मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, ३१ ऑगस्ट, २०२५

भारताचे पितामह - दादाभाई नवरोजी


मराठी शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकांत ज्यांच्याशी आपला परिचय झाला, ज्यांच्या आदरणीय व्यक्तिमत्त्वांनी आपल्याला भारावून सोडलं अशा व्यक्ती बऱ्याच वर्षांनी अचानक वर्तमानपत्रे, मासिके ह्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सामोऱ्या येतात तेव्हा मन त्या आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलायला लागतं. भावनामय अवस्थेतून बाहेर आल्यानंतर त्या लेखातील सखोल माहिती वाचल्यानंतर अशा व्यक्तींच्या ज्ञानाविषयी प्रचंड आदराची भावना निर्माण होते. अशीच भावना भारतीय राष्ट्रवादाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादाभाई नवरोजी ह्यांच्याविषयी आज त्यांच्या जन्म द्विशताब्दीनिमित्त लोकसत्तेने प्रसिद्ध केलेल्या दोन लेखांमुळं निर्माण झाली. एका ऋषितुल्य व्यक्तिमत्वाविषयी निरंजन राजाध्यक्ष आणि गोविंद तळवळकर ह्या अभ्यासू लेखकांनी लिहिलेल्या लेखांतील काही महत्वाचे मुद्दे माझ्या मतांसहित इथं उद्धृत करत आहे. गोविंद तळवळकर ह्यांच्या व्यासंगाविषयी बोलण्याचं धारिष्टय मी करू नये. 

आजच्या काळात अर्थशास्त्रज्ञांची एक मोठी फौज दिमतीला घेऊन एखादी वित्तीयसंस्था देशाचं आर्थिक उत्पादन मोजण्याचं काम करते. दादाभाईंनी केवळ कागदोपत्री असलेल्या माहितीच्या आधारे एकट्यानं हा भार उचलला. शेतकऱ्यांकडून घेतलेल्या कर्जाच्या माहितीच्या आधारे भारताच्या कृषी उत्पादनाचा अंदाज बांधून त्यांनी त्याला खाणकाम, वन उत्पादन आणि इतर क्षेत्रातील उत्पन्नाची जोड दिली. त्यांच्या अंदाजानुसार त्याकाळी असलेलं भारताचं ३४० कोटी वार्षिक उत्पन्न (दरडोई केवळ २० रुपये) आपल्याला तत्कालीन भीषण दारिद्याची जाणीव करून देते. अत्यंत धक्कादायक मुद्दा म्हणजे त्याकाळी तुरुंगात असणाऱ्या कैद्यांचे पोषण हे बाहेर असलेल्या मुक्त नागरिकांपेक्षा चांगल्या प्रकारे होत असे. 

कालांतरानं दादाभाई नवरोजी ह्यांनी जी 'ड्रेन थिअरी' मांडली त्यात भारतातून निर्माण होणारी संपत्ती विविध मार्गानं कशी देशाबाहेर नेली जात आहे ह्याच्या विविध मार्गांचा उल्लेख करण्यात आला होता. ब्रिटिश प्रशासकांचं प्रचंड पगार, त्यांना मिळत असणारं सेवानिवृत्ती वेतन, भारतात मिळणाऱ्या फायद्याचं ब्रिटनमध्ये हस्तांतरण इत्यादी मुख्य मुद्यांचा समावेश होतो. अर्थात त्यांच्या ह्या ड्रेन थिअरी मधील अनेक गृहीतकांविषयी काही प्रश्न उपस्थित निर्माण करण्यात आले.  पण आपल्या लेखाच्या शेवटी राजाध्यक्ष ह्यांनी दोन अत्यंत महत्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत. पहिला मुद्दा म्हणजे कोणत्याही देशात राजकीय स्वातंत्र्य, समाजसुधारणा ह्यांच्या जोडीला आर्थिक प्रगती महत्वाची आहे ह्याची जाणीव दादाभाई ह्यांनी त्याकाळी निर्माण केली. दुसरा मुद्दा म्हणजे देशप्रेम दाखविण्यासाठी फक्त आंदोलने करण्याऐवजी माहिती आणि आकडेवारी वापरून लोकांचे प्रबोधन करण्याचा मार्ग त्यांनी निवडला. हे दोन्ही धडे आजच्या भारतासाठी उपयुक्त आहेत असे सांगून राजाध्यक्ष ह्यांनी आपल्या लेखाची सांगता केली आहे. 

पहिल्या मुद्यात उल्लेखलेल्या राजकीय स्वातंत्र्य, समाजसुधारणा आणि आर्थिक प्रगती ह्या तीन घटकांचा आजच्या काळात विचार करता काही मुद्दे डोळ्यासमोर येतात. राजकीय स्वातंत्र्याचा आजच्या काळात अभिप्रेत असणारा सखोल अर्थ कोणता? शहरात समाजसुधारणेच्या इच्छित ध्येयांपेक्षा आपण नको तितके पुढे आलो आहोत पण खेड्यांमध्ये मात्र अजूनही बरंच काही गाठायचं आहे आणि आर्थिक प्रगतीची नक्की व्याख्या काय ? पर्यावरणाच्या होणाऱ्या हानीकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करू शकतो का? 

दादाभाई नवरोजी ह्यांना बहुदा आपण राजकारणी असे संबोधू शकणार नाही. तरीही एका राष्ट्रीय नेत्यानं कशी अभ्यासू वृत्ती दाखवायला हवी त्याचे ते एक उत्तम उदाहरण होते. सखोल अभ्यास करणाऱ्या नेत्यांचे प्रमाण आजच्या काळात नक्कीच वाढायला हवं असा विचार मनात आल्यावाचून राहत नाही. 

गोविंद तळवळकरांचा लेख हा त्यांच्या पुस्तकातील संपादित अंश आहे. त्यात काही समान मुद्दे आहेत. पण भारतातील गरिबीसाठी केवळ इंग्रजांना जबाबदार धरणं कितपत योग्य आहे ह्याचा योग्य ऊहापोह ह्या लेखात करण्यात आला आहे. इंग्रजांनी अधिक जकातीद्वारे भारतातील वस्त्रउद्योग, जहाजबांधणी उद्योग ह्यांना कसे पद्धतशीर मार्गानं अधोगतीस लावलं ह्याची सविस्तर माहिती इथं देण्यात आली आहे. दादाभाई नवरोजी ह्यांनी आपल्या पन्नास वर्षाच्या सार्वजनिक जीवनातील बराच काळ इंग्लंडमध्ये व्यतित केला. त्यामुळं व्यापार आणि उद्योग ह्यांचं महत्त्व त्यांना पटलं आणि इंग्लंडमधील आधुनिक विचारांची ओळख त्यांना मिळाली. त्याच्या प्रभावामुळं त्यांनी व्यापार आणि उद्योगाला प्रोत्साहन देण्याचा दृष्टिकोन १८६० सालापासूनच अवलंबिला. 'द्रष्टा' नेता म्हणतात त्याचं हे उत्तम उदाहरण! 

लेखाच्या पुढील भागात दादाभाई, डिग्बी,  कर्झन, के. टी. शहा ह्या तज्ञांनी मांडलेल्या एकंदरीत राष्ट्रीय उत्पन्न आणि त्या अनुषंगानं काढण्यात येणारं दरडोई उत्पन्न ह्या आकड्यात कसा फरक होता आणि त्यामागील कारणं ह्यांचा ऊहापोह करण्यात आला आहे. दीडशे वर्षापुर्वी सुद्धा प्रगत विचारसरणी  आणि सखोल अभ्यासू वृत्ती ह्यांची सांगड घालणारे नेते आपल्याला लाभले होते हे आपलं सुदैव ! 'भारतीय आर्थिक राष्ट्रवादाची गंगा ह्या उदात्त ध्येयानं प्रेरित झालेल्या महर्षीनं परिवर्तित केली'  विचाराला प्रवृत्त करणाऱ्या वाक्यानं ह्या लेखाचा शेवट होतो. 

ह्या दोन लेखांनी माझ्यावर आज बराच सकारात्मक प्रभाव पाडला आहे. प्रतिकुल  परिस्थितीत (आजच्या काळाच्या तुलनेत ज्ञानसंपादनास करावे लागणारे अथक परिश्रम) दादाभाई ह्यांनी सखोल अभ्यासाद्वारे ब्रिटिश साम्राज्यशाहीशी अधिकृत मार्गानं आर्थिक राष्ट्रवादासाठी कसा लढा दिला ह्याचं वर्णन मला उत्साहित करून गेलं.  मोठं ध्येय प्राप्त करायचं असेल तर कठोर परिश्रमाला पर्याय नाही हे आपल्याला जरी माहीत असलं तरी दैनंदिन जीवनाच्या रगड्यात ही शिकवणूक कुठंतरी मनाच्या कोपऱ्यात ढकलली जाते. असे लेख ह्या शिकवणुकीला पुन्हा एकदा आपल्या मुख्य विचारांच्या प्रवाहात घेऊन येतात. सद्यपरिस्थितीत काहीसं निराश झालेलं मन पुन्हा एकदा अथक परिश्रमाची कास धरण्यास सज्ज होतं. धन्यवाद साप्ताहिक सुट्टीच्या दिवसातील पुरवण्या !  

रविवार, २४ ऑगस्ट, २०२५

साप्ताहिक सुट्टीचा संभ्रम !


शनिवार सकाळी माझ्या मनात आदर्शवाद ओसंडून वाहवत असतो. आपल्याकडं देवानं दिलेलं पुढील बारा तास आहेत, त्यांचं आपल्या आयुष्यातील विविध जबाबदाऱ्यांमध्ये संतुलित विभाजन करून आपल्या आयुष्यात एक समाधानी दिवसाची नोंद करता येईल असले विचार मनात घोळत असतात. आयुष्य असो वा दैनंदिन दिवस असो, गोष्टी वेळेवर झाल्या की त्यात समाधान असतं. कोणत्याही निर्णयात वेळेचं गणित आणि परिपुर्णता ह्या दोघांची सांगड घालता येणं ही तारेवरची कसरत असू शकते. 

साप्ताहिक सुट्टीत कार्यालयीन कामासंबंधी सखोल वाचन करण्याचा  छुपा विचार मी सदैव बाळगून असतो. पण ते प्रत्येक वेळी जमतंच असं नाही. घरकामात थोडीफार मदत, दोन्ही दिवस घरात येणाऱ्या जाडजूड पेपरांतील लेखांचं वाचन, त्यातून काही डोक्यात विचार आला तर एखादी पोस्ट आणि लोकांना कंटाळून सोडण्यासाठी गायन अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडण्याचा माझा मनसुबा असतो. त्याचबरोबर दुपारी मस्त ताणून देणं ही सुप्त इच्छा देखील मनात असते. 

दिवस जसजसा उलगडत जातो तसतसा आदर्शवाद माझा निरोप घेऊन गायब होतो. इच्छित ध्येयांपैकी केवळ मोजक्या ध्येयांचा आपण पाठपुरावा करू शकतो हे सत्य काही काळानं मी स्वीकारतो. बऱ्याच वेळा ह्याला शनिवार, रविवारी येणारी जाडजूड वर्तमानपत्रं कारणीभुत असतात. त्यातील लेख वाचून मी माझ्या बाकीच्या ध्येयांपासून भरकटला जातो. इथं महत्वाचा मुद्दा असा आहे की माझ्या बाबतीत सकाळी सखोल अभ्यास करण्याची शक्यता महत्तम असते. एकदा का ती वेळ गेली की बाकीच्या वेळात मी माझ्या सर्वोत्तम मनस्थितीत नसतो. म्हणायला गेलं तर नाटकं !  

हल्ली खरं तर  साप्ताहिक सुट्टीच्या वेळी वर्तमानपत्रात येणाऱ्या लेखांतील विषयात तोचतोचपणा आला आहे. विषयात नावीन्य नसलं तरी विषय कशा प्रकारे मांडला गेलाय ह्यावरून लेखाच्या वाचनीयतेमध्ये चढउतार होऊ शकतो.  आता वळूयात काल आणि आज आलेल्या पुरवण्यांतील आणि काही बाबतीत मुख्य वर्तमानपत्रातील माझं लक्ष वेधून घेतलेल्या काही लेखांचा आढावा !

कालच्या इंग्लिश पेपरात एका जोडप्याची गोष्ट होती. आपल्याभोवती जाणवणारी! नवरा कामानिमित्त विविध ठिकाणी फिरणारा, काहीसा आपल्या कोषात आनंद मानणारा. तर पत्नीला आपल्या नवऱ्याच्या व्यावसायिक जीवनाचा भाग होण्याची मनापासून इच्छा, त्याचप्रमाणं सामाजिक समारंभांत पतीनं आपल्यासोबत आपल्याइतक्याच उत्साहानं सहभागी व्हावं असंही तिला वाटतं. लेखकानं सांगितल्याप्रमाणं दोघंही आपापल्या भुमिकेत योग्य! त्या दोघांचे मूळ स्वभाव, कौटुंबिक जडणघडण आणि आयुष्यानं तुम्हांला कसे अनुभव दिले ह्या सर्व घटकांचा परिपाक किंवा परिणाम (ह्यातील योग्य शब्द कोणता ?) म्हणजे ह्या दोघांचं सध्याचं वागणं! दोघांचं एकमेकांविषयी असणारं प्रेम ह्या घटकाविषयी शंका नाही पण ते कशा प्रकारे, किती वारंवारतेने प्रदर्शित व्हायला हवं ह्याविषयी मतभेद असू शकतात. लेखाच्या शेवटी लेखकानं उल्लेखलेले दोन मुद्दे - संपूर्ण विश्वासासहित एकमेकांना समजून घेणं; अनुकंपा दाखविताना प्रत्येकाला अपेक्षित असणारं स्वातंत्र्य देणं ! 

ह्या लेखाच्या प्रभावाखाली असतानाच आज सकाळी लग्न करून आनंदी असणाऱ्या पण विविध कारणांस्तव एकमेकांपासून दूर राहणाऱ्या जोडप्यांविषयी लेख वाचनात आला. बऱ्याच वेळा दोघांची करिअर हा कळीचा मुद्दा ! पण काही वेळा बाकी मुद्दे सुद्धा ह्यास हातभार लावू शकतात.  हल्ली बऱ्याच वेळा संकुचित विचारसरणीचा ठप्पा आपल्यावर लागू नये म्हणून योग्य आणि अयोग्य काय ह्याविषयी आपली मतं बासनात गुंडाळून ठेवावी लागतात. हे देखील कदाचित त्यातील उदाहरण! कदाचित आता लग्नाच्या सुद्धा विस्तृत श्रेणी बनल्या असाव्यात. सदैव एकत्र राहणारी जोडपी, आठवड्यातून एकदा भेटणारी जोडपी, वर्षातून एकदा भेटणारी जोडपी वगैरे वगैरे ! ह्या सर्व जोडप्यांतील समान दुवा म्हणजे अधुनमधून होणारी भांडणं ! त्यामध्ये विस्तृत श्रेणी कोणांस माहिती असतील तर मला सांगाव्यात ! बाकी सदैव एकत्र राहणारी जोडपी मनानं एकत्र आहेत का असले गहन प्रश्न आपल्याजवळच ठेवावेत !

कालच्या लोकसत्तेत वीणा पाटील ह्यांचा 'कमी करूया' हा एक हलकाफुलका पण महत्त्वाचा संदेश देणारा लेख वाचला. आपण भारतीयांच्या सद्य मनोस्थितीशी निगडीत असा हा लेख! आवड म्हणून नव्हे तर केवळ आपल्या वैभवाचे प्रदर्शन करण्यासाठी आपण चंगळवाद स्वीकारला आहे की काय ही शंका यावी अशी आपली एक समाज म्हणून स्थिती आहे. ह्या लेखातील अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालतात. लेखाची सुरुवात वीणाताईंनी ज्या उदाहरणाद्वारे केली आहे ते अत्यंत योग्य असे उदाहरण ! पंधरा दिवसाच्या प्रवासासाठी किती वैविध्यपूर्ण सामान घेऊन जावं हा इथला मुख्य प्रश्न ! ह्या पंधरा दिवसात एक तासाच्या  भारतीय लोकांच्या  स्नेहसंमेलनाला हजेरी लावायची आहे म्हणून कुर्ता, कोल्हापुरी चपला वगैरे सामान घ्यावं की पंधरा दिवसात दोन किंवा तीन फॉर्मल पँट्स आणि एकमेव लेदर शूजवर सर्व ठिकाणी हजेरी लावणं  ह्या पर्यायाची निवड करावी इथून सुरुवात होते. विमानतळावर चेकइन काउंटरवर भल्यामोठ्या सामान ऊतू जाणाऱ्या बॅग्स घेऊन कसरत करणारे भारतीय बांधव पाहिले की ह्याची प्रकर्षानं जाणीव होते. 

त्याच पुरवणीत लग्नप्रसंगी, हॉटेलात अन्नाची नासाडी करणाऱ्या आपल्या काही समाजबांधवांचं उदाहरण देण्यात आलं आहे. काही मान्यवर व्यक्ती ह्या प्रवृत्तीला आळा बसावा म्हणून आपल्या वर्तनातुन कसा आदर्श घालून देतात ह्याची चांगली उदाहरणं दिली आहेत. 'कमी करूया' आणि ह्या लेखातुन एक समान धागा जाणवतो तो म्हणजे तुमच्याकडे क्रयशक्ती असली तरी तिचा वापर करताना सामाजिक बांधिलकी दाखवा! तुमच्या क्रयशक्तीचा बेबंद वापर ह्या जगाच्या संतुलनाला बिघडवण्यात हातभार लावत आहे हे लक्षात असू द्यात. 

ह्या पोस्टमध्ये वापरलेलं चित्र हे आजच्या पेपरातील मुलं घर सोडून गेल्यानंतर स्त्रियांच्या जीवनात निर्माण होणाऱ्या पोकळीविषयी आहे. आपल्या मुलांभोवती आपलं विश्व उभारणाऱ्या स्त्रियांच्या जीवनात मुलं शिक्षणासाठी परदेशी निघून गेल्यानं कशी पोकळी निर्माण होते आणि ह्या परिस्थितीतुन बाहेर पडण्यासाठी विविध छंदांचा उदाहरणार्थ चित्रकला शिकण्याचा कसा उपयोग होऊ शकतो ह्याविषयी हा लेख आहे. मी खास डोकावून पाहिलं तेव्हा ह्या लेखाच्या शेवटी पुरुषांची उदाहरणं सुद्धा दिली आहेत हे पाहून आनंद झाला.  माझ्या मनात थोडा वेगळा विचार आला. हल्ली दहावी बारावीनंतर मुलं खरंतर घरात असून देखील स्वतःच्याच विश्वात मग्न असतात. पालकांनी आयुष्यातील येऊ घातलेल्या नव्या टप्प्याची मानसिक तयारी तेव्हापासूनच करायला हवी. बहुतांश मुलांनी उच्चशिक्षणासाठी बाहेरगावी जायला हवं का हा एक वेगळ्या लेखाचा मुद्दा! इथं पन्नाशीनंतरची जोडपी घरात बसून कितपत सुसंवाद साधू शकतात हा कळीचा मुद्दा ! सद्यकाली भोवतालच्या माणसांविषयी, त्यांच्या मनःस्थितीविषयी अनुकंपा दाखवून निरपेक्ष भावनेनं आवश्यक प्रसंगी त्यांच्यासाठी उपलब्ध असण्याची कला आपण सर्वांनी अवगत करणं आपल्या, आपल्या आप्तजनांच्या आणि समाजाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक ठरणार आहे !

शनिवार - रविवारच्या पेपरमुळं कार्यालयीन कामाला पुरेसा वेळ देता न येणं ही झाली माझी आजची सबब! दुपार अजून बाकी असली तरी रविवारी वामकुक्षी ही हवीच! 

रविवार, १७ ऑगस्ट, २०२५

भावनांचं हरवलेलं खरंखुरेपण !


खरंतर ही पोस्ट मी लिहिण्यात अर्थ नाही, म्हणजे मला ही पोस्ट लिहिण्याचा नैतिक अधिकार असे माझ्या ब्लॉगवर मनापासून प्रतिक्रिया देणारे मोजके सुहृद उरले आहेत ते म्हणु शकतात. तरी ही सवयीचा गुलाम असल्यानं ही पोस्ट!  सुरुवातीला पोस्टची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी काही उदाहरणं 

१. हल्ली ज्याचा बोलबाला आहे असं बहुचर्चित तंत्रज्ञान वापरून तुम्ही ज्यावेळी तुमचं पहिलं प्रेसेंटेशन बनवता त्यावेळी ह्या तंत्रज्ञानानं निर्माण केलेली आकर्षक स्लाईड पाहून तुम्ही अगदी प्रभावित होता. त्यानं वापरलेल्या प्रभावी संज्ञा,  अगदी व्यावसायिक पद्धतीनं आलेखाद्वारे मांडलेली माहिती पाहून आपण ह्याआधी हे तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात का केली नाही हा विचार तुमच्या मनात नक्कीच येतो. 

काही दिवस जातात. तुम्ही अजून काही प्रेसेंटेशन्स बनवता, तुमच्या सहकाऱ्यांनी बनविलेली प्रेसेंटेशन्स पाहता. मग अचानक तुम्हांला जाणवतं की कुठंतरी ह्या साऱ्या प्रेसेंटेशन्स मध्ये सारखेपणा आलेला आहे. त्या प्रभावी संज्ञा, ते आकर्षक आलेख तुमच्या समोर येण्याची वारंवारता वाढली आहे. तुम्ही सावध होता, मग तुम्हांला जाणवतं की ह्या तंत्रज्ञानाची जी काही निर्मिती आहे ती जशीच्या तशी स्वीकारणं धोक्याचं असतं, त्यानं जे काही निर्माण केलं आहे ते तपासून पाहायला तज्ञ माणूस हवाच ! Human in the loop म्हणतात तो हाच ! सध्यातरी तो हवाच !

२. सोशल मीडियावर बरेचजण आपल्या जीवनातील आनंदाच्या बातम्या जाहीर  करतात. इथं शेअर हा शब्द न वापरण्याचा निर्धार केल्यानं जाहीर हा काहीसा जशाचा तसा अर्थ न व्यक्त करणारा शब्द वापरला आहे.  'आनंदाची बातमी' ह्या शब्दप्रयोगाची व्याप्ती ५:५७ च्या चर्चगेट विरार लोकलमध्ये उडी मारून खिडकीची जागा मिळाली पासून ते माझी भारतीय  T २० संघात निवड झाली इतकी मोठी असू शकते.  पण त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये बहुदा ९०% खालील प्रतिक्रियांचा समावेश असतो. आता मराठी लोकसुद्धा मराठीतून प्रतिक्रिया देत नसल्यानं प्रातिनिधिक म्हणवल्या जातील अशा प्रतिक्रिया देण्याइतपत माहिती उपलब्ध नाही. 

"Wow! That's awesome!"

"Congratulations!"

"I'm so happy for you!"

"That's great news!"

"I'm thrilled for you!"

"Fantastic!"

"That's amazing!" 

आता ५:५७ च्या विरार लोकल मध्ये खिडकीची जागा मिळाली ही बातमी सोशल मीडियावर टाकणारा विद्वान "I'm thrilled for you!" ह्या प्रतिक्रियेला कसे उत्तर देत असेल ते माहिती नाही. पण सांगायचा मुद्दा हा की त्याच त्याच प्रतिक्रिया आपण आयुष्यातील सर्व घटनांसाठी वापरत असल्यानं समोरील व्यक्तीला आपल्या प्रतिक्रियेच्या, भावनांच्या खरेखुरेपणाविषयी साशंक व्हायला होतं. ह्यात ग्यानबाची मेख अशी ज्या क्षणी आपण अनेकांच्या आयुष्याचा हिस्सा होण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळी आपण खरेतर कोणाच्याच आयुष्यात नसतो. 

३. श्रीमान प्रथिन ह्या गृहस्थानं बहुसंख्य लोकांच्या आयुष्यात खळबळ माजवली आहे. तो दररोज मांसाहारी आहार करणाऱ्या लोकांच्या घरात चिकन, अंडी घेऊन येतो. पूर्वी पांढरा  रस्सा, तांबडा रस्सा ह्या क्वचितच घरी बनणाऱ्या डिशेस आज बनविल्या जात  हे ऐकूनच अत्यानंदाच्या भावनांनी उचंबळून येणाऱ्या माणसांच्या मनात आज दररोज बनणाऱ्या ह्या डिशेसच्या उल्लेखानं थोडीही खळबळ निर्माण होत नाही. 

४.  बऱ्याच धार्मिक, सामाजिक समारंभांना हल्ली एक साचेबंदपणा येऊ लागला आहे.  मर्यादित वेळेमुळे विवाह, मुंज वगैरे समारंभातील धार्मिक विधी बऱ्याच वेळा एक सोपस्कार म्हणून पार पाडावे लागतात. अर्थात ह्याला अपवाद असतातच. सामाजिक समारंभांना बेगडी रूप आलं आहे की काय अशी शंका मनात निर्माण होते. त्यातील भाषणं, एकमेकांचं कौतुक करण्याची वृत्ती, कोणताही वाद न होऊ देण्याची घेतलेली खबरदारी ह्यामुळं अशा समारंभांत कधीकधी अगदी वैतागून जायला होतं. 

पहिलं उदाहरण देण्याचं प्रयोजन असं की हे नवीन तंत्रज्ञान जसं एका साचेबंद पद्धतीनं उत्तर, माहिती देण्याची शक्यता महत्तम असते त्याचप्रमाणे आपण सुद्धा हल्ली एका साचेबद्ध पद्धतीनं बोलु चालू लागलो आहोत! 

दुसऱ्या उदाहरणात मला अभिप्रेत असलेला मुद्दा हा की नाती, मैत्री ह्या मध्ये वेळ गुंतवावा लागतो. पूर्ण मनापासून वेळ गुंतवला तरच ह्या नाती, मैत्रीमध्ये खरंखुरेपण येऊ शकतं. एका विशिष्ट मर्यादेपलीकडे केवळ असतं ते तोंडदेखलेपण ! प्रगतीच्या पुढील टप्प्यांमध्ये आपल्या वेळेवर संगणक, भ्रमणध्वनी, कार्यालय अधिक हक्क गाजवत राहतात. मग उरलेल्या वेळात केवळ त्या चेकबॉक्स वर टिक करायचं म्हणून आपण तोंडदेखलेपणानं प्रतिक्रिया देत राहतो. आता हे पूर्णपणे चुकीचं असं म्हणता येणार नाही. किमान आपण प्रयत्न तरी करत असतो!

तिसऱ्या उदाहरणातील मुद्दा अति परिचयात अवज्ञा ! सतत संपर्कात राहिल्यानं नातेसंबंधातील  गोडवा कमी होण्याचं भय असतं. 

पण जपण जर खरोखर गंभीरपणे विचार केला तर हे सारं अपरिहार्य आहे. मनुष्याच्या उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर मनुष्य भावनांपासून फारकत घेणार हे विधीलिखित आहे. आजही जगातील विविध मनुष्य समुदाय त्यांच्या प्रगतीच्या टप्प्यानुसार आपल्या भावना वेगवेगळ्या प्रमाणात नियंत्रित करायला शिकले आहेत. उत्क्रांतीच्या टप्प्यावर सर्वात पुढे असणारी माणसं आपली जीवनशैली पूर्णपणे यंत्रांशी सर्वप्रथम जुळवून घेतील. 

जाता जाता ह्या पोस्टमधील हे हसतमुख बाळ ! हल्लीच्या बहुचर्चित तंत्रज्ञानाला मी असं चित्र बनविण्याची विनंती केली असता त्यानं मला मोजके दोन तीन प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची मी उत्तरं दिल्यानंतर तात्काळ हे हसतमुख बालक माझ्यासमोर आलं. केवळ भावनांचं खरेखुरेपण हरवलं नसावं, आपल्या भोवतालच्या बऱ्याच गोष्टींच्या खरेखुरपणाबद्दल शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे !  

मंगळवार, १२ ऑगस्ट, २०२५

आस स्वातंत्र्याची


भारताला लौकिकार्थानं स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे झाली. आपण खऱ्या अर्थानं स्वतंत्र झालो का ह्याविषयी माझे काही विचार !

१. स्वातंत्र्य नक्की कशापासून मिळवायचं आहे ह्या विषयी प्रत्येकाच्या विचारात प्रचंड तफावत आहे.  आहार, पोषाख ह्या मुलभूत गोष्टींपासून सुरु होणारी स्वातंत्र्याची आस जीवनाच्या अनेक पैलूंना इतक्या खोलवर स्पर्शून जाते किंबहुना त्या पैलूंमध्ये इतका आमूलाग्र बदल घडवून आणते की ही आस धरणारी व्यक्ती नक्कीच मनात कुठंतरी खोलवर हादरते. ह्यात आपण रेखाटलेलं स्वातंत्र्याचं चित्र आपल्या पुढील पिढीने ज्या महाकाय प्रमाणात पुढं नेलेलं असतं त्याचा मोठा वाटा असतो. पण आपण हादरलो आहोत हे बाहेरच्यांशी सोडा पण स्वतःशीही कबूल करण्याचं स्वातंत्र्य आपण गमावून बसलो असतो. 

२. पाश्चिमात्य देशांच्या अर्थव्यवस्थेवर आधारित नोकऱ्या गेल्या अनेक वर्षांत प्रचंड प्रमाणात वाढल्या. भारताच्या महानगरातील विशिष्ट वर्गाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्यात ह्या नोकऱ्यांनी मोठा हातभार लावला. परंतु ह्या नोकऱ्या करताना तिथल्या संस्कृतीशी आधारित आहार, पोषाख, सण, विवाहपद्धती ह्यांनी कधी हळूच आपल्या जीवनात प्रवेश करत मग ठाण मांडलं हे आपल्याला समजलंच नाही. इतकंच काय आपली माय मराठी भाषा देखील ह्या आक्रमणाखाली दबली गेली. ह्या साऱ्यातून आपल्याला स्वातंत्र्य मिळावं असं आपल्याला वाटतंय का हा मुलभूत प्रश्न !

३. वरील  मुद्दा लक्षात घेता पाश्चिमात्य देशांनी प्रभावित केलेली जीवनपद्धती प्रथम महानगरात प्रवेश करती झाली. त्यानंतर चित्रपट, मालिका ह्याद्वारे तिचा शिरकाव गावागावांत होऊ लागला. संपूर्ण भारताचं चित्र लक्षात घेतलं तर फार मोजक्या लोकांना ही जीवनपद्धती स्वीकारणं आर्थिकदृष्टया शक्य आहे. पण सोशल मीडियाने आपल्या घराघरांत ठाण मांडून बसायला मदत केलेल्या ह्या जीवनपद्धतीपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळेल का हा मोठा प्रश्न !

४. आपलं वस्तुनिष्ठ परीक्षण करून, मोठ्यांचा / जाणकारांचा सल्ला घेऊन त्यानुसार वागावं ह्या मानसिकतेला आपण केव्हांच तिलांजली दिली आहे. हल्ली भारतातील बहुसंख्य लोक विविध कारणास्तव स्वतःला श्रेष्ठ समजू लागले आहेत. ह्या अकारण श्रेष्ठत्वाच्या भावनेतुन आपल्याला स्वातंत्र्य मिळावं ही माझी इच्छा ! 

५. मुद्दा क्रमांक दोन वर आधारित जीवनशैलीसाठी आवश्यक किती गंगाजळी तुमच्यापाशी असावी ह्याचे मोठाले आकडे अर्थतज्ञ मांडत आहेत. प्रात्यक्षिक दृष्ट्या विचार करता फार मोजक्या लोकांना ही गंगाजळी जमविणे शक्य आहे. ह्या मोठमोठ्या आकड्याच्या दडपणातून मुक्त होण्याचं स्वातंत्र्य तुम्हांला मिळावं ही माझी इच्छा !

अखेरीस फेसबुकवरील माझ्या प्रत्येक पोस्टला लाईक मिळायलाच हवेत ह्या मनातील सुप्त इच्छेपासून सुद्धा मला कधीतरी स्वातंत्र्य मिळावं ही माझी माझ्यासाठी इच्छा !

येत्या शुक्रवारी येणाऱ्या भारताच्या स्वातंत्र्यदिनी ह्या विविध छुप्या पारतंत्र्यातून मला आणि तुमची इच्छा असल्यास तुम्हांला स्वातंत्र्य मिळावं ही शुभेच्छा ! 

रविवार, १० ऑगस्ट, २०२५

द्वैत -भाग ४





११ जुलै २०५६ (पुणे )

मुथ्थुस्वामी आणि सुमुख बॅनर्जी ह्यांची मस्त चर्चा सुरु होती. "मुथ्थु मला नक्की खात्री आहे की तू सध्या नक्की किती अनिकेत आहेत ह्याविषयी गोंधळला आहेस!" सुमुख मस्करीच्या सुरात म्हणाला. "तीन! एक खरा आणि दोन डिजिटल !" मुथ्थु आत्मविश्वासानं म्हणाला.  "शाब्बास, एक डिजिटल अनिकेत बांद्रयात पोहोचला असला तरी चॅनच्या ताब्यात असलेला डिजिटल अनिकेत ज्याला तो खरा अनिकेत समजतोय त्याचं कसं चाललंय ह्याविषयी आपलं दुर्लक्ष होतंय असं नाही वाटत का तुला? सुमुखच्या ह्या प्रश्नानं मुथ्थुला त्याला नक्की काय म्हणायचं आहे हे जाणवलं. 

चॅन आणि अल्बर्टच्या समजुतीनुसार त्यांनी खऱ्या अनिकेतचे अपहरण केलं होतं. पण त्यांच्या ताब्यात असणारा अनिकेत हा मुथ्थु आणि सुमुख ह्यांनी पाठवलेला डिजिटल अनिकेत होता हे त्यांना समजलं नव्हतं. त्यांचं सारे लक्ष त्यांनी बनविलेल्या डिजिटल अनिकेतच्या कामगिरीवर असल्यानं आपल्या ताब्यातील अनिकेतच्या माणूसपणाची खातरजमा करून घ्यायला त्यांना संधीच मिळाली नव्हती. 

११ जुलै २०५६ (सॅन दिएगो )

"अनिकेत मी आल्ये !" वैदेहीचा आवाज ऐकताच अनिकेतच्या अंगावर शहारे उमटले. हे जे काही चाललं आहे त्यावर विश्वास ठेवण्यापलीकडे त्याची मनःस्थिती गेली होती. वैदेहीने झटपट त्याला सर्व बंधनातून मुक्त केलं. "किती अशक्त झाला आहेस रे तू ?" वैदेही कळवळून म्हणाली. अनिकेत अजूनही तिच्यावर विश्वास ठेवण्याच्या मनःस्थितीत नव्हता. पण तिनं पुढं केलेल्या शिऱ्याच्या बशीकडे मात्र दुर्लक्ष करणे त्याच्यासाठी अवघड होते. पहिला चमचा जिभेवर टाकताच हिच्यावर विश्वास ठेवणं योग्य राहील अशी ग्वाही त्याच्या अंतर्मनाने दिली. "वैदेही, हे काय चाललंय ?" इतके दिवसाचा संताप त्याच्या स्वरातून व्यक्त होत होता. "झालं, साऱ्या दुनियेचा राग माझ्यावर काढणार असशील तर मी चालले परत भारतात !" वैदेहीच्या ह्या वाक्यानं तो भानावर आला. आपण अजूनही अमेरिकेतच आहोत हे त्याला जाणवलं. 

११ - जुलै - २०५६ (बांद्रा मुंबई) - मंगळवार  

काल चॅन आणि अल्बर्ट आपल्यासाठी वेळ देऊ शकले नाहीत हे डिजिटल अनिकेतला पटण्यासारखं नव्हतं. ह्या प्रोजेक्टचे गांभीर्य पाहता प्रत्येक दिवस अत्यंत महत्वाचा असणार होता. पण तरीही त्यानं कसाबसा संयम राखला होता. रात्री वैदेही घरी आलीच नाही. तिनं आपलं ठाण्यातील वास्तव्य दोन दिवस वाढविले असल्याचं त्याला कळवलं होतं.  काहीतरी चुकतंय ह्याची जाणीव ह्या अनिकेतला होऊ लागली होती. 

आज चॅन आणि अल्बर्ट बैठकीला वेळेवर आले होते. व्हिडिओ कॉल एनक्रिप्ट करून त्या तिघांची अतिशय गोपनीय चर्चा सुरु झाली होती.  चॅन आणि अल्बर्ट ज्या पद्धतीनं चर्चेत भाग घेत होते आणि प्राथमिक स्वरूपाचे प्रश्न विचारत होते त्यामुळं डिजिटल अनिकेत साशंक झाला होता.  तासाभराने ज्यावेळी कॉल दहा मिनिटांच्या ब्रेकसाठी  थांबला त्यावेळी डिजिटल अनिकेतने मोठा निर्णय घेतला. त्यानं थेट उच्चपदस्थांशी संपर्क साधला. चॅन आणि अल्बर्ट ह्यांची खरी ओळख पुन्हा एकदा शहानिशा करून घ्यावी अशी त्यानं विनंती केली. 

मुथ्थु आणि सुमुख अनिकेतच्या हालचालीवर लक्ष ठेवून असल्यानं त्यांना लगेचच तो  काहीतरी संशयास्पद कृती करत असल्याचं जाणवलं. दहा मिनिटांनंतर डिजिटल अनिकेत अगदी काळजीपूर्वक कॉलवर आला. तोवर अमेरिकेतून आतापर्यंत भाग घेणारे डिजिटल चॅन आणि अल्बर्ट बाजूला होऊन खरेखुरे चॅन आणि अल्बर्ट कॉलवर आले होते. आपल्याला झालेल्या मारहाणीनंतर आणि त्यानंतर मिळालेल्या धमकीनंतर चॅन ह्या कॉलवर फक्त मुथ्थु आणि सुमुख ह्यांनी जे काही सांगितलं तेच बोलणार होता. डिजिटल अनिकेतच्या वरिष्ठांनी कॉलवर आलेल्या चॅन आणि अल्बर्ट ह्यांची सर्व शहानिशा केली. ते खरेखुरे चॅन आणि अल्बर्ट असल्याबद्दल त्यांनी डिजिटल अनिकेतला आश्वस्त केले. डिजिटल अनिकेत आता आपल्याला मिळालेल्या सर्व माहितीचा आढावा त्यांना देऊ लागला होता. 

(क्रमशः )


भारताचे पितामह - दादाभाई नवरोजी

मराठी शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकांत ज्यांच्याशी आपला परिचय झाला, ज्यांच्या आदरणीय व्यक्तिमत्त्वांनी आपल्याला भारावून सोडलं अशा व्यक्ती बऱ्य...