मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, ३० जून, २०२५

द्वैत -भाग १

 


१ - जुलै - २०५६ (मुंबई)

"अनिकेत, अमेरिकेतील ह्या महत्वाच्या प्रोजेक्टसाठी तुला मनःपुर्वक शुभेच्छा ! मला खात्री आहे की तू यशस्वी होऊनच परतशील !"  वांद्रा कार्यालयात आपल्या व्यवस्थापकाच्या ह्या शब्दांकडं अनिकेतचे फारसं लक्ष नव्हतं. आपल्याला विमानतळावरून वैदेहीला न भेटताच परस्पर अमेरिकेला जावं लागतंय ह्याची खंत त्याला बहुदा जाणवत असावी. "धन्यवाद जॉन !" म्हणत त्यानं जॉनच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. लगोलग केबिनमधून बाहेर पडत त्यानं वैदेहीला फोन लावला. "ठीक आहे रे, अनिकेत! मला सवय आहे तुझ्या अशा अचानक ठरणाऱ्या ट्रिपची! मी राहीन व्यवस्थित दोन आठवडे ! तू तुझी काळजी घे !" वैदेही रागावली तर अनिकेतला दडपण येत असे, पण अशा प्रसंगी ती रागावली नाही ह्याचं त्याला अधिक दडपण येई !

अनिकेतने अमेरिकेला पोहोचताच वैदेहीला मेसेज करून आपण सुखरूप पोहोचल्याचा संदेश पाठवला. त्याच्या प्रोजेक्टचे स्वरूप गोपनीय असल्यानं दिवसातून एखादाच मेसेज किंवा फोन करता येईल ह्याचा अंदाज त्यानं वैदेहीला देऊन ठेवला होता. 

३ - जुलै - २०५६ (सॅन दिएगो )

चॅन आणि अल्बर्ट आपल्या तयारीच्या अंतिम टप्प्यात होते. वर्षभर अनेक चाचण्या केल्या तरी डिजिटल अनिकेत भारतात विमानानं सुखरूप पोहोचेल ना, तिथं कार्यालयात आपल्याला हवी असलेली कामगिरी पार पाडेल ना ह्या गोष्टींचं त्यांना दडपण आलंच होतं. त्याहूनही अधिक दडपण होतं ते वैदेहीला अनिकेतच्या ह्या रूपाविषयी काही संशय येणार नाही ना ह्याविषयी !

७ - जुलै - २०५६ (दादर मुंबई)
अडीच वाजता घराची बेल वाजली आणि वैदेही दचकून जागी झाली. इतक्या रात्री कोण आलं असणार हा विचार तिच्या मनात आला. अनिकेत घरात नसल्यानं अगदी सावध राहायला हवं हे ही तिनं स्वतःला बजावलं. पीप होल मधून दरवाजाबाहेर अनिकेत आहे हे पाहताच तिची उरलीसुरली झोप उडाली. "अनिकेत, तू आणि इथं कसा काय?" दरवाजा उघडता उघडता ती जवळजवळ ओरडलीच. "अग वैदेही शेजारी जागे होतील ना? मी सारं काही तुला समजावून सांगतो. प्रोजेक्टमध्ये बराच गोंधळ झाला आहे, त्यामुळं मला तातडीनं परतावं लागलं. आताही मला तासभर काम करत बसावं लागेल. तू झोप आता. आपण सकाळी बोलूयात! " अनिकेतने एका दमात सारं काही सांगून टाकलं. "ह्याचं काही जगावेगळंच असतं! " असं स्वतःशीच पुटपुटत वैदेही झोपी गेली. 

सोफ्यावर काम आटपून दमलेला अनिकेत तिथंच झोपी गेला. सकाळी नऊ वाजता त्याला जाग आली तेव्हा घरात अगदी सामसूम होती. "वैदेही गेली कुठं" असा विचार करत अनिकेतने घरात एक फेरी मारली. शेवटी त्यानं भ्रमणध्वनी हातात घेतला तेव्हा त्याला वैदेहीचा संदेश दिसला. "सॉरी अनिकेत, तुला झोपेतून उठवायला मला जीवावर आलं ! मी जातेय ऑफिसला. आपण संध्याकाळी बोलूयात !" अनिकेत आश्चर्यचकित झाला होता. मोजक्या वेळात बरीच कामं आटोपायची होती आणि वैदेहीचं असं अचानक जाणं त्याच्या प्लॅन मध्ये बसणारं नव्हतं !
(क्रमशः ) 

रविवार, २२ जून, २०२५

भावनिक बुद्ध्यांक !



 

आयुष्यात एका वळणानंतर मनुष्याच्या जीवनातील संपत्ती,  नुसता बुद्ध्यांक (IQ) ह्यांचं महत्त्व अग्रस्थानावर कायम राहत नाही. काही सन्माननीय अपवाद वगळले तर ह्या वयात तुम्ही काहीतरी नेत्रदीपक करून दाखविण्याची शक्यता मावळू लागलेली असते. पस्तिशी - चाळिशीनंतर कुठंतरी आयुष्यातील उभारीचा काळ संपल्याची जाणीव मनात डोकावू लागते. मग सुरु होतो आपल्या जीवनाचा, भोवतालच्या परिस्थितीचा एका वेगळ्या दृष्टिकोनातून आढावा घेण्याची धडपड.  ह्या संदर्भातील काही मुद्दे.  

१.   ह्या वयातील व्यावसायिक, वैयक्तिक जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात. आपण स्वतःच्या हुशारीवर, श्रीमंतीवर सर्व काही निभावून नेऊ शकतो हा अट्टाहास चुकीचा ठरू शकतो. त्यामुळं माणसं जोडून ठेवायला हवीत. आपली तत्त्वं आणि माणसं जोडून ठेवण्याची गरज ह्यातील सुवर्णमध्य साधता यायला हवा. तत्त्वांशी विशिष्ट प्रमाणाबाहेर केलेली तडजोड  संवेदनशील माणसाला त्रासदायक ठरू शकते. इथं आपल्या भावनिक बुद्ध्यांकाची कसोटी लागते. त्रासदायक अशी तडजोड काही केल्यांनतर त्या परिस्थितीतून किती झटकन तुम्ही बाहेर येऊ शकता हे तुमच्या भावनिक बुद्ध्यांकावर अवलंबून असते. 

२. व्यावसायिक, वैयक्तिक जीवनात तुमची कर्तव्यं असतात. ह्या कर्तव्यांना संबंधित अशा सर्व घटनांवर आपल्याला पूर्ण लक्ष द्यायचं असतं. एकलव्य बनायचं असतं. पण त्याच वेळी तुमच्या जीवनात घडणाऱ्या इतर घटनांमध्ये तुमची उपस्थिती, तुमचा सक्रिय सहभाग असतो. आपला दिवस, सप्ताह, महिना ह्यांचं एका काल्पनिक कागदावर चित्र आखून कर्तव्यं आणि त्या पलीकडील असलेल्या आयुष्याला त्यावर योग्य ते स्थान देणं हे तुमच्या भावनिक बुद्ध्यांकाचं महत्वाचं काम !  हे चित्र योग्य कालावधीनंतर बदलत राहतात. 'और क्या ऐहदे वफा होते हैं, लोग मिलते हैं जुदा होते हैं' प्रकार घडत राहतात. 

३. हल्ली बरीच माणसं आयुष्यात काहीच घडलं नाही की निराश होतात. ह्या निराश होण्यासाठी काहीच न घडण्याचा  कालावधी अगदी काही तासांपासून सुद्धा सुरु होऊ शकतो. इथं आपले संस्कार कामी येऊ शकतात. गॅजेटपासून तुम्ही जितकं दूर राहाल तितकं तुम्हांला स्वत्व गवसेल आणि एकदा का स्वत्व गवसलं की नैराश्यापासून दूर राहायला तुलनेनं सोपं जाईल. आपल्या शहरातील मोकळ्या जागांचा अभाव हा मोठ्या चिंतेचा विषय तो ह्याच कारणास्तव! ह्या अभावामुळं लोक घरात कोंडून घेऊ पाहताहेत किंवा महामार्गावर गाड्या घेऊन वाहतूककोंडीत भर घालीत आहेत. 

४. आयुष्यात दीर्घकालीन आणि तात्कालिक ध्येयं असतात. त्यातही तुमची वैयक्तिक आणि संघटनेची ध्येयं असतात. सतत बदलणाऱ्या भोवतालच्या परिस्थितीत सर्वांना सोबत घेत जाऊन ह्या ध्येयांच्या विविध छटांना न्याय देण्यासाठी आवश्यक असणारा गुणधर्म म्हणजे भावनिक बुद्ध्यांक ! 

५. आयुष्याच्या उत्तरार्धात सर्वशक्तिमानाशी मिसळून जाण्याची प्रक्रिया जमेल तितकी लवकर सुरु करण्याची प्रगल्भता म्हणजे तुमचा भावनिक बुद्ध्यांक. ह्यासाठी देवांचे नामस्मरण करणे, स्वाभिमानाला योग्य ठिकाणी मुरड घालणे, सखोल वाचनात स्वतःला झोकून देणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. 

६. गावात वास्तव्य करणाऱ्या लोकांचा भावनिक बुद्ध्यांक पाहून मी नेहमीच अचंबित होत आलो आहे. जीवनातील विविध घटनांकडे तटस्थपणे पाहण्याची प्रगल्भता ह्यातील बऱ्याच लोकांकडे असते. निसर्गाची असलेली जवळीक ह्यात मोठा हातभार लावत असावी असा माझा कयास. म्हणूनच पोस्टमध्ये एका डेरेदार वृक्षाचं छायाचित्र! पोस्टशी अजिबात संबंध नसणारी छायाचित्रं पोस्टमध्ये बिनधास्त जोडून देणे ही माझी सवय !

कालच्या वसई भेटीत घरच्या जाणकार मोठ्या लोकांसोबत केलेल्या चर्चेचा ह्या पोस्टमध्ये मोठा सहभाग आहे. 

गुरुवार, १२ जून, २०२५

So what ..अर्थात तर मग काय ?





आधुनिक काळातील मला उमगलेल्या काही गोष्टी !

१.  हल्ली बरीच माणसं, राष्ट्रं अधिकाधिक महत्वाकांक्षी बनताहेत. माणसांच्या महत्वाकांक्षांचा उगम नक्की कुठं झाला आहे हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतो. पण बऱ्याच वेळेला आपली विचारप्रक्रिया भरकटत चालली आहे हे जाणवल्यानं मी हा प्रयत्न मी सोडून देतो. 

२. माणसानं महत्वाकांक्षी असणं चांगलं. प्रगतीसाठी ते आवश्यकच आहे. फक्त ध्येयापर्यंत मार्गक्रमणा करताना आपण जे काही त्याग करतो, ज्या माणसांना गृहित धरतो / दुखावतो त्याची जाणीव असणं आवश्यक आहे. तो एक विचारपूर्वक घेतलेला निर्णय असावा. 

३. ध्येय प्राप्तीनंतर त्याचा आपल्याला कोणत्याही बाह्य घटकांच्या मदतीशिवाय निखळ आनंद व्हायला हवा.  आपल्या आनंदासाठी इतरांच्या कौतुकाची, दाद मिळण्याची अपेक्षा नसावी. आपल्या तोंडावर कौतुक करताना काही खोचक वाक्यं, शब्द वापरण्याची सवय काही जणांना असते. मनुष्यजातीची ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे ह्याची जाणीव ठेवावी.  कोणीही किती मोठी प्रगतीची शिखरं गाठली तरी so what हा प्रश्न विचारला जाणार हे अपरिहार्य आहे. 

४. चाळीस, पन्नाशीनंतर माणसं विचित्र वागु लागली आहेत. मी ही वेगळाच वागतो. आपण वेगळं वागतोय हा संदेश आपल्या मेंदूनं आपल्याला द्यावा ह्याची सूचना मेंदूला द्यावी. आपल्याला हे जाणवु देणारी माणसं भोवताली असतील तर आपण सुदैवी आहात. फक्त अशा माणसांनी प्रतिक्रिया दिल्यावर त्यांना पुढील प्रतिक्रिया देण्यासाठी परावृत्त करेल अशी आपली प्रतिक्रिया नसावी. 

५. मुद्दा क्रमांक चार मुळे आपण आयुष्यभर ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्या माणसांपासून काही घटनांमुळं आपण दुखावलं जाण्याची शक्यता वाढीस लागली आहे. अशावेळी खंत न बाळगता शांतपणे बाजूला व्हावं. आपल्या दैनंदिन, कार्यालयीन कामात व्यस्त करून घ्यावं. जसं त्यांनी आपल्याला दुखावलं असं आपल्याला वाटतं तसंच आपण त्यांना दुखावलं असं त्यांना वाटत असावं ही शक्यता ध्यानात घेऊन गप्प बसावं. 

६. जिथं आपल्या मताला किंमत नाही तिथं व्यर्थ / फुकाची गडबड करू नये. 

७. मर्यादित कार्यक्षेत्रात सक्रिय असणाऱ्या लोकांचा आत्मविश्वास दृढ असतो, त्याला दैनंदिन दिवसात तडा जाईल असं काही घडत नसतं. त्यामुळं त्याच्या नादाला लागू नये. सुसरबाई तुझी पाठ मऊ सांगून गप्प बसावं. 

८. समाजातील एकमेकांविषयीचा विश्वास, आस्था झपाट्यानं लयाला जाऊ लागली आहे. ह्यासाठी कदाचित मुद्दा क्रमांक एक कारणीभूत आहे. आपल्या पूर्वजांनी ह्या युगाला कलियुग म्हटलं त्यामागं हे मुख्य कारण असावं. 

कालच वसईतील ज्ञानी माणसांनी 'जो पुरुष घरात शांत बसू शकतो तो समाधानी, त्याच्या जीवनात समस्या कमी!' असा संदेश पाठवला. ह्या संदेशाचे अनुकरण करत ऋतूकाळाप्रमाणे निसर्गात निर्माण होणाऱ्या हिरव्या भाज्या, डाळ, भात आणि मोजक्या वेळा सामिष आहार घेऊन सुखी जीवन जगावं! 

बुधवार, ४ जून, २०२५

वेडात इंग्लिश खेळाडू झाले सायकलस्वार !


मध्यंतरी युरोपातील एका शहरात सायंकाळी नदीतून पोहत घरी जाणारे नागरिक पाहून मी हैराण झालो होतो. दोन तीन दिवसांतच मला मी मुंबईतील नदीतून पोहत घरी येत असल्याचं स्वप्न पडलं.  हडबडून जागा झालो, बराच वेळ बेचैन होतो. शेवटी वेळ न पाहता स्नान केलं तेव्हा कुठं झोप लागली. 

आज सकाळी वर्तमानपत्र उघडताच अनेक खळबळजनक बातम्या वाचायला मिळाल्या. त्यात लंडनच्या वाहतूककोंडीत अडकल्यानं इंग्लिश खेळाडूंनी लाईम बाईक्स ह्या भाड्यानं सायकली देणाऱ्या यंत्रणेच्या सायकली वापरून ओव्हल मैदान गाठल्याची मनोरंजक बातमी होती. वेस्ट इंडिजचा संघ मात्र बसमध्येच बसून राहिला. त्यामुळं त्यांना मैदानावर पोहोचण्यास उशीर होऊन नाणेफेक सुद्धा उशिरानं झाली. ह्या निमित्तानं माझ्या मनात आलेले काही विचार !

१.  आधुनिक क्रिकेट खेळाडूंना रस्त्यावर आत्मविश्वासानं सायकल चालवता यायला हवी. ह्यात केवळ आपल्याच देशात नव्हे तर जगातील कोणत्याही देशात स्थानिक वाहतुकीचे नियम पाळून सायकल चालवता यायला हवी. 

२. लाईम बाईक्स ह्या कंपनीत ज्यावेळी इंग्लिश कर्णधार हॅरी ब्रुक ह्यानं "मला जरा चांगल्या पंधरा सायकली भाड्यानं हव्या आहेत" असा भ्रमणध्वनीवरून फोन केला असेल त्यावेळी तो फोन घेणाऱ्या स्वागतकक्षातील मनात कोणकोणते विचार आले असतील ह्यावर एक मोठा लेख लिहून होईल. हॅरीने तासाभरासाठी ह्या पंधरा सायकली नोंदविताना दरांमध्ये घासाघीस केली असेल का हा बाळबोध भारतीय विचार माझ्या मनात आला. तरी सध्या बेन स्ट्रोक संघात नसल्यानं अधिक दणकट सायकल द्या असं सांगण्याची वेळ हॅरीवर आली नसावी. 

३. वेस्ट इंडीज संघ मात्र बिचारा बसमध्येच बसून राहिला. सर्वप्रथम माझ्या मनात विचार आला तो म्हणजे अमेरिकेच्या सानिध्यात असल्यानं ते रस्त्याच्या उजव्या बाजूनं वाहनं चालवीत असतील. त्यामुळं रस्त्याच्या डाव्या बाजूनं सायकली चालविण्यासाठी योग्य तयारी नसल्यानं त्यांनी बसमध्ये बसून राहणं पसंत केलं असावं असं मला वाटलं. पण ते ही इंग्लिश वसाहतीचा भाग असल्यानं ते ही रस्त्याच्या डाव्या बाजूनं वाहनं चालवितात असं माहिती मायाजालाने सांगितल्याने हा सिद्धांत मागे पडला. जेव्हा केव्हा शाई होप भेटेल तेव्हा त्याला नक्कीच हा प्रश्न मी विचारेन. 

४. आता लेखातील मुख्य कल्पनाविलास! ह्या कल्पनेवर मी भविष्यात चित्रपट बनविणार. तोवर कोणी चौर्यकर्म करून असा चित्रपट बनवू नये ही आशा. भारतीय संघ वानखेडेवरील क्रिकेट सामन्यासाठी ताज हॉटेलमध्ये राहत असतो. दुपारी अडीच वाजता सुरु होणाऱ्या सामन्यासाठी साडेअकरा वाजता बसमधून निघालेल्या भारतीय संघाची बस अशीच वाहतूककोंडीत सापडते. तात्काळ लिंबूपाणी ह्या ताशी शंभर रुपये भाड्यानं सायकली देणाऱ्या कंपनीला गौतम गंभीर फोन करतो. त्यांच्याशी घासाघीस करून ताशी नव्वद रुपयांपर्यंत तो दर खाली आणतो.  पहिल्या दोन सायकली बसजवळ पोहोचताच रोहित आणि विराट, गिल आणि राहुलवर दादागिरी करून त्या सायकलीवर बसतात. विराटने आपण सायकलवरुन वानखेडेवर जात आहे हे कळविल्यानं तो सायकल व्यवस्थित चालवेल की नाही हे पाहायला अनुष्का आपली सायकल घेऊन तात्काळ तिथं पोहोचते. ते तिघे जरी हेल्मेट घालून रस्त्यावरून मार्ग काढत पुढे पुढे जात असले तरी रस्त्यावरील नागरिक त्यांना लगेचच ओळखतात. लगेचच डझनभर न्युज चॅनेलला ही बातमी कळल्याने त्यांचे प्रतिनिधीसुद्धा लिंबूपाणी कंपनीतर्फे सायकली घेऊन तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करीत असतात. एव्हाना भाडं ताशी दहा हजार रुपयांपर्यंत गेलं असतं. पुन्हा एकदा वाहतूककोंडीत सापडल्यानं रोहित, विराट, अनुष्का हताश झालेले असतात. इतक्यात एक उमदा तरुण विनू त्यांच्या मदतीला धावून येतो आणि गल्लीबोळातील रस्त्यातून वानखेडेला पोहोचविण्याची ऑफर देतो. अनुष्का लगेचच हो म्हणते. ह्या गल्लीबोळातील रस्त्यावरून जाताना एका गल्लीत स्थानिक दोन संघात टेनिस बॉलने सामना चाललेला असतो. तेथील फलंदाजी करणाऱ्या संघाला जिकंण्यासाठी एक षटकात पंचवीस धावांची आवश्यकता असते. त्यांचा कर्णधार स्थानिक दादा असतो. रोहित आणि विराट ह्यांनी एक षटक फलंदाजी करून आपल्या संघाला जिंकून दिलं तरच पुढे जाऊ देण्यात येईल अशी तो अट घालतो. एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेत अनुष्का त्या दोघांना हो म्हणण्यास भाग पाडते. आता ते दोघे फलंदाजीला जाण्यासाठी निघतात. परंतु रस्त्याच्या मध्यभागी असणाऱ्या पिचवर पोहोचताच त्या दोघांमध्ये बाचाबाची सुरु होते.  सर्वजण धावत धावत त्यांच्याजवळ पोहोचतात. महत्प्रयासाने त्यांना बाचाबाचीचे कारण कळतं. पहिला स्ट्राईक कोणी घ्यायचा ह्यावर त्या दोघांमध्ये एकमत होत नसतं. पुढं काय होतं ते जाणून घेण्यासाठी तुम्हांला माझा आगामी चित्रपट प्रसिद्ध होईपर्यंत थांबावं लागेल!   

द्वैत -भाग ३

९ जुलै २०५६ (सॅन दिएगो ) अनिकेतला खरं तर स्थळ आणि वेळेचं भान ठेवायला कठीण जायला हवं होतं. पण तैलबुद्धीचा अनिकेत दमला भागला असला तरीही महत्प्...