२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय लिहायचं ह्याविषयी काहीच ठरवलं नाही.
१. आयुष्यातील एका विशिष्ट टप्प्यावर कोणत्याही व्यक्तीस ढोबळमानानं तीन प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.
अ. पालकांविषयीची जबाबदारी
ब. अपत्यांविषयीची जबाबदारी
क. व्यावसायिक जबाबदारी
माझ्या कार्यालयातील मला सतत मार्गदर्शन करणाऱ्या व्यवस्थापकाने ह्याविषयी मोलाचा सल्ला दिला. ह्या तिन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांना वेगवेगळ्या कप्प्यांत विभागणे अत्यावश्यक असते. ज्यावेळी आपण कोणतीही एक जबाबदारी पार पडत असतो त्यावेळी दुसऱ्या जबाबदारीविषयीचे विचार कटाक्षानं दूर ठेवावेत. काहीसं भावनाशून्य माणसासारखं वागावं लागतं पण पर्याय नसतो.
२. तुम्ही कितीही प्रयत्न करा, वर्षभरात काही वेळा तुम्ही काही मोठ्या व्यावसायिक, वैयक्तिक घोडचुका करणारच. ह्या घोडचुका करणारे आपण कसे मूर्ख आहोत ह्याविषयी विचार करण्यापेक्षा ह्यातून लवकर कसं बाहेर येता येईल ह्याचा विचार करणं इष्ट राहील. आपण त्या परिस्थितीत तसे का वागलो / बोललो; तसा निर्णय का घेतला ह्याविषयी विचार करावा. त्यामागील आपली विचारसरणी, आपलं व्यक्तिमत्व ह्याविषयी शांतपणे चिंतन करावं. ह्यात हळूहळू जमेल तितका बदल घडवत राहावा.
३. कोणतेही महत्वाचं काम करताना आपण आपल्या सर्वोत्तम शारीरिक, मानसिक स्थितीत असायला हवं. त्यामुळं अशा व्यावसायिक बैठकीच्या वेळी आपल्याला आवश्यक अशी झोप घेणं, आपल्याला झेपणारा आहार घेणं, आपली मनस्थिती चांगली ठेवणाऱ्या लोकांशी संपर्क ठेवणं / ती बिघडवू शकणाऱ्या लोकांशी संपर्क टाळणं ह्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं.
४. आपल्या वैयक्तिक, व्यावसायिक जीवनातील महत्वाच्या व्यक्ती कोणत्या हे नक्की ठाऊक असावं. ही संख्या मर्यादित असावी. ह्या व्यक्तींना नक्की काय आवडतं, काय नाही हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. जमेल तितकं त्याप्रमाणं वागावं.
५. मला आयुष्यातील सर्वात आनंद देणारी गोष्ट - झाडांना, दुर्वा ह्यांना दररोज पाणी देणं. त्यांना येणारे अंकुर, कळ्या ह्यांचं निरीक्षण करावं. अशा झाडांवर येणारा एखादा इवलासा पक्षी जेव्हा आपण फवाऱ्यानं छोटी आंघोळ घातलेल्या झाडावरील जलबिंदू छोट्या चोचीनं टिपतो तो सुवर्णक्षण !
६. मला हे सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या चांगल्या कामगिरीनं आनंदित होणं किंवा दारुण पराभवानं निराश होणं ह्या भावनांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवण्यात मी यश मिळविलं आहे. भारतीय क्रिकेटपटूंच्या वैयक्तिक दैदिप्यमान कामगिरीचे आकडे किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील त्यांचे सर्वोच्च मानांकन हे सर्व काही झुट (हा शब्द मुद्दाम वापरला) आहे.
७. जर तुम्ही ९५% आहार हा घरी बनविलेला घेत असाल, रात्री साडेसातपर्यंत भोजन घेत असाल तर वैद्यकीय चाचण्यांपासून दूर राहणं इष्ट ! त्या चाचण्यांमधून नक्कीच काहीतरी निष्पन्न होत राहणार.
८. आपण सर्वजण स्वतःच्या प्रेमात पडलेलो असतो. ह्यात काही वावगं नाही. पण ह्याचा आपल्या वागण्यात कुठं अतिरेक होतोय का ह्याची जाणीव होणं आवश्यक आहे. ही जाणीव असल्यावर जाणीवपूर्वक हा अतिरेक करायचा असेल तर करावा. काही लोकांना ह्या अतिरेकाच्या परिणामांविषयी चिंता न करण्याची चैन परवडू शकते. आपण त्यातले आहोत का ह्याची जाणीव असावी.
(बहुतेक क्रमश: पण नक्की नाही !)