९ जुलै २०५६ (सॅन दिएगो )
अनिकेतला खरं तर स्थळ आणि वेळेचं भान ठेवायला कठीण जायला हवं होतं. पण तैलबुद्धीचा अनिकेत दमला भागला असला तरीही महत्प्रयासाने आपली विचारशक्ती कायम ठेवून होता. आज रविवार ९ जुलै. गेल्या शनिवारी रात्री आपण थेट विमान पकडून अमेरिकेला आलो. सोमवारी कामात खूपच चांगली प्रगती झाली होती. आणि अचानक सोमवारी रात्री आपल्याला असं डांबून ठेवण्यात आलं. गेले चार दिवस केवळ एक अनोळखी माणूस पिझ्झा, बर्गर वगैरे आणून देत असे. आंघोळ वगैरे आटोपण्यासाठी त्याला अंधारातच बाथरूममध्ये सोडलं जात असे. त्यावेळी त्याला अर्थातच बंधनातून मुक्त केलं जाई. पण तिथं करड्या आवाजात त्याला न्हाणीघरातून बाहेर येताच पुन्हा बांधून घेण्यासाठी ताकीद दिली जाई. एकंदरीत अनिकेत शाळेपासूनच मारामारी ह्या प्रकरणापासून दूर राहत असल्यानं इथं तो काही प्रतिकार करण्याची शक्यता नव्हती. तरीही ह्या आपल्या अपहरणकर्त्यांबद्दल तो काहीसं चांगलं मत बाळगून होता. त्याचबरोबर हे आपल्याबरोबर इतकं चांगलं का वागत आहेत हे त्याला समजणं कठीण जात होतं.
१० जुलै २०५६ (सॅन दिएगो )
अनिकेतला आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता. आज सकाळी त्याला नाश्त्याला चक्क त्याच्या आवडीचे पोहे देण्यात आले होते. पोहे काहीसे करपले असले तरीही त्याबद्दल त्याची काही तक्रार नव्हती. आवडीचे पोहे मिळाल्याच्या आनंद काही वेळानं स्थिरावल्यानंतर वैदेहीने पोहे केले असते तर असेच केले असते हा विचार त्याच्या डोक्यात आला. पण तिनं नक्कीच हे पोहे करपवले नसते हे तो जाणून होता. वैदेहीच्या चिंतेनं तो अगदी व्याकुळ झाला होता.
८ - जुलै - २०५६ (दादर मुंबई)
सकाळी अनिकेतला उठायला काहीसा उशीर झाला होता. वैदेहीला शोधत तो स्वयंपाकघरात आला. "गुड मॉर्निंग!" वैदेहीने त्याला सकाळच्या शुभेच्छा दिल्या. अनिकेतच्या माहितीनुसार शनिवारी सकाळी स्वयंपाकघरातून पोह्याचा खमंग वास यायला हवा होता. परंतु इथं तर वैदेहीने झोमॅटोवरून साग्रसंगीत नाश्त्याची ऑर्डर दिली होती. अनिकेत उठायचीच ती वाट पाहत होती. अनिकेत स्वयंपाकघरात येताच तिनं त्याला दात वगैरे घासून नाश्त्याला यायची सूचना दिली. अनिकेतच्या माहितीनुसार शनिवार सकाळी वैदेही जरा रोमँटिक मूडमध्ये असायला हवी होती. पण इथं तर उलट प्रकार दिसत होता. त्यानं पाठविलेले हे डेटा पॉईंट वाचून चॅनसुद्धा गोंधळात पडला होता. पण अल्बर्टने मात्र त्याची शंका उडवून लावली होती. "आपल्या कामावर लक्ष द्या, त्या वैदेहीकडे प्रमाणाबाहेर लक्ष देऊ नका" असं त्यानं चॅनला बजावलं. आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्याच्या विनंतीवजा आदेशाकडं लक्ष देण्याव्यतिरिक्त चॅनकडे पर्याय नव्हता.
अनिकेत आणि वैदेही ह्या दोघांनी मिळून जरी न्याहारी संपवली तरी वातावरणातील तणाव दोघांना जाणवत होता. अचानक दरवाजावरील बेल वाजली. "अनिकेत दरवाजा उघड!" वैदेहीने सूचना केली. चॅन अगदी सतर्क झाला होता. ह्या सर्व धावपळीत ह्या शक्यतेचा विचार करायला त्याला वेळ मिळाला नव्हता. त्यानं क्षणार्धात दोघांच्या नातेवाईकांची माहिती तात्काळ अनिकेतपर्यंत पोहोचवली. "या! या! दादा, वहिनी !" अनिकेतने त्यांचं स्वागत केलं. वैदेहीचे दादा, वहिनी काहीसे आश्चर्यचकित झाले. शक्यतो अनिकेतच्या तोंडून फार कमी शब्द बाहेर पडायचे. पुढील तासभर अनिकेत, वैदेहीसाठी कसोटीचा काळ होता. चॅन वैदेहीच्या वागण्याकडं बारीक लक्ष ठेऊन होता आणि क्षणाक्षणाला त्याच्या चिंतेत भर पडत होती. पण अल्बर्टचा त्याला धाक असल्यानं चॅनकडे गप्प राहण्याशिवाय पर्याय नव्हता.
दादा, वहिनी जसे परत जायला निघाले तसा वैदेहीने अनिकेतला अजून एक आश्चर्याचा धक्का दिला. "अनिकेत, मी दादा, वहिनीसोबत ठाण्याला जाऊ का?" अनिकेत सोबत दादा वहिनी सुद्धा आश्चर्यचकित झाले होते. "जाऊ दे तिला!" अनिकेत आपल्याला संदेश पाठवून विचारणा करणार हे जाणून चॅनने त्याला आधीच उत्तर दिलं. ते तिघंही बाहेर पडले तसं अनिकेत गॅलरीत येऊन उभा राहिला. पावसानं चांगलाच जोर धरला होता.
शनिवार - रविवार वैदेही अनिकेतची वेळोवेळी चौकशी करत होती. त्याच्या जेवणाची व्यवस्थित ऑर्डर सुद्धा तिनं दिली होती. दादा वहिनीशी कामापुरता संवाद साधून ती आपल्या भ्रमणध्वनीवरच जास्त वेळ घालवत होती. "त्यांचं आपल्यासारखंच लुटुपुटीचं भांडण झालं असावं. चल आपण बाहेर फिरून येऊ !" दादा वहिनीला म्हणाला.
१० - जुलै - २०५६ (बांद्रा मुंबई) - सोमवार
आज अनिकेतसाठी कार्यालयात अत्यंत महत्वाचा दिवस होता. केनेडी अमेरिकेतील कार्यालयात स्थानिक वेळेनुसार सकाळी (म्हणजेच भारतीय वेळेनुसार सायंकाळी) येण्याआधी त्याला बरीच कामगिरी पार पाडायची होती. रात्री उशिरा घरी परतलेल्या वैदेहीशी बोलायला त्याला वेळ नव्हता आणि रसही नव्हता.
९ जुलै २०५६ (सॅन दिएगो )
आपल्यासोबत काय होत आहे हे चॅनला समजत नव्हते. आज रात्री जागून भारतात परतलेल्या अनिकेतसोबत त्याला मोठा पल्ला गाठायचा होता. पण अचानक त्याच्या डोक्यावर एक फटका मारून त्याची शुद्ध घालविण्यात आली होती. काही तासानं शुद्धीवर येताच "आपल्या खोलीत इतक्या सगळ्या सुरक्षापातळ्या पार पाडून कोण पोहोचू शकतो?" हाच पहिला विचार त्याच्या मनात आला होता. "अल्बर्ट?" हा विचार त्याच्या मनात येताच एक मोठी भयाची लहर त्याच्या सर्वांगाला शहारून गेली.
१० - जुलै - २०५६ (बांद्रा मुंबई) - सोमवार
अनिकेत मोठ्या उत्साहानं बांद्रा कार्यालयात पोहोचला होता. व्हिडीओ कॉलवर येताच समोर चॅन आणि अल्बर्टला पाहून तो उत्साहित झाला. "आजच आपण सर्व कामं आटोपून टाकुयात!" अनिकेत मोठ्या उत्साहात म्हणाला. "टेक इट इझी यंग मॅन!" अल्बर्टच्या संयमी शब्दांनी त्याला भानावर आणलं.
(क्रमशः )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा