मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८

MTG - विहंग विहार





आपण भारतीय आपल्या परंपरा विसरु लागलो आहोत आणि नको त्या परंपरा निर्माण करण्याच्या मागे लागलो आहोत. जसे की पावसाळी सहल म्हटली की टी-शर्ट, जीन्स, फ्लोटर्स असा पेहराव परिधान केला पाहिजे.  परंतु या रुढ होत असलेल्या पद्धतीला छेद देण्यासाठी अखिल भारतवर्षात काही महान व्यक्तिमत्व अस्तित्वात आहेत. परवाच्या पावसाळी सहलीत चक्क साडी नेसून सुगंधाताईंनी भारतीय संस्कृतीप्रति आपलं कर्तव्य पार पडलं. त्यांनी आपल्या दबावामुळे मंगलताई गाडगीळ-मांजरेकर  यांनासुद्धा साडी नेसण्याची सक्ती केली होती. अशाप्रकारे आमच्या सहलीची सुरुवात अत्यंत अनपेक्षित वातावरणात झाली. 

सहलीसाठी बोरिवली येथुन पाचजण येणं अपेक्षित होते. ज्यांच्या येण्याजाण्याच्या वेळेवरून लोकांनी घड्याळे लावावेत असे संदेश भाऊ यांनी रात्री आपण सकाळची सहा वाजून 40 मिनिटांनी सुटणारी लोकल पकडणार असल्याचे घोषित केले. संदेशभाऊ यांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ! त्यामुळे संदेशभाऊंच्या शब्दांच्या धाकाचा परिणाम म्हणून पाटील कुटुंबीय अत्यंत धावपळ करीत सहा वाजून चाळीस मिनिटांनी सुटणारी लोकल पकडते झाले. त्यावेळी त्यांच्या पूर्ण डब्यामध्ये ते दोघेच होते. त्यामुळे फोटोसेशन करण्यास त्यांना सुवर्ण संधी मिळाली. 

वसई गावातून येणाऱ्या सर्व सहभागी लोकांमध्ये प्रचंड गोंधळाचे वातावरण होते. बस पेट्रोलपंपावरून, तामतलाव आणि त्यानंतर पापडी तलाव मार्गे स्टेशनला येणार अशी स्पष्ट सूचना असूनदेखील काही खट्याळ / आळशी मंडळी रमेदी येथे बस किती वाजता येणार याची चर्चा करत होते.  भारतातील लोकांना जबाबदारीचे भान कधी येणार देव जाणे!! अशा प्रकारच्या प्रचंड गोंधळाला तोंड देत बस एकदाची निघाली. तोपर्यंत अंबाडी रोड येथे वर्तक आणि पाटील कुटुंबीय हजर झाले होते. आता बस प्रचंड वेगाने दातिवरे  गावाच्या दिशेने  पळू लागली.   MTG  ग्रुपमधील सदस्यांनी  हल्लीच्या काळात  कोकण, लोणावळा,   तेलंगणा अशा विविध ठिकाणी प्रवास केला असल्यामुळे त्यांनी  त्या त्या ठिकाणाहून  खाऊचे पदार्थ आणले होते.  पाटील कुटुंबीयांना आपण आणलेल्या खाऊचे आकर्षक फोटो ग्रुपवर टाकून वातावरण निर्मिती करण्याची  सवय आहे. प्रत्यक्षात त्यातील सरासरी कमाल बारा टक्के खाऊ या ग्रुपमधील सदस्यांपर्यंत पोहोचतो असे इतिहास सांगतो. परंतु त्या फोटोंच्या प्रभावाखाली येऊन बाकीची भोळी मंडळी मात्र आपण  भेट दिलेल्या ठिकाणाहून  शिस्तीत  खाऊचे अनेक पुडे आणतात . त्यामुळे उज्वलदादा यांनी आणलेली कराची बिस्किटे, हेमंतसर यांनी आणलेली लोणावळ्याहून चिक्की, राजेश मोदगेकर यांनी आणलेले वैविध्यपुर्ण लाडू ह्या खाऊवर मंडळींनी हात मारला. या सर्व प्रकारांमध्ये ज्या खाऊची मोठ्या प्रमाणात जाहिरात झाली होती ती पाटील कुटुंबीयांनी आणलेली बिस्किटे मात्र त्यांच्या बॅगमध्ये राहिली होती!!

संदेशभाऊ यांच्या पत्नी आणि पुत्र यांची  MTG सोबत ही पहिलीच भेट असल्यामुळे ओळखीचा कार्यक्रम झाला! संदेशभाऊ ह्यांच्या चेहऱ्यावर ह्यावेळी प्रचंड तणाव दिसत होता. राजेश यांचा आज वाढदिवस होता आणि बालक याने आठवड्यात आधी आपला वाढदिवस साजरा केला होता. त्यामुळे थोड्यावेळातच  केक कुठे कापावा याविषयी चर्चेला उधाण आले होते. मावशीने साडी नेसल्यामुळे दिसेल देऊळ तिथे गाडी थांबवा  अशी ती घोषणा देत होती. परंतु ड्रायव्हरला राजेश आणि वर्षा यांनी तिकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले होते. जाणकार प्रशांत पाटील हे आपल्या या भागातील करामतीच्या कहाण्या सर्वांना ऐकवत होते.  त्यानंतर ढेकाळे गाव कुठे, वांद्री  प्रकल्प कोठे हे प्रश्न विचारून बालक त्यांना सतावत होते.  या दरम्यान मावशी आणि तिच्या असंख्य मैत्रिणी यावर तिची मुलाखत घेण्यात आली. आपल्या विविध मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठी तिने विविध मैत्रिणींशी मैत्री जोडली आहे. त्यामुळे संध्याकाळी तेलकट पदार्थ खाण्यासाठी एक,  दत्तानी मॉलमधील टुकार चित्रपट पाहण्यासाठी दुसरी अशा तिच्या मैत्रिणींची यादी न संपणारी आहे. परंतु यातील एकाही मैत्रिणीने आपल्या जीवावर उदार होऊन तिला पोहायला शिकवले नाही हा खरतर मैत्रीधर्माचा घोर अपमान आहे!! 

बसने वरई फाट्यावर वळण घेतलं आणि निसर्गरम्य हिरवागार परिसर सुरु झाला. तेथील नदीवरील पुलावर बस थांबवुन नास्ता आणि फोटोसेशन करण्यात आले! सुगंधाताई ह्यांनी प्रायोजित केलेल्या स्वादिष्ट बटाटवडे आणि जिलब्या ह्यांचा मंडळींनी आस्वाद घेतला. पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं विचार करुन बस एका बाजुला आणि मौशीसकट मंडळी दुसऱ्या बाजुला असे फोटो काढण्यात आले. बिस्किटे अजूनही पाटलांच्या बॅगेत होती. 

त्यानंतर बस दातिवऱ्याच्या दिशेने प्रस्थान करती झाली.  मध्ये एक छोटासा घाट लागला आणि बसच्या बॅलन्सचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. एव्हाना मंडळी गाती झाली होती. बर्थ डे बॉय राजू यांनी किशोर कुमारची यादगार गाणी गायली. त्यांनतर सुरु झालेले उखाणे आणि गाणी ह्यांची पातळी खट्याळ, अतिखट्याळ आणि अतिअतिखट्याळ या वर्गात मोडणारी होती. वाटेत दिसलेल्या ओम टी या हॉटेलात मिळणाऱ्या लज्जतदार  चहाच्या आठवणी प्रियाताई पाटील ह्यांनी सर्वांना सांगितल्या. घाट संपला होता. आजूबाजूला दिसणाऱ्या तलाव, तळी आणि दलदल या सर्वांना पाहून मौशीला पोहण्याची येणारी खुमखुमी आणि तिचा तो उत्साह पाहून भयभीत होणारे सर अशा सर्व घटनांमधून प्रवास करीत आम्ही डोंगरे गावी पोहोचले. ज्या महान पुरुषावरून आपल्या गावाचे नाव पडले तो पुरुष आपल्या गावाच्या जवळून प्रवास करतोय हे समजताच ते गाव आणि गावकरी कृतकृत्य झाले.  

आमचं रिसॉर्टला आगमन झालं. रिसॉर्टला जावयांचे लाल गालिचा अंथरून, सुवासिनीद्वारे आरतीच्या ओवाळणीने स्वागत होईल अशी जी काही चित्रे सरांनी मनात रंगवली होती. त्याला अनुसरून काहीच घडले नाही.  त्यामुळे निमूटपणे दिलेली कुपनं घेऊन सर्व मंडळी नाश्त्याच्या दिशेने कूच करू लागली.  नाश्त्यामध्ये पोहे, मिसळपाव आणि अंडाभुर्जी होती. परंतु कांद्याच्या वाढीव प्रमाणामुळं त्याला कांदाभुर्जी म्हणावं ह्यावर सर्वांचं एकमत झालं. 

नाश्त्याचा मनसोक्त आस्वाद घेऊन मंडळी रिसॉर्ट्सचा परिसर धुंडाळण्यासाठी निघाली. सर्वप्रथम बोटिंगचा आनंद घेण्यात आला. मौशी आणि मंडळी एका बोटीत बसले आणि त्यांनी मनसोक्त बोटिंग केलं.  त्यांची बोट मध्येच दलदलीमध्ये सापडल्याने काही वेळ संकटाची परिस्थिती निर्माण झाली होती. राजू आणि वर्षा मोदगेकर यांना केवळ दोघांची बोट मिळाल्यामुळे ते झपाट्याने संपूर्ण परिसर बोटिंग करत होते.  हा इथं कालवा असून तिथं समुद्राच्या भरतीच्या पाण्याला आत घेण्यात आले आहे. त्यामुळे सुरूच्या झाडांच्या परिसरात नौकानयनाचा एक चांगला अनुभव मिळतो. बोटिंग केल्यानंतर मंडळींची दृष्टी आगगाडीच्या दिशेने वळली. मावशीने या गाडीचे फोटो आधीच इंटरनेटवरून शोधून काढले होतेआणि त्यात बसण्याचा अट्टाहास धरला होता.  जवळपास सतरा-अठरा मंडळी त्या गाडीत बसली आणि आगगाडीने प्रस्थान केलं.  परंतु इतक्या मंडळींचे वजन बहुदा त्या गाडीला पेलवलं नाही आणि गाडी रुळावरुन घसरली.  आगगाडीचा मोटरमन तात्काळ खाली उतरला आणि त्याच्यासोबत पाच-सहाजण सुद्धा खाली उतरले. खरेतर फक्त एकाला उतरण्याची गरज होती परंतु काही कारणास्तव पाच-सहा जण उतरले. रुळावर आणल्यानंतर काही वेळ आगगाडी विरुद्ध दिशेने खाली गेली. ह्यामध्ये काही वजनदार व्यक्तींचा हात होता. परंतु मोटरमनने परिस्थिती नियंत्रणात आणून आगगाडीला पुढच्या दिशेने कूच करण्यात यश मिळवले. बाकीचे का उतरले ते मला अजूनही समजलं नाही परंतु विनू मात्र आपल्या मनातील दिलवाले दुल्हनिया मधील पळत्या गाडीमधून  नायिकेला हाताने आत घेण्याच्या प्रसंगाची रंगीत तालीम करत होता. गाडी प्रतिताशी पाच किलोमीटर वेगाने धावतआहे  आणि विनु सात किलोमीटर वेगाने धावतो हे चित्र पाहण्यासारखे होते. विनू डब्याजवळ पोहोचला असता डब्यांमध्ये मावशी असल्याचे त्याला दिसले. त्यामुळे त्याने डब्यात जाण्यास नकार दिला. परंतु वसईचा सलमान खान म्हणून ओळखला जाणाऱ्या विनुने शाहरुखच्या गाण्यावर परफॉर्मन्स करावा ते मात्र मला अजिबात आवडलं  नाही. 

त्यानंतर मंडळींची पावले स्विमिंगपूलकडे वळली. स्विमिंगपूलमध्ये सूर मारू नये अशी स्पष्ट सूचना असतानादेखील वसईतील प्रसिद्ध सुरवीर सर आणि त्यांच्या मागोमाग बाकीची मंडळी यांनी स्विमिंग पूलमध्ये सूर मारून पोहण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. एव्हाना ड्रामेबाज मौशी पंजाबी ड्रेस मध्ये आली होती. तिनेसुद्धा स्विमिंग पूलमध्ये उतरण्याचा आपला अट्टाहास पूर्ण केला. त्याप्रसंगी तलावातील पाण्याची पातळी ३० - ४० % कमी झाली . पुढील एक-दोन तास ती तरणतलावामध्येच होती. या अनुभवानंतर तिची पाण्याची भीती काहीशी कमी झाली असावी. त्यानंतर पोहण्याची शर्यत सुद्धा घेण्यात आली आणि एका अटीतटीच्या लढतीमध्ये बालक यांनी सरांवर मात केली. त्या दोघांच्या वयातील फरक लक्षात घेता सरांचा हा प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे.  या शर्यती दरम्यान शेवटच्या पाच मीटर अंतरा मध्ये एक अनाहूत स्पर्धक पोहू लागला परंतु  राहुलने त्याला सुद्धा मागे टाकले. राहुलला भरघोस इनाम देण्यात आलं. 

त्या नंतर सर्व मंडळींनी आपल्या नृत्यकलेचे प्रदर्शन केले. भाऊंनी जे काही नृत्यकलेचे प्रदर्शन केले ते पुढील काही दशके तरी आमच्या लक्षात राहील. 





उज्वल दादा यांना तहान लागल्यामुळे त्यांनी स्विमिंग पूलच्या भोवताली असलेल्या नारळाच्या शहाळ्याचा आस्वाद घेण्याचे ठरवले. स्विमिंग पूलचे कर्मचारी त्यांच्या हातातील शहाळे पाहून काही काळ अचंबित झाले होते.  स्विमिंग पूल  मध्ये बाकीची मंडळी व्यस्त असताना जिज्ञासु मंडळींनी मात्र उज्वलदादा यांच्या ज्ञानदान कार्यक्रमात सहभागी होणे पसंत केले.  त्यामध्ये सहभागी झालेल्या सर्वांना जीवनातील विविधांगी सत्याविषयी उज्ज्वल यांनी मार्गदर्शन केले. उज्ज्वल ह्यांना सायंकाळचे विमान पकडायचे असल्याने त्यांच्यासाठी लवकर भोजनाची व्यवस्था करावी हे मला सांगण्यात आले. 

रिसॉर्ट एकदम भरगच्च झालं होतं. जवळजवळ साडे बारा वाजले तरीदेखील मुंबईहून मंडळी येत होती. आणि त्यामुळे साधारणतः पाऊण वाजेपर्यंत लोकांचा नाश्ता चालू होता. जगदीश आणि हेमंत या दोन भावांचे (रिसॉर्टच्या मालकांचे) नियोजन कौशल्य वाखाणण्यासारखे आहे. या सर्व मंडळींना पाऊण वाजेपर्यंत नाश्ता देऊन सुद्धा त्यांनी आमची एक वाजता दुपारचं जेवण देण्याची विनंती मान्य केली. दोन लायन (राजेश आणि जगदीश) एकत्र बसुन गप्पा मारत असल्यानं उज्जु डिअर काहीसा चिंताग्रस्त झाला होता. 

जेवणाचा मेनू नेहमीप्रमाणेच अप्रतिम होता. नॉनव्हेजमध्ये चिकनचे दोन प्रकार आणि मटनाचा प्रकार होता. ग्रामीण भागातील मटणाला आणि चिकन स्वतःची एक विशिष्ट लज्जतदार चव असते. ती यात पुरेपूर उतरली होती. तिथं खास गावाकडे मिळणाऱ्या भाकऱ्यासुद्धा होत्या. त्या सर्व जेवणाचा आस्वाद घेऊन पोट तुडुंब भरलं आहे असं वाटत असतानाच जाणकार प्रिया पाटील यांनी वाल वांग्याची भाजी अप्रतिम असण्याची आणि ती आम्ही ट्राय करावी असा आग्रह धरला. खरोखरच त्या नॉनव्हेज पदार्थाच्या जेवणानंतरसुद्धा या वाल वांग्याची भाजीची चव आमच्या जिभेवर  बराच काळ रेंगाळत  राहिली. जेवताना उज्ज्वल दादा ह्यांच्या सोबत बसलेले संदेशपुत्र संचित हे गेम खेळत आहेत हे पाहुन उज्ज्वलदादा ह्यांनी त्यांना मौल्यवान उपदेश केला. 

पोहून, नाचून आणि तट्ट जेवून दमलेली मंडळी काही काळ विश्रांतीसाठी रूममध्ये आली. बाकी सर्व आले तरी संदेश भाऊ मात्र अजूनही जेवत असावेत असा सर्वांचा कयास होता. परंतु एखादा माणूस इतका वेळ कसा काय जेऊ शकतो याविषयी लोकांनी शंका व्यक्त केली आणि त्यामुळे ते कोणत्या दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतला नसावेत ना असा संशयही व्यक्त करण्यात आला. परंतु लोकांचा संशय चिंतेत परिवर्तन होण्याच्या आधीच संदेश भाऊ परतले. 

सरांच्या चिरतारुण्याचे रहस्य असणारी वामकुक्षी घेण्याचा निर्धार मंडळींनी हाणुन पाडला. मग मात्र सरांनी मला, विनुला आश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्यावरील लिहिलेल्या लेखाप्रति धन्यवादाची भावना म्हणुन आम्हांला भेटवस्तु देण्यात आल्या. मी धन्य धन्य झालो तर आपल्याबाबतीत असं काही खरोखर घडु शकतं ह्यावर विश्वास न बसल्यानं विनु बराच वेळ स्वतःला चिमटे काढून घेत होता. 

त्यानंतर पुढील काही काळ संदेश भाऊ यांनी आपल्या विजेच्या कमी बिलाची आणि आपल्या गॅस गिझरच्या बिलाची कहाणी विषद केली. महिन्याचं विजेचं बिल पाचशे रुपयाच्या आत आणि  दोन महिन्याचे महानगर गॅस बिल केवळ 116 रुपये येऊ शकते हे ऐकुन सर्व मंडळी आश्चर्यचकित आणि त्यासोबत दुःखीसुद्धा झाली. आजपासुन मी घरी स्वयंपाक करणार नाही अशा धमक्या सुद्धा देण्यात आल्या. 

बाकी इतका मोठा श्रोतावर्ग समोर उपलब्ध असल्याचं पाहुन ब्लॉगर मोकाट सुटले होते आणि त्यांनी बरीच गडबड केली. परंतु एक कजाग ह्या विशेषणाचा त्यांनी समोर बसलेल्या मातांसाठी केलेला वापर सोडुन बाकी काही दुर्धर प्रसंग ओढवला नाही. त्यांची नजर मग संचितकडे वळाली आणि नवी पिढी -जुनी पिढी ही चर्चा रंगली. ह्यानंतर मंडळी समुद्रकिनारी गेली. इथून विरार आणि अर्नाळा किल्ला ह्यांचं दर्शन होतं. 

चहापानानंतर परतीचा प्रवास सुरु झाला. परतीच्या प्रवासात पाटील कुटुंबियांनी आणलेल्या बिस्किटांचा बसमध्ये सर्वांनी आस्वाद घेतला. 
राजेशला दादरहुन दुर पल्ल्याची गाडी पकडायची असल्यानं त्यानं सफाळे इथं उतरणं पसंत केलं. राजु उतरल्यावर वर्षा विरहात असताना मौशीने मंगलला राजुच्या सीटवर बोलावलं. पुढील तास दीडतास वर्षाकडं लक्ष न देता त्या दोघी हसतखेळत गप्पा मारत होत्या. ह्या चर्चेत विस्मय, हर्ष , दुःख ह्या सर्व भावनांचं मिश्रण दिसुन येत होतं. परंतु वर्षाला त्यांनी दिलेली वागणुक काहीशी असंवेदनशील होती ह्याची राजुने एव्हाना नोंद घेतली असावी. 
वाटेत वास्ता (बांबूचं कोवळं खोड)आणि ताज्या भाज्या पाहुन मंडळी बस थांबवून खाली उतरली आणि गृहकृत्यदक्ष नवऱ्यांनी भाजी घेतली. 

संध्याकाळच्या त्या रम्य वेळी MT ग्रुपच्या एका दीर्घकाळ लक्षात राहण्याजोग्या सहलीची सांगता झाली होती. आयोजनात मोलाचा पुढाकार घेणारी सर्व मंडळी आणि दूर पल्ल्यावर जायचं असुनसुद्धा इथं आलेले उज्ज्वल आणि राजेश ह्यांचं खास आभार !!

(तळटीप - पोस्टच्या आरंभीचे चित्र जागतिक दर्जाचे छायाचित्रकार राहुल ठोसर ह्यांनी घेतलं आहे. )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...