मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१८

Link Road Outage



मुंबईतील वाहतुकीने सध्या अत्यंत भयावह स्वरुप धारण केलं आहे.  सायंकाळी साधारणतः तुम्ही सात वाजता मुंबई विमानतळावर उतरलात तर बोरिवलीसारख्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्हाला पश्चिम द्रुतगती महामार्गावरुन साधारणतः अडीच ते तीन तास इतका वेळ लागतो.  सध्या सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील दीर्घ पल्ल्याचे धावपटू हेच अंतर कापण्यासाठी किती वेळ घेतात हे पाहणे मनोरंजक ठरेल. 

आता वळुयात ते मला भेडसावणाऱ्या कार्यालय ते घर या प्रवासाविषयी! याच विषयावर आधीच दोन पोस्ट लिहुन झाल्या आहेत. परंतु आजचा विषय काहीसा वेगळा आहे. मुंबईमध्ये वेगवेगळ्या मेट्रोचे काम चालू असल्यामुळे त्या कामानिमित्त बऱ्याच ठिकाणी लिंकरोड सारखे महत्त्वाचे रस्ते अरुंद झाले आहेत. विशेषतः जिथं जिथं मेट्रोचे भलेमोठे खांब (Columns) उभारण्यात येत आहेत, तिथं त्या खांबाभोवतीचे barricades उभारण्यात आल्यामुळे तिथं रस्ता अत्यंत अरुंद होतो आणि बॉटलनेकसारखी परिस्थिती निर्माण होते. आता अशा घटकांच्या बाबतीत आपण काहीच करु शकत नाही.  पण वाहतुक कोंडीला कारणीभुत ठरणारा अजुन एक घटक म्हणजे या लिंक रोडवर पडलेले खड्डे!  हे खड्डे जिथं जिथे आहेत तिथे वाहन चालक आपल्या गाडीचा वेग मंदावतात आणि त्यामुळे प्रत्येक खड्ड्याच्या ठिकाणी वाहनांची भलीमोठी रांग लागलेली दिसून येते आणि ह्यामुळं वाहतुकीचा एकंदरीतच पुर्ण खोळंबा होतो. 

सध्याच इतकी भयावह परिस्थिती आहे तर येणाऱ्या गणेशोत्सवाच्या वेळी नक्की काय होईल याची कल्पना सुद्धा करवत नाही. आपल्या प्रिय गणपतीबाप्पाचा प्रवास सुखरुप होणं आवश्यक आहे.मुंबईत दीड दिवसाचे,  पाच दिवसांचे, गौरीसोबत जाणारे, दहा दिवसांचे अशा प्रत्येक गणेश विसर्जनाच्या दिवशी मोठाल्या मिरवणुका काढल्या जातात. ह्यावेळी 
वाहतुकीची प्रचंड कोंडी होण्याची शक्यता आहे. 

आता नेहमीप्रमाणे मी इथं माझ्या व्यावसायिक जीवनातील एका उदाहरणाचा आधार घेणार आहे.  आमच्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात छोटे मोठे बदल आपल्या सिस्टीम मध्ये टाकण्याचे असतील तर त्यावेळी तुमची सिस्टीम तुमच्या End User ना उपलब्ध ठेवून हे बदल घडवून आणता येतात. परंतु ज्यावेळी एखादा मोठा बदल घडवून  असतो त्यावेळी मात्र काही वेळ सिस्टीम तुमच्या End User  अनुपलब्ध करुन तुमच्या सिस्टीम मध्ये बदल घडवून आणणे आवश्यक असते. याला outage असे म्हटले जाते. यामध्ये दोन हेतू साध्य होतात तुमच्या बदल घडून आणणाऱ्या टीमला संपूर्ण सिस्टीमचा पूर्ण ताबा मिळतो आणि त्यावेळी End User याचा अनुभव कसा असेल याविषयी चिंता करण्याची गरज उरत नाही. 

आता मी जे काही सुचवणार आहे तेसुद्धा याच धर्तीवर आहे. आपल्या मुंबईतील महत्त्वांच्या रस्त्यांचे गणेशोत्सवाच्या आधी एखाद्या रविवारी outage घ्यावे आणि त्या रस्त्यावरील खड्डे आणि उंच-सखलपणा या सर्व गोष्टींचा कायमचा बंदोबस्त करावा. जिथं एखादा महत्त्वाचा रस्ता अचानक अरुंद होत आहे तिथं पाहणी करुन तज्ञांद्वारे परिस्थितीत काही सुधारणा करता येईल का ह्याचा विचार करावा! दोन समांतर रस्ते जसे की पश्चिम द्रुतगती मार्ग आणि लिंक रोड ह्यांचं एकाच वेळी outage घेऊ नये. ह्यावेळी फक्त वैद्यकीय आणीबाणीची वेळ असेल तरच ह्या रस्त्यांवर प्रवेश द्यावा.  हा उपाय जर  ५०% सुद्धा यशस्वी ठरला तर असंख्य मुंबईकरांचा वेळ आणि देशाचं इंधन वाचेल !!

आता तुम्ही म्हणाल की रविवारच्या दृष्टीने दिवशी कोणी बाहेर पडत नाही काय?  मला मान्य आहे की यातील काही रस्ते रविवारी बंद ठेवल्याने लोकांची गैरसोय होईल, परंतु आठवड्यातील बाकीच्या दिवसातील आपल्या सोयीसाठी ही गैरसोय सहन करावी असे माझे म्हणणे आहे.  आणि आपल्या देशातील काही परिस्थिती सुधारायची असेल तसे काही अन्य टोकाचे उपाय सुद्धा भविष्यात योजावे लागतील.  

आपले माननीय मुख्यमंत्री ही पोस्ट वाचतील आणि हा उपाय गणेशोत्सवाच्या आधी अमलात आणतील ही आशा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...