१. मनःस्वाथ्यासाठी लोक खरोखर संघर्ष करताना दिसताहेत. मी सुद्धा करतोय. माझा संघर्ष वेगळा आहे, तुमचा वेगळा असेल. जीवनातील एका क्षणी आपल्याला त्या क्षणापर्यंत ज्या गोष्टींसाठी आपण संघर्ष केला त्या गोष्टींतील काही प्रमाणातील निरर्थकता जाणवू लागते. मग आपण जीवनमार्ग नव्यानं रेखाटू इच्छितो. आपल्या जबाबदाऱ्या, चाकोरीबाहेरील निर्णय घेण्यासाठी लागणारी धमक वगैरे घटक आपल्या पुढील प्रवासाची दिशा ठरवतात.
२. आमच्या क्षेत्रात 'Decision Engine' नावाचा एक प्रकार असतो. त्या बापड्याला सर्व माहिती पुरवली की तो आपल्याला एक निर्णय देतो जसे की ह्या ग्राहकाला कर्ज द्यायचं की नाही, द्यायचं झाल्यास किती द्यावं की निर्णय घेण्यासाठी अधिक माहितीची विनंती करावी. आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात सुद्धा असंच एक किंवा काहींच्या डोक्यात अनेक 'Decision Engine' असतं / असतात.अगदी सोप्या सोप्या गोष्टी जसं की कुठं काय बोलावं, लिहावं इथून सुरु होणाऱ्या निर्णयापासून ते कार्यालयातील सर्वात मोठ्या आर्थिक परिणाम होऊ शकणारे निर्णय घेण्याचं काम हे Decision Engine (DE) करत असते. प्रगल्भ व्यक्तींकडं गोष्टींच्या क्लिष्टतेनुसार वेगवेगळी DE असावीत असा मला संशय आहे.
प्रत्येक व्यक्ती आपल्या डोक्यावर अनेक जबाबदाऱ्या घेऊन वावरत असते. कोणत्याही दिवशी, महिन्यात, वर्षात आपण ठरवलेली सर्व कामं पूर्ण होण्याची शक्यता शून्य असते. परंतु प्रत्येक दिवस, महिना, वर्ष ह्यांच्या आरंभी समोरील कामांचा प्राधान्यक्रम ठरविणं, त्यात वेळोवेळी योग्य फेरफार करणं आवश्यक आहे. ह्यासाठी तुमच्या त्या DE ची प्रगल्भता निर्णायक भूमिका बजावते.
कार्यालय असो की घर, आपली जी भूमिका आहे त्या भूमिकेला अनुसरून योग्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करता यायला हवं.
तुमच्या मेंदूत किती Decision Engines आहेत, ती भरकटलेली आहेत का वगैरेची जाणीव करून घ्या. माझं तसं ठीकठाक आहे असं मला वाटतंय. मी रात्री घरी परत येताना फक्त पूर्ण झालेल्या कामांचा विचार करून आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो.
फक्त एक ते ऑनलाईन बुद्धिबळ खेळण्याचं २०२१ सालापासून लागलेलं व्यसन गेले एक वर्ष दूर ठेवलं होतं, ते परत सुरु झालंय!!
३. हल्ली लोकांना दुःखी राहणं अजिबात झेपत नाही असं मला वाटू लागलंय. दुःखापासून दूर पळण्यासाठी मदिराप्राशन हा एक मार्ग लोक वापरतात. त्यासोबत अवतीभोवती विविध कार्यक्रम, पार्टी ह्यांचे आयोजन करून त्यात मग्न राहण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून दुःखाचा विसर पडावा किंवा चांगलं वाटण्यासाठी नवीन कारणं मिळावीत. माझं तरी म्हणणं आहे की दुःखी असणं ह्यात काही वावगं नाही. जीवन हा शक्यतांचा खेळ आहे. दुःखापासून, समस्यांपासून काही काळासाठी दूर पळण्यासाठी आपण ज्या उपायांचा वापर करत आहोत ते उपाय भविष्यात नवीन दुःख तर निर्माण करणार नाहीत ना ह्याचा निर्णय तुमच्या Decision Engine ला घ्यायला लावा.
जानेवारी महिन्यात महिलावर्ग हळदीकुंकू कार्यक्रमाचं आयोजन करतात. वर्षअखेरीस लागून असलेल्या सुट्टीचा काळ संपल्याचे दुःख विसरण्यासाठी हे कार्यक्रम आयोजित केले जातात अशी मला शंका आहे.
४. तीस चाळीस वर्षांपूर्वी ज्या गोष्टी अगदी साध्या पद्धतीनं पण त्या गोष्टींच्या मूळ हेतूला धक्का न पोहोचवता सादर केल्या जात, त्याच आता उगाचच धांगडधिंगाणा करत सादर केल्या जातात. ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे दूरदर्शनच्या कृष्णधवल युगात सादर केले जाणारे संगीताचे कार्यक्रम! फक्त आणि फक्त गाण्याच्या मूळ गाभ्यांकडं लक्ष केंद्रित करून हे सादर केले जात असत. आता कुठंतरी सादरीकरण आकर्षक करण्याच्या नादात दर्जाकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होत असावं असं वाटत राहतं.
५. आमच्या कार्यालयात एक गोष्ट पाळण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येकानं स्वतःच्या धोरणात्मक विचारांसाठी, क्लिष्ट आज्ञावली लिहिण्यासाठी सलग दोन-तीन तास राखून ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. ही कामं करण्यासाठी तुम्हांला "झोन" मध्ये जाणं आवश्यक असतं. त्यामुळं स्वतःही उगाचच बैठकीमध्ये गुंतवून घेऊ नये आणि दुसऱ्यांना सुद्धा गुंतवू नये. वैयक्तिक आयुष्यात सुद्धा आपला वेळ जपता यायला हवा. इथं योग्य प्रकारे नाही म्हणायला शिकणं ही गोष्ट आत्मसात करता यायला हवी. योग्य कारणासाठी नाही म्हणणं हा काही गुन्हा नव्हे हे ध्यानात घ्या!
६. कार्यालय असो की घर, कोणत्याही संवादातून आपल्याला कोणता निर्णय अपेक्षित आहे ह्याची तो संवाद सुरु करण्याआधी जाणीव असावी. तो निर्णय सर्वसमावेशक पद्धतीनं घेता यावा ह्यासाठी चर्चेला योग्य दिशेनं वळण देता यायला हवं. ही प्राथमिक पातळीवरील कला बहुसंख्य लोकांकडे नसते. त्यामुळं सर्वत्र गोंधळ माजलेला दिसतो.
७. आयुष्यात आनंदाची वा दुःखाची घटना घडली असता अगदी टोकाची प्रतिक्रिया न देण्याचा प्रयत्न करावा. Time Machine च्या आधारे साधारणतः पाच वर्षे पुढे जाऊन ह्या घटनेचे त्याकाळी परिणाम किती प्रमाणात असतील ह्याचा विचार करून मगच संयत प्रतिक्रिया द्यावी.
(कदाचित क्रमश: पण बहुतेक नाही !)
सुंदर लेखन
उत्तर द्याहटवा