मुथ्थुस्वामी आणि सुमुख बॅनर्जी ह्यांची मस्त चर्चा सुरु होती. "मुथ्थु मला नक्की खात्री आहे की तू सध्या नक्की किती अनिकेत आहेत ह्याविषयी गोंधळला आहेस!" सुमुख मस्करीच्या सुरात म्हणाला. "तीन! एक खरा आणि दोन डिजिटल !" मुथ्थु आत्मविश्वासानं म्हणाला. "शाब्बास, एक डिजिटल अनिकेत बांद्रयात पोहोचला असला तरी चॅनच्या ताब्यात असलेला डिजिटल अनिकेत ज्याला तो खरा अनिकेत समजतोय त्याचं कसं चाललंय ह्याविषयी आपलं दुर्लक्ष होतंय असं नाही वाटत का तुला? सुमुखच्या ह्या प्रश्नानं मुथ्थुला त्याला नक्की काय म्हणायचं आहे हे जाणवलं.
चॅन आणि अल्बर्टच्या समजुतीनुसार त्यांनी खऱ्या अनिकेतचे अपहरण केलं होतं. पण त्यांच्या ताब्यात असणारा अनिकेत हा मुथ्थु आणि सुमुख ह्यांनी पाठवलेला डिजिटल अनिकेत होता हे त्यांना समजलं नव्हतं. त्यांचं सारे लक्ष त्यांनी बनविलेल्या डिजिटल अनिकेतच्या कामगिरीवर असल्यानं आपल्या ताब्यातील अनिकेतच्या माणूसपणाची खातरजमा करून घ्यायला त्यांना संधीच मिळाली नव्हती.
११ जुलै २०५६ (सॅन दिएगो )
"अनिकेत मी आल्ये !" वैदेहीचा आवाज ऐकताच अनिकेतच्या अंगावर शहारे उमटले. हे जे काही चाललं आहे त्यावर विश्वास ठेवण्यापलीकडे त्याची मनःस्थिती गेली होती. वैदेहीने झटपट त्याला सर्व बंधनातून मुक्त केलं. "किती अशक्त झाला आहेस रे तू ?" वैदेही कळवळून म्हणाली. अनिकेत अजूनही तिच्यावर विश्वास ठेवण्याच्या मनःस्थितीत नव्हता. पण तिनं पुढं केलेल्या शिऱ्याच्या बशीकडे मात्र दुर्लक्ष करणे त्याच्यासाठी अवघड होते. पहिला चमचा जिभेवर टाकताच हिच्यावर विश्वास ठेवणं योग्य राहील अशी ग्वाही त्याच्या अंतर्मनाने दिली. "वैदेही, हे काय चाललंय ?" इतके दिवसाचा संताप त्याच्या स्वरातून व्यक्त होत होता. "झालं, साऱ्या दुनियेचा राग माझ्यावर काढणार असशील तर मी चालले परत भारतात !" वैदेहीच्या ह्या वाक्यानं तो भानावर आला. आपण अजूनही अमेरिकेतच आहोत हे त्याला जाणवलं.
११ - जुलै - २०५६ (बांद्रा मुंबई) - मंगळवार
काल चॅन आणि अल्बर्ट आपल्यासाठी वेळ देऊ शकले नाहीत हे डिजिटल अनिकेतला पटण्यासारखं नव्हतं. ह्या प्रोजेक्टचे गांभीर्य पाहता प्रत्येक दिवस अत्यंत महत्वाचा असणार होता. पण तरीही त्यानं कसाबसा संयम राखला होता. रात्री वैदेही घरी आलीच नाही. तिनं आपलं ठाण्यातील वास्तव्य दोन दिवस वाढविले असल्याचं त्याला कळवलं होतं. काहीतरी चुकतंय ह्याची जाणीव ह्या अनिकेतला होऊ लागली होती.
आज चॅन आणि अल्बर्ट बैठकीला वेळेवर आले होते. व्हिडिओ कॉल एनक्रिप्ट करून त्या तिघांची अतिशय गोपनीय चर्चा सुरु झाली होती. चॅन आणि अल्बर्ट ज्या पद्धतीनं चर्चेत भाग घेत होते आणि प्राथमिक स्वरूपाचे प्रश्न विचारत होते त्यामुळं डिजिटल अनिकेत साशंक झाला होता. तासाभराने ज्यावेळी कॉल दहा मिनिटांच्या ब्रेकसाठी थांबला त्यावेळी डिजिटल अनिकेतने मोठा निर्णय घेतला. त्यानं थेट उच्चपदस्थांशी संपर्क साधला. चॅन आणि अल्बर्ट ह्यांची खरी ओळख पुन्हा एकदा शहानिशा करून घ्यावी अशी त्यानं विनंती केली.
मुथ्थु आणि सुमुख अनिकेतच्या हालचालीवर लक्ष ठेवून असल्यानं त्यांना लगेचच तो काहीतरी संशयास्पद कृती करत असल्याचं जाणवलं. दहा मिनिटांनंतर डिजिटल अनिकेत अगदी काळजीपूर्वक कॉलवर आला. तोवर अमेरिकेतून आतापर्यंत भाग घेणारे डिजिटल चॅन आणि अल्बर्ट बाजूला होऊन खरेखुरे चॅन आणि अल्बर्ट कॉलवर आले होते. आपल्याला झालेल्या मारहाणीनंतर आणि त्यानंतर मिळालेल्या धमकीनंतर चॅन ह्या कॉलवर फक्त मुथ्थु आणि सुमुख ह्यांनी जे काही सांगितलं तेच बोलणार होता. डिजिटल अनिकेतच्या वरिष्ठांनी कॉलवर आलेल्या चॅन आणि अल्बर्ट ह्यांची सर्व शहानिशा केली. ते खरेखुरे चॅन आणि अल्बर्ट असल्याबद्दल त्यांनी डिजिटल अनिकेतला आश्वस्त केले. डिजिटल अनिकेत आता आपल्याला मिळालेल्या सर्व माहितीचा आढावा त्यांना देऊ लागला होता.
(क्रमशः )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा