जितेश विसरला नाही. बसमध्ये पडदे नव्हते. दिल्लीतील १६ डिसेंबरच्या निर्भया प्रकरणानंतर दिल्ली, पंजाब, हरयाणा ह्या राज्यांत सर्व सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बसमध्ये पडदे लावण्यास बंदी घालण्यात आली आहे अशी माहिती जितेशने दिली. ह्या भागात सार्वजनिक ठिकाणी मद्यपानास बंदी आहे अशी काहीशी आश्चर्यकारक माहिती आम्हांला मिळाली. दहा मिनिटातच आमची बस जेवणासाठी एका चांगल्या हॉटेलात थांबली. तिथे थोड्या वेळातच आमच्यासाठी एका स्वतंत्र विभागात बुफे पद्धतीचे जेवण मांडण्यात आले. पदार्थांमध्ये विविधता होती आणि मांसाहारी जेवण एका कोपऱ्यात ठेवण्यात आले होते. पुढील आठ दिवसात मांसाहारी जेवण एका कोपऱ्यात ठेवण्याची पद्धत कायम राखण्यात आली. अमेरिकेत असताना बुफे पद्धतीत आपण जेव्हा पुन्हा पदार्थ वाढून घ्यायला जातो त्यावेळी नवीन प्लेट घेण्याची एक उत्तम पद्धत आहे. उष्टं घेवून परत जाऊ नये हा हेतू! भारतात सुद्धा काही ठिकाणी ही पद्धत अवलंबितात. ही पद्धत सर्वत्र अंमलात आणावयास हवी. म्हणजे पहा ना, ज्यात मांसाहारी पदार्थ खाल्ले गेले तीच प्लेट घेऊन एखादा भाजी घेण्यास परत गेला, तर ते नक्कीच कट्टर शाकाहारी माणसास आवडणार नाही! जेवणानंतर बस येण्यास पाच दहा मिनिटे उशीर झाला. तितक्या वेळात सोहम आणि बच्चेमंडळीनी फिश टँक मधील माशांचे परीक्षण / विश्लेषण करून मग त्यांच्यासोबत फोटो काढून वेळ सार्थकी लावला! केसरी ग्रुपचा एक प्रवासी गट ह्याच हॉटेलात जेवण्यासाठी उतरला होता. बसची वाट पाहता पाहता नव्यानेच ओळख होत असलेल्या सह्प्रवाशांसोबत सिमला मनालीत तापमान किती असेल ह्याच्या गप्पा झोडण्यात मजा आली. बसमध्ये प्रवेश केल्यावर जितेशनं सिमल्याचा प्रवास एकंदरीत १२२ किमी असून मध्ये फक्त एकदा बस चहासाठी थांबेल अशी माहिती देईल. त्याआधी हिमाचलच्या हद्दीवर टोल भरण्यासाठी चालक उतरेल हे ही सांगण्यास तो विसरला नाही. बसचा प्रवास सुरु झाला होता. आखीवरेखीव चंदीगड शहर आणि विविध सेक्टर नजरेआड होत होती. रस्त्यावर चालणारी माणसे अगदी अभावानेच दिसत होती. आम्ही आणि नाशिकचे कुलकर्णी कुटुंबीय ह्या दोघांचेही तीन तीन सदस्य. बसमध्ये दोन दोन सीटच बाजूबाजूला असल्याने आई-मुलगा अशा दोन जोड्या आणि मी व अमोल कुलकर्णी अशी बैठक व्यवस्था सुरुवातीला करण्यात आली. बसमधून दिसणाऱ्या चंदीगड शहराच्या एकंदरीत दृश्यावरून ह्या शहरातील सर्वच लोकांची आर्थिक स्थिती म्हणावी तितकी चांगली नाही ह्यावर आम्हां दोघांचे एकमत झाले. बस आजूबाजूच्या एखाद्या महत्वाच्या ठिकाणाजवळून जात असेल तर जितेश तत्काळ सर्वांना माहिती देई. पिंजोर येथील कौशल्या धरण, HMT चा ट्रॅक्टर कारखाना आणि सुप्रसिद्ध गार्डन ह्यांची माहिती जितेशने आम्हांला दिली. आता माहितीमायाजाळावर ह्या स्थळांची गुगलदेवता तपासणी केल्यावर ही सुद्धा सुंदर ठिकाणे असल्याचे जाणवलं. पण वेळेअभावी त्यांना भेट देणे शक्य नव्हतं. १:५० च्या सुमारास टोलनाका येऊन गेला आणि हळूहळू चढ सुरु झाला. सुरवातीला माझा उत्साह असल्याने ह्या सगळ्या स्थळांच्या नोंदी मी ठेवल्या आहेत हे सांगू इच्छितो! आता चढ चांगलाच स्थिरावला होता. बस नागमोडी वळणे घेत होती आणि खिडकीतून दिसणारं खोल दरीच विहंगम दृश्य जसं मनाला सुखावत होत त्याचप्रमाणे हृदयाचा ठोकाही चुकवत होत. समजा चुकून ड्रायव्हरकडून एक चूक झाली तर? हा प्रश्न सतत मनात उद्भवत होता. आमचा ड्रायव्हर मात्र जबरदस्त होता. त्याचे बसवर व्यवस्थित नियंत्रण होते. उगाच वेगाने बस चालवायची त्याची सवय नव्हती. आणि समोरून वेगाने येणाऱ्या चालकांमुळे आपली स्थितप्रज्ञता तो गमावून बसत नव्हता. मुंबईत रिक्षावाला आणि बेस्ट ड्रायव्हर ह्यांच्या सोबत कार चालविताना ह्या ड्रायव्हरचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याची नोंद मी मनातल्या मनात केली. मध्येच एकदा टिंबर ट्रेल हे हॉटेल उजव्या बाजूने गेलं. ह्या हॉटेलची जी रस्त्याबाजुला इमारत होती तिथून दरीवरून उंच शिखरात एक केबल कार गेली आहे. उंच शिखरात ह्या हॉटेलचा दुसरा भाग आहे. लोकांना ह्या उंच शिखरातील वास्तव्य खूप भावतं. बडे लोक बडी पसंद! बाकी काय? हिमाचल प्रदेशात ह्या डोंगराळ भागात सलग असा सपाट भाग मिळत नाही. त्यामुळे थोडा थोडा सपाट भाग निर्माण करून पायऱ्यापायऱ्यांची शेती (Step Farming) केली जाते, ही माहिती जितेशने दिली. मध्येच ड्रायव्हरने बसला प्रती लिटर ५४.४६ ह्या दराचे २५७. ४४ लिटर डीजेल पिऊ घातले. एकूण बिल १४०२० रुपये झाले. पुन्हा एकदा ही नोंद १०० वर्षानंतरच्या वाचकांसाठी! पुढे मग कालका सिमला टॉय ट्रेनचा ट्रॅक बाजूने गेला. १९०३ साली कोण्या ब्रिटीश अधिकाऱ्याने दोन वर्षात मनुष्यबळाच्या मदतीने ह्या ट्रॅकचे काम केले आहे. अजून एकदाही ह्यावर मोठा अपघात झाला नाहीय! अधिक माहितीसाठी http://en.wikipedia.org/wiki/Kalka%E2%80%93Shimla_Railway आम्ही सोलन जिल्हा, थाना धर्मपुर इथे प्रवेश केला आहे असे रस्त्यावरील पाटी सांगत होती. हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२ होता. आजूबाजूचा मार्ग आमच्यासमोर नयनरम्य दृश्यांचा नजराणा सातत्याने पेश करीत होता. धावत्या बसमुळे हा नजराणा कॅमेरात पकडायला कठीण जात होते. परंतु बसमधील जिद्दी मंडळी आपले प्रयत्न चालूच ठेवत होती. अशाच एका नयनरम्य ठिकाणी जितेशने गाडी दुपारच्या चहासाठी थांबविली. पावसाळी ढग आकाशात जमा झाले होते आणि थंडीचा प्रभाव जाणवू लागला होता. बसमधून उतरलेली मंडळी आपल्याजवळील गरम कपड्याचा हिशोब लावण्यात गर्क होती आणि हे कपडे कोठे मिळतील ह्याची चौकशी सुरु होती. जितेशने एव्हाना गल्ल्याजवळील सीट पटकावली होती आणि बच्चेमंडळीच्या चॉकलेट , बिस्कीटच्या मागण्या पूर्ण करण्यात तो गुंग झाला होता. आपलाच माणूस गल्ल्यावर पाहून बच्चेमंडळींचा आत्मविश्वास दुणावला होता. रस्त्याच्या कडेला मधूनच माकडं दिसत होती. त्यांच्या दर्शनाने कुलकर्णी ह्यांचा पहिलीतील मुलगा निशाद ह्याला खूप आनंद होत होता. न राहवून तो म्हणाला, "माकडांचा बाजार भरला की!" चहापानानंतर बस सिमल्याच्या दिशेने धावू लागली. पाऊस अधूनमधून हजेरी लावत होता. सिमला जवळ येत चाललं होतं आणि बाजूच्या दरीची खोली अजूनच वाढत चालली होती. अशा वातावरणात जेव्हा ढगांशी लपाछपी खेळणारा सूर्य मधूनच आपल्या पिवळ्याजर्द किरणांसहित आपल्याला दर्शन देतो त्यावेळी मन कसं प्रसन्न होते. मध्येच डोंगरात सपाटी निर्माण करून बनविलेला सिमला विमानतळ सुद्धा आम्हांला दुरून दाखविण्यात आला. हॉटेल जवळ येत चाललं होतं, जितेशने प्रत्येकाच्या खोल्या घोषित केल्या आणि बॅगा रूमवर पोहोचविल्या जातील हे सांगितले.सिमला इथे आम्ही 'हॉटेल आशिया द डॉन (Dawn)' ह्या हॉटेलात उतरलो होतो. त्याच्या बाह्यदर्शनाने आम्ही काहीसे खट्टू झालो. आत वेलकम ड्रिंकने आमचे स्वागत करण्यात आले. खोलीमध्ये प्रवेश केल्यावर थंडावा खूप जाणवत होता. स्वच्छतेला काहीसा वाव होता. बऱ्याच कुटुंबियांच्या गृहमंत्र्यांनी स्वागतकक्षाला फोन लावण्याची नवरोबांना आज्ञा केली किंवा स्वतः फोन लावले. थोड्याच वेळात स्थिती काहीशी सुधारली. रूममधून दिसणारे हे विहंगम (?) दृश्य! रात्रीचे जेवण व्यवस्थित होते. आमचा मित्र बटाटा विविध डिशमध्ये वेगवेगळी अनपेक्षित रूपे घेऊन हजर होता. जितेश प्रत्येक टेबलवर येऊन दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची माहिती देत होता आणि कोणाला काही अडचणी असल्यास त्यांचे निवारण करीत होता. दुसरा दिवशीचा कार्यक्रम अगदी गच्च भरलेला असणार असे त्याने आधीच आम्हांला बजावलं. सकाळी साडेसहा वाजता निद्रामोड कॉल करण्याचे आश्वासन देऊन त्याने आमचा निरोप घेतला. सिमल्याच्या त्या थंडीत थकलीभागली शरीरे केव्हा निद्राधीन झाली ते कळलेच नाही! सकाळी जाग आल्यावर खिडकीबाहेर नजर गेली तर फटफटीत उजाडलं होतं. मी दचकून जागा झालो, निद्रामोड कॉल करायला मंडळी विसरली की काय अशी शंका मनात डोकावली. घड्याळात पाहिलं तर साडेपाचच वाजले होते. त्यामुळे थोड्या बिनधास्तपणे आम्ही आंघोळ वगैरे आटपून घेतली. नियोजित वेळी साडेसातला आम्ही नास्त्यासाठी हजर झालो. तिथे पोहे, प्रिय मित्र आलूची आमटी आणि भटुरे असा मोहविणारा बेत होता. आलुचा अतिरेक आता सर्वांना जरा खटकायला लागला होता. पोटभर नास्ता करून आम्ही बाहेर पडलो. बस निघायला अजून थोडा वेळ होता. बाहेरच आम्हांला पुण्याचे जतिन चुरमुरे कुटुंबीय भेटले. त्यांच्याशी गप्पा मारताना ते मुळचे वसईचे असल्याचे कळले. गावचा माणूस भेटल्याने मला खूप आनंद झाला. सव्वा आठ वाजता आम्ही प्रयाण केले. आज सकाळी आमच्या बसमध्ये आदित्य भोईटे हे व्यवस्थापक म्हणून उपस्थित होते. त्यांनी दिल्लीहून येणारा ग्रुप बसने आणला होता. काही कारणामुळे त्यांच्या बसला उशीर झाल्याने तो गट रात्री बाराच्या सुमारास हॉटेलात पोहोचला होता. तरीसुद्धा तो ग्रुप सकाळी वेळेवर हजर होता. चंदीगडहून आणि दिल्लीहून आलेल्या अशा दोन गटाच्या बसेस बरोबरीने नाल्देहरा गोल्फ कोर्सच्या दिशेने सुटल्या. प्रत्येक वेळी बस सुटताना बस व्यवस्थापकाच्या बरोबरीने आम्ही गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया उंदीर मामा की जय! असा घोष करीत असू. गोल्फ कोर्सचा प्रवास अगदी वळणावळणाचा होता. भरपेट न्याहारी केलेल्या बालकांना ह्या वळणावळणाच्या रस्त्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे बालकांभोवतीचा भाग अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आला. पूर्व दक्षता म्हणून घेतलेल्या गोळ्यांचा काहीजणांना फायदा झाला तर काहींना नाही. व्यवस्थापकांनी सर्वांना प्लास्टिकच्या पिशव्यांचा पुरवठा करून ठेवला होता. इतक्या उंचीवर संतुलितपणे गाडी हाकण्याचे ड्रायव्हरचे कौशल्य वाखाणण्याजोगे होते. शेवटी एकदाचे आम्ही नाल्देहराला पोहोचलो. तिथला इतिहास सांगणारा हा बोर्ड! गोल्फ कोर्सचे सौंदर्य वाखाणण्याजोगे होते. इतक्या उंचीवर १ वर्षापूर्वी गोल्फ कोर्स निर्माण करणाऱ्या ब्रिटिशांचे कौतुक करावे की त्या काळात सामान्य जनतेवर अन्याय करीत असे श्रीमंती चोचले करणाऱ्या त्यांच्या वृत्तीचा निषेध करावा अशा मनःस्थितीत मी सापडलो होतो. गोल्फ कोर्सचा प्रत्यक्षातील वापर फक्त सभासदांपुरता मर्यादित असल्याने आम जनतेसाठी तिथे झीपिंगचा प्रकार आयोजित करण्यात आला होता. प्राजक्ता आणि सोहम ह्या दोघांनी ह्या साहसी क्रीडाप्रकारचा आनंद लुटला. ह्या प्रकारात एक हात वरच्या पुलीवर ठेवायचा होता आणि दुसरे टोक आल्यावर हा हात त्या झिप वायरवर आणून वेग नियंत्रित करायचा होता. परंतु काहीजणांना ह्या वायरवर हात आणायच्या भागाचे महत्व न कळल्याने दुसऱ्या टोकाशी त्यांना काही क्षणापुरता उलट्या स्थितीचा अनुभव करावा लागला. ह्याच ठिकाणी हिमाचलीय पारंपारिक वेशात फोटो काढून घेण्याची सोय होती. हे फोटो रूमपोच केले जाणार होते. त्यामुळे तिथेही उत्साही लोकांची रांग लागली होती. तिथल्या एका हिमाचलीन युवतीच हे छायाचित्र! वीणा वर्ल्डचा चहा, कॉफीचा आम्ही आस्वाद घेतला. त्यानंतर आम्हांला फ्रुट प्लेटचा (फळ थाळी) सुद्धा आनंद लुटता आला. ह्यात सुद्धा आमचा मित्र बटाटा आल्याचे पाहून आम्ही सर्द झालो. उत्साही गणांनी बटाटा हे फळ आहे काय यावर बौद्धिक चर्चेस सुरुवात केली. ह्यानंतर आम्ही पावसाळी वातावरणात आम्ही जंतरमंतर अर्थात Amusement पार्कच्या दिशेने कूच केले. पावसाने जोर पकडला होता. ह्या जंतरमंतर पार्कला जायचा मार्ग अगदीच अरुंद होता. आमच्या कुशल ड्रायव्हरने तो लीलया पार केला आणि आम्हांला तिथे पोहोचवले. पावसामुळे बाह्य विभागातील करण्यासारख्या लीला (Outdoor Activities) जशा की गो कार्टिंग बंद ठेवण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे जाणकार बालगोपाल मंडळी नाखूष झाली. ह्याच ठिकाणी दुपारच्या भोजनाची सोय करण्यात आली होती. इथले भोजनालय आकाराने काहीसे छोटेसे असल्याने आणि त्याचवेळी केसरीचा अजून एक गट तिथे आल्याने काहीशी गर्दी झाली होती. आता काहीसं पर्यटकांच्या प्रकाराविषयी. पर्यटकांचे विविध प्रकार असू शकतात हे ह्या सहलीत आम्हांला जाणवलं. २०११ मधील केरळ सहल असो की गेल्या वर्षीची सापुतारा सहल असो, आम्ही एकट्यानेच प्रवास केला होता. ह्या प्रकारात आपण बहुदा उत्तमोत्तम हॉटेल्स बुक करतो, जेवणखाण्याची उत्तम सोय असते. परंतु समुहाचा भाग बनून एखाद्या स्थळाचा आनंद लुटण्याची संधी आपण गमावतो. समूहातील लोकांनी केलेल्या गंमतीजंमती, त्यांचे विनोदी संवाद, काही जणांच्या मजेशीर सवयी ह्यातदेखील धमाल असते हे ह्यावेळी आम्हांला जाणवलं. त्याचप्रमाणे मुलांना खेळण्यासाठी सवंगडी मिळतात आणि त्यामुळे आपली जबाबदारी सुद्धा कमी होते. त्यामुळे लांब ठिकाणच्या सहलीत आता अशा गटाने प्रवास करण्याकडेच आमचा कल राहील. त्याचबरोबर आमच्या गटातसुद्धा विविध व्यवसायातील यशस्वी माणसे होती. थोडसं निरीक्षण केलं तर प्रत्येकाकडून शिकण्यासारखं असं बरंच काही होतं. केल्याने देशाटन अंगी येते शहाणपण असे म्हणतात त्यात हा भागही आलाच की! अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांना सुद्धा असं काही शेयर करण्याची, काहीशी गैरसोय सहन करण्याची सवय असावयास हवी. नाहीतर अगदी लहानपणापासून त्यांच्यात स्वतःला सर्व काही उत्तमोत्तम मिळावयास हवं अशी जी भावना निर्माण होते ती पुढे धोकादायक ठरू शकते. असो पण काही लोक खरोखर एकलकोंडे ह्या प्रकारात मोडतात. त्यांना अनोळखी माणसांचा अगदी जवळचा सहवास फारसा खपत नाही. त्यांनी आपली एकट्याने प्रवास करण्याची सवय कायम ठेवणेच योग्य. बाह्यलीला बंद असल्याने जंतरमंतर पार्कातील अंतर्गत लीलांकडे मंडळी वळली होती. तिथे ५D राइड, टक्करकार आणि भयमहाल असे तीन प्रकार होते. ह्या प्रत्येक प्रकाराचे वैयक्तिक भाडे २०० रुपये असले तरी वीणा वर्ल्डच्या पर्यटकांना सवलतीच्या दरात ह्या तिन्ही प्रकारांची एकत्रित फी ३०० रुपये होती. आता बालक जायचे म्हटले की पालकाला अजिबात इच्छा नसली तरी जावे लागणारच हे ओघाने आलेच की! आमचा प्राधान्यक्रम चुकला आणि आम्ही ५D राइडच्या रांगेत बराच वेळ तिष्ठत उभे राहिलो. ही राईड तशी ठीक होती. हलणाऱ्या खुर्चीवर आम्हाला बसविण्यात येऊन आमच्यासमोर गुरुत्वाकर्षणाचे सर्व नियम झुगारून देणारी आणि केव्हाही उंचावरून जमिनीवर आपटू शकण्याची शक्यता निर्माण करणारी दृश्ये दाखविण्यात येत होती. पायाजवळ पाण्याचा फवारा वगैरे मारण्यात येत होता. हल्लीच्या मुलांना ह्या प्रकारात काही भीती वाटत नसली तरी केवळ मजेपोटी ती किंचाळ्या वगैरे मारीत होती. अशा दोन वेगवेगळ्या राईड नंतर हा प्रकार संपला. एव्हाना वीणा वर्ल्डवाले आमच्या नावाने शंख करू लागले होते. त्यामुळे बाकीच्या दोन लीलांकडे दुर्लक्ष करून आम्ही बसमध्ये जाऊन बसलो. आता आमची बस हिमालयन झूच्या मार्गी लागली होती. ह्या झूच्या अगदी शेवटापर्यंत जाण्याचा रस्ता नसल्याने एका विशिष्ट बिंदूपाशी आम्हांला सोडून तिथून सुमो, तवेरा इत्यादी वर्गातील गाड्यांमधून झू मध्ये जाण्याची सोय करण्यात आली होती. भ्रमणध्वनीच्या कॅमेरावर निशुल्क फोटोग्राफीची मुभा असली तरी खऱ्या कॅमेरावर छायाचित्रणासाठी पंचवीस रुपये शुल्क होते. ते आम्ही भरले. वातावरण अगदी कुंद झालं होते. छत्री घेऊन नैसर्गिक वातावरणात राहणाऱ्या ह्या प्राण्यांना पाहणे हा एक नक्कीच आनंददायी अनुभव होता. तिथल्या विविध प्राण्यांची ही छायाचित्रे! हे मात्र प्राणी नव्हेत! :) अशा प्रकारे जवळपास अर्ध्या तासाचा झूचा प्रवास आटपून आम्ही जवळच असलेल्या इंदिरा गांधी स्मारकाला भेट दिली. हा सिमलामधील सर्वात उंच बिंदू असून (समुद्रसपाटीपासूनची उंची अंदाजे २६०० मीटर) सिमल्यात सर्वात पहिली हिमवर्षाव ह्या भागात होतो अशी माहिती आदित्य भोईटे ह्यांनी दिली. ह्याच ठिकाणी इथेच इंदिरा गांधी आणि झुल्फिकार (बहुदा) भुत्तो ह्यांची भेट झाली होती. त्यावेळी सिमलावासियांची ह्या ठिकाणी गर्दी उसळली होती. ही गर्दी ह्या मातबर राजकारण्यांना पाहण्यासाठी नसून भुत्तो ह्यांच्यासमवेत आलेल्या त्यांच्या अतिसुंदर कन्येला पाहण्यासाठी होती असा खुलासा ज्यावेळी आदित्याने केला तेव्हा आमच्या गटात हास्याची खसखस पिकली. चहा, कॉफीपानाचा कार्यक्रम आटपून आम्ही पुन्हा छोट्या गाड्यांत बसून बसच्या दिशेने निघालो. छोट्या गाड्यांत बसण्याआधी याकचे दर्शन झाले. आता आम्ही सुप्रसिद्ध सिमला मॉल रोडवर जाणार होतो. काही बालके भिजल्याने त्यांच्या मातांनी हॉटेलवर परतण्याचा निर्णय घेतला. सिमला मॉल तीन पातळ्यांवर विभागला गेला आहे आणि प्रत्येक पातळीची स्वतःची अशी खासियत आहे. आदित्य आम्हांला हे अत्यंत विस्तृतपणे समजावून देत होता. परंतु माझे त्याच्याकडे फारसं लक्ष नव्हतं. आम्हांला सोडून बस हॉटेलकडे रवाना झाली. दोन उद्वाहकांचा वापर करून आम्ही मॉलरोडवर आलो. तिथे आम्हां सर्वांना वीणावर्ल्ड तर्फे पॅटीस, बर्गर अशा पदार्थांची छोटेखानी ट्रीट देण्यात आली. वातावरण अगदी थंड झाले होते. त्यामुळे तिथल्या चहा, कॉफीने बरे वाटले. इथे उतरण्याआधी खरेदी करण्यासाठी कुलू शाल फॅक्टरी आणि मनाली मार्केट उत्तम असा प्रेमळ सल्ला आम्हांला देण्यात आला होता. वीणा वर्ल्डचे हे अनुभवी बोल नवरेलोकांनी मोठ्या खुशीने मानले. आम्ही आणि कुलकर्णी कुटुंब ह्यांनी आपला मोर्चा वरच्या पातळीवर असणाऱ्या चर्चकडे वळविला. ह्या चर्चच्या मार्गावरून सिमल्याचे दिसणारे हे विहंगम दृश्य. हे चर्च उत्तर भारतातील दुसऱ्या क्रमाकांचे सर्वात जुने चर्च आहे. त्याची ही काही छायाचित्रे! इथेच इंदिरा गांधीचा एक सुंदर पुतळा आहे! पुन्हा काही वेळ कौटुंबिक छायाचित्रणासाठी! खाली उतरल्यावर चेरी खरेदी करण्यात आली. ह्या रस्त्यावर स्थानिक खाद्यपर्दाथांची रेलचेल होती. पण बर्गर, पॅटीसने पोट भरली असल्याने त्याचा आस्वाद घेण्याची आमची फारशी इच्छा झाली नाही. साडेसात वाजेस्तोवर आदित्य, जितेश ह्यांनी सर्व कुटुंबियांची हजेरी (चांगल्या अर्थाने!) घेत सर्वजण परत आल्याची खातरजमा करून घेतली. एव्हाना ह्या हजेरी प्रकरणामुळे आम्ही सर्वजण एकमेकांना चांगले ओळखू लागलो होतो. वेळा सकर आणि राठी कुटुंबियातील फक्त यजमान ह्या ठिकाणी आले होते. त्यांनी वैविध्यपूर्ण फळांची (अप्रीकोट वगैरे) खरेदी करून आपल्या गृहकृत्यदक्षतेचा आम्हाला अनुभव आणून दिला! आमची बस हॉटेलवर गेल्याने आता आमची सोय हिमाचल प्रदेश परिवहन निगमच्या बसमध्ये करण्यात आली. त्यात आम्ही सर्व बसल्यावर त्या बसच्या ड्रायव्हरने मुक्तपणे बस चालवीत आम्हांला हॉटेलवर आणून सोडले. ह्यात वीणा वर्ल्डच्या आयोजन कौशल्याची दाद द्यावी इतकी थोडी! त्यांनी हिमाचल प्रदेश परिवहन निगमच्या बस उपलब्ध करून देण्याची दक्षता घेतली होती. हा दिवस जितेशने म्हटल्याप्रमाणे बराच लांबला होता. अजून स्वपरिचयाचा (introduction) कार्यक्रम बाकी होता. ठीक साडेआठ - पावणेनऊच्या सुमारास हा कार्यक्रम सुरु झाला. दोन्ही बसचा मिळून एक मोठासा गट बनला होता. ह्यात डॉक्टर, पी. एच. डी धारक, ज्येष्ठ पोलिस अधिकारी, भ्रष्टाचारविरुद्ध काम करणारे, आयकर विभागात काम करणारे अशा विविध लोकांचा समावेश होता. भ्रष्टाचारविरुद्ध काम करणाऱ्या महिलेचा दूरध्वनी क्रमांक जाणून घेण्यात सर्वांनी रस दाखविला, तर आयकर विभागात काम करणाऱ्या गृहस्थांना आम्ही आमचा नंबर देणार नाही असे मजेत सांगितलं! मग वीणा वर्ल्डच्या टीमने आपली ओळख करून दिली. आदित्य गेली दहावर्षे ह्या क्षेत्रात आहे तर जितेश गेली पाच वर्षे! आदित्याची ही हिमाचल प्रदेशाची एकशेएकतिसावी सहल तर जितेशची पस्तिसावी! अशा अनुभवी लोकांसोबत आपण प्रवास करतो आहोत ही भावना सुखदायक होती! शेवटी त्यांनी पुढील दिवसाचा कार्यक्रम समजावून सांगितला. दुसऱ्या दिवशी आम्ही मनालीला कूच करणार होतो. हा प्रवास २७५ किमी इतका होता. त्यामुळे काहीसे लवकर निघावे लागणार होते. सकाळी पाच वाजताच गरम पाणी सोडण्याचे आश्वासन देऊन आदित्यने आम्हांला जेवणासाठी मोकळे केले. आता थोडंच खाल्लं पाहिजे असा केलेला निर्धार समोरील सुग्रास जेवण पाहून पुन्हा एकदा मोडून पडला!!! सिमल्यातील सर्व प्रेक्षणीय स्थळे पाहताना दुसरा दिवस काहीसा दमवणूक करणारा ठरला होता. आणि तिसऱ्या दिवशी मनालीचा २७५ किमीचा पल्ला गाठायचा होता. दोन दिवसात हॉटेल डॉन मध्ये काही प्रमाणात संसार मांडला होता. हा संसार रात्रीच सावरून बॅगात भरायचा की सकाळी उठून भरायचा ह्यावर चर्चा करतानाच झोप लागल्याने आपसूकपणे दुसऱ्या पर्यायाचा विजय झाला होता. ६ मे! लग्नाचा १३ वाढदिवस! पाच सव्वापाचला उठून बॅगा भरतानाच घरच्यांनी अभिष्टचिंतनाचे फोन करण्यास सुरुवात केली. दरवर्षीप्रमाणे लग्नाला इतकी वर्षे झाली ह्यावर विश्वास बसत नव्हता. बॅगा पावणेसात वाजता खोलीबाहेर काढून ठेवायच्या होत्या. निद्रामोड कॉलमध्ये ह्याचीसुद्धा आठवण करूनदेण्यात आली होती. बॅगा भरण्याची जबाबदारी प्राजक्ताकडे असल्याने त्यात लुडबुड न करणे आणि तिने दिलेल्या सूचनांचे आज्ञाधारकपणे पालन करणे हे आम्ही दोघे व्यवस्थित पार पाडत होतो. शेवटी तिघांच्या आंघोळी आटपून बॅगा सहा पन्नासला खोलीबाहेर निघाल्या तेव्हा आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. आदल्या दिवशी सकाळी वळणावळणाच्या रस्त्यांचा ज्यांना त्रास झाला होता त्या बालकांच्या मातांनी आपापसात सुसंवाद साधला होता आणि विविध सिद्धांत मांडले होते. सोहमने जास्त जड ब्रेकफास्ट करू नये, हलकेच खावे असा काहीसा निष्कर्ष निघाला होता. सोहमने सुद्धा ह्या प्रकाराचा इतका धसका घेतला होता की त्याने केवळ सुक्क्या कॉर्नफ्लेक्सवर आपला नास्ता आटोपला. त्याच्यासमोर पराठे, दही वगैरे वगैरे खाताना माझ्यात अपराधीपणाची भावना निर्माण होत होती. परंतु कर्तव्य पार पाडायचं म्हणून आम्ही हा नास्ता मनसोक्त भक्षण केला!! एक सांगायचं राहून गेलं, वीणा वर्ल्ड तर्फे सर्वांना फराळाची एक मोठी पिशवी आदल्या दिवशी देण्यात आली होती. त्यात बाकरवडी, डाळ, बिस्किटे, डिंक लाडू अशा मनाचा संयम ढळवू पाहणाऱ्या विविध पदार्थांचा समावेश होता. हे सर्व खायचं तरी कधी हा आम्हांला पडलेला प्रश्न! आणि हो डिंकाचा लाडू स्नो पॉइंटला गेल्यावरच मग खा असा अनुभवी सल्ला द्यायला आदित्य विसरला नाही. सिमला सोडण्याची वेळ आली होती. गणपतीबाप्पा, उंदीरमामांचे स्मरण करून प्रवासास सुरुवात झाली. बिसलेरीच्या बाटल्यांसोबत गोळ्या, प्लास्टिक बॅगाचाही पुरवठा करण्यात आला होता. सिमला शहर तसे सुरेख! थंड हवामान आणि उंच डोंगरात जमेल तशा एकमेकाला खेटून उभारलेल्या इमारती. पण ह्यात माणसानं निसर्गाला ओरबाडून खरं सौंदर्य नष्ट केल्याची भावना माझ्याच नाही तर सर्वांच्याच मनात निर्माण होत होती. सिमल्यात आदल्या दिवशी पाहिलेल्या ठिकाणात निसर्गाशी थेट नाते जोडणारे ठिकाण म्हणजे फक्त हिमालयीन झू हेच होतं. बाकी सर्व व्यापारीकरणाचे प्रकार! असे असलं तरी सिमला सोडताना काहीशी चुकचुकल्यासारखी भावना होत होती. ऋणानुबंध केवळ माणसांशीच जुळत नाहीत तर ते वास्तू, स्थळे ह्यांच्याशी सुद्धा जुळतात हे आपण अधूनमधून अनुभवत असतो, त्यातलाच हा एक प्रसंग! आदित्य खिडकीतून दिसणाऱ्या ठिकाणांची अधूनमधून माहिती देत होता. असंच सिमल्याच्या विमानतळाविषयी सुद्धा त्याने माहिती दिली. ह्या विमानतळाचा कारभार हवामानामुळे कसा बेभरवशाचा आहे आणि विमानाची तिकिटे विना -परतावा (non-refundable) असतात हे सांगितलं. प्रवास चालू होता. क्रमांक १ च्या बालकाची विकेट पडली होती. त्यामुळे बसच्या मागील भागात थोडी गडबड उडाली होती. सुदैवाने मागची मोठी सीट रिकामी होती आणि त्यामुळे काही प्रवाशांचे तिथे स्थलांतर होऊ शकले. प्लास्टिक पिशव्यांसोबत जुन्या पेपरची रद्दी सुद्धा बसमध्ये असायला हवी हा धडा आम्ही शिकलो. रस्त्याला एका बाजूला ड्रायव्हरला मॅकेनिकचे दुकान दिसलं. बसच्या चाकांना ग्रीस लावायचं केव्हापासून त्याच्या मनात घोळत असावं. त्यामुळे तिथे बस थांबविण्यात आली. काहीशा दहशतीच्या वातावरणात बसलेली बालके ह्या संधीचा फायदा घेऊन तत्काळ बसमधून बाहेर उतरली. माझं वाहनांविषयीच ज्ञान अगाध! त्यामुळे वाहनांच्या तांत्रिक गोष्टींची चर्चा सुरु झाली की मी एकतर त्यापासून चार हात दूर राहतो किंवा जी जाणकार मंडळी बोलत असतात त्यांच्या ज्ञानाची सतत मान डोलावून दाद देत राहतो. इथे डोंगरावरील रस्ता असल्याने पहिल्या पर्यायाला फारसा वाव नव्हता, म्हणून मी दुसऱ्या पर्यायासोबत मानेचे व्यायाम झाल्याचे समाधान करून घेत होतो. इतक्यात आमच्या चौकस सौंचे लक्ष बाजूला बांधकामासाठी आणून टाकलेल्या वीटाकडे गेले. तिच्यातील जाणकार जागा होऊन ह्या विटांच्या कणखरपणाविषयी तिने सहप्रवाशांना दोन शब्द सांगितले. बसच्या चाकांना लावण्यात येणाऱ्या ग्रीसच्या दीर्घ कार्यक्रमाला वैतागलेली मंडळी तत्काळ इथे आली. त्यामुळे जोशात येऊन मला आणि कुलकर्णी ह्यांना ह्या विटा उचलण्याची विनंती करण्यात आली. आम्हीसुद्धा ह्या विटा आपल्या महाराष्ट्रातील विटापेक्षा चांगल्याच जड आहेत असे बळेच सांगितले. आता महाराष्ट्रातील वीट मी शेवटी केंव्हा उचलली असेल हे देव जाणो! असो ह्या वीट प्रकरणाचा पुरावा म्हणून केलेलं हे जबरदस्त छायाचित्र! ह्यालाच जबरदस्ती छायाचित्रण असेही म्हटले जाते. छायाचित्रातील व्यक्तींच्या चेहऱ्यावरील हावभावावरून जाणकारांनी निष्कर्ष काढावाच! थोड्या वेळाने हे ग्रीस आणि विटा प्रकरण आटपून आम्ही पुन्हा बसमध्ये शिरलो. रस्त्याच्या कडेने स्थानिक लोकांची देवाची पालखी जात होती. पालखी घेवून जाणारे सेवेकरी आपल्या खांद्याच्या हालचालीने पालखीला एक विशिष्ट गती प्राप्त करून देत होते. त्यानंतर थोड्याच वेळात चहापानाचा ब्रेक आला. आतापर्यंत जाणवलेली एक गोष्ट म्हणजे, केवळ वॉश बेसिन ह्या प्रकाराचा अभाव. जे काही वॉश बेसिन असायचं ते टॉयलेटच्या बाहेर असायचं. हा मला काहीसा खटकणारा प्रकार. परंतु इलाज नव्हता. आदित्य, जितेश, अमेय आणि अमोल मंडळी बसमधून उतरायच्या आतच किती चहा, कॉफी आणि शीतपेय ह्याची मोजणी करून घेत आणि त्यानुसार झटपट व्यवस्था करीत. त्यांचे कौतुक करावे तितकं थोडं! चहापानानंतर आदित्य आणि अमोल ह्यांनी बसला दोन गटात विभागलं. आणि अंताक्षरीचा खेळ सुरु झाला. पुढील अर्धा भाग 'अ' गट आणि मागचा अर्धा भाग 'ब' गट. सोहम आणि प्राजक्ता 'अ' गटात आणि मी 'ब' गटात अशी काहीशी धर्मसंकट निर्माण करणारी परिस्थिती उद्भवली. 'अ' गटात श्री. चुरमुरे, त्यांचा मुलगा अद्वैत ह्यांच्याकडे अनुक्रमे जुन्या आणि नवीन गाण्यांचा चांगलाच खजाना होता. प्राजक्ताने सुद्धा गेल्या काही वर्षात विकसित केलेल्या आपल्या जुन्या गाण्यांच्या जाणकारितेचा प्रत्यय आणून दिला. आमच्या गटात सौ. कुलकर्णी ह्यांनी आपल्या सुमधुर सुरात पूर्ण गाणी गाऊन प्रवाशांना मंत्रमुग्ध केले. सौ. वेळासकर, मोरे मॅडम ह्यांनी सुद्धा गाण्यांचा चांगला पुरवठा केला. 'ब' गटाने अगदी ६० - ७० च्या काळापासूनची सुंदर गाणी गायली. परंतु 'अ' गट त्याबाजूला काहीतरी गुणगुणे आणि 'ल' हे अक्षर 'ब' गटाला आणून देई. मी दोन वेळा 'लाजून हासणे' आणि 'लुंगी डान्स' (इथे थोडी फसवेगिरी करीत) भेंडी वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु 'ल' ह्या अक्षराच्या सततच्या माऱ्यापुढे आम्ही हतबल झालो. आणि हा हा म्हणता आमच्यावर तीन भेंड्या चढल्या. परंतु पूर्ण गाणी म्हणणे, गाण्याचा दर्जा पाहता आमच्या संघांची कामगिरीच श्रेष्ठ होती असे म्हणावं लागेल. आणि आदित्य 'अ' गटात असल्याने अमोल त्याला 'दादा' 'दादा' म्हणत त्याचेच ऐके. ह्याचासुद्धा अंतिम निकालावर परिणाम झाला. दहा ते एक असे तीन तास भेंड्या खेळल्यावर दुपारच्या भोजनाचे ठिकाण आले. ह्या भेंड्यामुळे सहप्रवाशी एकत्र येण्यास खूप मदत झाली. औपचारिकतेची उरलीसुरली बंधनं गळून पडली. आणि हो बालकांचे लक्ष उलटीच्या प्रकारापासून विचलित होण्यास बराच फायदा झाला. दुपारच्या जेवणाचे ठिकाण बरेच प्रशस्त होते. इथे केवळ शाकाहारी जेवण होते. परंतु आजूबाजूच्या भव्य परिसरामुळे मस्त वाटलं. भेट दिलेल्या प्रत्येक ठिकाणी फोटो काढला पाहिजे ह्या शिरस्त्यानुसार इथेही थोडीफार फोटोग्राफी झालीच. हल्ली ब्लॉगला उपयोगी पडेल म्हणून मीसुद्धा फारसा विरोध करीत नाही. भरपेट जेवण करून सुस्तावलेल्या देहांना 'वीणा वर्ल्ड, वीणा वर्ल्ड' ह्या घोषाने जड पावलानी बसकडे येण्यास भाग पाडलं. ह्यापुढील रस्ता खरतर अगदी निसर्गरम्य होता आणि त्याचप्रमाणे अगदी धोकादायक वळणावळणाचा सुद्धा. राठी आणि वेळासकर ह्यांच्या छोट्या मुली एकमेकींच्या खास मैत्रिणी. त्यांच्या मजेशीर बोलण्याने बस जागी रहात असे. परंतु इतक्या दीर्घ प्रवासात त्यांनी झोपावं म्हणून त्यांच्या मातांनी त्यांना बळेच झोपवलं. ह्या प्रवासात सतलज, बियास ह्या दोन मोठ्या नद्या आपल्या भव्य दर्शनाने आमचे मन मोहवून टाकत होत्या. त्यांची ही काही छायाचित्रे! मग एका अरुंद ठिकाणी मेंढ्यांच्या समूहाने आमचा रस्ता अडवला. धावत्या बसमधून काढल्याने फोटोच्या दर्जात थोडी घसरण जाणवेल परंतु ह्या फोटोवरून आमच्या छायाचित्रणाच्या कौशल्याविषयी निष्कर्ष काढण्याची घाई करू नये!! मध्येच एक अंदाजे तीन मिनिटांचा एक बोगदा येवून गेला. अंधाऱ्या बोगद्यातून प्रवास करताना सर्वांनी अपेक्षेप्रमाणे आरडओरडा केला. आता ह्या ठिकाणी आम्ही छायाचित्रे का काढली नाहीत अशी शंका सुज्ञ लोकांच्या मनात आली असल्यास ती रास्त आहे इतकेच मी म्हणू इच्छितो. बाकी आदित्याच्या म्हणण्यानुसार हा उत्तर भारतातील / भारतातील / आशियातील (ह्यातील योग्य पर्याय निवडा) किमान क्ष मीटर उंचीवर असलेला सर्वात लांब बोगदा होता. बाकी आमचे छायाचित्रण सुरूच होते. काही चित्रात (जसे की ह्या) निसर्गासमवेत एखादी पांढरी आकृती दिसल्यास तो कोणी परग्रहवासी वगैरे असल्याचा संशय मनात येऊन देऊ नये. आमच्या समोरच्या सीटवर घातलेलं कव्हर असंच अधूनमधून फोटोत दिसत राहणार! एव्हाना आम्ही कुलूच्या आसपास येऊन पोहोचलो होतो. आजूबाजूच्या प्रदेशाच्या सौंदर्याने मी भारावून गेलो होतो. हिमालयाची आकाशाशी स्पर्धा करणारी शिखरे, त्यातून आपला मार्ग शोधणारा वळणावळणाचा रस्ता. रस्त्याच्या कडेला असणारी जीवनरसाने मुसमुसलेले हिरवेगार उंच डेरेदार वृक्ष आणि मधूनच दिसणारी इवली इवली घरे! ह्या गावांतून राहणाऱ्या लोकांकडे नुसतं बसमधून जरी पाहिलं तरी त्यांच्या मनातील जीवनाविषयी संतृप्तता कशी जाणवते! जीवन जगावं तर ते आपल्या आणि निसर्गाच्या मर्जीनुसार! उगाचच आर्थिक प्रगतीच्या भ्रामक संकल्पना निर्माण करून त्याच्या मागे धावत धावत आपली शांतता गमावून बसण त्यांना मंजूर नसावं. पार्वती आणि बियास ह्या दोन नद्यांच्या संगमाचे हे छायाचित्र! आता आम्ही कुलू शाल फॅक्टरीत येवून पोहोचलो होतो. अगदी उंच पर्वतांनी वेढलेल्या अशा विभागात असणाऱ्या सपाट भागात ही शाल फॅक्टरी आहे. प्रथम तिथल्या एका महिलेने आम्हाला शाल विणण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्याची ही चित्रफीत. तिच्या पायाखाली चार पट्ट्या होत्या. डावा पाय एक आणि तीन क्रमांकाच्या पट्ट्यांवर आणि उजवा पाय दोन आणि चार क्रमांकाच्या पट्ट्यांवर ती आळीपाळीने दाबत होती. ह्या प्रात्यक्षिकानंतर प्रत्यक्ष खरेदीची वेळ होती. तिथे उत्तमोत्तम शाली, स्वेटर्स, जैकेट्स विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. ह्या खरेदीला विशिष्ट वेळ देण्यात आला होता आणि त्यानंतर चहा देण्यात येणार होता. वेळेच्या बाबतीतील ही शिस्त मला खूपच भावली. तुम्हांला एका विशिष्ट वेळेत खरेदीचा निर्णय घेत यायला हवा असे माझे स्पष्ट मत आहे. एखाद्या दुकानात असणाऱ्या वस्तू दर्जा, विविधता, किंमत ह्या बाबतीत एका विशिष्ट रेंज (पट्ट्यात) मध्ये असतात. पहिला निर्णय म्हणजे ह्या रेंज मधील गोष्ट खरेदी करायची आहे की नाही हा घ्यायचा असतो. नसेल घ्यायची तर आपला, दुकानदाराचा आणि आपल्या सोबतच्या लोकांचा उगाच वेळ घालवू नये. आणि समजा खरेदी करण्याचा निर्णय घेतला तर एक लक्षात ठेवावे एक त्या रेंजमधील सर्वात उत्तम गोष्ट आणि सर्वात खराब गोष्ट ह्यात काही फारसा फरक नसतो. निर्णय घेण्यातील चोखंदळपणा आयुष्यातील महत्वाच्या निर्णयाच्या बाबतीत जमला तर दाखवावा! असो वीस मिनिटात तीन शाली घेऊन आम्ही बाहेर पडलो. ह्यानंतरच्या प्रवासातील निसर्गसौंदर्याचे वर्णन करणे ही माझ्या पामराच्या आवाक्यातील गोष्ट नव्हे. एव्हाना हिमाच्छादित शिखरे काहीशी जवळून दर्शन देऊ लागली होती. सफरचंदाच्या झाडांचे जवळून दर्शन होऊ लागले होते. ह्या सफरचंदांचे दोन प्रकार, रॉयल आणि गोल्डन. ह्या दोन प्रकारातील एक निर्यात केला जातो. आता नक्की कोणता हे जरी आदित्य / जितेशने सांगितलं असलं तरी मला आठवत नाही. मध्येच गुलाबाची फुलांनी अगदी बहरून गेलेली झाडं डोळ्याला अगदी सुखावून जायची. एका झाडावर इतकी फुले असू शकतात हे पाहून मन थक्क होऊन जायचं. असाच एक स्वर्गीय अनुभव देणारा प्रवास चालू असताना अचानक आमचं हॉटेल आलं. हे मनालीच्या बाहेरील भागातील हॉटेल होते. आजूबाजूला साधं गाव होतं. दुसऱ्या दिवशी म्हणजे सात मेला हिमाचल मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत्या. तरीही गावातील शांतता अगदी वाखाणण्याजोगी होती. आमची आणि बऱ्याच जणांची खोली चवथ्या मजल्यावर होती. पुन्हा एकदा जड बॅगा थेट खोलीत पोहोचविणाऱ्या वीणा वर्ल्डचे आभार मानावे तितके थोडे! चौथ्या मजल्यावरील खोलीतून समोर दिसणारा नजारा जबरदस्त होताच. पण त्याहून जबरदस्त होता तो मार्गिकेतून दिसणारा हा हिमाच्छादित शिखरांचा आणि त्यातून जमिनीकडे धाव घेणाऱ्या ह्या सरितेचा! त्यातच हे गाव वसलं होतं. नंतर संध्याकाळी ह्या गावातील घरांतील मिणमिणते दिवे आणि रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांचे दिवे ह्याचे दृश्य मनःपटलावर कायमचे राहील. रात्रीचे जेवण देखील वैविध्यपूर्ण होते. हॉटेलचे नाव होते सार्थक रिसोर्ट! सहलीचा हा तिसराच दिवस होता पण ही सहल, हे वातावरण ह्यामुळे एकंदरीत खरोखर ही ट्रीप सार्थक वाटत होती. आयुष्यातील एक अविस्मरणीय सहल म्हणून ही लक्षात राहील ह्याचे आतापासूनच नक्की वाटायला लागलं होतं. आपल्या भारतमातेचा अभिमान द्विगुणित झाला होता. एकंदरीत एका प्रसन्न मनःस्थितीत मनालीच्या पहिल्या रात्री आम्ही निद्राधीन झालो. पुढील तीन दिवसाच्या कार्यक्रमाविषयी उत्सुकता मनात भरली होती. बऱ्याच दिवसांनी मनात खऱ्याखुऱ्या आनंदाचं भरत आलं होतं. मनालीतील पहिली सकाळ अगदी प्रसन्न वातावरणात उजाडली. आज खरं तर लोकसभा निवडणुकीचा दिवस. परंतु शांतपणे जीवन जगणाऱ्या मनालीवासीयांच्या जीवनात ह्याने सुद्धा फारसा फरक पडला नव्हता. आज वशिष्ठ कुंड आणि स्नो पॉइंट करायचे होते. रोहतांग पासला बर्फमय प्रदेश पाहायला जायची सर्वांचीच इच्छा होती परंतु तिथं रविवारीच नव्याने बर्फवृष्टी झाली होती आणि त्यामुळे तिथं जाणं शक्य होणार नव्हतं. एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यावर तिथले पेपर बघणे हा एक शिकण्याचा अनुभव असतो. नंतर एक दिवशी पेपर चाळताना जाहिरातीचं अगदी किमान प्रमाण मोठ्या प्रकर्षाने जाणवलं. अजून एक बातमी वाचनात आली. रोहतांग पासच्या पलीकडे जी हिमाचल प्रदेशातील गावे आहेत तिथले नागरिक अतिकडक हिवाळ्यापासून बचाव करण्यासाठी हिवाळ्यात मनालीला येऊन राहतात. आणि साधारणतः हिवाळा आटोक्यात आला की आपल्या गावी परततात. ७ मेला मतदान असल्याने त्यांना आपल्या मूळ गावी परतणे आवश्यक होते. परंतु नव्याने झालेल्या बर्फवृष्टीमुळे बिचारे मनालीतच अडकून बसले होते आणि मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. पुढे त्यांचे नक्की काय झालं हे वाचनात आलं नाही. अजून एक बातमी म्हणजे काही अतिदुर्गम भागातील ३ गावाच्या गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. गावापर्यंत दळणवळणाच्या मुलभूत सुविधा उभारण्यात राजकीय पक्षांना आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ हा निर्णय होता. आपल्या निवडणूक आयोगाचा मात्र मोठ्या कौतुकाने इथे उल्लेख करावासा वाटतो. ह्या दोन्ही ठिकाणी निवडणूक कर्मचारी आपली ड्युटी निभावण्यास आदल्या दिवशीच पोहोचले होते. आमचे सहप्रवासी अमोल कुलकर्णी हे नाशिकचे रहिवाशी. वर्तमानपत्रातील जाहिरातींशी निगडीत असा त्यांचा व्यवसाय. मोठ्या एकाग्रतेने पेपर चाळताना पाहून मी त्यांना विचारलं, "कुलकर्णी साहेब, काय खास बातमी?" "नाही, इथले लोक कशा प्रकारे जाहिरात करतात ते जरा बघतोय!" त्यांचं हे उत्तर आपल्याला आवडलं! आजच्या प्रवासातील ठिकाणांपर्यंत बस जाऊ शकत नसल्याने तवेरा, इनोवा वगैरे SUV प्रकारातील गाड्यांची सोय करण्यात आली होती. वैयक्तिक प्रवास करताना हा प्रवास खूप महागडा ठरण्याची शक्यता असते कारण अशा गाड्यांचे मालक हे बऱ्याच वेळा पर्यटकांना फसवायला टपलेले असतात असा माझा केरळ प्रवासातील अनुभव. अशा अनेक गाड्या हॉटेलच्या समोर लागल्या होत्या. आज बसप्रवास नसल्याने सोहम आणि अन्य बालके मोठ्या आत्मविश्वासाने नास्त्यावर तुटून पडली होती. आपल्या इच्छेनुसार गाडी प्राप्त व्हावी हे सोहमची इच्छा केवळ इछाच राहिली. आम्ही गोविंद रणमारे कुटुंबीयांसोबत होतो. गाडीचा चालक हा सर्व गाड्यांचा मालक होता. आदल्या दिवशी आदित्यने सूचनांचा भडीमार केला होता. आपल्या गाडीचा क्रमांक नीट ध्यानात ठेवा. आपल्या गाडीतील सहप्रवाशांबरोबरच शक्यतो राहा. ट्राफिक जाम वगैरे झाला तर तो सोडविण्याच्या भानगडीत पडू नका. ह्या गाड्यांचे स्थानिक ड्रायवर ज्या क्षणी मोकळा रस्ता मिळेल त्या क्षणी गाडी भरधाव वेगाने हॉटेलला घेऊन येतील आणि परतताना वेळीच परत न आल्यास स्वखर्चाने हॉटेलला परतण्याची तयारी ठेवा!वगैरे वगैरे! पहिला थांबा होता वसिष्ठ कुंड. लक्ष्मण ह्या भागात आला असता वशिष्ठ मुनींना स्नानासाठी दूरवर जावं लागतं हे पाहून त्याने बाण मारून ही गरम पाण्याची कुंड निर्माण केली आहेत अशी माहिती सर्वज्ञ आदित्य (भोईटे हो!) ह्यांनी दिली. वशिष्ठ मंदिरासोबत रामाचे आणि शंकराचे मंदिर सुद्धा आहे. ज्या वेळी ह्या मंदिरांचा जीर्णोद्धार होतो त्यावेळी बाजूच्या जंगलातील सर्वात जुन्या वृक्षाचा बुंधा आणून मंदिराजवळ उभारला जातो. वशिष्ठ मंदिराजवळ असे दोन बुंधे आणि रामाच्या मंदिराजवळ एक आढळल्याने सुज्ञ लोकांनी योग्य तर्क काढावा. त्यानंतर आम्ही प्रत्यक्ष गरम पाण्याच्या कुंडांना भेट दिली. पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र कुंड आहेत. तिथे आत गेल्यावर पाहिलेल्या दृश्याने स्वतंत्र कुंडांच्या निर्मितीची गरज लक्षात आली!! आता पुढचा टप्पा म्हणजे आदित्यच्या भाषेत ह्या सहलीचे मुख्य आकर्षण अर्थात हिमखेल बिंदू होता. ह्या ठिकाणी जाण्याआधी खास जॅकेट, लेदर शूज ह्या गोष्टी २०० रुपये भाड्याने आणि आवश्यकता भासल्यास १०० रुपयांचा गॉगल विकत घ्यावं लागतं. ह्या गोष्टी इतर ठिकाणी थोड्या कमी दरात मिळण्याची जरी शक्यता असली तरी त्याच्या दर्जाविषयी आम्ही खात्री देवू शकत नाही असे आदित्य म्हणाला. आणि हो हे जॅकेट आणि बूट आपल्या नेहमीच्या मापापेक्षा एक माप मोठी घ्यावीत हे सांगण्यास तो विसरला नाही. हे सर्व निकष पूर्ण करताना रंगसंगती वगैरे पाहायला जाल तर फसाल असा सल्ला द्यायला तो विसरला नाही. भाड्याच्या दुकानाजवळ गाडी थांबली तर पूर्ण सावळागोंधळ होता. सर्व जॅकेट बाहेरून ओली लागत होती. परंतु तसेच मिळेल ते एक अंगावर ओढले. ते घालताना सुद्धा द्राविडी प्राणायाम करावा लागला. मग शूज कडे मोर्चा वळविला. ह्या क्षणी आदित्याचा सल्ला विसरलो आणि त्यामुळे पुढे थोडाफार त्रास सहन करावा लागला. माझ्या कपड्यांची निवड झाल्यावर सोहमची पाळी होती. त्याचा कोट, बूट वेगवेगळ्या ठिकाणी होते. हे सर्व निवडून आमचा मोर्चा गॉगलवाल्या सरदारजीकडे वळला. १०० रुपये किमतीचे ३ गॉगल खरेदी करण्यात आले. तोवर आम्हांला काहीसा उशीर झाल्याने आम्ही झटपट गाडीकडे धाव घेतली. आता बर्फ रस्त्याच्या बाजूला दिसू लागला होता. आणि थोड्याच वेळात बर्फलीलेचे ठिकाण आले. इथे गाड्यांची खूप गर्दी झाली होती. वीणा वर्ल्ड असा पुकारा करीत आदित्य मंडळींनी आम्हांला एका बाजूला घेतलं. तो सर्वांच्या नावाचा पुकारा करीत असतानाच आम्ही आमचा छंद सुरु ठेवला! वीणा वर्ल्डचा झेंडा मोठ्या दिमाखात फडकत होता! सर्वांना एकत्र गोळा करण्यात यश आल्यावर पुन्हा एकदा आदित्यने सर्वांना आचारसंहिता समजावून सांगितली. वरती बर्फलीलेच्या ठिकाणापर्यंत चालत अथवा याकवर बसून जायचा पर्याय देण्यात आला होता. परंतु आम्ही चालत जाणेच पसंत केलं. वीस रुपये भाड्याची एक काठी मात्र आम्ही खरेदी केली. काही मंडळींनी मात्र याकवर बसून जाणे पसंत केले. वरपर्यंत चालत जायची ही चढण पहा! बाजूचा नजारा नेहमीप्रमाणे प्रेक्षणीय होता. पर्वताचा चढ तसा तीव्र होता. ह्या एकंदरीत जय्यत तयारीने माझ्या हालचाली काहीशा मोकळेपणाने होत नव्हत्या. संपूर्ण चढणीचे तीन भाग करता येतील. प्राजक्ताला उन्हाचा त्रास होत असल्याने तिने छत्री घेणे पसंत केले. त्या पांढऱ्याशुभ्र बर्फाच्या पार्श्वभूमीवर तिची गुलाबी छत्री मात्र शोभून दिसत होती. विविध मंडळी आपल्या कुवतीनुसार वरती चढत होती. मराठीतील गेले अनेक वर्षे 'होतकरू' असलेले लेखक आणि सोहम ह्यांचे हे छायाचित्र! सोहम आणि मी एकमेकांवर बर्फ उडविण्याचा खेळ बराच वेळ खेळलो. चांगला बर्फ कोठून गोळा करता येईल ह्यांची पाहणी करण्यात गर्क असलेला सोहम! अचानक आलेल्या याकने सोहमची धावपळ केली आणि त्याच्या तयारीत खंड पडला. याकने जरावेळ इथे टाईमपास केला ही गोष्ट सोहमला अजिबात खपली नाही. एकदाचा याक पुढे गेला आणि सोहम कामाला लागला. बराच वेळ बर्फाची मारामारी केल्यानंतर बनविलेला हा बर्फगोळा! तिथे रबरी टायरवरून खाली घसरत यायचा सुद्धा खेळ होता. काहींनी तो पर्याय स्वीकारला. दुसऱ्या चढणीवर असताना तिथे डाळवाला आला. त्याची पहिली चणाडाळ चविष्ट लागल्याने आम्ही अजून दोनदा त्या चणाडाळीचा आनंद घेतला. तिथे एक मुका काठीवाला होता. ह्या बिंदूपर्यंत आलेल्या काहीजणांना आता आपणास काठी पाहिजे असा साक्षात्कार झाल्याने ते ह्या काठीवाल्याकडून काठी घेत असत. काहीजण परतताना भाडे देऊ अशा समजुतीने काठी घेऊन तसेच पुढे चालू लागत. तेव्हा हा काठीवाला संतापाने तोंडाने जोराजोराने आवाज करीत अशा माणसांच्या मागे धावत जाई आणि त्यांना पैसे देण्यास भाग पाडी. बराच वेळ बर्फात खेळल्यावर आम्ही खाली उतरलो. एव्हाना उकडू लागलं होतं. तसं पाहिलं तर ह्या अंतराळवीराच्या वेषाची गरज नव्हती असेच मला राहून राहून वाटत होते. अशा वातावरणात समोर गरमागरम मैगी बनवून देणारा दिसल्यावर त्याच्याकडे दुर्लक्ष करायला आम्ही कोणी निर्मोही नव्हतो. त्यामुळे ५० रुपये दराच्या तीन मैगीच्या ऑर्डरी देऊन आम्ही बर्फात खेळणाऱ्या लोकांची मजा पाहत राहिलो. मैगीवाल्याने ह्या तीन मैगी बनवायला बराच वेळ घेतला. त्यामुळे नापसंती व्यक्त करणाऱ्या सोहमची प्राजक्ताने "दोन मिनिटातील मैगी फक्त टीव्हीवरच बनते" अशी समजूत काढली. हा एकंदरीत भाव जास्त आहे हे तत्वतः मैगीवाल्याने मान्य करीत मला एक फुकट चहा पाजला. आता उतरणीचा मार्ग तसा सोपा होता. हा कोट आणि बूट कधी एकदाचे काढतो असे झालं होतं. शेवटी एकदाचे खाली उतरलो. तिथे असंख्य / अगणित गाड्या होत्या. त्यात आपली गाडी कशी शोधायची हा प्रश्न होता. नशिबाने आदित्य आणि जितेश तिथे होते आणि मग आम्हांला आमची गाडी लगेच मिळाली. गाडीच्या चालकाने आम्हांला सर्व वेष खाली काढून ठेवण्यास सांगितलं आणि व्यवस्थितपणे घडी करून हा सर्व प्रकार गाडीच्या टपावर ठेवून दिला. परतीच्या प्रवासात एका राजबिंड्या ईगलचे आम्हांला दर्शन झाले. त्यानंतर निवडणुकीचा प्रभाव म्हणून एका पोलिसवाल्याने सुद्धा आमची गाडी अडवली. वीणा वर्ल्ड ऐकून त्याने आम्हांला जाऊ दिले. हॉटेलात पोहोचेस्तोवर अडीच झाले होते. झटपट ताजेतवाने होऊन आम्ही जेवणावर ताव मारला. इतके भरपेट जेवण आणि बऱ्याच दिवसांनी मिळालेली मोकळी दुपार ह्यामुळे बिछान्यावर आडवे होण्याचा मोह आम्हांला आवरला नाही. सोहमची IPL बरोबरची गहिरी दोस्ती इथेही सुरूच होती. मॅक्सवेलच्या तडाखेबंद फलंदाजीमुळे आता त्याने सोहमच्या मनातील विराट कोहलीची जागा घेतली होती. पण ह्या IPL प्रकरणाने आमच्या झोपेत व्यत्यय येत होता. अचानक आकाशात ढग भरून आले आणि जोरदार गडगडाट झाला. होती नव्हती पांघरुणे'घेऊन मी झोपण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. साडेपाचच्या सुमारास अमोलचा सायंकालीन चहापानाचा कॉल आला आणि आम्ही सज्ज होऊन खाली गेलो. पाहिलं तर गरमागरम चहासोबत प्रिय बटाटवडे होते. तमाम मराठी वर्ग अगदी खुश होऊन गेला. सार्थकच्या जेवण आणि अल्पोपहाराच्या पदार्थांविषयी एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते. त्यांनी चारही दिवस अगदी आरोग्यपूर्ण आहार दिला. पदार्थ भलेही चमचमीत नसतील पण तब्येतीसाठी अगदी उत्तम होते आणि भरपेट खाऊन सुद्धा कोणालाही पोटाच्या कोणत्याच तक्रारी झाल्या नाहीत. चहापान आणि बटाटेवडे भक्षणानंतर आम्ही हॉटेलच्या मागील बाजूला असलेल्या बागेत जाऊन आसनस्थ झालो. तिथे हिमाचलीन नर्तकांच्या तीन जोड्या त्यांच्या पारंपारिक वेशात हजर होत्या. आपल्या सवयीप्रमाणे प्रथम आदित्यने संध्याकाळचा आणि उद्या सकाळचा कार्यक्रम सांगितला. शिस्त म्हणजे शिस्त! इतकी मंडळी समोर शांतपणे बसल्यावर पुढील कार्यक्रम नाही सांगायचा म्हणजे काय? आदित्य दिसायला तसा साधाभोळा असला तरी अधूनमधून जनतेला टेन्शन देण्यात माहीर होता. आता हे नृत्य पाहण्याच्या आधीच तुम्हांला सुद्धा नंतर हाच नाच करावा लागेल हे सांगायची त्याला काय गरज होती? माझे नृत्यकौशल्य वाखाणण्याजोगे आहे. ज्या लोकांनी पूर्वी कधी त्याचा अनुभव घेतला नसतो ते बिचारे मला खूप आग्रह करतात आणि मग नाईलाजाने मी एक दोन स्टेप्स केल्या ते आपण ह्याला आग्रह करून किती भली मोठी चूक केली असा भाव तोंडावर आणतात. ह्या नृत्याची ही काही चित्रे आणि चित्रफीत! सुरुवातीला मंदगतीत सुरु झालेल्या ह्या नृत्याविष्काराने नंतर हळूहळू गती पकडली. सोबतीला सुमधुर संगीत होतेच. जनता आता मनातल्या मनात ह्या स्टेप्सचा सराव करीत होती. आदित्याने नुसता इशारा करण्याचीच खोटी होती, सर्वजण तत्परतेने नृत्यात सहभागी झाले. प्राजक्ता चांगली नाच करीत असल्याने ती एकंदरीत खुशीत होती. आदित्य, जितेश, अमेय आणि अमोल ह्यांनी ह्या नृत्यावर पूर्णपणे प्रभुत्व मिळविले आहे. समजा एखाद्या दिवशी ही नर्तक मंडळी येऊ शकली नाहीत तर हे लोक आरामात वेळ निभावू शकतील. फक्त त्यांना महिला कलाकारांची उणीव भासेल इतकेच! एकंदरीत हा नाच आम्ही अगदी आनंदाने अनुभवला. अगदी माझ्या नृत्यकौशल्यासहित! त्यानंतर आदित्य आणि मंडळीनी दोन मजेशीर खेळ खेळून अजून धमाल आणली. ह्या दोन्ही प्रकारात महिला वर्गाने बक्षिसे पटकावली. हे खेळ कोणते हे इथे सांगून मी आदित्याची नाराजी ओढवू इच्छित नाही. ह्या खेळानंतर IPL च्या साथीने रात्रीचे मस्त जेवण पार पडले. बहुदा चायनीज मेनू होता. चार दिवस संपले होते. ही सहल कशी अगदी संपूच नये असे वाटत होते! चौथ्या दिवशीचा बर्फखेळ आणि हिमाचलीन नृत्य हा नक्कीच ह्या सहलीचा परमबिंदू होता. ह्या क्षणापर्यंत अनुभवलेल्या सर्व क्षणांना मागे टाकणारा! ह्या पुढील भेट दिल्या जाणाऱ्या प्रत्येक स्थळाला ह्या दोन अनुभवांनी दिलेल्या समाधानाच्या पातळीला मागे टाकावे लागणार होते. पाचव्या दिवसाच्या सकाळचे आकर्षण होते ते सोलंग व्हॅलीची भेट आणि पॅराग्लायडिंग! पॅराग्लायडिंगविषयी आम्हांला एकंदरीत सावधानतेचा इशारा देण्यात आला होता. हे करणार असाल तर स्वतःच्या जबादारीवर असे आम्हांला कोणताही आडपडदा न ठेवता सांगण्यात आलं होतं. क्रिया करताना जखमी झालेल्या आणि अतिदक्षता विभागात दाखल केल्या गेलेल्या लोकांची उदाहरणे सुद्धा देण्यात आली होती. त्यामुळे आमच्यातील कोणी मंडळी त्या प्रकाराकडे वळली नाहीत. सकाळी नेहमीप्रमाणे उदरभरण करून आम्ही तवेरा किंवा तत्सम वर्गातील गाड्यांमध्ये स्थानापन्न झालो. पहिला थांबा होता तो हिडींबा मंदिर! हे मंदिर अगदी निसर्गरम्य परिसरात आहे. हिमाचल प्रदेशाला देवभूमी म्हटले जाते. आपल्याला इथे फिरताना अधूनमधून अशी ठिकाणे दिसतात की नक्कीच इतक्या स्वर्गीय सौंदर्याला देवाच्या अस्तित्वाचं वरदान लाभलं असलं पाहिजे असं मानायला मन (मनापासून!!) तयार होतं. हिडींबा मंदिराचा परिसर हा एक अशाच परिसरांपैकी एक! ह्या देवळाभोवती असलेली अगदी उंच (आता इथे गगनाशी स्पर्धा करणारी किंवा ज्यांच्या शिखरापर्यंत दृष्टी पोहोचवायची झाली तर डोक्यावरील टोपी खाली पडेल असे नाट्यमय शब्दप्रयोग आपण करू शकतो!) देवदार झाडांची गर्दी अगदी प्रेक्षणीय आहे. अगदी थोडीच सुदैवी सूर्यकिरणे जमिनीपर्यंत पोहोचू शकतात. आमच्या सहलीचे "three musketeers" मंदिराच्या आवारात आदित्याने आम्हांला एकत्र केले. ह्या मंदिराच्या एक पौराणिक आणि एक ऐतिहासिक अशा दोन्ही गोष्टी मी तुम्हांला सांगतो असे प्रास्ताविक त्याने केलं. पौराणिक आणि ऐतिहासिक ह्या दोन शब्दाच्या भिन्न अर्थाविषयी आपण ह्या पूर्वी कधी विचार केला होता काय हे आठविण्याचा मी प्रयत्न करू लागलो. पौराणिक कथा अशी की ह्या परिसरात हिडींब आणि हिडींबा असे दोन भाऊ बहिण राहत. हिडींब आपल्या प्रजेवर खूप अन्याय करी आणि त्यामुळे नाखूष असलेल्या हिडींबा हिने जो कोणी ह्या भावाचा वध करेल त्याच्याशी मी लग्न करीन अशी प्रतिज्ञा केली होती. "अरे वा! तुझी इच्छा असली म्हणून काय झालं, समोरच्याची इच्छा असायला हवी की नको" हा मनात डोकावणारा विचार आणि तोंडावर येऊ पाहणार हसू महत्प्रयासाने दूर सारलं. पुढे भीमाने हिडींबचा वध केला आणि हिडींबाने त्याच्याशी विवाह केला. (बघा इथे मी भीमाने हिडींबाशी विवाह केला हा शब्दप्रयोग टाळला की नाही!) ह्या दोघांचा पुत्र घटोत्कच ह्याने कौरवांबरोबर झालेल्या लढाईत मोठा पराक्रम करून मग प्राण सोडले. प्रत्येक गोष्ट घडायला विधात्याची काहीतरी योजना असते असं म्हणतात ते ही खरंच! ऐतिहासिक कथा पंधराव्या शतकातील कोण्या एका राजाची! त्याने हे मंदिर उभारलं. मंदिर उभारणीनंतर ह्या मंदिराच्या सौंदर्यावर तो इतका खुश झाला की त्याने त्याच्या शिल्पकाराला बरेच द्रव्य देऊन त्याला गौरविले. परंतु ह्या कारागिराने इतर कोठे जाऊन अजून असेच मंदिर उभारू नये म्हणून त्याचे हात तोडून टाकले. ताजमहालाबाबतीत सुद्धा आपल्याला अशीच कथा ऐकायला मिळते. परंतु हा कारागीर इतका हिमतीचा की त्याने अशा स्थितीत सुद्धा ह्यापेक्षा सुंदर मंदिर दुसऱ्या भागात जाऊन उभारलं. तिथेही त्याचा मोठा सत्कार करण्यात आला. परंतु त्या राजाने मात्र त्याला जीवानिशी मारून टाकले. खरी असल्यास किती दुर्दैवी कथा ही! उद्या इतका सुंदर ब्लॉग लिहिणाऱ्याची इंटरनेट जोडणी कोणी काढून टाकली तर किती दुर्दैवी! आता ह्या मंदिराची बॉलीवूड कथा! रोजा चित्रपटात आपल्या नवऱ्याच्या शोधात काश्मिरात आलेली मधु एका मंदिरात येऊन देवाकडे आपल्या नवऱ्याच्या जीवनासाठी साकडं मागते. तिने एक नारळ फोडताच आजूबाजूचे सर्व सैनिक धावत येतात. तर ते हेच हिडींबा मंदीर! आता काश्मिरातले मंदिर हिमाचल प्रदेशात कसे आले असा विचार कोणी करू नये. ह्या मंदिराचे छत उतरते असून ह्या भागात होणाऱ्या बर्फवृष्टीवर हा उपाय! बाकी मंदिराच्या चौथ्या पायरीवर उभे राहून फोटो काढल्यास व्यवस्थित सर्व मंदिर कॅमेरात सामावता येईल हा सल्लासुद्धा आदित्य आणि मंडळींचाच! मंदिराचा गाभारा अगदी शांत! पंधराव्या शतकात देखील इथं कोणी वावरून गेलं असेल ह्या विचाराने आपल्याला अंतर्मुख करणारा! पुजाऱ्याने दिलेला प्रसाद ग्रहण करून आम्ही असेच बाहेर फिरत असताना "वीणा वर्ल्ड, वीणा वर्ल्ड" ह्या सादेने आपापल्या गाड्यांकडे खेचले गेलो. गाडीत बसण्याआधी काही जणांनी याकवर बसून फोटो काढून घेतले! आता पुढचा टप्पा होता केबलकार आणि पॅराग्लायडिंगचा! आमच्यासाठी फक्त केबलकारच उपलब्ध पर्यायात मोडत होते. हा परिसर अगदी विस्तृत होता. पॅराग्लायडिंग करून जमिनीवर परतणारे इथेच उतरत होते. केबलकार इथूनच वर जात होती. केबलच्या वर जाण्याच्या प्रवासात खालचा भूभाग तसा चांगला दिसत होता. खाली दिसलेला एक श्वानसदृश्य प्राणी हा कोल्हा असावा ह्या माझ्या तर्काला पुण्याचे सहप्रवासी सोहम आफळे ह्यांनी अनुमोदन दिले. वरती आकाशात मोठी छत्री घेतलेले साहसवीर मुक्त गगनविहार करीत होते. वरती पोहोचल्यावर आम्ही समोर दिसणाऱ्या मोकळ्या भूभागाकडे प्रस्थान केले. इथेसुद्धा अजून रेंगाळणारा बर्फ होताच की! कालच्या अनुभवाने कौशल्यपातळी उंचावलेली बच्चेमंडळी तत्काळ तिथे धावली. हातात मावतील इतके बर्फाचे गोळा करून त्यांनी एकमेकांवर फेकण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी आपल्या मातांवर आक्रमणाचा रोख वळविला. इथे एक सोनेरी विग १० रुपये भाड्याने काही काळ वापरू देणारी बाई फिरत होती. अर्थात समस्त महिला वर्गाला हा मोह आवरला नाही. आपल्याच बायकांनी घातलेले पाहून क्षणभर आम्हांला सुद्धा ह्या आपल्याच बायका ह्यावर विश्वास बसला नाही. तात्काळ मी प्राजक्तासोबत फोटो काढून घेतला! आपापल्या वयोगटातील हिरो नंबर १!!! थोड्या वेळाने केबल कारने आम्ही पुन्हा खाली उतरलो. ह्या हवेतील मैगीला आम्ही सरावलो होतो. त्याचा आस्वाद घेताना पॅराग्लायडिंग करणाऱ्यांच्या अनेक लीला दिसत होत्या. एकाला त्याचा मार्गदर्शक समोर दिसणाऱ्या हिमशिखरापाशी घेऊन गेला असे रणमारे म्हणाले. आम्हांला दिसणारा एक साहसवीर ढगांमध्ये बराच वेळ विहार करीत होता आणि तो जमिनीवर कधी आणि कसा उतरेल ह्याची आम्ही चिंता करीत होतो. चिंतातुर जंतु! पुन्हा एकदा हॉटेलचा परतीचा प्रवास! हो सांगायचं राहून गेलं. आमच्यातील काही जण रिवर राफ्टींगसाठी दुपारच्या भोजनानंतर जाणार होते. ह्या रिवर राफ्टींगचा आरंभबिंदू हॉटेलपासून ४५ किमीवर होता. दुपारच्या जेवणानंतर इतका प्रवास करणे आमच्या जीवावर आल्याने हा पर्याय आम्ही स्वीकारला नाही. परंतु मनालीला आल्यावर नक्कीच सर्वांनी रिवर राफ्टींग करावे. आणि खरेतर वीणावाल्यांनी रिवर राफ्टींगची वेळ सकाळची ठेवायला हवी होती असेच मलाच नव्हे तर सर्वांना वाटून गेले. दुपारच्या जेवणानंतर पुन्हा एकदा नभ मेघांनी आक्रमिले. ढगांचा मोठासा गडगडात झाला. वारेही सुटले आणि जडावलेल्या देहाला कधी निद्रेने आपल्या कब्जात घेतलं हे आम्हांला समजलंच नाही. अचानक साडेपाचला जाग आली. पुन्हा एकदा सायंकाळचा चहा आणि नास्ता! ह्यानंतर हॉटेलच्या परिसरात एक फेरफटका मारला. त्यानंतर होता तो सर्व तरुण मंडळी उत्कंठेने वाट पाहत असलेला डिस्को डेकचा प्रोग्रॅम. अंधाऱ्या वातावरणात सर्व नृत्यकुशल मंडळी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करीत होती. अशा गाण्यात सुद्धा स्टेप्स असतात हे हल्ली हल्ली कंपनीच्या कार्यक्रमात लोकांचे निरीक्षण करून शिकलो आहे. त्यातील 'तेरा प्यार प्यार हुक्काबार' हा ओळींच्या वेळी वरती हात करून धूर सोडण्याची कृती करावी हे बऱ्यापैकी माझ्या लक्षात राहिले आहे. त्यामुळे मी ती ओळ येण्याची बराच वेळ वाट पाहत होतो. बाकी माझ्या नृत्यकौशल्याविषयी मी मागच्या भागात लिहिलेच आहे. परंतु हल्ली आपल्याला जमेल तशा काही वेड्यावाकड्या स्टेप्स एका कोपऱ्यात करण्यास मला काही संकोच वाटत नाही. उगाच एका कोपऱ्यात बसून राहिले की लोकांचे लक्ष आपणाकडे जाते आणि मग ते उगाचच आपल्याला आत खेचतात त्यापेक्षा हा भाग परवडला. इथे नमूद करण्याची गोष्ट एकच! असं सर्वांसमोर वेडेवाकडी नृत्य करणे आपल्या संस्कृतीचा खरा भाग नव्हता. पण कोणास ठाऊक का पण आपण आज हे स्वीकारत आहोत. आणि ह्या अनाडी नृत्यावर नाच हा शहरी संस्कृतीच भाग बनत चाललं आहे. तेलकट, मसालेदार पदार्थ खावेत आणि मग ते पचविण्यासाठी अशा लीला कराव्यात. येणारा काळ आपणास अजून काय काय दाखविणार आहे कोणास ठाऊक! शेवटी जोडीनृत्याची वेळ आली. मंद पाश्चात्य संगीत सुरु झालं. प्राजक्ताने मला ह्या संगीतावर पदलालित्य करून दाखविण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण एकदा तिचा हात जवळजवळ पिरगळल्यानंतर आणि नंतर तिच्या पायावर बुटांनी जोरात पाय दिल्यावर तिने हा नाद सोडला! आणि आमचे नृत्य एकदाचे संपले आणि मी सुटकेचा निश्वास सोडला. पुन्हा एकदा कमी जेवण्याचा केलेला मोडलेला संकल्प! एव्हाना निशादची आणि माझी चांगली दोस्ती बनली होती. अधूनमधून माझी तो खेचत असे. असाच रात्रीच्या जेवणाच्या वेळी तो माझ्याजवळ आला. त्याच्या चेहऱ्यावरील मिश्किल भावांनी मी सावध होऊन बसलो. माझ्या जुन्यापुराण्या ब्लॅकबेरीकड़े पाहत म्हणाला, "काका जुना झाला की फोन!" मी सुद्धा म्हणालो "हो रे! पण करायचं काय?" चेहऱ्यावर आधी गंभीर भाव आणत तो म्हणाला, "पाण्यात टाका की!" आणि खो खो हसत पळत गेला! पाचवा दिवस संपला होता! म्हणायला गेलं तर सहलीचे अजून तीन दिवस बाकी होते. सहावा दिवस मनाली मार्केट मधील खरेदीचा, सातवा चंडीगडच्या ३१० किमी प्रवासाचा आणि आठवा मुंबईच्या प्रवासाचा. परंतु सर्व प्रेक्षणीय स्थळे बघून झाल्याने मनातील उत्सुकता उतरणीच्या मार्गावर होती. सहावा दिवस उजाडला. आज आदित्य आणि मंडळी जरा सावकाश होती. सर्वांना SUV मध्ये कोंबून कुठे दूरवर न्यायचे नव्हते ना! सकाळी सात वाजताचा निद्रामोड कॉल, तयारीची धावपळ आणि मग न्याहारीला काय पदार्थ असणार ह्याची उत्सुकता! ह्या सर्व प्रकारांची आता काहीशी सवय होऊन राहिली होती. आजचे खास आकर्षण होते, ग्रुप फोटो! न्याहारी झाल्यानंतर दोन्ही बसमधील सर्वांना गच्चीवर एकत्र बसवून एक सुंदरसा फोटो काढण्यात आला. सोशल मिडियावर बाकीच्या सहप्रवाशांची परवानगी न घेता तो प्रसिद्ध करणे उचित होणार नाही म्हणून तो इथे मी आणत नाहीये. ह्या गच्चीवरून दिसणारी ही मोहक दृश्ये! बच्चेमंडळी, तरुण जोडपी, मध्यमवयस्क जोडपी आणि जेष्ठ जोडपी आणि आदित्य मंडळी ह्यांना ह्या छायाचित्रासाठी कसे बसवायचं ह्यासाठी त्या स्थानिक छायाचित्रकाराचे काही नियम होते. हे नियम लागू करता करता त्याच्या नाकी नऊ आले. प्राजक्ता आणि माझ्याकडे बघून आमचे वर्गीकरण कोणत्या गटात करायचे ह्याचा संभ्रम पडणारा तो काही पहिला नव्हता. मी त्याची ही संभ्रमावस्था गमतीने पाहत होतो. शेवटी माझ्या केशरंगाचा मान राखून आम्हांला खुर्च्यांवर बसविण्यात आले! त्यानंतर आम्ही मनाली मार्केटच्या दिशेने मार्गक्रमण केले. वाटेतील प्रवासात दिसलेलं गुलाबाचं मोहक झाड! खरेदी करणे हा काही माझा आवडीचा प्रांत नाही. आम्हांला काही चांगल्या दुकानांची नावे सुचविण्यात आली होती. अग्रवाल शॉपिंग सेंटर ह्या दुकानाचे मराठी मालक कुलकर्णी ह्यांनी सर्वांचे स्वागत केले. इथे शाली, अक्रोड, बदाम तत्सम वर्गातील प्रकार, लसूण आणि सफरचंदाचे लोणचे वगैरे खरेदी आम्ही केली. सफरचंदाच्या लोणच्यावरून मला २००२ साली फिनिक्स, अरिझोना इथे तेलगु मित्राकडे पाहिलेल्या चिकनच्या लोणच्याची आठवण झाली. त्यावेळी त्या चिकनच्या लोणच्याची चव घेऊन पाहण्याची हिम्मत मला झाली नव्हती. परंतु इथे मात्र ह्या लोणच्याची चव घेत मी ते विकतसुद्धा घेतले. लोणचं आणि मनातील काही कप्पे ह्यात कसे साधर्म्य आहे पहा ना! क्षणभंगुर गोष्टींना टिकवून धरण्याचा आटोकाट प्रयत्न माणसं ह्या दोन प्रकारात करतात. मे महिन्यात आंब्यांचा मनमुराद आनंद घेतल्यावर धुमशान पाऊस चालू होतो आणि मग त्या आंब्यांची आठवण काढत काढत आपण त्या कुंद वातावरणात लोणच्याचा स्वाद घेत राहतो आणि पुढच्या मे महिन्याची आस धरून बसतो. आयुष्यातील भेटून गेलेल्या काही व्यक्तीसुद्धा अशाच कोठेतरी एका कोपऱ्यात कशा दडून बसून राहतात. खरेदी करून बाहेर आल्यावर मालक कुलकर्णी भेटले. बोलता बोलता मी वसईचा आहे हे कळल्यावर ते म्हणाले, "गैरसमज नको, पण तुमच्या बोलण्याच्या लकबीवरून मला वाटलंच की तुम्ही वसई विरारचे असावेत!" नंतर ते म्हणाले की "मी बोळींजचा!" वसई विरार भागातील माणसाचे मनालीला दुकान असावे ह्याचा रास्त अभिमान आम्हांला वाटला. त्यांचे गेले १२ वर्षे इथे वास्तव्य आहे. तिथल्या नियमानुसार त्यांना अजूनही मालमत्ता खरेदी करता येत नाही. सर्व काही भाड्याने! बहुदा १६ वर्षांच्या वास्तव्यानंतर परिस्थिती बदलेल असा आशावाद त्यांनी दर्शविला. पुढे एक तिबेटी मार्केट आणि अजून एक शॉपिंग सेंटर (बहुदा R. K. ) होते. इथे केसर चांगला असावा असा अंदाज होता. परंतु तिथला वाढीव भाव न पटल्याने आम्ही परत येऊन अग्रवाल शॉपिंग मध्येच तो खरेदी केला. बाकी इथे एक सुरेख बाग होती. आम्ही, कुलकर्णी आणि आफळे कुटुंबीयांनी तिथे वेळ व्यतीत करणे पसंत केले. त्या उद्यानातील काही सुंदर निसर्गचित्रे! तिथे खेळताना मुलांना आईसक्रीम खाण्याची खुमखुमी आली. उद्यानाबाहेर आईसक्रीमखरेदी करायला गेलेली मंडळी बऱ्याच वेळाने परत आल्यावर त्यांनी पाणीपुरीचे सुद्धा रसग्रहण केले हे ऐकून बरे वाटले. पाणीपुरी, पावभाजी, वडापाव अशा तत्सम वर्गाच्या खऱ्याखुऱ्या रसिकांविषयी मला सदैव आदर वाटत आला आहे . त्यांना उत्तर ध्रुवावर उणे ५० सेल्सिअस तापमानात जरी ठेवले तरी त्यांना ह्या खाद्यपदार्थांची एका तासाभरात आठवण येईल हे नक्की! सोहमला तिथे एक देवदार वृक्षाची बर्यापैकी मोठी फांदी सापडली. ती त्याने वसईला घेऊन जाण्याचा मानस व्यक्त केला. आता एका महिन्यानंतर अजूनही ती फांदी वसईच्या अंगणात आहे आणि तिला फुटणाऱ्या पहिल्या नवीन हिरव्या कोंबाच्या प्रतीक्षेत आम्ही सर्व अजूनही आहोत. बाकी मग परतल्यावर दुपारचं पोटभर जेवण. आता जवळजवळ एका महिन्यानंतर नक्की आठवत नाही, पण बहुदा जेवणात मटण होतं. परंतु त्याला काहीसा उग्र वास येत असल्याने आम्ही त्यापासून दूरच राहिलो. जेवणानंतर सहप्रवाशांशी गप्पा वगैरे मारण्यात वेळ गेला. आता हा रम्य प्रवास, चार दिवसांची सोबत संपुष्टात येणार ह्याची खंत सर्वांनाच लागून राहिली होती. काही वेळाने पुन्हा एक वामकुक्षी आणि चहापान! चहाबरोबर केवळ मारी बिस्किटे पाहून आम्ही वीणा वर्ल्डला धन्यवाद दिलं! अमोल कुलकर्णी ह्यांनी हॉटेलसमोरून जाणाऱ्या रस्त्यावर पुढे मजल मारली होती. तिथली सफरचंद आणि नाशपत (हा त्यांचा उच्चार, मी त्याला नासपत म्हणायचो!) ह्याच्या बागा पाहण्याचे आम्ही ठरविले. ह्या बागा छोट्याशाच पण सुंदर होत्या. त्याचे आम्ही निरीक्षण केले आणि हो फोटोही काढले. हिमाचलप्रदेशातील उंच पर्वतराजीतील एका छोट्या गावातील मे महिन्यातील संध्याकाळची सात वाजताची शांत वेळ आपणास बरेच अंतर्मुख करून जाते. आयुष्य अगदी असेच शांतपणे व्यतीत करण्याची अगदी दाट इच्छा असली ती पूर्ण करण्याची हिंमत आपल्यात नाही ह्याची खंत नक्कीच जाणवते. परत येताना एक छोटेखानी घर होते. तिथे विणकाम वगैरे करीत असलेली एक महिला पाहून महिलावर्गाने तिच्याकडे आपला मोर्चा वळविला. डिस्कवरी वाहिन्या, मीना प्रभू ह्यांची प्रवासवर्णने वगैरे वाचून स्थानिक रहिवाश्यांशी संवाद, तिथल्या संस्कृतीचा अभ्यास वगैरे प्रकार आपणसुद्धा करावेत अशी मनीषा आमच्याकडे सुद्धा निर्माण झाली आहे. त्यानुसार त्या महिलेशी पाटील आणि कुलकर्णी महिलावर्गाने संवाद सुरु केला. सुरुवात अर्थातच तिच्या हातातील बांगड्यांच्या नक्षीवरून झाली. तिच्या पेहरावाचे सुद्धा मनसोक्त कौतुक करण्यात आले. डिस्कवरीचा विडीओ फोटोग्राफर आपल्यासोबत नाहीय ह्याची राहून राहून मला खंत वाटत होती. ही महिला बोलण्यात अगदी हुशार होती. हिवाळ्यात रस्त्यावरील बर्फ कसा तात्काळ काढला जातो, आम्ही हिवाळ्यापासून बचाव करण्यासाठी उत्तर प्रदेश वगैरे भागातील तीर्थस्थानांना भेट देऊन येतो अशी सर्व माहिती तिने आम्हाला दिली. तिची परवानगी घेऊन आम्ही काढलेला तिचे हे फोटो! आम्ही परतलो तोवर सोहम आमची वाट पाहत होता. ह्या हॉटेलातील निरोपसोहळा सुरु झाला होता. प्रथम आदित्याने उद्याचा कार्यक्रम सांगितला. ह्याला मध्येच आम्ही लग्न कधी करणार असे छेडले होते. तर तो म्हणाला, " वर्षातील नऊ महिने इथेच जातात तर लग्न कसे करणार?" "मग इथलीच मुलगी का नाही बघत?" हा प्रश्न ओघाने विचारला गेला. "इथल्या मुली आखडू असतात!" तो म्हणाला! अनुभवांचे बोल असे म्हणून आम्ही त्याची बराच वेळ मस्करी करीत होतो. तर ह्याची उद्याचा कार्यक्रम सांगण्याची सवय मला फार आवडून गेली. समजा पुढे मागे मुलगी पाहायला गेला तरीसुद्धा तिला उद्याचा कार्यक्रम सांगूनच तो पुढे बोलेल असे मला वाटतं! मग हौसी नावाचा महिलावर्गात आवडता असलेला खेळ खेळण्यात आला. अशा खेळात मी शक्यतो जिंकत वगैरे नाही. प्राजक्ताचे नशीब तसे चांगले असते पण माझ्याजवळ बसल्याने असेल म्हणून तिचे अथवा सोहमचे नशीब उजळले नाही. त्यानंतर वैयक्तिक कार्यक्रमासाठी प्रवाशांना विनंती करण्यात आली. मुग्धा कुलकर्णी ह्यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात सुरेख गाणं गायलं. त्यांना वन्स मोर ची विनंती सुद्धा झाली. दोन दक्षिणी (बहुदा जुळ्या) बहिणींनी आधुनिक हिंदी गाण्यावर सुरेख नाच केला. अशा दोघी नर्तिका पाहिल्या की मला हल्लीच पुन्हा पाहिलेलं १९६४ च्या आसपासचे 'तुमको पिया दिल दिया बडे नाज से' हे गाणे आठवते. असा नाच हल्ली का बरे शिकविला जात नसावा? त्यानंतर विविध स्पर्धातील विजेत्यांना मराठी पुस्तके बक्षीस देण्यात आली. मराठी वाचन संस्कृती जोपासण्याचा वीणा पाटील ह्यांचा हा उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे. चार पाच महिन्यानंतर ह्या ब्लॉगच्या छापील प्रती बक्षीस म्हणून वाटल्या जातील असा मानस मी मनी बाळगून आहे. त्यानंतर कोळी आणि पाटील (अर्थात आम्ही) ह्या कुटुंबियांचे गेल्या आठवड्यातील लग्नाचे वाढदिवस केक कापून साजरे करण्यात आले. रात्रीची जेवण आटपली. ह्या हॉटेलची साथ सुटणार ह्या विचाराने मला तर समोर आयतं ताट वाढून येण्याचे दिवस संपत आले आहेत ह्या विचाराने प्राजक्ताला गहिवरून आले होते! रोज रात्री रंगणाऱ्या गप्पा आज रात्री अधिकच रंगल्या होत्या. तिथून पाय निघता निघवत नव्हता. परंतु उद्याचा लांब प्रवास आणि भराव्या लागणाऱ्या बॅगांच्या विचाराने शेवटी गप्पा आवरत्या घ्याव्या लागल्या. ई मेल, फोन क्रमाकांची देवाणघेवाण झाली. WHATSAPP वर एकमेकांना जोडण्यात आले. एक तत्वाचा प्रश्न म्हणून मी अजूनही WHATSAPP वर नसल्याने माझ्या बाबतीत हे लागू नव्हते. आवराआवर करून आम्ही मनालीतील शेवटच्या रात्री निद्राधीन झालो. आवराआवर करताना वीणा वर्ल्डच्या सुक्क्या खाऊला कसे बरे विसरणार? . आज सहलीचा सातवा दिवस! ३१० किमी प्रवासाची नकोशी जाणीव मनात दडी धरून होती. सकाळी लवकर उठून, बॅगा वगैरे भरून आम्ही चंदीगडच्या प्रवासासाठी निघालो. काही वेळातच वैष्णो माता देवीचे (सुप्रसिद्ध वैष्णोदेवीचे नव्हे) मंदिर आलं. हे मंदिर एका मध्यम उंचीच्या डोंगरात वसलेलं आहे. ह्या मंदिराचं नाव आधी केव्हा ऐकलं नव्हतं. परंतु विविध उंचीवर असलेल्या देवांच्या अनेक मूर्ती पाहून डोळ्यांचे पारणे फिटलं. सर्व देवांचे दर्शन घेण्यासाठी अनेक पायऱ्या चढून जावं लागतं. पण हे सर्व बंदिस्त असल्याने फारसा त्रास जाणवला नाही. प्रत्येक मूर्तीभोवतालच नक्षीकाम मनाला थक्क करून सोडणारं होतं. त्यावरील कलाकुसर इतकी सूक्ष्म होती की हे इतक्या प्रमाणातील नक्षीकाम करायला किती वेळ लागला असेल ह्याचा विचार करणे सुद्धा कठीण होतं. पूर्वीची लोक विविध रूपांत तपस्या करीत. पाठांतर, संगीत, चित्रकला, शिल्पकला ह्या सर्व माध्यमातून वर्षोनवर्षे आपली कलाकुसर घडवीत. ईश्वराशी एकरूप होण्यासाठी ही माध्यमे असावीत असे कधी कधी वाटून जातं. अशा ठिकाणच्या वातावरणात का कोणास ठाऊक एक प्रकारची गूढ शांतता असते असे मला वाटतं. ईश्वराचं वास्तव्य काही प्रमाणात आपल्या मनात कुठेतरी दडलं असणार, ह्या कलाकारांनी बहुदा त्या अंतर्मनातील ईश्वराला साद देण्याचा कलामाध्यमातून प्रयत्न केला असणार. ह्या मंदिराच्या परिसरात छायाचित्रणास सक्त मनाई होती. तिथे नवग्रहांचे मंदिर सुद्धा होते. आणि मग शनीची एक वेगळी मूर्ती होती. शनिवारच्या दिवशी शनीला तेलाभिषेक करण्याचं भाग्य आम्हांला लाभलं. ह्या मंदिराच्या जवळून नदीचा खळखळ आवाज करणारा प्रवाह होता. आज बसमध्ये लेज आणि फ्रुटी ह्यांचं प्रवाशी मंडळींना वाटप करण्यात आलं. त्यामुळे बच्चेमंडळी तर खुश झालीच पणआई बाबालोक सुद्धा खुश झाले. स्वतःची अशी फ्रुटी आपल्या लहानपणी फार कमी वेळा मिळाली असेल आणि आता मोठेपणा (वयाचा!) आपली स्वतःची फ्रुटी असावी असा विचार मनात बहुदा आणून देत नाही. पण ह्यापुढे संधी मिळाल्यास महिन्यातून एकदा तरी शांतपणे फ्रुटी प्यावी आणि लेज वगैरे खाऊन घ्यावेत असा निर्धार करण्याचा विचार मनात डोकावला. बाकी परतीचा प्रवास बऱ्याच भागापर्यंत सिमल्याहून येतानाच्या मार्गाचाच होता. त्या प्रवासाची ही काही चित्रे! दोन डोंगराच्या मधून आपली वाट शोधणारी ही नदी मला खूप भावली! मार्गात अनेक संकटे आली तरी त्यातून आपला मार्ग शोधावा असा सल्ला देण्याचा दृष्ट विचार सुद्धा त्यावेळी माझ्या मनात आला नव्हता. भोवतालच्या निसर्गाचा परिणाम असावा! पण आज मात्र तो विचार माझ्या मनात आला. भोवतालच्या वातावरणाचा प्रभाव; बाकी काय! पुन्हा एकदा पायऱ्यापायऱ्यांची शेती! मला इथे आपले एक छोटे घर असावे असे राहून राहून वाटत होते. नदीची अनेक नयनरम्य वळणे टिपण्याचा हा प्रयत्न! बाकी बसमध्ये अमेय आणि मंडळी खाद्यपदार्थांच्या नावाच्या भेंड्या खेळत होते. नाचणीचे सत्व, ठेचा, थालीपीठ वगैरे प्रकारापासून सुरु झालेली गाडी आधी लाल भात आणि मग बदकाचे मटण वगैरे प्रकारावर येऊन पोहोचली तेव्हा मग मंडळी वैतागली आणि मग आपसूक गाण्यावर वळली. काही का असेना पण प्रवासीमंडळी आज विचारात गढली होती. इतके दिवस, महिने जिची उत्सुकतेने वाट पाहिली, ती सहल जवळजवळ संपली होती. मनाला एक नवीन उत्साहाचं भरतं आलं होतं. वर्षभर तणावाचे, नैराश्याचे अनेक प्रसंग येतात. हयावर मात करण्यासाठी प्रत्येकाची वेगवेगळी तंत्रे असतात. अशा सहलीतील अनुभवलेले मनमोकळे क्षण आपल्या मनाला सर्व बंधनातून मुक्त करून आपल्या आयुष्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहण्याची क्षमता देतात. हे जग, आपलं आयुष्य एक मोठं विस्तृत पसरलेलं अंतराळ आहे. शहरात आपण जे आयुष्य जगतो ते ह्या विस्तृत पसाऱ्याचा एक छोटासा भाग आहे. त्यामुळे ह्या छोट्या भागाचं फारसं दडपण घेऊ नये ही दृष्टी, हा विचार मनात निर्माण करण्याची क्षमता पर्यटनामुळे आपल्यास लाभावयास हवी. उत्साहाचं भरलेलं हे लोणचं वर्षभरात जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा बाहेर काढावं! प्रवास चालूच होता. जेवणाचं ठिकाण हॉटेल वैली व्यू साडेअकरा वाजताच आलं त्यामुळे लवकर भोजन करणे क्रमप्राप्त होते. सव्वा बाराच्या उन्हात पुन्हा त्या बसमध्ये बसणे अगदी जीवावर आले होते. परंतु नाईलाज होता. वाटेत ऋषी धवनचे गाव मंडी लागलं. त्यानंतर हळूहळू प्रदेश रुक्ष होत चालला होता. आणि मग एका वळणावर सिमल्याचा रस्ता सुटून आम्ही बिलासपुरच्या मार्गे लागलो. कुलकर्णी ह्यांना बिलासपूर विषयी, हे शहर कसे असेल ह्याविषयी जरा उत्सुकता होती. परंतु एकंदरीत त्या गावाने त्यांची निराशा केली. आता बर्यापैकी खाली उतरल्याने आजूबाजूची झाडी सुद्धा वेगळी दिसत होती. विशेष म्हणजे आंब्यांची झाडे सुद्धा होती. त्यांना आताशा कैऱ्या लागल्या होत्या. एक दीर्घ प्रवास सुरु होता. आता पुन्हा चढ लागला होता. उंच पर्वतांना वळसा घालून जावं लागत होत. अशा दोन उंच डोंगराना जोडणारे पूल बांधल्यास ह्या प्रदेशातून प्रवास करणाऱ्या असंख्य मालवाहू ट्रक, प्रवासी बसेस ह्यांचा वेळ आणि इंधन ह्यात खूपच बचत होईल असा प्रस्ताव कुलकर्णी ह्यांनी मांडला. एक पर्यावरणाची हानी हा भाग सोडला तर त्यांच्या ह्या प्रस्तावात मला खूपच तथ्य वाटलं. ह्या प्रस्तावाच्या अनुकूल / प्रतिकूल बाबींचा (Feasibility Study) अभ्यास करण्यासाठी सरकारने एक शीघ्र समिती नेमावी अशी मागणी मी इथे करीत आहे. महामार्गाचा हा भाग (जवळजवळ ४० किमी) खराब असल्याने प्रवासास जास्तच वेळ लागत होता. साडेतीन - चारच्या सुमारास एका सुमार धाब्यावर चहापानासाठी आम्ही थांबलो. वीणा वर्ल्डवाल्यांनी नेहमीप्रमाणे गल्ल्याचा ताबा घेतला. पुन्हा बसमध्ये बसलो. आता अमेयने चित्रपटांच्या नावांच्या भेंड्या सुरु केल्या. The Last of the Mohicans, The Two Days in Valley, Last Samurai अशा नावांचा मी त्याच्यावर मारा केल्यावर बिचारा हतबल झाला. चेहऱ्यावर कसनुसं हसू आणत ही नावे स्वीकारण्याशिवाय त्याला पर्याय नव्हता. आमच्या गटातील बाकी मंडळींनी सुद्धा चांगली कामगिरी बजावल्याने भेंडी चढायची राहिली. मग अचानक रस्ता सुधारला. महामार्ग सुरु झाला. पंजाब आलं होते. ह्याच सुमारास धुळीचे मोठे वादळ सुरु झाले. त्यामुळे एकदम बदल झाल्यासारखं वाटत होते. पंजाबातील कालवे, गव्हाची शेती, केवळ लाकडासाठी पैदास केलेले वृक्ष ह्यांची सुंदर दृश्ये बसमधून दिसत होती. ह्या वृक्षांची नावे कोणाला माहित असल्यास जरूर सांगा! कालव्याचे विहंगम दृश्य! पंजाबला गव्हाचे कोठार म्हणतात ह्या लहानपणी शिकलेल्या वाक्याची प्रचीती देणारी दृश्ये! पंजाब खरोखर खूप समृद्ध आहे ह्याची केवळ बसमधील पंजाबच्या दर्शनाने खात्री पटत होती. परंतु ह्याच पंजाबातील तरुण पिढी व्यसनी पदार्थांच्या अधीन होत चालली आहे ह्याच्या बातम्या वाचून फार दुःख होत होते. समृद्धी कशी पचवावी ह्यावर आता भारतात धडे घ्यावे लागतील अशीच लक्षणे दिसू लागली आहेत. चंडीगड शहरातील रस्ते प्रशस्त होते. एका ठिकाणी तर रस्त्याच्या कडेला मोर दिसल्यावर आतापर्यंत शांत असलेल्या बसमध्ये थोडे चैतन्य पसरलं. हॉटेल आता १० -१५ मिनिटात येईल असे अमेय गेले दीड सांगत होता! शेवटी एकदाचे ते हॉटेल आले. चार तारांकित असलेले हे हॉटेल निर्विवादपणे आतापर्यंतच्या ह्या प्रवासातील सर्वोत्तम हॉटेल होते. त्याची ही काही दृश्ये! कुलकर्णी ह्यांच्या आईवडिलांनी त्यांनी पंजाबातील लस्सी पिण्यास सांगितल होते. परंतु हॉटेलवर उशिरा पोहोचल्याने ती मनिषा पूर्ण झाली नाही. रात्रीचे जेवणही ह्या हॉटेलला साजेसे होते. ह्या वर्षात पहिल्यांदा शनिवारी चिकन खाण्याचा मोह आवरला नाही! शनैश्वरा, माफ करा! सकाळचा नास्ताही वैविध्यपूर्ण होता. सर्वांनी एकमेकांच्या संपर्कमाहितीची देवाणघेवाण केली. मी सर्वांना जबरदस्तीने ब्लॉगचा पत्ता दिला. हिट संख्या वाढायला नको का? आणि हे सहप्रवासी नक्कीच ह्या ब्लॉगशी अधिक जवळून समजून घेतील! विमानतळपाच मिनिटातच आला. इथेच हा प्रवास सुरु झाला होता. इतक्या दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात आम्हाला अगदी सुखरूप आणणाऱ्या ड्रायव्हरचे आम्ही मनापासून आभार मानले. माझ्या जुन्यापुराण्या ब्लॅकबेरीत त्याचा फोटोही काढला. आदित्य, अमेय मंडळींचा आम्ही भावूक निरोप घेतला. हिमाचल कितीही सुंदर असलं तरी आता आपली मुंबई आम्हांला साद देत होती. पण ह्या मंडळींना मात्र 'Show Must Go On!' ह्या उक्तीनुसार एका नवीन सहलीला जावे लागणार होत. आदित्याची तर तेरा दिवसाची लगेचच सहल होती. त्यांच्या निग्रही मनोवृत्तीचे कौतुक करावे तितके थोडे! विमानात सुद्धा जवळजवळ बससारखंच वाटत होतं! उड्डाणाच्या वेळी गणपती बाप्पा मोरया करण्याचा मोह कसाबसा आवरला! विमानाने उड्डाण केलं. सोहमशी मांडवली करून खिडकीची जागा पटकावली. मध्येच ढगाळ वातावरण लागलं. त्यानंतर मात्र आकाश स्वच्छ झाले. अशाच आकाशातील ही ढगांची रांग! विमानातले अल्पोपहार करता करता मुंबई कधी जवळ आलं ते समजलं सुद्धा नाही! मुंबई विमानतळाजवळील ही टेकडी! गो एयर विमान आमच्या मनातील त्याच्या प्रतिमेनुसार वेळेआधीच दहा मिनिटे मुंबईला उतरले! आणि बाहेर आल्यावर सातव्या मिनिटाला सामान हातात पडले / खेचून काढले. पुन्हा एकदा सर्वांचा निरोप घेतला. प्री पेड टॅक्सीत बसलो. पहिल्याच सिग्नलला लागलेलं हे मुंबईतील दुर्मिळ हिरवं दृश्य! टॅक्सी भरधाव वेगाने धावत होती. अशीच आठवण निघाली. आमच्या कंपनीतील एका पार्टीत प्रत्येकाने अमेरिकेतील आणि भारतातील किती राज्ये बघितली ह्याची चर्चा चालू होती. फक्त दोघांचा अपवाद वगळता आम्ही दहा जणांनी बघितलेल्या अमेरिकेतील राज्यांची संख्या जास्त निघाली. आज मी भारतातील राज्यांच्या संख्येत तीनाची भर घातली ह्याचा सार्थ अभिमान मला वाटला. दुसऱ्या दिवशीची सकाळ! नऊ वाजले तरी सोहम बिछान्यातून लवकर उठत नव्हता. प्राजक्ता जवळ जाऊन ओरडली, "वीणा वर्ल्ड, वीणा वर्ल्ड!" पाचव्या मिनिटाला गडी दात वगैरे घासून हॉलमध्ये येउन बसला एका सांग्रसंगीत नास्त्याच्या अपेक्षेने! (समाप्त)

२ टिप्पण्या:

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...