मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

मंगळवार, १ जुलै, २०२५

द्वैत -भाग २


२ - जुलै - २०५६  सायंकाळ (सॅन दिएगो )

आजच्या दिवसभराचं काम व्यवस्थित आटोपलं म्हणून समाधान पावलेला अनिकेत उबेरमध्ये आरामात बसला. आवडीचं मराठी गाणं भ्रमणध्वनीवर सुरु करून इअरफोन कानात टाकून तो  बाहेरच्या रहदारीकडं पाहू लागला. 

...... 


अनिकेतला बऱ्याच वेळानं जाग आली तेव्हा वेदनेनं त्याचं सर्वांग ठणकत होतं. हात पाय बांधल्याने डोळ्यावरील पट्टी काढण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. नक्की काय झालं असावं ह्याचा अंदाज घेण्याचा तो प्रयत्न करू लागला. 


४ - जुलै - २०५६ सकाळ  (सॅन दिएगो )

चॅन आणि अल्बर्ट कार्यालयाच्या दिशेनं जाणाऱ्या अनिकेतच्या प्रत्येक हालचालीवर सुक्ष्म नजर ठेवून होते. कार्यालयात पोहोचल्यावर अनिकेतने बायोमेट्रिक प्रवेशद्वारातून यशस्वीरीत्या आत प्रवेश केल्यानंतर त्यांनी एकमेकांना हाय फाय देऊन आनंद व्यक्त केला.  "गुड मॉर्निंग सर!" अनिकेतने अभिवादन करताच बॉस केनेडीनं नजरेनंच त्याला प्रतिसाद देतानाच लगेचच माझ्या केबिनमध्ये ये असं सुचवलं. अनिकेत आणि केनेडीची चर्चा बराच वेळ चालली. अनिकेतच्या माध्यमातून ती चर्चा चॅन आणि अल्बर्ट ह्यांना थेट ऐकायला मिळत होती. चर्चेचे सविस्तर तपशील ऐकत असताना चॅनचे छोटे डोळे अगदी विस्फारून जात होते. एकंदरीत योजना यशस्वीरित्या सुरु झाली आहे ह्याविषयी त्यांच्या मनात खात्री निर्माण झाली होती.  

४ - जुलै - २०५६ सायंकाळ  (सॅन दिएगो )

अंधारकोठडीतील अनिकेत संतापानं अगदी पेटून उठला होता. आपल्याशी कोण हा असला खेळ खेळत आहे ह्याची त्याला सुतराम कल्पना नव्हती. त्याच गोष्टीचा त्याला जबरदस्त राग येत होता. त्याच बरोबर केवळ बर्गर आणि पिझ्झा खाऊन त्याच्या संतापाचा पारा अगदी वर गेला होता. 

५ - जुलै - २०५६ दुपार  (सॅन दिएगो )

केनेडी आणि अनिकेतची आजची बैठक सुद्धा अगदी यशस्वी झाली होती.  केबिनमधून बाहेर पडता पडता अचानक अनिकेत म्हणाला, "सर, मी सायंकाळचे फ्लाईट बुक करतो. इथली चर्चा बऱ्यापैकी आटोपली आहे, मी आता उर्वरित काम मुंबईतून करू शकतो. " ह्या अनपेक्षित प्रश्नाने केनेडी क्षणभर गोंधळला. पण दुसऱ्याच क्षणाला सावरत "व्हाय नॉट, आताच तू बेकीला सांगून थेट विमानाची सायंकाळची तिकिटं आरक्षित कर !" असं केनेडी म्हणाला. 

हे सारं ऐकणाऱ्या चॅन आणि अल्बर्ट ह्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्यांना हवी ती माहिती मिळाली होती.  

सायंकाळी विमानतळाकडे जाणाऱ्या अनिकेतच्या हालचालीवर चॅन आणि अल्बर्ट नजर ठेवून होते. तिथून येणाऱ्या व्हिडिओमध्ये दूरवर दिसणाऱ्या एका कारमध्ये केनेडी आपल्या कुटुंबासोबत विमानतळातून बाहेर पडणाऱ्या दिशेनं जात आहे असा भास चॅनला झाला. त्याच्या दुर्दैवानं अतिवेगाने जाणारी ती कार क्षणार्धात दूर गेल्यानं अथक प्रयत्न करूनही चॅन आपल्या शंकेचा पाठपुरावा करू शकला नाही. आताच कार्यालयात असणारा केनेडी इथं कसा असू शकेल ह्या शंकेला त्यानं थोडा वेळ विश्रांती दिली. कारण अनिकेतचे इमिग्रेशन कसं सुरळीत पार पडेल ह्यावर त्याला लक्ष द्यायचं होतं. 

७ - जुलै - २०५६ (दादर मुंबई)
वैदेही सायंकाळी घरी परतली तेव्हा अनिकेत क्षणभर आश्चर्यानं तिच्याकडं पाहतच राहिला. वैदेही काहीशी लाजली हे पाहून त्यानं पुन्हा संगणकात लक्ष गुंतवलं. तरीही ही इतके मॉडर्न कपडे कधीपासून परिधान करू लागली हा विचार त्याच्या मनात रेंगाळतच राहिला. 

(क्रमशः )

भाग १ - द्वैत -भाग १  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

द्वैत -भाग २

२ - जुलै - २०५६  सायंकाळ (सॅन दिएगो ) आजच्या दिवसभराचं काम व्यवस्थित आटोपलं म्हणून समाधान पावलेला अनिकेत उबेरमध्ये आरामात बसला. आवडीचं मराठी...