मी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक तत्वांचा चाहता आहे. ही तत्त्वे प्रत्यक्ष जीवनात योग्य प्रकारे वापरली तर खुप सकारात्मक बदल घडून येऊ शकतो ह्यावर माझा ठाम विश्वास आहे. वेळेअभावी आजची पोस्ट अगदी छोटी असणार आहे.
आजचं तत्त्व आहे 'आपत्कालीन व्यवस्थापन'. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात ज्यावेळी एखादा मोठा बदल (आज्ञावली / infrastructure संबंधित) अंमलात आणण्याची तयारी सुरु असते त्यावेळी संबंधित टीमला अनेक मुद्द्यांची तपासणी यादी भरून द्यावी लागते. त्यातील काही महत्वाचे मुद्दे
१. ह्या बदलामुळं जर काही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर ती तुम्ही कशी निस्तराल?
२. आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्याच्या क्षणापासून ते योग्य व्यक्तीला संदेश पोहोचण्यासाठी किती वेळ लागणार आहे? ही संदेशवहनाची प्रक्रिया पुर्णपणे automated आहे की नाही?
३. ह्या आणीबाणीच्या परिस्थितीची रंगीत तालीम तुम्ही केली आहे की नाही? ही रंगीत तालीम प्रत्यक्षातील परिस्थितीशी किती मिळतीजुळती आहे?
टीमकडे वरील प्रश्नांची सकारात्मक उत्तरं नसतील तर त्यांना तो बदल अंमलात आणण्यास परवानगी दिली जात नाही. आणि जर ह्या प्रश्नांची सकारात्मक उत्तरं देऊन जर बदल अंमलात आणला गेला आणि प्रत्यक्ष जीवनात (production environment) मध्ये ह्या बदलाने गोंधळ घातला तर तुमचं नाव काळ्या यादीत टाकलं जातं. पुढील बदल अमलात आणण्यासाठी तुमच्यावर अधिक कठोर बंधनं घातली जातात.
आपल्या भोवती जे सुरु आहे त्यात प्रचंड बदल अगदी किमान तपासणी यादीच्या आधारावर प्रत्यक्ष जीवनात अमलात आणले जात आहेत. ह्या सर्व मुलभूत सुविधांच्या बाबतीत आणीबाणीच्या कोणत्या परिस्थिती निर्माण होऊ शकतात, त्यावर उपाय कसा काढावा, कोणाला तात्काळ पाचारण करावं ह्याविषयी कोणतीही सुस्पष्ट योजना कागदावर नाही. त्यामुळं आपण ह्या सर्व सुविधांचा वापर करत असताना कोणता धोका घेत आहोत ह्याची आपल्याला जाणीव असणं आवश्यक आहे. इथं मर्फीचे तत्त्व उद्धृत करावंसं वाटतं.
Murphy's Law - "Anything that can go wrong, will go wrong".
भविष्यात जर तुम्ही आंतरराष्ट्रीय उड्डाण करण्यासाठी पुण्याहून मुंबईला एक्सप्रेस वे ने निघणार असाल तर गेले दोन दिवस चाललेली महाकाय वाहतूक कोंडी लक्षात ठेवा. ही सुविधा निर्माण करणाऱ्यांनी आपत्कालीन व्यवस्थापनाकडं पुरेसं लक्ष न दिल्यानं ह्या महामार्गाचा आंतरराष्ट्रीय विमान पकडण्यासाठी वापर करण्यात जो काही धोका असतो त्याचं स्वामित्व तुम्हांलाच घ्यावं लागणार आहे!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा